श्रीब्रह्मचैतन्य महाराजांची प्रवचने/५ एप्रिल

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

५ एप्रिल

संतांच्या संगतीचा परिणाम.


जडीबुटीवाल्याजवळ एक गोळी असते. ज्याच्या अंगात विष भिनले आहे अशा माणसाच्या जखमेवर ती गोळी नुसती ठेवतात. ती सर्व विष शोषून घेते. नंतर तिला धुतली की ती पूर्ववत्‌ होते. त्याचप्रमाणे सत्पुरूषाच्या संगतीत आपले पाप शोषून घेतले जाते, आणि पुनः तो सत्पुरूष स्वतः शुद्धच राहतो. सत्संगती मिळेल, पण ती टिकणे फार कठीण काम आहे. साधारणपणे ज्या विषयाची आपल्याला आवड असते तसलीच संगत आपण बघतो. मीच वाईट म्हणून मी वाईट लोकांची संगत धरतो. विषयात दोष नाही; म्हणजेच, नुसते विषय बाधक होत नाहीत, विषयी लोकांची संगत मात्र फार बाधक असते. संगतीने आपल्यावर बरावाईट परिणाम होतो. विषय मागूनही जो ते देत नाही, त्यांपासून परावृत्त करतो, तो संत. विषयतृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे, हा संतसंगतीचा परिणाम. ज्याची संगत केली असताना भगवत्प्रेम प्रकट होते तो संत जाणावा. अशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी. विषयाची गोडी फार; पण तो सुटावा असे वाटू लागले म्हणजे भजनपूजन करणार्‍यांची संगत धरावी. वाईट विचार मनात आले की नामाची जोड ठेवावी. आपला सर्वाठायी भगवद्‌भाव वाढू लागला म्हणजे संतांची प्रचीती येते. भगवंताच्या लीला पाहणार्‍यांनाच खरा आनंद मिळतो. म्हणून संत नेहमी भगवंताविषयीच सांगत असतात. ते जे गातील तो संगीतातला रागच समजावा. तुकारामबुवा नुसते 'विठठ्‌ल विठठ्‌ल' म्हणत, पण त्याची गोडी आपल्या गाण्यामध्ये देखील नाही. खरोखर संताना आपल्याविषयी इतकी कळकळ असते, आपल्याला ती कळतही नाही. संत आपल्या हिताचे सांगतात, पण आपले मन विषयात वावरत असल्याने त्यांचे बोलणे आपल्या मनात पूर्णपणे ठसत नाही. औषध कडू असले तरी रोग झाल्यावर आपण ते घेतोच ना ? मग प्रपंचातल्या व्याधींनी त्रस्त होऊनही आपण संतांच्या हितकारक बोलण्याकडे का दुर्लक्ष करावे ? ज्याला भगवंताचे अधिष्ठान आहे त्याचे कडक बोलणेसुद्धा कुणाला लागणार नाही. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे, कारण 'सर्व ठिकाणी मीच आहे' ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. आईपण जसे सगळीकडे सारखे, त्याचप्रमाणे सर्व संत एकच भाषा बोलतात. संतांनी मिळविलेले पद मिळविण्याचे साधन आपणही करतो; पण त्यांचे करणे निःसंशय असते, तर उलट आपण नेहमी शंकाच व्यक्त करीत असतो. डोळयांत खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात; त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो. त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड, मऊ, हितकारक असते; तसे आपण बोलावे.


PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg