शोधयंत्राचा शोध - भाग ७ - पुन्हा इतिहास

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

[१]आपण ह्या आधीच्या तीन भागांत शोधयंत्राच्या तीन मुख्य भागांचा, म्हणजे संचारक, सूचिकार आणि दर्शनीभागाचा परिचय करून घेतला. आल्टाव्हिस्टा, ह्या डिजिटल इक्विपमेंट कॉर्पोरेशन मधून (डेकमधून) तयार झालेल्या शोधयंत्राने आधुनिक शोधयंत्राचा पाया कसा रचला ते बघण्यासाठी. त्याही आधीच्या भागात मी लिहिले होते, की "आल्टाव्हिस्टे रचिला पाया, गूगल झालासे कळस". ह्या उक्तीचा अर्थ शोधण्याच्या मोहिमेवर आपली नियुक्ती झाली होती असे समजा हवे तर.

आपण ह्या भागात पुन्हा शोधयंत्राच्या इतिहासाकडे वळणार आहोत. डेकने तयार केल्या अल्फा ह्या सूक्ष्मप्रक्रियकाचा (मायक्रोप्रोसेसरचा) उपयोग आणि खप ह्या 'विश्वजालाच्या खुळामुळे' वाढावा, म्हणून डेकच्या व्यवस्थापकांनी लुई मोनिए आणि माईक बरोज ह्या दोघा संगणक वैज्ञानिकांना उत्साहित केले शोधयंत्राच्या विकसनासाठी. त्यांनी डिसेंबर १५, १९९५ ला हे आल्टाव्हिस्टा नावाचे शोधयंत्र स्थापित करून आणि विश्वजालवाचकांना फुकट उपलब्ध करून देऊन देखील आज आपल्याला शोधयंत्र म्हटले की आल्टाव्हिस्टा आठवत नाही, पण गूगल आठवते. का? आज लुई मोनिए आणि माईक बरोज, हे दोघेही डेकमध्ये काम करत नाहीत. गूगलमध्ये काम करतात. का? ह्याचे कारण की शोधयंत्राचे विश्वजालात इतके महत्वाचे स्थान असेल, हे तेव्हाच्या डेकच्या निकटदृष्टीरोगी (मायोपिक) व्यवस्थापकांच्या लक्षात आले नाही!

आपल्या संस्थेतल्या तंत्रज्ञांनी जे तंत्रज्ञान विकसीत केलेले आहे, त्याचे महत्व समजून घेण्याइतकी व्यवस्थापकांची बुद्धिमत्ता असती, तर प्रत्येक संस्था मायक्रोसॉफ्ट झाली असती. हे जरा विषयांतर होते आहे, परंतु तंत्रज्ञानाविषयी लिहिताना तंत्रज्ञानाच्या व्यवस्थापनाविषयी जर लिहिले नाही तर त्याला काहीही अर्थ उरणार नाही. तंत्रज्ञानाइतकेच त्याचे व्यवस्थापन जाणकार असायला हवे. एका उदाहरणातून स्पष्ट करतो. आज आपण विंडोज ही प्रणाली सर्रास वापरतो. संगणकाला जोडलेल्या एका पडद्यावर अनेक आज्ञावली एकाच वेळी काम करून आपले कार्य़ वेगवेगळ्या खिडक्यांत दाखवू शकतात, ही कल्पना पहिल्यांदा कुणाला आली असावी असे तुम्हाला वाटते? कुणी म्हणतील मायक्रोसॉफ्ट! कारण ते सुरुवातीपासून, म्हणजे ते संगणक वापरत असल्यापासून, मायक्रोसॉफ्ट विंडोज हीच आज्ञावली वापरत आले आहेत. चूक! आता तिशीत असलेले लोक ऍपलचे नाव सांगतील. तेही चूक. लोकप्रिय झालेल्या पहिल्या स्वीय संगणक प्रणालीत जरी ऍपलचे नाव असले, तरी त्यांनी हा शोध नाही लावला. हा शोध लावलाय, तो झेरॉक्स (होय, तेच. झेरॉक्स मशीनवाले.) ह्या संस्थेच्या पालो-अल्टो मधील संशोधन संस्थेत काम करणाऱ्या संशोधकांनी. आपण आज काहीही विचार न करता सर्रास वापरतो, तो संगणकाचा मूषक (माऊस). ह्याचाही शोध झेरॉक्स पार्कमधल्या (पार्क म्हणजे पालो-अल्टो रीसर्च सेंटर, ह्या संस्थेची आद्याक्षरे वापरून केलेले संक्षिप्त रूप) संशोधकांनी लावलाय. आपल्या कार्यालयातले संगणक एकमेकांना कसे जोडलेले आहेत ते बघा. म्हणजे झेरॉक्सच्या आणखी एका संशोधनाचा शोध लागेल. ईथरनेट. असो.

एवढे सगळे शोध आपल्या आज रोजच्या वापरात असताना देखील आपल्याला झेरॉक्स पार्कचे नाव मी सांगावे लागते, ह्यासारखे दुर्दैव कुठले? ह्याचे कारण ते संशोधन कमी दर्जाचे होते असे नाही. ते संशोधन कमी दर्जाचे असते, तर आपण ते वापरले असते का? ते संशोधन उच्च दर्जाचेच होते. पण तो दर्जा न कळणारे व्यवस्थापक (मॅनेजर्स, किंवा एक्झिक्यूटिव्ह्ज). त्यांनी एमबीए केले तेव्हा त्यांना संशोधनाचा दर्जा ओळखण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नसावे बहुतेक. त्यामुळे त्यांनी त्यांच्याच संस्थेत घडलेल्या संशोधनाला असा निम्न दर्जा दिला. आपल्या संस्थेचे मुख्य काम म्हणजे कागदावर लिहिलेल्या मजकुराच्या प्रती काढणे यापर्यंत मर्यादित ठेवले. पण आपल्या पीढीचे पुण्य थोर, की ह्या संशोधकांनी आपल्या शोधांना व्यवस्थापनाचा पाठिंबा मिळत नाही हे पाहून स्वत:च्या संस्था उभारल्या. त्यातूनच आपल्याला हे सुख भोगायला मिळतेय. उद्या एखादी आय आय एम अहमदाबाद सारख्या संस्थेतून एमबीए केलेली व्यक्ती तुम्हाला भेटेल (त्यांना सध्या लालूप्रसाद यादवांनी त्यांच्या संस्थेत प्रथम भाषण केल्याचा अभिमान असेलच) आणि कॉलर ताठ करून सांगेल, त्याला किंवा तिला विचारा, ह्या सगळ्या एमबीए व्यवस्थापकांनी असे चुकीचे निर्णय का घेतले म्हणून.

तर, तंत्रज्ञानाचे हे तथाकथित व्यवस्थापक कसे वाटोळे करतात हे आपण एका उदाहरणातून बघितले. तुम्हाला वाटत असेल, एवढा स्वत:ला संगणकतज्ञ म्हणवून घेणारा लेखक एका उदाहरणातून ह्या निर्णयाप्रत कसा पोहोचू शकतो? वाचकांनो, माझ्याकडे उदाहरणे भरपूर आहेत. ती इथे द्यायला जागा नाही. त्यामुळे फक्त एकच उदाहरण दिले. आणि आल्टाव्हिस्टाच्या संदर्भात, म्हणजे आपल्या मूळ विषयाच्या संदर्भात आणखी एक उदाहरण देणार आहे.

आल्टाव्हिस्टाच्या निर्मात्यांनी डेकच्या व्यवस्थापकांना आपल्या प्रयोगाविषयी सांगितले. ह्याच व्यवस्थापकांनी विश्वजाळात त्यांच्या अल्फा ह्या प्रक्रियकाची लोकप्रियता वाढवण्यास संशोधकांना सांगीतले होते हेही आपल्याला आठवतच असेल. पण आता ते काय निर्णयाप्रत पोहोचले बघा. ते म्हणाले, की आपली संस्था ही 'हार्डवेअरची' संस्था आहे. अशा प्रणाली आपण बाजारात आणल्या, तर 'हार्डवेअरची संस्था' अशी असलेली आपली ख्याती धुळीला मिळेल! आता बोला!

भिकेला लागलेली, पण तरीही 'आपण हार्डवेअरची संस्था' म्हणून शोधयंत्रासारखी सोन्याची कोंबडी मारून टाकणाऱ्या संस्थेला आपण काय म्हणणार? आपल्या शोधाविषयी अभिमान असणाऱ्या लुई आणि माईक ह्यांनी आल्टाव्हिस्टा हे शोधयंत्र आपल्या मातृसंस्थेच्या व्यवस्थापकांच्या इच्छेविरुद्धही काही काळ चालवलं. ते लोकप्रियही झालं. परंतु व्यवस्थापकच एखाद्या संस्थेला लागणारे अर्थसाह्य करत असतात. आल्टाव्हिस्टाला जेव्हा डेककडून मिळणारे अर्थसाह्य बंद करण्याचा व्यवस्थापकांनी निर्णय घेतला, तेव्हा अनायसे गूगल ही संस्था स्थापन झाली होती. त्यात लुई मोनिए आणि माईक बरोज आपसूक शिरले. नव्हे, गूगलच्या लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन ह्या संस्थापकांनी त्यांना बोलावूनच घेतले.

पण आपण ह्या इतिहासाच्या नादात फारच पुढे जातोय. गूगलच्या आधी शोधयंत्रातून पैसे कसे मिळवावेत हे जगाला ज्ञान देणाऱ्या 'इंकटुमी' ह्या संस्थेचा इतिहास आपण पूर्णपणे डावललाय ह्यात. तो इतिहास आणि इंकटुमीने केलेली क्रांती आपण पुढच्या लेखात पाहू.

[गृहपाठ: तंत्रज्ञान सोडून आपण व्यवस्थापनात कधी शिरलो ते आपल्याला कळलेच नाही या लेखात. त्यामुळे ह्या भागाचा गृहपाठ जरा वेगळ्या विषयावर असला, तर तुमचा काही आक्षेप आहे का? गूगल ह्या संस्थेची स्थापना अमेरिकेत झाली. त्याचा एक संस्थापक, सर्जी ब्रिन, हा अमेरिकेच्या शीतयुद्धातील प्रतिद्वंद्वी रशियाचा नागरीक होता. अगदी गूगलची स्थापना झाली तेव्हा देखील. आपल्या भारतात इतर देशांच्या नागरिकांनी अशा महत्वाकांक्षी संस्थांची स्थापना केलेली आहे का? कॉंग्रेस पक्षाच्या संस्थापकांपैकी सर ऍलन ह्यूम हे स्कॉटिश होते. तो पक्ष एक संस्था मानला, तर त्याला - किंवा त्याच्या सदस्य असलेल्या भारतीय नागरिकांना - आजवर ह्या संस्थेचा अगणित फायदा झालाय, जसा एका रशियाच्या नागरिकाने स्थापन केल्या संस्थेचा अमेरिकन नागरिकांनाच नव्हे तर साऱ्या जगाला झाला तसा. पण मी अशा अनेक संस्थांचा अमेरिकेच्या बाबतीत दाखला देऊ शकतो. उदाहरणार्थ जॉर्ज सोरोस, हे नाव शोधयंत्रातून शोधा. ते कुठल्या देशाचे नागरीक होते? त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांचा कुठल्या देशांना फायदा झाला? भारतात इतर देशांतील नागरिकांनी स्थापन केल्या संस्थांचा आपल्या देशांतील नागरिकांना फायदा झाला, तरी ती संस्था आपण फक्त देशाभिमानापायी तुच्छ लेखायची का? विचार करा.]