लंकेचें वर्णन व वृतांत
प्रि. भाटे यांची प्रवासवृत्त-माला
पुष्प नववें
लंकेचें वर्णन व वृत्तांत.
लेखक व प्रकाशक :
गोविंद चिमणाजी भाटे
डे. ए. सोसायटी पुणें हिचे सेवानिवृत्त तहाहयात सभासद
(सर्व हक्क स्वाधीन ठेविले आहेत.)
किंमत १॥ रुपाया
मुद्रक :
रा. रा. अनंत विनायक पटवर्धन, बी. ए.
आर्यभूषण प्रेस, भांडी पेठ, घर नं. ९३६।३
पुणे, नं. ४
₪ ₪ ₪ ₪ ₪
₪ ₪ ₪ ₪ ₪
प्रकाशक :
गोविंद चिमणाजी भाटे,
महाड, जिल्हा कुलाबा.

इचलकरंजी संस्थानचे अधिपति
श्रीमंत
नारायणराव बाबासाहेब घोरपडे,
इचलकरंजी संस्थानचे अधिपति,
स्वामींचे सेवेसीं
श्रीमंतांच्या सल्ल्याप्रमाणें व खास आश्रयानें
तयार केलेलें 'लंकेचें वर्णन व वृत्तांत' हे
पुस्तक त्यांच्या स्नेहांकित लेखकानें
सादर व सप्रेम अर्पण
केलें आहे.
गो. चि. भाटे.
हिंदुस्थानच्या उत्तर दिशेकडील नंदनवन- काश्मीरप्रांत- मीं सन १९१५ मध्यें पाहिलें व त्याचें वर्णनपर पुस्तक पुढे वर्ष दीड वर्षानें प्रसिद्ध केलें. तेव्हांच हिंदुस्थानच्या दक्षिण दिशेकडील नंदनवन- लंका बेट पाहण्याचे माझ्या मनांत होतें. तदनुरूप सन १९१८ मध्ये मी लंकेस जावयाचा बेत मुक्रर केला होता. पण त्याच सालीं विलिंग्डन कॉलेज स्थापन करण्याची कल्पना व योजना निघाली व त्या कामावर माझी नेमणूक झाली. त्या विलिंग्डन कॉलेजच्या कामांत माझ्या आयुष्याचें एक तप निघून गेलें व माझा लंका बेट पाहण्याचा बेत जागच्या जागींच राहिला.
पण गुदस्तसाली मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या कामांतून सेवानिवृत्त होऊन मोकळा होतों तोंच लंका बेट पाहण्याचा माझा फारा दिवसांचा बेत तडीस जाण्याचा अचानक योग आला तो असा. दोन वर्षाखालीं श्रीमंत नारायणराव बाबासाहेब इचलकरंजी संस्थानचे अधिपति हे आपल्या अंमलदारासह लंका बेट पाहण्यास गेले. त्या बेटाचा पूर्वेतिहास, त्या बेटाचें निसर्गरमणीयत्व व तेथली सद्यःस्थिति यांबद्दल त्यांचा फार अनुकूल ग्रह झाला. लंका बेटासंबंधींची मनोरंजक माहिती देणारें चांगलेसें पुस्तक मराठी भाषेमध्यें नाहीं तरी एखादें चांगलें पुस्तक प्रसिद्ध होणे इष्ट आहे असे त्यांना वाटलें. आपल्याला किंवा आपल्या बरोबर गेलेल्या अंमलदाराला कार्यबाहुल्यामुळे ग्रंथ तयार करण्यास सवड सांपडणार नाहीं असें ध्यानांत आणून व मी मोकळा असलेला पाहून श्रीमंतांनी लंकेचा प्रवास करून येऊन त्या संबंधी एक पुस्तक लिहिण्याची कामगिरी मजवर सोपविली व मी ती मोठ्या आनंदानें पतकरली. हल्लींचें माझ्या प्रवासमालेतील नववें पुष्प लंकेचें वर्णन व वृत्तांत हें मजवर टाकलेल्या कामगिरीचें मूर्त रूप होय. श्रीमंतांनीं प्रवासाला व पुस्तकप्रकाशनाला पैशाची उदार मदत केली हें सांगावयास नकोच.
लंकेमध्ये मी दोन सव्वा दोन महिने राहिलों. या पुस्तकाचा अर्धा अधिक भाग मी लंकेंत प्रवास करीत असतांनाच लिहिलेला आहे. परत आल्यावर व पुस्तक पुरें झाल्यावर मी त्यांतला बराच भाग श्रीमंतांना वाचून दाखविला. त्यांच्या सल्ल्याचा व सूचनांचा पुस्तकाचें अंतरंग सुधारण्यास फार उपयोग झाला. तरी पण या पुस्तकांत दिलेल्या माहितीच्या बिनचूकपणाबद्दल व त्यांत प्रदर्शित केलेल्या मतांबद्दल मी सर्वस्वी जबाबदार आहे.
| महाड, जिल्हा कुलाबा, | ||
| ता. १२ सप्टेंबर १९३४ | गो. चि. भाटे. | |
| गणेशचतुर्थी |
| प्रकरण | नांव | पानें |
|---|---|---|
| १ | लंकापुराणपरिचय | १-१२ |
| २ | लंकेचा दंतकथात्मक इतिहास | १३-२८ |
| ३ | लंकेंत पहिलें पाऊल: कोलंबो व रत्नपुर नगर | २९-५० |
| ४ | कँडी व पेरेडॅनिया | ५१-६५ |
| ५ | खडक देऊळ व खडक-किल्ला | ६६-७६ |
| ६ | बॅटिकोला व त्रिंकोमाली | ७७-९४ |
| ७ | लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत | ९५-११४ |
| ८ | जाफना अथवा नागद्वीप | ११५-१२८ |
| ९ | श्रीपादशिखर | १२९-१४० |
| १० | लंका बेटांतील दोन शीतल निवासस्थानें | १४१-१५६ |
| ११ | लंकेच्या आग्नेय टोकाकडील जुनी राजधानी | १५७-१६५ |
| १२ | लंका बेटाच्या दक्षिण किनाऱ्यावरील तीन शहरें | १६६-१७३ |
| १३ | पश्चिम लंकेच्या लोकवस्तीचें धावतें अवलोकन | १७४-१८२ |
| १४ | कोलंबोच्या उत्तरेचा लंकेचा पश्चिम किनारा. | १८३-१९० |
| १५ | कोलंबो निवासाचा अखेरचा आठवडा व देश प्रत्यागमन | १९१-१९८ |
| १६ | पोर्तुगीझ कारकीर्द सन १५०५ ते १६५६ | १९९-२०९ |
| १७ | डच कारकीर्द सन १६५६ ते १७९६ | २१०-२१४ |
| १८ | इंग्रज कारकीर्द सन १७९६ ते १८३४ | २१५-२१८ |
| १९ | लंकेची गेल्या शतकांतील स्थिति व सुधारणा | २१९-२२६ |
| २० | लंका बेट व हिंदुस्थान यांमधील संस्कृतिसाम्य | २२७-२२८ |

लंकापतेः संकुचितं यशो यत् । यत् प्रीतिपात्रं रघुराजपुत्रः ॥
स सर्व एवाद्यकवेः प्रभावः । न कोपनीयाः कवयः क्षितीन्द्रैः ॥
वरील प्रसिद्ध श्लोक बिल्हण कवीच्या विक्रमांकदेवचरित्राच्या प्रस्तावनेंतील आहे. आपल्या कविसांप्रदायाचें महत्त्व व सामर्थ्य दाखविण्याकरितां कवीनें सदरील श्लोक लिहिला असेल. पण वाल्मीकीच्या रामायणानें व त्यावरून केलेल्या इतर कवींच्या संस्कृत व प्राकृत काव्यांनी व कवनांनी राम-रावणांबद्दल कितीतरी बारिकसारिक, खऱ्याखोट्या व मुळाशी जुळत्या न जुळत्या गोष्टी हिंदु समाजांतील आबालवृद्धांस ठाऊक झाल्या आहेत. त्यांतल्या त्यांत जन्मापासून तों मरणापर्यंत रामाची खडान् खडा माहिती पुराणप्रिय लोकांस अवगत आहे. पण रावण व लंका यांबद्दल निश्चित माहिती फार थोडी आहे. इतकेंच नव्हे तर तिच्यासंबंधीं कितीतरी वादग्रस्त प्रश्न उपस्थित होऊन त्यांबद्दल विद्वानांमध्यें मतभेद आहे. उ. रावणाला दहा तोंडें व वीस वीस हातपाय होते; किंवा तो धिप्पाड व कुरूप पण माणसासारखाच एक तोंडाचा व दोन दोन हातापायांचा माणूस होता; त्याची लंका राजधानी हल्लीं ज्याला सिंहलद्वीप किंवा सीलोन म्हणतात त्याच बेटांत होती, किंवा दुसऱ्याच एखाद्या बेटांत होती; लंकाबेट हिंदुस्थानच्या दक्षिणेस होतें, किंवा विंध्यपर्वताच्या दक्षिणेस दक्षिणारण्यांतील एखाद्या दलदलीच्या प्रदेशांत होतें. या ग्रंथामध्यें सीलोन प्रत्यक्ष पाहून तेथल्या प्रेक्षणीय स्थळांचें वर्णन व विश्वसनीय कागदपत्रांवरून त्या द्वीपाचा पूर्ववृत्तांत व अर्वाचीन इतिहास देण्याचा विचार आहे. पण या प्रस्तावनारूपी पहिल्या प्रकरणांत खुद्द वाल्मीकि रामायणांत रामरावणांबद्दल व लंकेबद्दल काय माहिती मिळते तें पहावयाचें आहे. दुसऱ्या प्रकरणांत पाली भाषेत लिहिलेल्या महावंस व चूलवंस या दोन ग्रंथांमध्यें जो सिंहलद्वीपाचा दंतकथात्मक वृत्तांत बुद्धभिक्षूंनीं धार्मिक भावनेनें प्रेरित होऊन लिहून ठेविला आहे त्याचा सारांश देण्याचा विचार आहे.
सध्यां उपलब्ध असलेलें वाल्मीकि रामायण हे २४००० श्लोकांचें महाकाव्य आहे. त्याची भाषासरणी सोपी, साधी व सरळ आहे. वाल्मीकीच्या प्रतिभेचा प्रवाह अप्रतिहत आहे असें प्रत्ययास येतें. पण सध्यांचा ग्रंथ वाचीत चाललें म्हणजे मनुष्याला मधून मधून अडखळल्यासारखें होतें. कारण, पुनरुक्ति, परस्परविरोध व असंबद्धता हे तीन दोष सध्यांच्या रामायणांत पदोपदीं दिसून येतात. वाल्मीकीसारखा प्रतिभावान् कवि असे काव्यदोष आपल्या काव्यांत ठेवील हें मनाला पटत नाहीं. तेव्हां, वाल्मीकीचें काव्य लोकप्रिय झाल्यावर व तें या अफाट देशावर सर्वत्र पसरल्यावर हरिदास- पुराणिकांनीं आपल्या पदरची भर त्यांत टाकली असली पाहिजे असें वाटल्याखेरीज रहात नाहीं. तेव्हां सध्यांच्या उपलब्ध रामायणांत प्रक्षिप्त भाग बराच असावा असें म्हणणें प्राप्त आहे. तरीपण इतक्या काळानंतर मूळचें रामायण कोणतें व केवढे व प्रक्षिप्त भाग कोणते व केवढे हे एक मोठें कोडेंच होऊन बसलें आहे. या कोड्याचा उलगडा करणारी गुरुकिल्ली म्हणजे रामायणकाव्यांतील त्रिदोषचिकित्सा होय. रामायणकाव्यांतील उल्लेख केलेले तीन दोष ज्या तीन कारणसमुच्चयानें उत्पन्न झाले आहेत तीं कारणें अशीं. राम हा विष्णूचा अवतार असून त्यानें रावणाचा वध करण्याकरितां मनुष्यदेह धारण केला ही अवतारकल्पना हें प्रक्षिप्ताचें पहिलें कारण; दुसरें कारण मानवी मनाची अद्भुत गोष्टींबद्दल आवड व तदनुरूप लिहिण्याची कवीची प्रवृत्ति; व तिसरें कारण कवींचा अतिशयोक्ति अलंकाराकडे ओढा; तेव्हां अवतारावरील विश्वास, अद्भुताची आवड व अतिशयोक्तीकडे कल या तीन मानवी भावनांमुळें रामायणांत प्रक्षिप्त भाग आला. या प्रक्षिप्त भागामुळे पुनरुक्ति, परस्परविरोध व असंबद्धता हे तीन काव्यदोष रामायणांत उत्पन्न झाले. तेव्हां प्रक्षिप्त भाग वगळून वाल्मीकि रामायणांतील साध्या, सरळ व सहज कथेचा सारांश खालीलप्रमाणे देतां येईल.
आर्यावर्तामध्यें फार पुरातन काळीं गंगा-यमुनेच्या उत्तरेस कोसल नांवाचा देश होता. त्याची राजधानी अयोध्या नगरी शरयू नदीचे कांठी होती. तेथें दशरथ राजा राज्य करीत होता. त्याला तीन राण्या होत्या, पण वृद्धापकाळापर्यंत त्याला पुत्रसंतान नव्हतें. म्हणून त्यानें आपल्या पुरोहिताच्या सल्ल्यानें पुत्रकामेष्टि नांवाचा यज्ञ केला. त्यानें यज्ञांतील हविर्भागाचा अवशिष्ट आपल्या तीन राण्यांना खाण्यास दिला. लवकरच तिन्ही राण्या गरोदर राहून नवमासानंतर बाळंत झाल्या. थोरली राणी कौसल्या हिला राम हा पुत्र झाला. मधली राणी सुमित्रा हिला लक्ष्मण व शत्रुघ्न असे दोन जुळे मुलगे झाले व तिसरी आवडती राणी कैकेयी हिला भरत हा मुलगा झाला.
राम व लक्ष्मण हे जुळे भाऊ नव्हते; तरी पण त्यांची एकमेकांवर फार प्रीति जडली व ते जुळ्या भावासारखे वागत. कारण त्यांचे स्वभाव एकमेकांशीं जुळते होते. भरत व शत्रुघ्न या दोघांची जोडी जमली व त्यांच्या स्वभाव-सादृश्यामुळे तेही जुळ्या भावासारखे वागत. त्यांच्या दर्जाला योग्य असें सर्व प्रकारचे शिक्षण या राजपुत्रांना देण्यांत आलें. राम व लक्ष्मण यांची सर्व विद्येत फार हुशारी दिसून आली; विशेषतः धनुर्विद्येत तर त्यांनी अलौकिक प्राविण्य मिळविलें. शिक्षण पुरें होऊन राजपुत्र विवाहयोग्य झाले आहेत असें पाहून दशरथ राजानें त्यांच्या विवाहाचा विचार मनांत आणला. इतक्यांत् प्रख्यात विश्वामित्र ऋषि रामलक्ष्मणांचें धनुर्विद्यानैपुण्य ऐकून राजाकडे आले. त्यांनीं राजास विनंति केली कीं, आपण दहा दिवसांचा एक यज्ञ करीत आहों, त्या यज्ञाला राक्षस (रानटी अनार्य लोक) त्रास देतात, तरी आपल्या पराक्रमी रामलक्ष्मणास यज्ञरक्षणार्थ मजबरोबर द्यावें. राजानें प्रथमतः राजकुमारांस पाठविण्यास कां कूं केलें, पण शेवटीं तो कबूल झाला.
राम-लक्ष्मण विश्वामित्राबरोबर त्याचे आश्रमास गेले. तेथें त्यांनीं त्रास देणाऱ्या कांहीं राक्षसांना पिटाळून लावून व कांहींना ठार मारून यज्ञाचें उत्तम रक्षण केलें. यज्ञसमाप्तीनंतर विश्वामित्राने या दोन राजपुत्रांचा अलौकिक पराक्रम पाहून त्यांना जनक राजाच्या मिथिला नगरीस नेलें. विश्वामित्रानें जनक राजाला या राजपुत्रांचा परिचय करून दिला. रामाच्या पराक्रमाचें वर्णन करून हा तुमच्याजवळच्या प्रचंड धनुष्याला दोरी लावून त्यांतून बाण मारूं शकेल असें जनकाला सांगितलें. जनकानें मोठ्या कौतुकानें रामाला धनुष्यगृहांत नेलें. रामानें लीलेनें तें धनुष्य उचललें, तें वाकविलें, त्याला दोरी लावली व धनुष्य आकर्ण ओढून त्याला बाण लावला. रामाचा हा अलौकिक पराक्रम पाहून जनक राजाला फार आनंद झाला. आपली मुलगी सीता रामाला देण्याबद्दल व आपल्या भावाच्या मुली रामाच्या इतर भावांना देण्याबद्दल जनकानें इच्छा प्रदर्शित केली. विश्वामित्राला ही योजना पसंत पडली व तो म्हणाला, "दशरथ राजासही ही योजना आवडेल; कारण त्याचे मनांत मुलांचे विवाह करावयाचेच होते. तेव्हां आपल्या राजघराण्यायोग्य वधू मिळाल्यामुळे दशरथ नाकबूल जाणार नाहीं." विश्वमित्राचें हें म्हणणें ऐकल्याबरोबर जनकानें दशरथाला ती गोष्ट कळवून त्या सर्व मंडळीस मिथिलेस बोलाविलें. तदनुरूप दशरथ आपल्या लव्याजम्यानिशी मिथिलेस आला. तेथें सर्व राजपुत्रांचे मोठ्या थाटानें विवाहविधी उरकण्यांत आले. मग सर्व मंडळी अयोध्येस परत गेली. दशरथ राजानें आपला अतिवृद्धापकाळ झाला हें पाहून रामाला यौवराज्याभिषेक करण्याचा बेत केला व तदनुरूप समारंभाची सर्व व्यवस्था करण्यांत आली. कैकेयीच्या मनांत आपल्या भरताला राज्य मिळावें अशी गुप्त महत्त्वाकांक्षा होती म्हणून म्हणा किंवा कैकेयीची दूधदाई मंथरा हिच्या चिथावणीनें म्हणा, पण कैकेयीनें यावेळीं दशरथ राजाला त्यानें पूर्वी एकदां संकटांत असतां आपल्याला दिलेल्या दोन वरांची आठवण दिली व त्या वरांच्या पूर्ततेकरतां रामाला चौदा वर्षे वनवासास पाठवावें व भरतास यौवराज्याभिषेक करावा अशी मागणी केली. दशरथ राजाला अतोनात वाईट वाटलें, पण सत्यप्रतिज्ञ माणसाप्रमाणें कैकेयीच्या मागण्या त्याला नाकबूल करवतना. पण राजा फार शोकमग्न झाला व कैकेयीला नाना प्रकारें बोलूं लागला. रामाला ही बातमी कळली. म्हणून तो राजाच्या समोर आला व राजाला म्हणाला, "मला राज्याचा मुळींच लोभ नाहीं, तुम्ही खुशाल भरताला राज्य या, मी चवदा वर्षे वनवासास जाण्यास तयार आहे." भरत यावेळीं आपल्या मामाच्या घरीं गेला होता. बापाचें वचन पाळण्याकरितां राम लागलीच वनवासास जाण्याच्या तयारीला लागला. लक्ष्मण व सीता यांना ही गोष्ट कळल्याबरोबर तीं दोघेही रामाबरोबर वनवासास जाण्यास निघाली. त्या त्रिवर्गांनीं सर्वांचा निरोप घेऊन व लागलींच वनवासास योग्य अशीं वल्कलें परिधान करून अयोध्या नगरी सोडली. शरयूच्या पार ते गेले. नंतर ते गंगेच्या तीरास आले; तेथें त्यांना निषादांचा नायक गुह भेटला; त्यानें या त्रिवर्गांना गंगेच्या पार पोहोंचतें केलें. नंतर राम, लक्ष्मण व सीता चालतच चित्रकूट पर्वतानजीकच्या भारद्वाज आश्रमास जाऊन तेथें राहूं लागलीं. राम, लक्ष्मण व सीता ही त्रिवर्ग वनवासास गेल्यामुळे दशरथाचें दुःख अनिवार होऊन तो मृत्यु पावला. भरताला ही भयंकर हकीकत कळल्यामुळे तो अयोध्येस परत आला. त्याला आपल्या आईचें करणें मुळींच पसंत पडलें नाहीं. म्हणून तो सैन्य व लोक बरोबर घेऊन चित्रकूटास राम होता तेथें गेला. त्यानें रामास दशरथ वारल्याची बातमी सांगितली. "आतां तूंच राज्यांचा वारस व मालक आहेस तेव्हां तूं परत अयोध्येस चल", असे भरत रामास म्हणाला. "पण वडिलांना दिलेलें वचन त्यांच्या पश्चात्सुद्धां पाळणें माझें कर्तव्यकर्म आहे", असें राम म्हणाला व भरतासच राज्यावर बसण्यास त्यानें आग्रह केला. पण भरतही तितकाच निग्रही व न्यायप्रिय होता. त्यानें राज्यावर बसण्याचें नाकबूल केलें, पण राम वनवास संपून परत येईपर्यंत त्याच्या नांवानें व त्याचा प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार चालविण्याचे कबूल केलें. तेव्हां नाइलाजानें रामानें आपल्या पादुका भरतास देऊन त्यास परत अयोध्येस पाठविलें. भरताने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून आपण शेजारच्या नंदिग्रामीं राहून कोसल देशाचा राज्यकारभार चालू केला. चित्रकूटास राहिल्यास भरत वारंवार आपल्याकडे येण्याचा संभव आहे असें मनांत आणून रामानें दूर दंडकारण्यामध्यें जाऊन राहण्याचा बेत केला. अगस्त्य ऋषीनीं विंध्यपर्वत ओलांडून दंडकारण्यांत आश्रम स्थापिले होते. या अरण्यांत राक्षसांची जा-ये असून ते ऋषींच्या यज्ञयागास अडथळा आणीत. तेव्हां पराक्रमी राम-लक्ष्मण या अरण्यांत राहण्यास आल्यास यज्ञरक्षणास त्यांची मदत होऊन राक्षसांवर वचक बसेल असें जाणून अगस्त्य ऋषीनीं रामास गोदावरी नदीच्या तीरावर जनस्थान व पंचवटी हीं स्थानें राहण्यास योग्य आहेत असें सांगून तेथें जाऊन राहण्यास त्यांना सांगितलें. राम, लक्ष्मण व सीता हीं पायींच या आश्रमापासून त्या आश्रमास व मध्यें मध्ये तर वृक्षांच्या छायेंत विश्रांति घेत घेत गोदावरीच्या तटाका आली. तेथें लक्ष्मणानें त्रिवर्गाकरितां एक पर्णकुटिका बांधली व तेथें हीं त्रिवर्ग राहूं लागलीं. आसपासच्या ऋषींची राक्षसांच्या त्रासापासून त्यांनीं सुटका केली.
याप्रमाणें राम, लक्ष्मण व सीता यांचा वनवासांत असतांना सुद्धां बराच काळ सुखांत, समाधानांत व एकमेकांच्या सहवासांत गेला. पण एके दिवशीं रामलक्ष्मण मृगयेकरितां रानांत गेले असतांना व सीता पर्णकुटींत एकटी असतांना एक माणूस सीतेच्या पर्णकुटीशीं आला. सीतेनें सरळपणें तिच्या साध्या भोळ्या स्वभावानुरूप आपला नवरा व दीर कोण हें सांगून "ते मृगयेला गेले आहेत व आतां हरिण मारून घेऊन येतील. तरी तेथपर्यंत पाहिजे तर थांबा," असें त्या माणसास म्हटलें. पण त्या सुंदर स्त्रीस पाहून त्या माणसाला मोह उत्पन्न झाला व त्यानें सीतेला जबरीनें धरलें व तिला घेऊन तो तत्काळ तेथून निघून गेला. रामलक्ष्मण परत येतात तो सीता पर्णकुटीत नाहींशी पाहून त्यांना आश्चर्य वाटलें. सीतेला कोणी तरी पळवून नेली असें वाटून राम अत्यंत शोक करूं लागला. लक्ष्मणानें त्याचें शांतवन करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्यांनीं आसपास सीतेचा पुष्कळ शोध केला. शेवटीं त्यांना कळलें कीं, दक्षिण दिशेला असलेल्या लंकेचा राजा रावण या नांवाच्या राक्षसानें सीतेला पळवून नेली. आतां तर रामाचा शोक अनिवार झाला. पण "आतां त्या राक्षसाचा शोध करून त्याचा नाश करून सीतेला सोडवून आणण्याची खटपट करण्याचा निश्चय करूं या," असें लक्ष्मण म्हणाला. रामानेंही शोक आवरून त्याच उद्योगाला लागण्याचे ठरविलें. तो राक्षस दक्षिण दिशेला गेला येवढीच माहिती रामलक्ष्मणास प्रथमतः मिळाली होती. त्या धोरणानें ते त्या भयंकर अरण्यांत शोध करीत चालले. त्यांना पुष्कळ नद्या, सरोवरें, रानें व मोठमोठे डोंगर वाटेनें लागले. जातां जातां त्यांना एक रानटी मनुष्य भेटला. त्यानें रामास सांगितलें कीं, "पंपा सरोवरानजीक प्रस्रवणपर्वतावर सुग्रीव नांवाचा वानर राजा (रानटी टोळीचा) राहतो. त्याची बायको व त्याचें राज्य वाली नांवाच्या त्याच्या भावानें बळकाविलें आहे. तो तुझा समानदुःखी आहे, तेव्हां त्याला तूं राज्य व बायको परत मिळविण्यास मदत कर म्हणजे तो आपलें सर्व सैन्य व सामर्थ्य तुझे साहाय्यास देईल व त्याच्या मदतीनें तूं लंकेत जाऊन रावणास मारूं शकशील." या माहितीमुळें रामलक्ष्मणास पुष्कळच धीर आला व ते सुग्रीवाची भेट घेण्याकरितां त्याच्या ठिकाणास गेले. सुग्रीवानें रामलक्ष्मणांचें स्वागत केलें व आपल्या भावाच्या दुष्कृत्यांचा पाढा रामापुढें वाचला. भावाचा सूड घेण्यास साहाय्य करण्याबद्दल त्यानें रामास विनंति केली. सुग्रीवाचा स्नेही हनुमान या नांवाचा वानर होता. त्याची व रामाची येथे भेट झाली. पुढे रामावर त्याची भक्ति जडली व तो रामाचा आजन्म विश्वासु सेवक बनला. रामानें वालीचा वध केला व सुग्रीवाला राज्य व स्त्री प्राप्त करून दिली. पावसाळा आल्यामुळे रामलक्ष्मणांनीं तो वर्षाकाळ पंपा सरोवरानजीकच्या प्रस्रवणपर्वतावर राहून काढला. पावसाळा संपतांच सुग्रीव व रामलक्ष्मण लंकेच्या व सीतेच्या शोधाच्या उद्योगास लागले. सुग्रीवानें अशी मसलत दिली कीं, "प्रथम आपले विश्वासु हेर पाठवून लंका व रावण यांचेकडील बातमी बारकाईनें काढू व हेर परत आल्यावर सर्व वानरसैन्यासकट लंकेवर स्वारी करून रावणास मारून सीतेला सोडवून आणूं." त्याप्रमाणें आपला मुलगा अंगद व विश्वासु व शूर हनुमान यांचेबरोबर थोडे निवडक वानर देऊन सुग्रीवानें त्यांना दक्षिण दिशेस पाठविलें. दक्षिण दिशेला जातांना त्यांना प्रचंड पर्वत, श्वापदांनी युक्त अशीं घोर अरण्यें, मोठमोठ्या नद्या व सरोवरें, गुहा व दऱ्याखोरीं लागलीं. पण हा सर्व बिकट व संकटमय मार्ग आक्रमून ते दक्षिण दिशेच्या समुद्रकिनाऱ्यास आले. आतां पुढें कसे व कोणी जावयाचें हा मोठा बिकट प्रश्न येऊन पडला. पण हनुमानानें ही अशक्यप्राय कामगिरी अंगावर घेतली. तो उड्डाण करून (प्रायः पोहून- बद्दल ही अतिशयोक्ति असावी) लंकेंत गेला. हनुमानानें पाहिलें कीं, लंकेच्या उत्तरेस सपाट प्रदेश असून पुढें त्रिकूट (तीन-शिखरी) पर्वत आहे. त्या त्रिकूट पर्वतरूपी प्राकारांनीं व नदीरूपी खंदकांनी संरक्षित अशी ती सुंदर व मोठी लंका नगरी आहे. मग तो रात्रीचा त्या नगरीत शिरला. त्यानें बारकाईनें शोध केला, व अशोक वनांत बंदींत ठेवलेल्या सीतेला तो भेटला व त्यानें "राम मोठ्या सैन्यासह लवकरच येऊन तुझी सुटका करील", असें तिला आश्वासन दिलें. तो परत सुग्रीवाच्या नगरीस गेला व त्यानें पाहिलेली सर्व हकीकत सुग्रीवास व रामास सांगितली. नंतर सुग्रीवानें आपल्या सर्व सैन्यास मोठ्या बिकट स्वारीवर जावयाचें आहे असें सांगून तयार होण्यास हुकूम दिला. त्याप्रमाणें सर्व सैन्य सज्ज झालें. मोठ्या उत्साहानें व उमेदीनें राम, लक्ष्मण व सुग्रीव सर्व सैन्यासह मजल दरमजल कूच करीत चालले. शेवटी ते दक्षिण समुद्राच्या किनाऱ्याशीं आले. त्यांनीं तेथें सैन्याचा तळ दिला. समुद्र कसा ओलांडावयाचा याबद्दल रामाला मोठी काळजी पडली. पण सुग्रीवाच्या नळ नांवाच्या वानरानें जेथें समुद्र उथळ व खडकाळ आहे असें आढळलं तेथें समुद्रावर तात्पुरता पूल करण्याचा बेत केला. त्यानें सर्व सैन्यास सभोवारच्या प्रचंड रानांतील उंच उंच वृक्ष व मोठमोठे दगड उचलून आणण्यास व जाड जाड दोरखंडें पैदा करण्यास हुकूम केला. ते वृक्ष एकमेकांना बांधून व त्यांवर दगड टाकून नळानें दररोज बराच मोठा पुलाचा भाग तयार केला. अशा तऱ्हेनें त्यानें सर्व सैन्याच्या मदतीनें लंकेच्या किनाऱ्यापर्यंत तात्पुरता पुल तयार केला. मग सर्व सैन्य समुद्रपार झालें व त्यानें लंकेच्या उत्तर तीरावरील सपाट प्रदेशांत तळ दिला. रामानें रावणाचा भाऊ बिभीषण याला रावणवधानंतर राज्य देण्याचें कबूल करून आपल्या पक्षाला वळवून घेतलें. रावणाचें सीतेला पळवून आणण्याचे व नंतर तिला परत न करण्याचे कृत्य बिभीषणाला अन्यायाचें वाटत होतें म्हणून तो रामाच्या न्याय्य पक्षाला जाऊन मिळाला. रामाला याप्रमाणे अचानक मदत मिळाल्यामुळे त्याने लागलीच रावणसैन्यावर हल्ला केला. रामरावणांच्या सैन्यांचे कित्येक दिवस तुमुल युद्ध झालें. शेवटीं रामरावणांचें द्वंद्वयुद्ध होऊन रावण धारातीर्थी पतन पावला. रामानें कबूल केल्याप्रमाणें बिभीषणाला लंकेच्या गादीवर बसविलें तसेंच सर्व वानरसैन्याला शाबासकीदाखल देणग्या देऊन संतुष्ट केलें. मग सीतेला बरोबर घेऊन वानरसैन्यासह राम परत फिरला व पंपेस आल्याबरोबर सुग्रीवाचा निरोप घेऊन तो अयोध्येस गेला. तो परत अयोध्येस पोहोंचला तेव्हां १४ वर्षे होऊन गेलींच होतीं. अर्थात् बापाच्या वचनांतून मुक्त झाल्यामुळें त्याला राज्याधिकार हातांत घेण्यांत आनंद वाटला. भरतानें रामाच्या पश्चात् त्याच्या नांवानें उत्तम तऱ्हेनें राज्य चालविलें होतें. त्यानेही मोठ्या आनंदानें कारभाराची सूत्रे रामाच्या स्वाधीन केलीं. रामानें अयोध्येचें राज्य इतक्या उत्तम तऱ्हेनें व लोकांना सुख होईल अशा तऱ्हेने चालविलें कीं रामराज्य हा शब्द आदर्शभूत राज्यकारभाराचा द्योतक बनला.
अतिशयोक्ति, अद्भुतोक्ति व अवतारभावना यांच्या योगानें रामायणांत आलेले प्रक्षिप्त भाग सोडले तर रामरावणाची कथा थोडक्यांत वर लिहिल्याप्रमाणें सांगतां येते. पण दिलेल्या सारांशावरून कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो. रावण हा जरी राक्षस म्हणून वर्णिला आहे तरी रामायणांत बहुतेक ठिकाणी सामान्य पण धिप्पाड माणसासारखेंच त्याचें रूप होतें असें म्हटलेलें आहे. थोड्याच ठिकाणीं त्याला दशमुख म्हटलें आहे. हीं स्थळें प्रक्षिप्त तरी असावी किंवा दशमुख हा शब्द दुष्ट, लबाड, बहुरूपी अशा लाक्षणिक अर्थानें वापरलेला असावा. कारण प्राकृत भाषेंत बहुमुहो असा शब्द आहे. हा बहुमुख या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. बहुमुहो याचा प्राकृतांत दुष्ट, बहुरूपें धारण करणारा व म्हणून लबाड असा अर्थ आहे. तेव्हां दशमुख हा शब्दही दुष्ट, लबाड, अशा अर्थी रामायणांत वापरलेला असण्याचा संभव आहे. मात्र पुढे लोक त्याचा अक्षरशः अर्थ करूं लागले व म्हणून रावणाला दहा तोंडें व मंग अर्थात् वीस हात व वीस पाय होते अशी वेडगळ समजूत सर्वत्र पसरली.
रामायणावरून राम गोदावरी तीरावर रहात होते यांत शंका नाहीं व गोदावरी नदी तर विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आहे. तेथून ते बराच लांबचा प्रवास करून किष्किंधा नगरीस गेले. अर्थात् किष्किंधा दंडकारण्याच्या पुष्कळ दक्षिणेस असली पाहिजे. म्हणजे ती तुंगभद्रा नदीच्या कांठाला असावी हें म्हणणें संयुक्तिक दिसतें. तेथून किती तरी लांबचा प्रवास करून रामलक्ष्मण व वानरांचे सैन्य दक्षिण समुद्राच्या तीरावर आलें. अर्थात् हल्लींच्या रामेश्वराच्या आसपास तें ठिकाण असावें हेंही रास्त दिसतें. लंकाबेट व त्यांतील लंकापुरी हीं त्या दक्षिण समुद्रांत होतीं ही गोष्ट रामायणांत स्पष्टपणें सांगितली आहे. लंकेच्या वर्णनपर श्लोकांतील खालील रावणोक्ति विचार करण्यासारखी आहे. "लंकानाम समुद्रस्य मध्ये मम महापुरी । सागरेण परिक्षिप्ता निविष्टा गिरिमूर्धनि ॥" अर्थात् लंका हें बेट होतें व त्यामध्ये डोंगरांनीं परिवेष्टित अशा पठारावर लंकानगरी होती असें वरील श्लोकावरून होतें. वरील उल्लेखावरून सध्यांचे सिंहलद्वीप म्हणजेच लंका बेट व त्या बेटाच्या मध्यभागी असलेल्या डोंगराळ प्रदेशाचे माथ्यावर रावणाची लंका होती असें म्हणण्यास हरकत नाहीं. तेव्हां हिंदुस्थानांत दलदलीच्या भागांत लंका होती किंवा दुसऱ्या कोणच्या तरी बेटांत लंका होती वगैरे शंका या कुशंका ठरतात व प्रचलित दंतकथा सत्याच्या पायावरच उभारलेल्या आहेत असें म्हणावें लागतें.
सर्व उत्तरकांड प्रक्षिप्त असल्यामुळें व लंकावर्णनाशीं त्याचा संबंध येत नसल्यामुळें त्याचा सारांश येथें दिला नाहीं. असो.
वाल्मीकि रामायणाच्या वरील सारांशावरून रामकथा ही किती सरळ, साधी व संभवनीय आहे हें दिसून येईल. म्हणून ही कथा ऐतिहासिक सत्य असावें व मूळच्या पायावर कविकल्पनेचे उंच उंच मनोरे उभारले असावे असे वाटल्या खेरीज रहात नाहीं. तेव्हां वास्तविकपणें पहातां राम हा अवतारी पुरुष नव्हता, किंवा तो लंकेवरील आर्यलोकांच्या स्वारीचा व वसाहतीचा नायक नव्हता; तर ज्याप्रमाणें अर्वाचीन काळीं लिव्हिंगस्टनने रानटी लोकांत जाऊन एकट्यानें सबंध आफ्रिकेचा शोध लावला त्याप्रमाणें रामलक्ष्मणांनीं सर्व दक्षिण हिंदुस्थान शोधलें व दक्षिण समुद्राच्या नजीक असलेल्या बेटावर ते गेले. अर्थात् हे अवघड काम करण्यास ते जे प्रवृत्त झाले ते लिव्हिंगस्टनप्रमाणें केवळ चौकस बुद्धीनें नव्हे तर आपल्या प्रिय माणसाचा शोध व सोडवणूक करून घेण्याच्या बुद्धीनें होय. यामुळें रामलक्ष्मणसीता यांना लंकेची विशेष माहिती झाली होती असें नाहीं व हिंदुस्थानांत परत आल्यावर लंकेशीं त्यांचा संबंध राहिला नाहीं. तेव्हां हिंदु लोकांनाही त्या काळीं लंकेची फारशी माहिती नव्हती. खुद्द लंकेंत रामाच्या कर्तबगारीबद्दलच्या दंतकथा थोड्या फार प्रचलित आहेत त्यांची माहिती लंकास्थलवर्णन प्रसंगी ओघाओघानें येईलच.
आतां पुढील प्रकरणांत पालीभाषेत लिहून ठेवलेल्या दंतकथांकडे वळूं या.
मागील प्रकरणांत रामायणांतील मुख्य कथेचें विश्वसनीय सार सांगितलें. रामाच्या व वाल्मीकीच्या काळीं लंकेमध्ये आर्यांनीं वसाहत केली नव्हती किंवा आर्य प्रवासी स्वतः लंका पाहून आलेले नव्हते. राम- लक्ष्मण एवढेच आर्य दक्षिणेतील वानरतुल्य लोकांच्या साहाय्यानें लंकेस गेले व तेथें रावणाला मारून पण त्याचाच भाऊ बिभीषण याला लंकेच्या गादीवर बसवून सीतेला घेऊन ते परत आले. तेव्हां त्या काळीं आर्यांना लंकेची जी काय माहिती मिळाली असेल ती राम-लक्ष्मण-सीता या तीन व्यक्तींकडूनच मिळाली असली पाहिजे. अर्थात् ही माहिती लोकांना कर्णोपकर्णीच मिळणार हे उघड आहे. पुढे दीर्घ काळपर्यंत भारतवर्ष व लंका यांचा प्रत्यक्ष संबंध आला नाहीं. म्हणून लंकेंत रामाच्या स्वारीबद्दल व भारतवर्षामध्यें लंकेबद्दल कर्णोपकर्णी दंतकथाच काय त्या शिल्लक राहिल्या. सीतेच्या लंकेंतील वसतिस्थानाबद्दल व रावणाच्या लंकेंतील कारकीर्दीबद्दल व त्याच्या अलौकिक सामर्थ्याबद्दलच्या दंतकथा अजून लंकेमध्यें प्रचलित आहेत. पण आर्याची कायमची वसाहत त्या काळीं तेथें न झाल्यामुळे या रामाच्या स्वारीचा लंकेच्या वाङ्मयांत कोठेंच उल्लेख नाहीं. कारण लंकेतील पाली भाषेतील काय किंवा सिंहली भाषेतील काय सर्व वाङ्मय बौद्धकालीन व त्यानंतरचें आहे, त्या वाङ्मयामध्ये, महावंस व xxxxनांवाचे दोन अद्वितीय ऐतिहासिक ग्रंथ झालेले होते. ते xx xx भाषेत व भाषांतरद्वारा इंग्रजी भाषेमध्ये छापले गेले आहेत. दोन ग्रंथ निरनिराळ्या काळीं व निरनिराळ्या लेखकांच्या हस्ते तयार झालेले असले तरी त्या ग्रंथांमध्यें लंकेचा बुद्धनिर्वाण कालापासून तो थेट ब्रिटिश लोकांनी लंकेचा ताबा घेईपर्यंतच्या कालाचा व सर्व राजवटींचा सविस्तर, संगतवार, सनवार व सलग असा इतिहास गोवलेला आहे. म्हणून हे दोन्ही ग्रंथ खरोखरीं वस्तुतः एकच आहेत व एकाच नांवानें पुष्कळ वेळां त्यांचा उल्लेख केला जातो. महावंस भाग पहिला व महावंस भाग दुसरा असे त्याचे कालक्रमानें दोन भाग साहजिक पडले आहेत.
महावंस भाग पहिला हा ग्रंथ लंकेच्या राजघराण्यांतील एका राजभक्त, देशभक्त, भाविक पण चौकसबुद्धीच्या महानाम नांवाच्या बुद्धभिक्षूनें इसवी सनाच्या पांचव्या शतकांत जुन्या कागदपत्रांवरून माहिती मिळवून लिहिला. त्यांत क्रिस्तपूर्व सन ५०० पासून इ. स. ३०० पर्यंत म्हणजे सुमारे ८०० वर्षांच्या काळाचा इतिहास महासेन राजाच्या कारकीर्दीच्या अखेरपर्यंत गोविलेला आहे. महावंस याच्या पहिल्या भागाचें ग्रंथकर्त्याच्या नांवावरून 'महानाम' असेही दुसरें नांव प्रचलित आहे. महावंसाचा दुसरा भाग मात्र वेळोवेळीं व निरनिराळ्या लेखकांकडून लिहिला गेला आहे. ज्याप्रमाणें काश्मीरच्या इतिहासाला विश्वसनीय व आधारभूत असा एकच 'राजतरंगिणी' हा ग्रंथ आहे त्याप्रमाणेंच लंकेच्या इतिहासाला महावंस हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ बौद्धधर्मी भिक्षूंनी बौद्ध धर्माची महती गाण्याकरितां व बौद्धधर्माकरितां ज्या राजांनीं विशेष कामगिरी केली त्यांची सविस्तर हकीकत देण्याकरितां लिहिला आहे. त्यामुळे त्यामध्यें अतिशयोक्ति व असत्योक्ति असली तरी ती नारळाची करटी व चोड यांच्याप्रमाणें थोड्या प्रयासानें काढून टाकतां येण्यासारखी असून आंत नारळाच्या गोड व चवस खोबऱ्याप्रमाणें सत्याचा गाभा पुष्कळच आहे असें आतां निर्विवाद सिद्ध झालें आहे.
ज्याप्रमाणे पहिल्या प्रकरणांत वाल्मीकिरामायण सागरांत बुड्या मारून एक विश्वसनीय कथारत्न वाचकांस सादर केलें, त्याप्रमाणें या मोठ्या महावंस ग्रंथाच्या दंतकथात्मक इतिहासरूपी सागरांत बुड्या मारून विश्वसनीय व मनोरंजक कथारत्ने वाचकांस नजर करण्याचा बेत आहे. वंगदेशाचा विजय नांवाचा राजकुमार हा लंकेवर स्वारी करून तेथें आर्याचें राज्य स्थापन करणारा पहिला क्षत्रिय राजा होय. या राजकुमाराच्या बापाच्या विलक्षण जन्मकथेपासून महावंसाच्या ऐतिहासिक हकीकतीस सुरवात झाली आहे. ती कथा रोमचा प्रस्थापक रॉम्युलस याच्या दंतकथेपेक्षां जास्त आश्चर्यकारक व जास्त असंभवनीय वाटली. तरी त्याच पंखीं आहे हें खरें. ती दंतकथा अशी.
वंग देशाच्या राजाचा कलिंग देशाच्या राजकन्येशी विवाह झाला. या जोडप्याला सुप्पा देवी नांवाची एक लावण्यवती कन्या झाली. पण तिच्या नशिबीं वनराजसंयोग आहे असें तिच्या जन्मपत्रिकेवरून भविष्य करण्यांत आलें. या कन्येला खरोखरीच रानावनांत हिंडण्याचा नाद लागला. ती एका व्यापारी तांड्याबरोबर अरण्यांत गेली असतां एका सिंहानें त्या तांड्यावर हल्ला केला; पण सुप्पादेवीला पाहिल्याबरोबर सिंह तिच्याशीं लांगूलचालन करूं लागला. तिनें सिंहाच्या पाठीवर हात फिरवून त्याला कुरवाळलें. सिंहानें तिला पाठीवर घेतलें व आपल्या गुहेत नेलें. त्या सिंहापासून सुप्पा देवीला सिंहबाहु नांवाचा एक मुलगा व सिंहशिवळी नांवाची एक मुलगी अशीं जुळीं मुलें झाली. सिंहबाहू सोळा वर्षांचा झाल्यावर व त्याला समजूं लागल्यावर त्यानें आपल्या आईला आपला बाप इतका विलक्षण कां असें विचारलें. तेव्हां तिनें आपल्या जन्माबद्दल, जन्मपत्रिकेतील भविष्याबद्दल व वनराज-संयोगाबद्दल खरी हकीकत सांगितली. ती ऐकून सिंह गुहेबाहेर गेला असतां, सिंहबाहु आपल्या आईस एका खांद्यावर व आपल्या बहिणीस दुसऱ्या खांद्यावर घेऊन गुहेच्या बाहेर जाऊन दूरच्या एका रानांत झोपडें करून राहिला. तेथें वंग देशाच्या राजाचा सेनापती शिकारीकरितां आला होता. त्यानें या त्रिवर्गीस पाहून त्यांची चवकशी केली व त्यांना घेऊन तो नगरास गेला. इकडे सिंह गुहेत परत येतो तो त्रिवर्ग पसार झालेले. तेव्हां त्याला फार दुःख झालें व तो सिंह खेडोखेडीं जाऊन त्यांचा शोध करूं लागला. खेड्यांतील लोक सिंहाला भिऊन राजाकडे दाद मागावयास आले. राजानें त्या सिंहाला मारून त्याचे डोके आणून देणारास मोठें बक्षीस देऊ केलें तें बक्षीस आईचे न ऐकतां सिंहबाहूनें घेतलें. मग त्यानें त्या सिंहाला गाठून त्याला मारून त्याचें डोकें नगरांत राजवाड्यांत आणून दिलें. इतक्यांत राजा वारला. तेव्हां सेनापतीला सिंहबाहूची व त्याच्या आईची खरी खरी हकीकत ठाऊक होती, म्हणून त्याने सर्व सरदारांची समजूत घालून सिंहबाहूला वंग देशाचें राज्य दिलें. सिंहबाहु हा पराक्रमी असून राजाचा नातूच आहे असें कळल्यामुळे लोकांन आनंद वाटला.
या सिंहबाहूला विजयासकट दहा मुलगे झाले. पण विजय लहानपणापासून खोडकर व बापाच्या मनाविरुद्ध वागणारा निघाला. तो आपल्यासारखे तरुण सोबती व संवगडे जमवून हवा तसा दंगाधोपा करूं लागला. म्हणून राजानें त्या सर्वांना होड्यांत बसवून समुद्रांतून देशाबाहेर पाठविलें. विजय राजकुमार आपल्या सातशें संवगड्यांसकट लंकाबेटास आला व तेथें त्यानें कायमचें ठाणें दिलें. लंकेंत त्यावेळी यक्षांचे राज्य होतें. त्या यक्षजातीपैकी कुवेणू नांवाच्या यक्षिणीनें विजयाचे सर्व संवगडे सरोवरांत बुडविले. राजा त्यांच्या शोधार्थ सरोवराशीं आला असतां त्यानें त्या कुवेणूला झाडाखालीं सूत काढीत बसलेली पाहिली. याच चेटकिणीनें आपले संवगडे मारले असले पाहिजेत असे वाटून तो रागानें तिच्या अंगावर धांवून गेला व त्यानें तिला मारण्याचा धाक घातला. "मला आपली स्त्री करशील तर तुझे संवगडे परत देतें व तुला येथला राजाही करतें", असें कुवेणू म्हणाली. तेव्हां विजयानें तिला सोडलें. मग तिनें सरोवरांतून त्या संवगड्यांना जिवंत काढून विजयाचे स्वाधीन केलें. रात्रीं वाद्यें वाजतांना विजयानें ऐकलें. तेव्हां कुवेणू म्हणाली, "आज रात्रीं यक्षनगरीत मोठा विवाह समारंभ चालू आहे; तेथे सर्व यक्ष जमले आहेत व त्यांचा राजा कालसेनही तेथेंच आहे. त्या सर्वांना मारण्याची ही वेळ आहे. तरी मी सांगतें त्या युक्तीनें तूं त्यांचा संहार कर म्हणजे सर्व लंकेचा राजा होशील." विजयानें कुवेणूच्या सल्ल्याप्रमाणें राजासकट सर्व यक्षांना मारून आपण कालसेनाचा पोशाख अंगावर घातला व आपल्या संवगड्यांना इतर यक्ष सरदारांचा वेष दिला. या प्रमाणें विजय हा लंकेचा पहिला आर्य राजा झाला. त्यानें ताम्रपर्णी नांवाची आपली राजधानी वसविली. त्याचे संवगडे सरदार झाले; व त्यांनीही दुसरी शहरें वसविली. याप्रमाणे कायमचें राज्य स्थापन केल्यावर विजयाला राज्याभिषेक करण्याचें ठरलें. परंतु राजघराण्यांतील विवाहित राणीखेरीज राजानें राज्याभिषेक करून घेण्याचें नाकारिलें. तेव्हां प्रधान मंडळींनीं मदुरेच्या पांडव नांवाच्या राजाच्या राजकन्येला मागणी घातली व इतर सरदारांनी स्त्रियांकरितां आणखी पुष्कळ मुलींना मागण्या घातल्या. मदुरेच्या राजानें आपली कन्या विजयास देण्याकरितां व इतर मुली सरदारांस देण्याकरितां सर्व मंडळींना नजराण्यासकट पाठवून दिलें. नंतर विजयाचा व इतर सरदारांचे विवाह झाले. याप्रमाणें लंकेत आर्याची मोठी वसाहत व राज्य सुरूं झालें. विजय राजकुमार आपल्या संवगड्यांसह बुद्धाच्या निर्वाण-वर्षी म्हणजे अर्वाचीन शोधाप्रमाणे क्रिस्तपूर्व ४८३ या वर्षी लंकेत आला. लंकेमध्यें या बुद्ध-निर्वाणापासूनच कालगणना सुरू झाली व ती एकसारखी ब्रिटिश अंमलापर्यंत सुरू राहिली. म्हणूनच महावंसांतील राजावळीची व इतिहासाची परंपरा सारखी व विश्वसनीय राहूं शकली. हिंदुस्थानाप्रमाणें निरनिराळे शककाल व त्यांनीं उत्पन्न केलेला घोंटाळा व संदेह लंकेच्या ऐतिहासिक वाङ्मयांत मुळींच दिसून येत नाहीं. असो.
विजयाची हकीकत जरा विस्तारानें सांगितली. कारण तो लंकेचा पहिला राजा होय. व दुसरें कारण महावंस हा किती सविस्तरपणें लिहिलेला ग्रंथ आहे याची कल्पना वाचकांस यावी.
दोन्ही भाग मिळून महावंसांत एकंदर सुमारे पावणे दोनशें राजांची थोडीफार हकीकत दिलेली आहे त्यांपैकी सुमारे शंभर राजांची अनुराद्धपूर ही राजधानी होती. सुमारें पसतीस राजांची पोलनुरूवा ही राजधानी होती व शेवटच्या दहा राजांची कँडी ही राजधानी होती. लंकेतील दुसऱ्या दुय्यम दर्जाच्या शहरांना राजधानीचा मान थोडा काळ मिळाला होता; पण त्या केव्हांही कायमच्या किंवा बहुतकाळच्या राजधान्या झाल्या नाहींत. आपसांतील राजघराण्यांच्या तंट्यामुळें किंवा परचक्राच्या भयानें कित्येक राजांनीं आपल्या कायमच्या राजधान्या सोडून दुसऱ्या दुर्गम दुर्गाचा किंवा दूरच्या शहरांचा कांहीं काळ आश्रय केला व म्हणून त्या ठिकाणांना तात्पुरतें राजधानीपद प्राप्त झाले इतकेंच. विजयापासून शेवटच्या श्री विक्रम राजसिंहापर्यंत लोटलेल्या सुमारें तेवीसशे वर्षांच्या काळाचा हा इतिहास ग्रंथ आहे. तेव्हां असा ऐतिहासिक ग्रंथ जगांतील कोणत्याही वाङ्मयांत उपलब्ध नाहीं हें उघड होतें. असा अद्वितीय ग्रंथ लंकेला लाभलेला आहे व त्यावरून लंकेच्या उत्कर्षापकर्षाची उत्तम कल्पना मनांत येते, ही निर्विवाद गोष्ट आहे. तेव्हां येवढ्या मोठ्या ग्रंथांतून ठळक ठळक कारकीर्दीची केवळ रूपरेखा देण्याखेरीज गत्यंतर नाहीं.
विजयाला पुत्र नव्हता म्हणून त्याच्या पश्चात् त्याचा भाऊ पंडुवास याला वंग देशांतून आणून लंकेच्या राज्यावर बसविलें. त्यानें शाक्य राजघराण्यांतील राजकन्येशी विवाह केला. त्या दांपत्याला दहा मुलगे व एक सीता नांवाची मुलगी झाली. या मुलीचा मुलगा आपल्या सर्व मामांना मागे सारून राज्य बळकावील असें भविष्य केलें असल्यामुळें तिला मारून टाकावी असा सल्ला भावांनी दिला. पण राजानें तिला फक्त नजर कैदेत ठेवलें. तरी पण तिच्यावर तिच्या चुलतभावाचें (वंग देशच्या राजपुत्राचें) प्रेम जडलें. मुलगा झाल्यावर मारून टाकण्याचें कबूल केल्यावर तिचें त्या राजकुमाराशीं लग्न लावून देण्यांत आलें. सीतेला पुत्र झाला, पण त्याला त्याच वेळीं बाळंत झालेल्या एका बाईचे स्वाधीन करून तिची मुलगी राजकन्येनें बाळगली. पण हा मुलगा मोठा झाल्यावर त्यानें आपल्या मामांस मारिलें व तो लंकेचा राजा झाला. त्याचें नांव पंडुकाभय. हा लंकेचा अत्यंत कर्तृत्ववान् व मोठा राजकार्यधुरंधर असा राजा होय. त्यानेंच प्रथम अनुराद्धपुर येथे राजधानी स्थापन करून मोठमोठ्या इमारती बांधण्यास सुरवात केली. त्यानें राज्यही खूप काळ केले. त्यांमुळे त्या राज्याला स्थैर्य व बळकटी आली.
पंडुकाभयाच्यापेक्षांही लंकेच्या इतिहासांतील अति महत्त्वाची कारकीर्द म्हणजे देवानांपियतिस्स या राजाची होय. कारण बुद्ध धर्माचा लंकेतील प्रवेश व प्रसार या कारकीदींत झाला व सर्व लंकेचें व लंकेच्या लोकांचें स्वरूपच पालटून गेलें. महावंसकाराला या कारकीर्दीची हकीकत देतांना किती व काय लिहूं असें होऊन गेलें असावें, कारण त्यानें ग्रंथाची किती तरी प्रकरणे या एका कारकीर्दीला दिलीं आहेत. अर्थात् भाविक बुद्ध भिक्षूला लंकेंतील बुद्धधर्माच्या प्रवेशाचें व प्रसाराचें विलक्षण आश्चर्य व कौतुक वाटून त्यानें अतिशयोक्तीनें व पाल्हाळानें हवें तें लिहावें हें साहजिक आहे. देवानांपियतिस्स राजा हा मगध देशाच्या अशोकाचा समकालीन होता. देवानांपियतिस्स राजा अनुराद्धपुरपासून आठ मैलांवर असलेल्या जंगलमय डोंगरावर शिकारीस गेला होता. तेथें त्याला बुद्धभिक्षूच्या रूपानें अशोकाचा मुलगा महिंद किंवा महेन्द्र भेटला. राजा बुद्धधर्माचीं तत्त्वें समजण्यासारख्या व स्वीकारण्यासारख्या स्वभावाचा आहे असें पाहून महिंदानें त्याला त्या धर्माचीं तत्त्वें सांगितलीं. राजाला तीं पटून त्यानें बुद्धधर्म स्वीकारला व त्या महिंदाला मोठ्या आदरानें व मानानें आपल्या राजधानींत आणले व आपल्या महामेघवन नांवाच्या प्रचंड बागेंत जमलेल्या प्रजेस महिंद्राकडून बुद्धधर्माचीं तत्त्वें सांगविलीं व राजाच्या प्रजेनें राजाचें अनुकरण करून बुद्धधर्म स्वीकारला. राजानें आपली महामेघवन नांवाची नंदनवनासारखी बाग महिंदास व बुद्धभिक्षूंस बक्षीस दिली व तेथें त्यानें त्यांच्या करितां महाविहार बांधला. देवानांपियतिस्स राजाला ज्या पर्वतावर बुद्ध धर्माचा उपदेश झाला व ज्यावर महेन्द्र प्रथम येऊन उतरला त्या पर्वताला महेन्द्र पर्वत (अर्वाचीन मिहिंतिल) हें नांव मिळालें. हें ठिकाण लंकेतील बुद्धधर्माचें फार पुरातन व फार पवित्र असें यात्रास्थान बनलें. त्या पर्वतावर किती तरी स्तूप, विहार इत्यादि धार्मिक इमारती उभारल्या गेल्या; पर्वतावर चढण्याकरितां मोठ्या प्रशस्त दगडाच्या बाराशें पायऱ्या बांधण्यांत आल्या. महिन्द अनुराद्धपुरास आल्यावर व तेथें राहिल्यावर राजाच्या विनंतीवरून त्याची बुद्ध भिक्षुकीण बनलेली बहीण सुमिता ही लंकेस आली. ज्या बुद्धगया येथील पिंपळाच्या वृक्षाखालीं गौतमबुद्धास बुद्ध- धर्मज्ञान- प्राप्ति झाली त्या पिंपळाची एक खांदी तिनें बरोबर आणली. त्या खांदीची मोठ्या समारंभानें मिरवणूक काढण्यांत आली. व ती खांदी महामेघवन बागेतील एका स्वतंत्र बांधलेल्या आवारांत पुरून तेथें देवालय बांधण्यांत आलें. अनुराद्धपुर येथें हा पवित्र पिंपळवृक्ष तेव्हांपासून आजं तागाईत जीवंत असून मिहिंतले पर्वतापेक्षांही तो अधिक पवित्र मानण्यांत येतो. हजारों बुद्ध धर्मी लोक या वृक्षाच्या दर्शनास दरवर्षी येतात व या वृक्षाचें एखादें पान पवित्र म्हणून परत जातांना घरीं घेऊन जातात. देवानांपियतिस्स राजाची कारकीर्द सुमारें चाळीस वर्षांची झाली.
नंतर त्याचा बंधु उत्तीय हा राज्यावर आला. याच्या कारकीर्दीच्या आठव्या व नवव्या वर्षी अनुक्रमें महिंद व सुमिता हीं दोघें बहीणभांवडेंं वारलीं व त्यांचीं स्मारके मिहिंतले येथें व इतर ठिकाणी झाली.
उत्तीयानंतर दोन बंधु एकामागून एक राज्यावर आले. दुसरा बंधु सुरतिस्स याचे कारकीर्दीपासून दक्षिण हिंदुस्तानच्या केरल, मदुरा व त्रावणकोर या निरनिराळ्या राज्यांतून तामीळ लोक लंकेंत येऊन वसाहत करूं लागले व त्यांच्या मनांत लंकेचें राज्य बळकावण्याची महत्त्वाकांक्षा उद्भूत झाली. याचें प्रत्यंतर म्हणजे कांहीं तामीळ तरुणांनी सुरतिस्स राजाविरुद्ध कट करून त्याला ठार मारलें व त्याचें राज्य बळकावलें. असेल या बंधूनें तामीळांचा बीमोड करून आपले राज्य परत मिळविलें, पण या काळापासून लंकेंत तामीळ लोकांची वसाहत वाढत गेली. पुढें तर तंजावरच्या इलाला नांवाच्या तामीळ राजानें लंकेवर मोठ्या सैन्यानिशीं स्वारी करून असेल राजाचा रणांगणावर पराभव करून त्याला ठार मारून तो अनुराद्धपूर येथे कायमचा येऊन लंकेचें राज्य करूं लागला. पण जरी हा राजा परकी होता तरी त्यानें राज्य उत्तम तऱ्हेनें केलें. त्यानें राजवाड्याबाहेर एक घंटा बांधून ठेविली होती; कोणालाही ती घंटा वाजवून आपले गाऱ्हाणें राजाला समक्ष सांगण्याची मुभा होती. राजा प्रजेचे गाऱ्हाणे ऐकून ताबडतोब तें दूर करीत असे. हा राजा इतका न्यायनिष्ठुर होता कीं आपल्या मुलानें एका खोंडाला हलगर्जीपणानें आपल्या रथाखाली चेंगरून मारल्यावरून राजानें त्या मुलाला देहांत शिक्षा दिली!
असेल राजाला इलालानें ठार मारले खरें; पण त्याचे बंधु व इतर राजघराण्यांतील मंडळी यांनीं आपली कशी तरी सुटका करून घेऊन ती सर्व राजमंडळी महावेलीगंगा नदीच्या पलीकडच्या जंगली प्रदेशांत गेली. तेथें राजाच्या बंधूनें लहानसें राज्य स्थापिलें. त्या राजाला गामनी म्हणून एक शूर व महत्त्वाकांक्षी पुत्र झाला. तो लहानपणीं सुद्धां आंथरुणावर हातपाय आंखडून निजे. राणीनें असें करण्याचें कारण विचारतां "काय करावें, हातपाय पसरून निजावयास जागा कोठें आहे? दक्षिणेस समुद्र आला व गंगेच्या पलीकडचें आपलें राज्य तामीळ राजाच्या हातीं आहे," असें त्यानें खोंचदार उत्तर दिलें.
यावरून लहानपणापासूनच गामनीची महत्त्वाकांक्षा उद्दीपित झालेली होती असें दिसतें. त्यानें आपल्याभोंवतीं दहा शूर, वीर असे तरुण जमविले व त्या प्रत्येकाला दहा दहा तरुण लोक तयार करण्यास सांगितलें. अशा तऱ्हेनें त्यानें मोठें सैन्य तयार केलें. त्यानें दोन वेळा इलालावर स्वारी करण्याकरितां बापाची परवानगी मागितली. पण राजानें ती नाकारली. तेव्हां गामनीनें राजाकडे बांगडी पाठवून ती हातांत घालण्यास सांगितलें. तात्पर्य, राजानें बायकांप्रमाणें हातांत बांगड्या घातल्या असून तो भित्रा आहे तेव्हां त्याची आज्ञा पाळण्यांत अर्थ नाहीं असें म्हणून गामनीनें इलालाच्या राज्यावर स्वारी केली. तेव्हांपासून गामनीला दत्त (बंडखोर) गामनी असें टोपण नांव पडलें. आपल्या सैन्यानिशीं दत्तगामनीनें प्रथमतः विजितपुराला वेढा देऊन तें कांहीं महिन्यांनी काबीज केलें. मग त्यानें खुद्द अनुराद्धपुरावर स्वारी केली. इलाला हा शूर राजा होता. तो आपल्या सैन्यानिशीं दत्तगामनीच्या सैन्यासमोर युद्धाकरितां उभा राहिला व हत्तीवर बसून त्यानें दत्तगामनीवर स्वतः हल्ला केला. दोघेही राजे शूर असल्यामुळे खऱ्या योद्ध्याप्रमाणें ते लढले. त्यांत इलालाचा हत्ती पडला. मग इलालाला दत्तगामनीनें धारातीर्थी पाठविलें. पण खऱ्या शूर वीर पुरुषाला शोभेल अशा तऱ्हेनें दत्तगामनीनें इलालाच्या शवाचें दहन केलें. व त्या जागेवर एक स्मारक छत्री बांधली, व लंकेच्या प्रत्येक राजानें या स्मारकछत्रीला नमस्कार करून मग पुढें जावें असा नियम केला. या नियमाची अंमलबजावणी ब्रिटिश कारकीर्दीपर्यंत चालू होती. इलाला राजाबद्दल दत्तगामिनीला केवढा आदर होता हे यावरून दिसून येतें.
दत्तगामनी हा अनुराद्धपुर राजधानींतला तिसरा मोठा कर्तबगार राजा होऊन गेला. त्यानें प्रथमतः प्रचंड लोहप्रासाद (brazen palace) बांधला. यानेंच ऋवनवेली दागबा बांधण्यास प्रारंभ केला. यानेंच राज्यांत तलाव बांधले व ओसाड जमीन लागवडीस आणली. याचेच कारकीर्दीत अनुराद्धपुराचा लंडनसारखा विलक्षण विस्तार झाला. याची कारकीर्द सुमारें पंचवीस वर्षांची झाली.
दत्तगामनीच्या राजपुत्राचें एका चांडाल कन्येवर प्रेम बसलें. तिच्याकरितां त्यानें राज्यावरचा हक्क सोडला. म्हणून दत्तगामनीचे दोन भाऊ एकामागून एक राजे झाले. पुढें पहिल्या भावाचा पुतण्या राज्यावर आला; नंतर त्याचा पुत्र राज्यावर आला. पण या राजांच्या कारकीर्दी लवकर लवकर संपल्या. 'हे राजे आले व गेले' अशापैकींच यांच्या कारकीर्दी झाल्या.
पुढें कालुने नांवाचा राजा झाला. याचे कारकीर्दीत चोल देशांतील तामील राजांनी लंकेवर स्वारी केली व लंकेचें राज्य बळकावलें. अर्थात् पूर्वीचें राजघराणें इलालाच्या काळाप्रमाणे जंगलांत जाऊन राहिलें. पुढें त्यांतील वलंगबाहु राजानें तामीळ राजाचा पराभव करून आपलें राज्य परत मिळविलें. त्यानें अनुराद्धपुर येथील अभयगिरी दागवा बांधला; तसेंच डांबुला येथील विहार बांधला. याचेच काळीं प्रथम बौद्ध धर्माचा ग्रंथ त्रिपीठक ताडपत्रावर लिहिला गेला. यानेंच प्रथम एका बाजूस मनुष्याची आकृति व दुसऱ्या बाजूस स्वस्तिकाची आकृति अश तांब्याची नाणी पाडली.
पुढें पुनः 'आलेगेले' कोटींतील राजे झाले. कुडतिस्स राजाची राणी अनुला ही तर इतकी नादान व उच्छृंखल राणी निघाली कीं तिनें अर्वाचीन अमेरिकन उच्छृंखल बाईच्यावर कडी केली. तिनें सहा वर्षांत बत्तीस पती केले, व आपण राज्य करूं लागली. कुडतिस्स राजापासून तिला झालेला राजपुत्र मकलंतिस्स हा फार चांगल्या स्वभावाचा होता. त्यानें आपल्या आईस राज्य करूं दिलें. पण तिनें जे अनन्वित प्रकार केले त्यायोगें राजपुत्राला प्रजेबद्दल कींव येऊन त्यानें स्वारी करून आईकडून राज्य हिसकावून घेतलें. शहराच्या आगीत आई जळून मेली. या राजानें राज्याची उत्तम व्यवस्था ठेविली. देशांत पुष्कळ तलाव बांधले, अनुराद्धपुर शहराला तट बांधला. अशीं पुष्कळ लोकोपयोगी कामें त्यानें आपल्या कारकीर्दीमध्ये केली.
याचे नंतर बरेच राजे झाले; पण संध्येच्या नांवाप्रमाणें त्यांचीं नुसतीं नांवें सांगण्यांत काय रहस्य आहे? शिवाय महावंसामध्ये सुद्धां नऊ राजे, अकरा राजे, अशीं मोघम नांवाचीं प्रकरणें आहेत. यावरून या काळांत नांव घेण्यासारखा पुरुष झाला नाहीं असें सिद्ध होतें. परकी स्वाऱ्यांनीं व राजघराण्यांतील कलागतींनी देशामध्यें अंदाधुंदी होऊन देशाची स्थिति खालावली. राजघराण्यांतील सिरीनाग नांवाच्या एका सेनापतीनें आपल्या स्वामीला मारून आपण राज्य बळकावलें. त्याचा पुत्र अभयतिस्स नांवाचा चांगला राजा निपजला. नंतर पुनः कर्तृत्वहीन असे राजे राज्यावर आले. पण श्रीसंगबोधी हा राजा मात्र साधूसारखा सच्चा व सदाचरणी निघाला. म्हणून बुद्धधर्मी लोक त्याला फार मान देतात. त्यानें राज्यत्याग केला व शेवटीं आपला प्राण आपल्या अन्नदात्याकरितां देऊन मोठी कीर्ति मिळविली.
यानंतर महासेन राजा झाला. याचे काळी बुद्ध धर्माच्या निरनिराळ्या पंथांत तंटे सुरू झाले. महासेनानें एका पंथाचा पक्ष स्वीकारून विरुद्ध पंथाची देवळें व इमारती जमीनदोस्त केल्या. या महासेनाच्या कारकीर्दीतील हकीकतीनें महावंस ग्रंथाचा पहिला भाग संपला आहे. येथपर्यंतच्या राजांना महावंसांतील राजे असें म्हटलें आहे. पुढल्या राजांना लहान वंशांतील राजे म्हटलें आहे.
महासेनाच्या नंतरचा राजा कीतसिरी निवाण नांवाचा झाला. याच्या कारकीर्दीतील संस्मरणीय गोष्ट म्हणजे इ. सन ३११ मध्यें बुद्धाचा एक दांत हिंदुस्थानांतून एका ब्राह्मण राजकन्येनें लंकेत आणला. तो मोठ्या समारंभानें अनुराद्धपुरामध्यें दलद मलिगवा नांवाच्या दंत देवळांत ठेवण्यांत आला.
पुढील जेठतिस्स नांवाच्या राजानें तामिल लोकांनी लुटलेला लोहप्रासाद पुनः बांधला. त्याचा पुत्र बुद्धदासही चांगला राजा निपजला. त्याला वैद्यविद्या उत्तम येत असे. त्यानें संस्कृतांत वैद्यकीवर एक ग्रंथही लिहिला होता. त्यानें आपल्या राज्यांत दवाखाने व व्यंग असलेल्या लोकांकरितां विश्रामवाडे (Asylume) बांधले.
पुढच्या उपतिस्स राजाला राणीनें मारविलें व त्या राणीचा प्रियकर महानाम सन ४१२ मध्ये राजा झाला. याच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या गोष्टी दोन. पहिली, प्रख्यात चिनी प्रवासी फे हायन चीनमधून हिंदुस्थानांत येण्याकरितां सन ३९९ मध्ये निघाला, तो हिंदुस्थानांत दहा बारा वर्षे प्रवास करून व बुद्ध-धर्म-ग्रंथ मिळवून लंकेला आला. तेथें दोन वर्षे राहून मग जलमार्गानें आपल्या देशास परत गेला. त्यानें लंकेविषयी माहिती आपल्या प्रवासवृत्तांत लिहून ठेविली आहे. त्यांवरून लंकेची तत्कालीन स्थिति व बुद्ध धर्माचें तेथील स्वरूप याची कल्पना येते. दुसरी गोष्ट म्हणजे बुद्धघोष हा हिंदुस्थानांतील बुद्धधर्मी विद्वान् कवि लंकेंत येऊन राहिला व त्यानें तेथें राहून पाली व संस्कृत भाषेत कित्येक तरी ग्रंथ लिहिले.
उपतिस्साच्या राजपुत्राला राजकन्येनें व तिच्या पतीनें संगनमत करून ठार मारिलें व लामिनीतिस्स राजा झाला. नंतरच्या कारकीर्दीत मलबारच्या सरदारांनी स्वारी करून राजाला मारलें. मागच्याप्रमाणें राजघराणें व त्यामधला धातुसेन राजपुत्र हे महावेलीगंगेपार रुहुनुरत या जंगली ठिकाणीं पळाले. येथें धातुसेनानें सव्वीस वर्षे वनवास भोगला. पण शेवटीं त्यानें आपलें वंशपरंपरागत राज्य पुनः मिळविलें. या धातुसेनाच्या कारकीर्दीमध्यें राजघराण्यांतील भिक्षु महानाम यानें महावंस ग्रंथ लिहिला. त्यावरून धातुसेनाच्या कारकीर्दीत बरीच व्यवस्था व स्थिरस्थावरता झाली होती असें दिसतें. पण लवकरच गृहकलह सुरू झाले. आदिगर नांवाचा मोठा सरदार हा धातुसेनाचा जावई होता. त्यानें आपल्या पत्नीस म्हणजे धातुसेनाचे मुलीस क्षुल्लक कारणावरून मारलें. स्वतःची बहीण आदिरची आई हिला ठार मारून स्वतःच्या मुलीला मारल्याचा सूड धातुसेनानें उगवला. म्हणून आदिगर धातुसेनावर संतापला व त्याचा सूड घेण्याकरितां धातुसेनाच्या दुसऱ्या मुलाला (कश्यपाला) राज्यपदाचें आमिष दाखवून त्यानें आपल्या कटांत घेतलें. नंतर धातुसेनाला कैद केलें व कश्यपानें राज्यलोभानें आपल्या बापाला भिंतींत जिवंत पुरून मारलें. पण धातुसेनाचा थोरला मुलगा मोगलान कश्यपाचा सूड घेण्याकरितां व राज्य मिळविण्याकरितां हिंदुस्थानास गेला. तेथे त्यानें मोठें सैन्य जमविण्याचा उद्योग सुरू केला. कश्यपानें भीतीनें अनुराद्धपुर सोडून सिगिरीया या अगम दुर्गावर राजवाडा बांधून तेथून अठरा वर्षे राज्यकारभार चालविला; पण शेवटी मोगलान मोठें सैन्य घेऊन आला व त्यानें कश्यपाच्या सैन्यावर हल्ला केला; भिऊन जाऊन कश्यपानें आत्महत्या केली.
याच राजाच्या कारकीर्दीमध्यें काशीहून बुद्धाचा एक दांत आणण्यांत आला व त्याकरितां अर्थात् एक स्मारकस्तूप बांधण्यांत आला. याच्या पुढला राजा कुमारदास याच्या कारकीर्दीमध्यें कालिदास लंकेत येऊन या राजदरबारी कांहीं काळ राहिला अशी दंतकथा आहे. या राजाच्या कारकीर्दीचा काळ सन ५७५ हा आहे.
पुढें दोन राजे आले-व-गेले कोटींतील होते. नंतर अगबोधी नांवाचें चार पांच राजे झाले. ते विद्येचे चाहते असून त्यांनीं एकंदरीत राज्यव्यवस्था चांगली राखली. सातव्या अगबोधीच्या कारकीर्दीत पोलनरुवा ही राजधानी झाली. पहिल्या सेन राजाच्या वेळीं तामीळ राजांनी लंकेवर स्वारी करून पोलनरुवा काबीज केलें व त्यांनीं पुष्कळ वर्षे तेथें राज्य केलें. त्या काळापासून लंकेचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पडून दोन राज्यें झाली. पण विजयबाहु पराक्रमी निघाला, त्यानें तामीळ राजांना सन १०६५ मध्ये आपल्या देशीं हाकून लावलें व लंकेचें पुनः एकसूत्री राज्य केलें. या घराण्यांत दोन चार मोठे राजे होऊन गेले. त्यांचे कारकीदींतच पोलनरुवा ही राजधानी वैभवास चढली व तेथें अनुराद्धपुरापेक्षांही मोठ- मोठीं देवळें व राजवाडे बांधण्यांत आले. या राजघराण्यांत पहिला पराक्रमबाहु म्हणून अत्यंत कर्तृत्ववान् असा राजा झाला.
त्याच्या कारकीर्दीमध्यें पोलनरुवा राजधानी अनुराद्धपुराच्या वरकडी अशी विस्तीर्ण व सुंदर बनली. लंकेच्या उत्कर्षाची व वैभवाची पराकाष्ठा याच राजाच्या कारकीर्दीत झाली. म्हणूनच ज्याप्रमाणें देवांनापियतिस्साच्या किंवा दत्तगामनीच्या कारकीर्दीसंबंधीं महावंसकारांना काय लिहू किती लिहूं, काय वर्णू किती वर्णू असें होऊन गेलें, त्याचप्रमाणें पराक्रमबाहूच्या कारकीर्दीसंबंधीं लिहितांना त्यांची कल्पनाशक्ति अनावर झाली व त्यांनी या एका राजाच्या कारकीर्दीला ग्रंथाची किती तरी प्रकरणें दिली आहेत. विक्रमबाहु (विजयबाहूचा पुत्र व पुष्कळ काळपर्यंत राज्य केलेला राजा) याचा थोरला पुतण्या मानभरण याला विजयबाहूची मुलगी दिली होती. या दांपत्याचें अपत्य पराक्रमबाहु होय. विक्रमबाहूला या नातवाच्या जन्मामुळे आनंद झाला. लहानपणापासून पराक्रमबाहूमध्यें भावी मोठेपणाचीं चिन्हें दिसत होती. त्यानें कला, शास्त्र व धर्म यांचा चांगला अभ्यास केला व राज्यकर्त्याला आवश्यक गुण व गोष्टी संपादन केल्या. पण पराक्रमबाहु अजून तरुणच असतांना विक्रमबाहु मरण पावला. त्याचा दुर्बल मुलगा गजबाहु हा राज्यावर आला. पराक्रमबाहु आपला चुलता गजबाहु याला भेटावयास पोलनरुवा येथें गेला. गजबाहूनें त्याला आग्रहानें व आदरानें ठेवून घेतलें. पराक्रमबाहूनें आपला काळ तेथली लोकस्थिति व जनमन यांची माहिती मिळविण्यांत घालविला. पोलनरुवांत त्याच्या जीवाला अपाय होईल या भीतीनें त्याच्या आईनें पराक्रमबाहूला परत आपल्या रहात्या ठिकाणीं बोलाविलें. अजून योग्य संधि आली नाहीं असें पाहून पराक्रमबाहु परत आला. इतक्यांत त्याचा पालक चुलता वारला. नंतर तेथल्या छोट्या राजाचा कारभार पराक्रमबाहु पाहूं लागला व तो त्यानें फारच उत्तम रीतीनें केला. तेव्हांपासून पराक्रमबाहूचें हें ध्येय "कीं माझ्या राज्यांत जमिनीचा एक तुकडाही असा राहूं नये कीं ज्यापासून प्रजेला उत्पन्न मिळणार नाहीं." म्हणून त्यानें जागोजाग तलाव बांधले, पाटाचीं कामें केलीं, झाडे लावलीं, व नवी जमीन लागवडीस आणिली. आपलें सामर्थ्य वाढलें आहे असें पाहून त्यानें गजबाहूवर हल्ला केला. त्यामध्यें त्याला पूर्णपणे यश येऊन त्यानें अनुराद्धपुर राजधानी काबीज केली. नंतर पोलनरुवा शहर घेतलें. त्यानें गजबाहूला चांगल्या तऱ्हेनें वागविलें. पण गजबाहु लवकर मरण पावला. पराक्रमबाहूसारखा कर्तृत्ववान राजा सर्व लंकेचा राजा झाला म्हणून सर्व प्रजेला आनंद झाला. पराक्रमबाहूला सन ११६४ मध्ये राज्याभिषेक करण्यांत आला.
त्यानें आपल्या सर्व राज्याचा उत्तम बंदोबस्त केला. तो करण्याकरितां त्याला पुष्कळ लढाया कराव्या लागल्या, पण तो त्यांत यशस्वी झाला. मग त्यानें सर्व देशभर लोकोपयोगी कामें केलीं; अनुराद्धपुराची दुरुस्ती करून त्या राजधानीची झालेली दैना दूर केली; पोलनरुवा राजधानीस तर त्यानें प्रति अमरावती बनविलें. हल्लीं शोधून काढलेलें पोलनरुवा शहर पराक्रमबाहच्या काळचेंच होय. पराक्रमबाहूनें याप्रमाणें सर्व लंका बेटाला पूर्वकाळचें वैभव व संपन्नता आणून दिली. त्यानें एकंदर तेहतीस वर्षे राज्यकारभार केला. पराक्रमबाहूला पुष्कळ राण्या होत्या. त्यांपैकीं लीलावती व रूपवती या त्याच्या फार आवडत्या राण्या होत्या. पराक्रमबाहूनंतर त्याच्या बहिणीचा मुलगा राज्यावर आला. त्याने चांगल्या प्रकारें राज्य केलें. पण पुढले राजे दुर्बळ निघाले व आपसांतील तंट्यामुळे तामीळ राजांनीं पुनः लंका काबीज केली. पुढे त्यांचेही वैभव कमी झालें. पंधराव्या शतकांत कँडी ही विमलधर्म या राजानें आपली राजधानी केली. पण एव्हांपासून युरोपीयन लोकांची टोळधाड लंकेवर सुरू झाली. त्यांनी लंकेचा किनारा व त्यालगतचा मुलुख ताब्यांत घेऊन तेथे हळूहळू आपला अंमल सुरू केला. कँडीचे राजे यांनी दोन शतकें कसेंबसें डोंगराळ मुलुखांत राहून आपलें खड्यासारसे छोटे राज्य संभाळले. पण कँडीचा शेवटचा राजा श्रीविक्रमराजसिंह याला इंग्रजांच्या हातावर राज्याचें दान देऊन सन १८१५ मध्यें राजसंन्यास घ्यावा लागला. पण पंधराव्या शतकापासून लंकेचा अर्वाचीन काळ सुरू होतो. त्या काळची सविस्तर माहिती पुढील 'लंकेचा अर्वाचीन इतिहास' या प्रकरणांत येईल. तेव्हां हें प्रकरण येथें संपविणें रास्त आहे.
पुरातन कालापासून लंका बेटाला जायचे दोन मार्ग माहीत आहेत. एक खुष्कीचा व एक जलमार्ग. पूर्वकाळीं जलमार्ग काय किंवा खुष्कीचा मार्ग काय दोन्हीही बिकट व संकटमय होते. पण आतां आगगाड्या व आगबोटी या साधनांच्या सोयीमुळे दोन्ही मार्गांनी दोन तीन दिवसांत लंकेला जातां येतें. साउथ इंडियन रेल्वेनें धनुष्कोडी धक्क्यापर्यंत आगगाडीनें जावयाचें. तेथून आगबोटीनें दोन तासांत लंका बेटाच्या तलाईमानार धक्यावर उतरावयाचें. तेथून लंकेंत कोठेही आगगाडीनें जातां येतें. मी लंकेला सबंद जलमार्गाने गेलों. हल्लीं इटालीयन लॉइड ट्रीस्टीनो कंपनीनें ट्रीस्ट बंदरापासून चीनमधील शांघाय बंदरापर्यंत जाणाऱ्या दरमाही आगबोटींची रहदारी सुरू केली आहे. ती आगबोट मुंबईहून दोन दिवसांनी कोलंबो बंदरास पोहोंचते. मी ता. २२ नोव्हेंबर १९३३ रोजी काँटे रॉसो बोटीनें दिवसा बारा वाजतां मुंबई बंदर सोडलें. काँटेरॉसो ही इटालीयन कंपनीची बोट वीस हजार टनाची असून ती दर तासास सुमारें वीसबावीस मैलांच्या वेगानें जाते. तीन चार वर्षांखालीं मी या कंपनीच्याच आगबोटीनें विलायतचा जाता येताचा प्रवास केला होता. त्यावेळीं त्यांच्या बोटी छोट्या होत्या. पण काँटे रॉसो ही खरोखरीच फार मोठी बोट आहे. तीला एकावर एक पांच मजले (डेक्स) आहेत. सर्वांत वरच्या कप्तानाच्या केबीनी पांच मजली इमारतीच्या वरच्या खोल्यांसारख्या उंच दिसतात. पहिल्या वर्गाचा बसावयाचा दिवाणखाना तर एखाद्या राजवाड्यांतील सुंदर दिवाणखान्याप्रमाण झुंबरांनी, पडद्यांनीं, गालिच्यांनी, मखमाली खुर्च्या टेबलांनीं शृंगारलेला असून भिंतीवर व तक्तपोशीवर सुंदर सुंदर तैलचित्रे व निसर्ग- रमणीय देखावे काढलेले आहेत. म्हणूनच महाराजा सर सयाजीराव गायकवाड यांच्यासारखे मोठ्या दर्जाचे राजे सुद्धां या बोटीनं प्रवास करूं लागले आहेत.
वर सांगितल्याप्रमाणे माझी बोट बारा वाजतां मुंबई बंदराच्या बाहेर पडली व मग ती वेगानें चालू झाली. बऱ्याच वेळपर्यंत मुंबई बेट दिसत होतें; पण लंकेचा प्रवास विलायतच्या प्रवासाप्रमाणें दूर देशच्या प्रवासासारखा भासत नाहीं. कारण त्या प्रवासांत मुंबई बंदर एकदां दिसत नाहींसें झालें कीं, पांच सहा दिवसांनीं एडनचे उघडे बोडके व जळके खडक व डोंगर दिसूं लागेपर्यंत वर निळें निळें आकाश व खालीं धूसर व हिरवट रंगाचा समुद्र व त्यावर पांढऱ्या फुलांच्या माळांप्रमाणे येणाऱ्या लाटा याखेरीज कांहींच दिसत नाहीं. अफाट समुद्रावर आपली बोट एकाकी चालली आहे असा भास होतो. पण लंकेच्या प्रवासांत असें वाटत नाहीं; निदान पहिल्या दिवशीं तरी मला तसें वाटलें नाहीं. कारण हिंदुस्थानचा किनारा अस्पष्टपणे कां होईना पण सतत दिसत होता. रात्रीच्या वेळीं सुद्धां दीपगृहांतील फिरते व मधून मधून लकाकणारे दिवे दिसतात. यामुळे बोट किनाऱ्यापासून फारशी दूर नसावी असें कळून येतें. मनाला एक प्रकारचा न कळत धीर व विश्वास वाटतो, व जल-प्रवासाचा धोका केव्हांच मनांत येत नाहीं. विलायतेच्या प्रवासांत ज्याप्रमाणें मला अनुभव आला त्याप्रमाणे या प्रवासांतही अनुभव आला. अर्वाचीन जल-प्रवासांत सर्व प्रकारच्या सुखसोयी असतात. इतकेंच नव्हें तर येथला दिनक्रमही अगदीं रेखलेला व नियमित असतो. पहाटेस साडेपांच सहा वाजतां उठून सकाळचे सर्व विधी (यांत अर्थात् दाढी करण्याचा दररोजचा विधी वाढतो) आटोपतात तोंच न्याहारीची घंटा होते. मी यावेळीं सेकंड एकॉनॉमिक अथवा इंटर क्लासने गेलों; त्याला सहामाही परत प्रवासाच्या तिकिटासकट रु. १०७σ८ आणे किंवा ८ पौंड पडले. या क्लासाला शेजचहा मिळत नाहीं. पण ७॥ वाजतांच न्याहारी मिळते.
न्याहारी झाली की फराळाच्या वेळेपर्यंत डेकवर फिरावें किंवा धूम्रपान-गृहांत बसावें; किंवा समुद्राची शोभा पहावी. माझ्या विलायतेच्या प्रवासांत मला लाभलेल्या दोन्ही बोटींना बोटीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सभोंवार फिरण्यास मुभा होती. पण काँटे रॉसो बोटींत तशी सोय नव्हती. हे या बोटीचें मोठें वैगुण्य मला वाटलें. कारण येथें प्रत्येक वर्गाचें निराळें डेक होतें व एका डेकांतून दुसऱ्या डेककडे जाण्यास प्रतिबंध होता. यामुळें बोट येवढी मोठी असून सुद्धां आमच्या डेकची जागा संकुचित भासली; कारण बोटीचा इंटर वर्ग माणसांनीं चिकार भरलेला होता. पण माझा प्रवास काय तो दोन दिवसांचा! म्हणून संकुचित जागेची अडचण भासणार तोच आमची उतरावयाची वेळ झाली सुद्धां. या दिवसांत आरबी समुद्र अगदीं शांत असतो; बोट किनाऱ्यापासून फारशी दुरून जात नसल्यामुळें समुद्राचें पाणी धूसर हिरवट दिसतें. नेहेमी अनुभवास येणारा समुद्राचा काळसर दाट निळा रंग हिंदुस्थानचा किनारा टाकून कोलंबो बंदराच्या दिशेने थेट बोट पूर्वेकडे जेव्हां वळली तेव्हांपासून दिसूं लागला. मग कांहीं काळपर्यंत वर निळे आकाश व खालीं दाट निळे पाणी याखेरीज कांहीं एक दिसेनासें झालें.
मुंबईपासून कोलंबो बंदर ८८९ मैल आहे. ता. २३ च्या बारा वाजेपर्यंत म्हणजे बरोबर २४ तासांत आमच्या बोटीनें ४२९ मैलांची मजल मारली. कोलंबो बंदरास दुसरे दिवशीं दुपारी एक वाजतां बोट पोहोंचण्याचा अंदाज आहे असें दररोजच्या रिपोर्टावरून कळलें.
पण ता. २४ सकाळपासून आम्हाला हिंदुस्थानचा किनारा अदृश्य झाला व लंकेचाही किनारा दिसूं लागला नव्हता. तेव्हां अफाट समुद्रांत प्रवेश केल्याचा भास झाला. आतां खरोखरीच आरबी समुद्र टाकून आम्हीं हिंदी महासागरांत प्रवेश केला. या समुद्रांच्या नांवांचेही मोठें नवल वाटलें. हिंदुस्थानपासून आरबस्थान कितीतरी दूर पण हिंदुस्थानच्या येवढ्या मोठ्या लांबच लांब पसरलेल्या किनाऱ्यालगतच्या समुद्राचें नांव आरबी समुद्र! आणि हिंदुस्थानचा पश्चिम किनारा दूर टाकल्यावर लागणाऱ्या अफाट समुद्राचें नांव हिंदी महासागर! तेव्हां हीं नांवें अन्वर्थक नसून कांहीं तरी आकस्मिक कारणांनी पडलेली असावीं असें वाटल्यावांचून राहिलें नाहीं.
ता. २४ सकाळपासून म्हणजे आम्हीं हिंदी महासागरांत प्रवेश केल्यापासून वारा जोराचा सुटला व महासागरानें किंचित् उग्र स्वरूप धारण केलें. यामुळें कित्येक लोकांना व विशेषतः नाजूक बायकांना थोडीशी दर्यादुखी वाटूं लागून त्या केबीनमध्यें अंथरुणावर जाऊन पडल्यासुद्धां; पण तो वारा वादळी वारा म्हणण्याइतका जोरदार नव्हता. मात्र त्याने आमच्या बोटीच्या वेगाला थोडासा अडथळा केला व आदल्या दिवसाच्या अंदाजापेक्षां कोलंबोस पोहोंचण्यास तास दीड तास उशीर होणार असें समजलें. दीड दोन वाजतांच्या सुमारास एकदांचें कोलंबो बंदर दिसूं लागलें व तीन वाजतां बोटीने बंदरांत नांगर टाकला. बंदरांत बोट आल्यावर मेडिकल ऑफिसर व पोलीस ऑफिसर बोटीवर आले. त्यांनी थोड्या वेळापुरते किनाऱ्यावर जाणाऱ्या लोकांना आधीं परवाने दिले. ही मंडळी पुष्कळच होती. कोलंबोस उतरणारे उतारू थोडेच होते. दुसऱ्या वर्गानें जाणाऱ्या उतारूंना फार त्रास होत नाहीं; पण तिसऱ्या वर्गाच्या उतारूंना पुष्कळ वेळां दहा दिवस क्वारंटाईन किंवा निदान हजेरी तरी द्यावी लागते. लंकेंत जाणाऱ्या उतारूनें देवी काढल्याचा किंवा आंगच्या देवी आल्याचा व प्लेगची लस टोचून घेतल्याचा दाखला. बरोबर आणणे आवश्यक आहे. नाहींतर क्वारंटाईनचा त्रास पडतो. पण माझ्याजवळ दोन्ही दाखले असल्यामुळे मला कांहीं एक त्रास झाला नाहीं. मला जॉली बोटींत जाण्याची परवानगी मिळाली. येथें थोरल्या बोटी लागणारे मुंबई बंदराप्रमाणें खोल पाण्याचे धक्के नाहीत. असा धक्का बांधण्याचा विचार चालू आहे. चार वाजतां मी जॉली बोटींतून लंकेत पहिले पाऊल टाकलें. जॉली बोटीला दर माणशी आठ आणे पडतात; व दर बोजास हमालीही तितकीच पडते. हमाल बोजे आणून कस्टम ऑफिसांत ठेवतात. तेथें प्रत्येक ट्रंक उघडून आंतील वस्तूंची कसून तपासणी होते. माझ्याजवळ करास पात्र असें कांहीं नसल्यामुळे माझी लवकर सुटका झाली. कस्टम कचेरींतून बिनत्रास सुटका होऊन बाहेर आल्याबरोबर मनाला समाधान वाटत आहे तोंच थेट मुंबईसारखा देखावा पाहून पूर्व परिचयाचा मनाला आनंद वाटला. कोलंबो शहर मुंबई शहराची छोटेखानी आवृत्तिच आहे असें वाटलें. तसेंच डामरी काळसर रस्ते, तशाच फसरबंदी पाऊलवाटा, तशाच पिवळ्या, पांढऱ्या, तांबड्या रंगाच्या उंच उंच इमारती व त्यासमोर तशाच कमानदार आच्छादित पाऊलवाटा, तशाच वृक्षांच्या रांगा. सारांश, कोलंबो शहराचें प्रथम दर्शन मनावर अनुकूल ग्रह उत्पन्न करितें यांत शंका नाहीं. माझ्या हिंदुस्थानांतील दोघां स्नेह्यांनी कोलंबोस त्यांच्या स्नेह्यांना आगाऊ पत्रे लिहिलीं असल्यामुळे ते स्नेही कस्टम कचेरीशीं मला भेटले. त्यांच्या मदतीनें मी समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका शांत व स्वच्छ गल्लीतील डोमिनियन हॉटेल नांवाच्या निवासगृहांत उतरलों. मला अगदीं पश्चिमेकडे समुद्रासमोरच खिडकी असलेली सर्वांत वरच्या मजल्यांतील एकमाणशी खोली मिळाली. त्यामुळें समुद्राचें हिरवट निळसर पाणी, त्या पाण्यावरून सतत किनाऱ्याकडे येणाऱ्या लहान मोठ्या लाटा व मधून मधून त्या लाटांनी उत्पन्न झालेल्या पांढऱ्या शुभ्र फेसांच्या माळा हा सुंदर देखावा सदा डोळ्यापुढे उभा राही व मनाला आनंद देई. दररोज फक्त चार रुपये देऊन मुंबईच्या नेपीयन सी रोडवरील समुद्र किनाऱ्याला लागून असलेल्या एखाद्या हवाशीर बंगल्यांत राहिल्याचा मला भास झाला. पण नेपीयन सी रोडच्या पेक्षांही येथला देखावा जास्त मनोहर आहे. कारण येथें खडकाळ व म्हणून घाणेरडा दिसणारा समुद्राचा भूमिभाग मुळींच दिसत नाहीं. ओहोटी असो भरती असो रस्त्याच्या लगतच्या पाऊल वाटेच्या सखल भिंतीला लागून नेहमीं समुद्राचें पाणी असतें.
मी कोलंबोमध्ये सुमारें दहाबारा दिवस राहिलों. त्या वेळांत पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळवर्णनाकडे आतां वळणं बरें. आधीं कोलंबो बंदर व शहर यांचें सामान्य स्वरूप सांगणे सोयीचे होईल.
कोलंबो बंदर हे मार्मागोवा बंदराप्रमाणें खुलें व भर समुद्रावरील कृत्रिम बंदर आहे. मुंबई, कराची यांच्याप्रमाणें तें आपोआप व सहज बनलेलें बंदर नाहीं. शिवाय तें अगदीं अर्वाचीन काळचें आहे. पोर्तुगीज व डच लोक जलमार्गानें पूर्व दिशेला व पूर्वेकडील देशांना येऊ लागले त्या वेळेपासून अलीकडेपर्यंत लंकेच्या दक्षिण टोकास असलेलें गॉल हेंच सिलोनचें बंदर होतें. तेथें प्रथमतः परदेशचीं गलबतें व आगबोटी लागत असत. पण तें बंदर बेटाचे अगदीं खालचे टोकाला असल्यामुळे फार गैरसोयीचें वाटे. म्हणून कोलंबो येथें सन १८७४ च्या सुमारास कृत्रिम बंदर करण्याचें ठरलें. कोलंबो येथें एके ठिकाणीं किनारा कांहींसा द्वारका बेटाप्रमाणे किंचित् पुढें आलेला आहे. तेथें टेकडीवजा थोडा उंच खडकही आहे. तेव्हां तेथें बंदर करण्यास सोयीची जागा पाहून खडकापासून तटवजा मजबूत भिंत थेट उत्तर दिशेला एका मैलापर्यंत बांधण्यांत आली. या प्रचंड बांधकामाच्या पायाचा दगड सातवे एडवर्ड प्रिन्स ऑफ वेल्स असतांना त्यांच्या हस्ते सन १८७५ मध्ये बसविण्यांतर आला. तें काम पुरें झाल्यावर दुसरी व मग तिसरी अशा निरनिराळ्या दिशेला भिंती घालण्यांत आल्या. या भिंतींना इंग्रजीत लाटमोड्या भिंती (break-waters) म्हणतात. या लाटमोड्या भिंतींवर लाटा आपटून त्यांच्या फेसाचे फेवारे कितीतरी उंच उडतात. हा देखावा विलक्षण खरा! या कृत्रिम भिंतीच्या योगानें साडेसहाशें एकरांचा समुद्राचा भाग मुख्य महासागरापासून जणूं कांहीं वेगळा केल्यासारखा झाला व तो या प्रचंड लाटमोड्या भिंतींमुळे सुरक्षित व स्वाभाविक बंदराप्रमाणे शांत पाण्याचा तलाव झाला. कारण हिंदी महासागरावरील वारा व लाटा या प्रचंड भिंती थोपवून धरतात व बंदरामध्यें भिंतीमधील प्रवेशद्वारानें आंत येऊन गलबतांना व आगबोटींना शांत पाण्यांत उभे राहण्यास सांपडतें. परंतु कोलंबो बंदराला मुंबई बंदराप्रमाणें मोठ मोठ्या बोटी धक्क्याला लागतील असा खोल पाण्याचा धक्का बांधलेला नाहीं. म्हणून मागें सांगितल्याप्रमाणें येथें मोठ्या आगबोटीतून जॉली

कोलंबो शहराचें सामान्य स्वरूप समजून देणें फारच सोपें काम आहे. कोलंबो हे सात मैल लांबीचें, दोन अडीच मैल रुंदीचे सुमारें तीन लाख वस्तीचें शहर असून तें लंका बेटाच्या पश्चिम किनाऱ्यालगत व बेटाच्या लांबीच्या अर्ध्या अंतराचे जरा खालीं वसलेलें आहे. या शहराची उत्तर मर्यादा केलानी गंगा नांवाच्या नदीनें बनलेली आहे. ही नदी पूर्वेकडील डोंगराळ प्रदेशांत निघून नागमोडी वळणे घेऊन कोलंबो बंदराच्या उत्तरेस तीन मैलांवर हिंदी महासागरास मिळते. या नदीशीं कोलंबो म्युनिसिपालिटीची हद्द संपते. कोलंबो शहराच्या दक्षिण दिशेस वरच्यासारखी स्वाभाविक मर्यादा नाहीं; कारण हा दक्षिण दिशेकडचा किनारा कालु गंगा नांवाच्या नदीच्या मुखापर्यंत सुमारें पन्नास मैल सारखा सलग आहे. पण म्युनिसिपालिटीची मर्यादा बंदरापासून चार मैलांवर असलेल्या वेलावाटा खेड्यापर्यंत आहे. शहराच्या पश्चिमेस अर्थात् हिंदी महासागर आहे. शहराची पूर्व- मर्यादा कृत्रिमच आहे व ती उत्तरेस कँडी व दक्षिणेस रत्नपुर या शहरांस जाणाऱ्या रेलवे रस्त्यांनी बनली आहे.
कोलंबो शहराचा मुख्य भाग म्हणजे ज्याला फोर्ट किंवा किल्ला म्हणतात तो होय. डच लोकांच्या ताब्यांत लंका बेट असतांना हा किल्ला त्यांनी बांधला. आतां त्यापैकीं कांहींच शिल्लक राहिलें नाहीं. मात्र तट पाडल्यामुळे मुबलक खुली जागा झाली व त्यामुळें या भागांत फारच प्रशस्त रस्ते व दुतर्फा रुंद पाऊलवाटा करावयास सांपडल्या. या भागांत व बंदरांत अगदी नजीक क्वीन्स हाऊस नांवाचा जुना मोठा बंगला आहे. हाच लंकेच्या गव्हर्नराचा राहण्याचा बंगला. मुंबई-पुण्याच्या गव्हर्नराच्या सरकारी गृहाप्रमाणे शेंकडो एकर जागेचें या बंगल्याला आवार नाहीं; सामान्यतः खासगी बंगल्याला असतें असेंच या सरकारी बंगल्याचें आवार आहे. पण त्यांत उंच उंच व दाट झाडे आहेत. यामुळे हा बंगला बाहेरून दिसत नाहीं. सरकारी बंगल्यासमोर जनरल पोस्ट ऑफिसची भव्य दगडी इमारत आहे. किल्ल्याचा राहिलेला भाग मोठमोठ्या युरोपियन दुकानांच्या, मोठमोठ्या बँकांच्या व प्रचंड हॉटेलांच्या तांबड्या, पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या दगडी व विटांच्या भव्य व उंच उंच इमारतींनीं दुतर्फा व्यापलेला आहे. कस्टम हाऊस व पॅसेंजर उतरण्याचा धक्का यांचेसमोर मोठा यॉर्कस्ट्रीट नांवाचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरच ग्रँड ओरिएंटल हॉटेल व ब्रिस्टल हॉटेल या नांवांची मोठीं भव्य वसतीगृहें आहेत. गव्हर्नरच्या बंगल्यावरून जो एक मोठा प्रशस्त रस्ता जातो त्याचें नांव क्वीन्स स्ट्रीट. हे दोन्ही रस्ते समांतर असून दक्षिणोत्तर जातात. सरकारी बंगल्यासमोरून थेट पूर्वेकडे रस्ता जातो त्याचें नांव मेन स्ट्रीट. हा रस्ता पुष्कळ लांबवर जातो. या रस्त्याला दुतर्फा कोलंबोमधील युरोपीयनेतर लोकांच्या व्यापाऱ्यांचीं सारखीं दुकानें लागलेलीं आहेत. या भागाला पेट्टा म्हणतात. कोलंबोचा फोर्ट हा भाग छोटा असून त्याची फार सुबक रचना असल्यामुळे कोलंबो बंदरांत प्रथम पाऊल ठेवणाराचा फारच अनुकूल ग्रह होतो. फोर्ट व पेट्टा हे दोन्ही भाग छोटे असून ते एकमेकांना लागून आहेत. हेंच मूळचें कोलंबो शहर. पुढे शहराचा तिन्ही बाजूंस विस्तार होत गेला. त्याच्या वर्णनास लागण्यापूर्वी कोलंबो शहरांतील दळणवळणाच्या साधनांची व सोयींची माहिती देणे इष्ट आहे.
सिलोनमध्यें सर्व रेलवे रस्ते सरकारी आहेत; येथें खासगी कंपन्या व त्यांची चढाओढ हा प्रकार नाहीं. शहरांत दोन मुख्य स्टेशनें आहेत. एक मरडाना व दुसरें फोर्ट. पण कोणतेंही स्टेशन टरमीनस (शेवटचे) असे वाटत नाहीं. कारण कोलंबो शहरांतून थेट उत्तर दिशेला व थेट दक्षिण दिशेला जाणाऱ्या दोन रेलवे लाइनी आहेत व दुसऱ्या ईशान्य (उत्तर- पूर्व) दिशेनें कँडीकडे जाणारी व आग्नेय (दक्षिणपूर्व) दिशेनें रत्नपुराकडे जाणारी अशा दोन लाइनी आहेत. त्या सर्व मरडाना व फोर्ट या दोन्ही स्टेशनांपासून निघतात. यामुळें प्रथमतः प्रवासी थोडासा गोंधळांत पडतो. मुंबई शहरांतून उत्तरेस जाणारी बाँबे-बडोदा लाईन, ईशान्येस नाशकाकडे जाणारी लाईन, आग्नेयीस पुण्याकडे जाणारी लाईन व चवथी थेट दक्षिणेस पेन-पनवेलकडे जाणारी लाईन (अशी लाईन नाहीं ही गोष्ट निराळी) अशा चारी लाईनी व्हिक्टोरिया व सेंट्रल या स्टेशनांपासून निघाल्या, अशी कल्पना केली म्हणजे कोलंबोच्या रेलवे रस्त्यांबद्दल चांगली समजूत पडेल. पण दक्षिण दिशेनें थेट समुद्रकिनाऱ्याला भिडून जाणाऱ्या रेल्वेच्या दोन तीन स्टेशनांखेरीज रेलवेचा उपयोग शहरांतील दळवळणाला मुळींच होत नाहीं.
दळणवळणाचें दुसरें जलद व स्वस्त साधन ट्रॅमचें. पण कोलंबोमध्यें मुंबईसारखें ट्रॅमचें फार मोठे जाळे पसरलेलें नाहीं. यॉर्क रस्त्यापासून जवळ जवळ समांतर अशा दोन ट्रॅम लाईनी एक मेन स्ट्रीटनें व दुसरी चॅथॅम स्ट्रीट ईशान्य दिशेस व आग्नेय दिशेस जातात. मेनस्ट्रीटनें जाणाऱ्या ट्रॅम लाईनला ग्रँड पासलाईन म्हणतात व ती केलानी नदीच्या व्हिक्टोरिया पुलापर्यंत जाते. दुसऱ्या ट्रॅम लाईनला बोरेली लाईन म्हणतात व ती दक्षिणोत्तर जाणाऱ्या वेजलाईन रस्त्यापर्यंत जाते. या ट्रॅमलाईनला कोठे बदली करावी लागत नाहीं; या लाईनी मध्यें कोठें एकमेकांना जोडलेल्या नाहीत; त्या एकाच ठिकाणाहून निघून परस्परविरुद्ध दिशेनें जातात. यॉर्क रस्त्यापासून दोन्ही टोकांच्या ट्रॅम टरमिनसला जाण्यास सारखेंच भाडें पडतें व तें ८ सेंट म्हणजे १६ पै पडतें व वेळ सरासरी वीस पंचवीस मिनिटें लागतो. बहुतेक शहर या दोन ट्रॅम लाईनींनीं जाऊन आलें कीं पाहून होते.
तिसरें दळणवळणाचें अर्वाचीन साधन म्हणजे टॅक्सी मोटरकार. पण हें साधन फार महागाईचें आहे. शिवाय शहराचा फारसा विस्तार नसल्यामुळें या साधनाचा फारसा उपयोग नाहीं.
कोलंबोमध्यें घोड्याच्या गाड्या किंवा टांगे हे शहरांतील दळणवळणाचें साधन फार क्वचित् दृष्टीस पडतें.
कोलंबोमधील सररहा चालणारें साधन म्हणजे रिक्शा होत. या मनुष्यांनी ओढावयाच्या अति हलक्या व नाजुक अशा छोट्या गाड्या असतात. यांमध्यें एकच मनुष्य बसूं शकतो. अशा रिक्शा व गाडया ओढणारी माणसें येथें गल्लोगल्लीं व चौकाचौकास हवीं तितकीं दृष्टीस पडतात. ज्याप्रमाणें आपल्या इकडल्या शहरांत टांगेगाड्या उभे राहण्याचे अड्डे असतात त्याप्रमाणें कोलंबोमध्यें रिक्शा उभे राहण्याचे अड्डे असतात. मनुष्यांनीं बैलांप्रमाणें गाड्या ओढण्याची रिक्शा गाड्यांची पद्धती मी प्रथम पंचवीस वर्षांपूर्वी मद्रासेस पाहिली होती. तेव्हां ही पद्धती गुलामगिरी- इतकी मनुष्याला नीचपणा आणणारी नसली तरी या पद्धतीमध्ये आपण आपल्यासारख्या माणसांचा बैलासारखा उपयोग करून माणसांना प्रत्यक्ष बैल बनवितों म्हणून रिक्शाचा उपयोग करावयाचा नाहीं असा मी निश्चय केला होता व तदनुरूप कोलंबोंतसुद्धां मी रिक्शाचा उपयोग केव्हांही केला नाहीं. सर्व शहर मी ट्रॅमनें व पायीं चालून पाहिलें. तरी आतां शहरांतील प्रेक्षणीय स्थळवर्णनाकडे वळणें बरें.
कोलंबो शहराचे उत्तरभाग, मध्यभाग व दक्षिण भाग असे तीन भाग पडतात. मध्यभागांत फोर्ट व पेट्टा येतात. येथें युरोपीयन हॉटेलें व तद्देशीय दुकानें या खेरीज पहाण्यासारखें कांहीं नाहीं. कोलंबोचा उत्तरभाग हा लंडनच्या ईस्ट एंडसारखा साधारण गरीब स्थितींतील मजूर लोकांच्या वस्तीचा भाग आहे. बंदरही इकडेच पसरले असल्यामुळे, मालाची नेआण करणारी धक्क्यापर्यंत नेलेली आगगाडी अगदीं समुद्राला लागून असल्यामुळे व तिच्या बाजूनें पुरुषभर उंचीची भिंत सारखी घातल्यामुळे रिक्लेमेशन रोड नांवाच्या नव्या रस्त्यानें चालत गेलें म्हणजे समुद्र मुळींच दिसत नाहीं. मालाच्या नेआण करणाऱ्या बैलगाड्यांच्या रहदारी करितां हा सर्व रस्ता फरसबंदी केलेला आहे. हा भाग कांहींसा अस्वच्छ व मळकट घरांचा दिसतो. या इकडल्या भागांत मी दोनच प्रेक्षणीय स्थळें पाहिली. दोन्ही ट्रॅमनें जाऊन व मग चालत जाऊन पाहतां येतात. पहिलें प्रेक्षणीय स्थळ म्हणजे सेंट लुसीयन नांवाचें रोमन कॅथॉलिक प्रार्थना मंदिर होय. ट्रॅम टाकून प्रशस्त आरमार रस्ता चालून डाव्या हातास वळलें कीं एका बोळांत हे जुनें प्रार्थना मंदिर लागतें. बाह्य देखाव्यावरून हें फार जुनें मंदिर आहे हें तेव्हांच कळतें. कारण हे मंदिर विटांचें असून त्याला आंतून बाहेरून चुन्याचा गिलावा केलेला आहे. त्या काळवंडलेल्या व कोठें कोठें शेवाळ बाजलेल्या भिंतीवरून मंदिराचा जुनाटपणा तत्काळ ध्यानांत येतो. मंदिराचा घुमट भव्य व उंच आहे. मनोऱ्यावर रोमन कॅथॉलिक साधूंच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. मी प्रार्थना मंदिराच्या आंत शिरतों तों तेथें बरीच मंडळी जमलेली असून सकाळची प्रार्थना चालू आहे असें पाहिलें. आंतला भाग भव्य व उंच आहे; अगदीं शेवटीं गाभाऱ्यावजा चौथऱ्यावर मेरी व क्राईस्ट यांची सोनेरी मखरांत बसविलेली मूर्ती आहे. या मंदिराच्या दोन्ही बाजूच्या प्रत्येक प्रचंड खांबावर लहानसा गलथा केलेला असून त्यावर निरनिराळ्या साधुसंतांच्या मूर्ती बसविलेल्या दिसल्या. प्रत्येक मूर्तीवर व तिच्यापुढे फुलांच्या माळा व गुच्छ ठेवलेले दिसले. मुख्य गाभाऱ्यासमोर व गलथ्यावर मेणबत्त्या जळत होत्या. एकंदर देखावा हिंदी देवळासारखाच दिसला, पण येथें पूर्ण शांतता होती. यामुळे प्रार्थनेला एक प्रकारचें गांभीर्य व पवित्रता आलेली दिसत होती.
दुसरें प्रेक्षणीय स्थळ म्हणजे बुद्धधर्मी कालिनी देऊळ. हे पहाण्याकरितां ट्रॅमनें व्हिक्टोरिया पुलाच्या टरमिनसपर्यंत जावें. येथेंच कालिनी नदी लागते; डाव्या हातच्या गल्लीनें गेलें म्हणजे लोखंडी खांबांनी व तुळयांनी बनविलेला मोठा थोरला पूल लागतो. नदी बरीच रुंद असून अगदीं पाण्यानें तुडुंब भरलेली आहे. अर्थात् येथें पाणी खारें आहे. कारण नदीचें महासागरास मिळालेलें मुख येथून नजीकच आहे. पूल टाकला की पलीकडे शहराचा देखावा जाऊन बागेचा देखावा सुरू होतो. जिकडे पहावें तिकडे नारळी, पोफळी, केळी, यांची झाडेंच झाडें दिसतात; सर्व जमीन व रस्त्याच्या सभोवारची खुली जागा या सर्वावर जणूं कांहीं हिरवा हिरवा गालीचा पसरला आहे असा भास होतो. कारण सर्व जागा हिरव्यागार गवतानें व्याप्त असते. हा रस्ता कँडीला जाणारा राजरस्ता होय. मैल दीडमैल चालल्यावर उजव्या हातास कालिनी गांवाला जाणारा रस्ता लागतो. हा रस्ता नागमोडी वळणाचा आहे. दोन्ही बाजूंस लहान लहान पण नीटनेटकीं टुमदार घरें लागत होती. प्रत्येक घरासभोंवतीं नारळ पोफळ केळी यांची गर्द झाडी होती. या भागांतून गेलें म्हणजे रत्नागिरी कोकणांतील गांवाची आठवण होते. मात्र इकडलीं घरें कोकणांतील घरांपेक्षां जास्त चांगलीं दिसतात. या रस्त्यानें मी बराच चाललो तरी बुद्ध मंदिराचा मागमूस लागेना. पण इतक्यांत एक बैलाचा एक्का भेटला. जशा इकडल्या रिक्शा तशाच इकडल्या बैलाच्या गाड्या. या फारच छोट्या, हलक्या व नाजूक असतात. यांत समोरासमोर एक एकच माणूस बसण्याइतकी आकुंचित जागा असते, फार लठ्ठ माणूस असेल तर दुसरा माणूसही बसणें शक्य नाहीं इतकी जागा लहान असते. जशी गाडी तसा बैल. हा बैलही आखूडशिंगी खोंडासारखा काळ्या रंगाचा असतो. हें वहानही रिक्शाप्रमाणे मोठं नवलाचें वाटतें. या बैलगाडीवाल्याशी मंदिरास पोहोंचवून मग परत कालिनी रेलवे स्टेशनला पोहोंचविण्याचा करार करून गाडींत बसलो. भाडें ४० सेंट म्हणजे सुमारें सात आणे पडलें. या सावकाश चालणाऱ्या गाडीने गेल्यामुळे मंदिर लागतां लागेना. साधारण सायंकाळ होत आली. शेवटी एकदांचें मंदिर आलें. या मंदिराचें नवें बांधकाम चालू आहे. तें एका बुद्धधर्मी बाईनें सुरूं केलें आहे असें कळले. पण एक भाग जुनाच आहे. त्यांत बुद्धाची निजलेल्या स्थितींतील एक प्रचंड मूर्ती आहे. दुसरी एक बसकी मूर्ती आहे; भिंतीवर अंजिठा लेण्याप्रमाणें रंगीत चित्रे काढलेली आहेत. पण काळोख होत चालल्यामुळे येथला देखावा स्पष्टपणे दिसला नाहीं. प्रवासाकरितां घेतलेली टॉर्च आणली असती तर बरें झालें असतें असें वाटलें. देवालयाजवळ बुद्धाचा कांहीं तरी अवशेष ठेवलेला दागबा (स्तूप) होता. याचा आकार व रचना अगदीं ठरलेली असते. हे सर्व देऊळ व दागबा विटांचें व त्यावर केलेल्या गिलाव्याचें काम आहे. समोरच पण बरीच खोलांत अशी कालिनी नदी आहे. पण बाजूच्या गर्द झाडांनीं ती दिसत नाहीं. जरी या देवळाचें ठिकाण निसर्गरमणीय आहे तरी या बुद्धदेवळापेक्षां मला मलीकगुंडा नांवाचें पेट्टाभागाच्या पलीकडे असलेले देऊळ जास्त आवडलें. या देवळाच्या मुख्य उपाध्यायाला मी प्रो. धर्मानंद कौशांबीकडून पत्र घेतलें होतें. पण त्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे मोठी अडचण भासली. दुसऱ्या एका भिक्षूला थोडेसें बोलण्यापुरतें इंग्रजी येत होते. येथे सुमारें पांचशे भिक्षूंना राहण्याची व शिकण्याची व्यवस्था आहे. हे देऊळ व त्याचें आवार नीटनेटकें व स्वच्छ ठेवलेले दिसलें; तितकें कालिनी देवळाचें दिसलें नाहीं. कोलंबोंत लहान मोठीं बुद्धधर्मी देवळें आणखी बरीच आहेत.
पण कोलंबोमध्यें- अत्यंत विलायती बनलेल्या शहरांत सुद्धां- देवळाखेरीज बुद्ध धर्माच्या प्रसाराची व प्राबल्याची खूण म्हणजे चौकाचौकाला दिसणारीं पिंपळाचीं झाडे होत. बुद्धगयेस पिंपळाच्या झाडाखाली गौतमबुद्धाला ज्ञान झालें; व म्हणून हा वृक्ष बौद्ध धर्मीयांना पवित्र वाटतो. पिंपळाला लहान मोठा पार बांधतात व झाडाला लागून लहानशा लाकडी मखरांत बुद्धाची मूर्ति ठेवतात. तिच्या पुढें प्रार्थना करतांना व मूर्तीच्या पुढें तांबड्या व पांढरा चाफ्याची फुलें व इतर फुले ठेवतांना बुद्ध बायका पुरुष या चौकांशी नेहमीं दिसतात. या पिंपळाच्या पारांप्रमाणें आपलेपणाचा भास उत्पन्न करणारीं तामीळ लोकांनी बांधलेलीं हिंदू देवळेंहीं कोलंबोमध्ये आहेत. त्यापैकीं एक देऊळ तर बांधकला व मूर्तिकला या दृष्टीने फार प्रेक्षणीय आहे हें छायाचित्रावरून दिसून येईल.
कोलंबोच्या दक्षिणेकडे बेटांतील सैन्याच्या बराकी, सेक्रेटॅरिएट व कौंसिल हॉल वगैरे सरकारी इमारती आहेत. आधीं बंदराला व धक्याला लागून दक्षिण अंगास जो उंचवट्याचा व पुढें घुसलेला भाग आहे तेथें कोलंबो बंदराचीं लष्करी संरक्षक कामे आहेत; तोफांचा डेपो येथेंच आहे. समुद्राच्या काठानें रस्ता आहे. तो अर्धवर्तुळाकार असून बंदराचे बाजूस येतो. डाव्या हातास गॉर्डन बाग नांवाची छोटीशी टुमदार बाग लागते. मागें सांगितल्याप्रमाणें या बागेला लागून क्वीन्स हाऊस नांवाचा गव्हर्नराचा बंगला आहे. त्या बंगल्यावरून क्वीन्सस्ट्रीट नांवाचा रस्ता थेट दक्षिण दिशेला जातो. या रस्त्याच्या मधोमध कोलंबोचा घड्याळ बुरूज आहे व त्याचेवरच गलबतांना व आगबोटींना मार्गदर्शक व स्थान दर्शक फिरता मोठा दिवा बसविलेला आहे. अर्थात् घड्याळ-बुरूज व दीपगृह हीं कोलंबोस एकच आहेत. मुंबईतील कुलाब्याची दांडी हे दीपगृह शहरापासून फार दूर व भरतीच्या वेळी पाण्यानें वेष्टिलें जाणारें दीपगृह आहे. पण कोलंबोचें दीपगृह हे शहरांतील एक प्रेक्षणीय स्थान असून तें प्रशस्त व सुंदर रस्त्याचे मधोमध बांधलेलें आहे. दीपगृह टाकून सरळ पुढे गेलें कीं उजव्या हातास गोलंदाज सैन्याच्या तुकडीच्या बराकी तर डाव्या हातास लष्करी शिपायांच्या बराकी लागतात. या बराकी टाकल्या की अफाट हिंदी महासागर समोरच दृष्टीस पडतो व आश्चर्य व आनंद अस मिश्र मनोविकार मनुष्याच्या मनांत उद्भूत होतात. येथून तब्बल एक मैलाची समुद्राला लागून सहलवाट बांधलेली आहे. ही वाट सन १८५४ मध्यें वार्ड नांवाच्या गव्हर्नरनें बांधविली. या सहलवाटेच्या डाव्या अंगास व समुद्रापर्यंत पसरलेल्या लांब रुंद कालव्यावजा सरोवराच्या कांठीं सिलोन सरकारची सेक्रेटॅरिएटची इमारत आहे. ही इमारत तांबडसर दगडाची असून फार लांबट आहे. चालतीं तीनशें पावलें लांबी भरली. या इमारतीपासून वेगळी, पण दगडी दुमजली आणि पायवाटेनें जोडलेली अशी, कौन्सिल स्टेट हॉलची भव्य इमारत आहे. या हॉलचा दर्शनी भाग समुद्रासमोर असून त्याला लांब, रुंद व दगडी कठड्यानें सुशोभित केलेल्या दगडी पायऱ्या आहेत. त्या दुसऱ्या मजल्याच्या हॉलवर जातात. या पायऱ्यांचे खाली पोर्चसारखा मोटारी व गाड्या थांबण्यास कमानदार खुला रस्ता ठेवला आहे. या तळमजल्यावर सभा

सद व प्रेक्षक यांच्या उपयोगाचा वाटपाही दिवाणखाना आहे. तेथून विजेच्या पाळण्याने प्रेक्षकांच्या सज्जाकडे जातां येतें. कौन्सिल हॉलची रचना अर्धवर्तुळाकार असून सभोवार निरनिराळ्या दर्जाच्या प्रेक्षकांकरितां सज्जे आहेत. कौन्सिलची बसावयाची रचना मुंबई कौन्सिलप्रमाणें आहे. जेथें जेथें इंग्रजांचें राज्य आहे तेथें तेथें त्यांनी लोकसभांची सर्व रचना व व्यवस्था ब्रिटिश पार्लमेंटासारखीच सामान्यतः केलेली आहे. यामुळें कोठेंही पहावयास गेलें तरी एक प्रकारचा पूर्वपरिचयाचा भास होतो. सिलोनच्या कौन्सिलची बैठक चालूं असल्यामुळे एके दिवशीं दोन प्रहरीं (येथें अडीच वाजतां बैठक सुरू होते) कौन्सिलचें काम पहावयास गेलों होतों. काम चालविण्याची पद्धत व वादविवादाची पद्धत मला पूर्ण परिचयाची वाटली. कारण मी मुंबई कौन्सिल, दिल्लीची असेंब्ली व ब्रिटिश पार्लमेंट यांच्या बैठका एक एकदां तरी पाहिलेल्या होत्या.
ही एक मैलाची सहलवाट खरोखरीच अपूर्व आहे. डाव्या बाजूस तो हिरवट निळसर रंगाचा अफाट हिंदी महासागर व त्याच्या त्या पांढऱ्या फेसाच्या पुष्पहारांनीं युक्त अशा लाटा, ती केशरी रंगाच्या बारीक रेतीने शोभित केलेली वाळवंटाची पट्टी, तिला लागून तो दगडी धक्का व डामरी काळी सहलवाट, तिच्या पलीकडे तांबड्या बारीक खडीचा रस्ता व त्याचे पलीकडे तें लांब व रुंद हिरव्यागार हरळीनें आच्छादिलेलें खुलें मैदान हा देखावा एकसमयावच्छेदेंकरून पाहिला म्हणजे ही सहलवाट कोलंबोचा एक अपूर्व अलंकार होय असें वाटल्यावांचून रहात नाहीं. या सर्व भागावर कोठेही एक सुद्धां झाड नाहीं. सर्व भूमिभाग अगदीं खुला व मोकळा ठेवण्यांत आला आहे. यामुळे सकाळी संध्याकाळीं केव्हांही येथें सहल करावयास आल्याबरोबर मन प्रसन्न होतें असा माझा आठदहा दिवसांचा अनुभव मला सांगतो. या खुल्या भागांत शुभ्र दगडांनी बांधलेला एक उंचच उंच स्तंभ आहे. हा अर्थात् महायुद्धाचा स्मारक स्तंभ आहे व तो फार दूरवरून स्पष्टपणे दिसतो. स्तंभाचें शिल्पकाम साधेंच पण नीटस आहे म्हणून हा स्तंभ सुंदर दिसतो. एका मैलाची ही सहलबाट जेथें संपते तेथें गॉलफेस हॉटेल नांवाचें तांबड्या विटांचें तीन मजली भव्य निवासस्थान आहे. हें निवासस्थान उत्तराभिमुख असल्यामुळे सहलवाटेच्या अगदीं समोर येतें. याच्या बागेची भिंत सहलवाटेच्या धक्याला लागूनच आहे. अर्थात् सहलवाट या हॉटेलाशीं खुंटते व मग रस्ता हॉटेलावरून समोर पूर्वेकडे जातो व दक्षिण दिशेच्या गॉल नांवाच्या बंदराला जाणाऱ्या मोठ्या राजरस्त्याला जाऊन मिळतो. ही सहलवाट कोलंबोत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचें मन आकर्षण करणारी आहे; माझ्यासारख्या रोज चालण्याचा व्यायाम करणाऱ्याला इतकी उत्तम व हवाशीर दुसरी पायवाट कोलंबोमध्यें नाहीं.
परंतु कोलंबोमधील यापेक्षांही अधिक प्रेक्षणीय स्थान म्हणजे सिनॅमन गार्डन्स (दालचिनी बाग) हा विस्तीर्ण व हवाशीर भाग होय. या भागाला हें नांव पडण्याचें कारण असें कीं डच लोकांच्या ताब्यांत कोलंबो असतांना या ठिकाणी त्यांनीं दालचिनीच्या बागा बनविल्या होत्या व हा मसाल्याचा पदार्थ ते मोठ्या किफायतीनें युरोपांत नेऊन विकत असत. सध्या अर्थात् या भागांत एकही दालचिनीची बाग नाहीं. आतां हें मुंबईतील मलबार हिल किंवा कुलाबा याप्रमाणे श्रीमंत लोकांच्या राहणीचें ठिकाण झाले आहे.
हें ठिकाण बरेंच विस्तीर्ण आहे. त्याचे मधोमध व्हिक्टोरिया पार्क नांवाची मोठी वर्तुळाकार बाग व उपवन ठेविलें आहे. त्याचे सभोवार वर्तुळाकार सहलवाट केलेली आहे. व्हिक्टोरिया पार्कचे दाट बाग व खुलें उपवन असे दोन भाग आहेत. खुल्या उपवनांत जिकडे तिकडे हिरवींगार हरळीचीं पटांगणें राखिलीं आहेत व मधून मधून फरसबंदी पाऊलवाटा ठेवल्या आहेत व हारीनें विजेच्या दिव्यांचे खांब बसविलेले आहेत. या उपवनाच्या एका टोकाला नवीन पांढऱ्या रंगाची दगडी व काँक्रीटची मिश्र बांधणीची उत्तम इमारत दिसते. ती ग्रीक बांधकला पद्धतीची आहे. प्रवेशद्वारासमोर सहा उंचच उंच खांब आहेत व त्यांवर तिकोनी दगडी छपर आहे. ही इमारत सन १९२८ मध्ये पुरी झाली असें प्रवेशद्वारावरील शिलालेखावरून कळलें. हिला टाऊन हॉल म्हणतात. पण ही कोलंबो म्युनिसिपालिटीच्या कचेरीची व कमिटीच्या बैठकीची इमारत होय. इमारत प्रेक्षणीय आहे यांत शंका नाहीं. सभोवार हिरवळीनें हिरवीगार दिसणारी खुली पुष्कळच जागा असल्यानें इमारत मोठी उठावांत दिसते व पांढऱ्या व हिरव्या रंगाचा तो मिलाफ मोठा मनोहर वाटतो.
या खुल्या उपवनाच्या दुसऱ्या टोकास कोलंबोचें पदार्थसंग्रहालय व त्याला लागून रॉयल एशिआटिक सोसायटीच्या सिलोन ब्रँचचें पुस्तकालय आहे. म्हणजे येथें छोट्या प्रमाणावर ब्रिटिश म्युझियम सारखी व्यवस्था आहे. शिवाय पार्कच्या बाहेरच्या रस्त्याला लागून कोलंबोचें सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आहे. पार्कच्या बागेच्या बाजूस चित्रमूर्तिकलाकृतींचें संग्रहालय आहे. या विस्तीर्ण उपवनाचे जरा दक्षिणेस गेलें म्हणजे हिरवेंगार मोठें मैदान लागतें. त्यांत युनिव्हर्सिटी कॉलेज, रॉयल ट्रेनिंग कॉलेज इत्यादि शिक्षणसंस्था एकमेकाशेजारी आहेत. चौकशीअंतीं असें कळलें कीं सिलोनमध्यें अजून स्वतंत्र विश्वविद्यालय स्थापन झालेलें नाहीं. फक्त एकच युनिव्हर्सिटी कॉलेज तेवढे बी. ए. पर्यंत शिकविणारे असून तें लंडन युनिव्हर्सिटीला जोडलेलें आहे. यामुळें सर्व परीक्षा लंडन युनिव्हर्सिटीकडून होतात. मुलांना परीक्षेला बसण्याची फी बरीच जबर आहे. नुसत्या प्रवेश परीक्षेस साठ रुपये फी आहे व पुढच्या परीक्षांस तर सवाशेपासून दीडशे रुपये परीक्षेची फी आहे. याप्रमाणें सिनामन गार्डन भाग म्हणजे कोलंबोच्या सार्वजनिक संस्थांचा भाग आहे. बागेच्या बाकी राहिलेल्या भागांत मोठमोठे बंगले आहेत. मी हा भाग दोनदां पायीं चालून जाऊन पाहिला. पदार्थ संग्रहालय व चित्रकलागृह हे आणखी एका दिवशीं पाहिलें.
या भागाला जावयाचा सोयीचा व सुंदर रस्ता म्हणजे फोर्ट स्टेशनपासून समुद्रकाठानें दक्षिण दिशेला जाणाऱ्या रेल्वेनें कोलपिटीया या स्टेशनला जावयाचें; मध्यें स्लेव्ह आयलंड नांवाचें एकच स्टेशन लागतें. कोलपिटीया स्टेशनवरून पूर्वेस ग्रीनपाथ नांवाचा रस्ता जातो तो थेट व्हिक्टोरिया बागेच्या व उपवनाच्या मधून जातो. किती सुंदर हा रस्ता आहे! रस्ता डांबरी, निर्धूळ व निर्मळ असून त्याचे दोन्ही बाजूंस क्राँक्रीटचे पायरस्ते आहेत; नवीं झाडें पायरस्त्याच्या मधून लावलीं आहेत. पण येथें रस्त्याला झाडें लावण्याची जरूरींच नाहीं. कारण रस्त्याच्या दुतर्फा बंगलेच बंगले आहेत व प्रत्येक बंगल्याच्या पुढे फुलबाग असून नारळ, पोफळ, केळी व इतर नानारंगी फुलांनी फुललेले वृक्ष हारीनें लावले आहेत. यामुळे हा रस्ता आपोआप मुद्दाम दुतर्फा लावलेल्या गर्दच्छाय वृक्षांनी अलंकृत केलेल्या रस्त्याप्रमाणें (ॲव्हन्युप्रमाणें) दिसतो. प्रत्येक बंगल्याला खुजी भिंत असते. तिच्या मागे तांबड्या, पिवळ्या, हिरव्या अशा क्रोटन जातीच्या झुडुपांचे कुंपण किंवा रांग लावलेली असते, व त्याचे मागें मोठ्या वृक्षांची रांग असते. कांहीं बंगल्यांच्या भिंतीवर वेली चढविलेल्या असतात व त्या वेलींच्या पानांनीं भिंत अजीबात बुजून गेलेली असते. यामुळे त्या ठिकाणी भिंतीचें कुंपण आहे कां दाट वेलिचें कुंपण आहे हें ओळखण्याची भ्रांति पडते. बंगले बहुतेक विटांच्या बांधणीचे असून बाहेरून बंगल्यांना गिलावा केलेला असून त्याला पिवळसर, केशरी, गुलाबी व बदामी असे नाना तऱ्हेचे नयनमनोहर रंग दिलेले असतात. तेव्हां या ग्रीनपाथनें जातांना कोलंबोच्या या भागाच्या सौंदर्यानें मन थक्क होऊन जातें यांत शंका नाहीं.
या ग्रीनपाथने व्हिक्टोरिया पार्कच्या मधोमध मनुष्य येतो. डाव्या हातास बागेचें लोखंडी फाटक लागतें. व्हिक्टोरिया बागेची रचना मनोहर आहे. त्या बागेंत नानातऱ्हेचे पामवृक्ष आहेत; गर्द छायेचे मोठमोठे वृक्ष आहेत; कांहीं वृक्षांवर वेली चढविलेल्या आहेत; एक वर्तुळाकार फुलबाग केली आहे व तिच्या सभोवारच्या पायरस्त्यावर मधून मधून ताटीच्या कमानी करून त्यावर फुलवेली चढविलेल्या आहेत; कांहीं ठिकाणी पोफळीप्रमाणे सडपातळ वाढणाऱ्या पाम झाडांची दुहेरी रांग इतकी दाट लाविली आहे की पायवाट म्हणजे जणू कांहीं अरूंद पण उंच असा पाचूच्या रंगाचा एक बोगदा आहे असा भास होतो! या बागेंत बँड स्टँड आहेच व मी सायंकाळी गेल्यामुळें तेथें बँडवादन थोडा वेळ चालू होतें. तास दोन तास मनाची करमणूक करणारी व निसर्ग-देवीच्या निकट सहवासाचा आनंद देणारी ही बाग आहे यांत शंका नाहीं.
कोलंबोंतील विलासप्रिय लोक शनिवारी आदितवारीं ज्या सौंदर्यस्थळीं वनभोजनास जातात त्या स्थळाचें वर्णन करून हें कोलंबो पुराण पुरें करणें प्राप्त आहे. या सौंदर्य स्थळाला माँट लॅव्हिनीया म्हणतात. हें शहरापासून सुमारें सात आठ मैल आहे. याला आगगाडीने किंवा मोटारनें जातां येतें. आम्हीं जातांना मोटारबसने गेलों व येतांना आगगाडीनें आलों. मोटारबस फोर्ट स्टेशनच्या अलीकडील गॉल रस्त्यावरील अड्ड्यावरून निघते. हा गॉल रस्ता सारखा सत्तर मैल गॉल बंदरापर्यंत गेला आहे. हा मोठा प्रशस्त व सुंदर रस्ता आहे. माँट लॅव्हिनीयापर्यंत सारखा सरळ एका सुतांत हा रस्ता गेला आहे; दोन्ही बाजूंस फरसबंदी प्रशस्त पायवाटा आहेत; दुतर्फा लहान लहान टुमदार बंगले व मधून मधून दुकानें आहेत. आपल्या डाव्या बाजूस हिंदी महासागर सारखा दिसत राहतो. त्याचे कडेस मधून मधून पण तुरळक व पातळ लावलेलीं नारळीची झाडें दिसतात; जवळून आगगाडीचा रस्ता जातो; पण त्याचे दोन्ही बाजूंस भिंती वगैरे किंवा मोठें उंच कांपाऊंड नसल्यामुळे या आगगाडीच्या रस्त्यांनें समुद्राचा देखावा आडला जात नाहीं. त्याचे अलीकडे बंगल्यांच्या गल्ल्या व त्यांचे तांबडे रस्ते लागतात; अशा तऱ्हेचा मोठ्या मजेदार रचनेचा हा भाग आहे. जरी वेलावाटा स्टेशनपर्यंतच म्युनिसिपालिटीची हद्द आहे तरी आतां पुढें सुद्धां सारखे बंगले व दुकानेंच लागतात. कालें करून कोलंबोची हद्द माँट लॉव्हिनीयापर्यंत जाईल असें वाटतें. माँट लॅव्हिनीयाच्या जरा अलीकडे आलें म्हणजे मात्र शहर टाकून आपण खेडेगांवासारख्या भागाला आलों असा भास होतो. माँट लॅव्हिनीयाच्या अड्ड्याशीं आम्ही उतरलों. पण त्या दिवश दोन प्रहरपासून झिम झिम पावसाची पिर पिर चालू होती. म्हणून आम्ही माँट लॅव्हिनीयाशी जाण्याकरितां बैलाचा एक्का केला व लवकरच माँट लॅव्हिनीया येथील हॉटेलच्या आवारांत गेलों. ज्याला मोठें माँट लव्हिनीया असें नांव दिलें आहे, तें ठिकाण म्हणजे जराशा उंचवट्याचें समुद्रांत घुसलेलें खडकाचें टोंक होय. त्याला टेकडी म्हणणें म्हणजे सुद्धां त्या स्थानाची थट्टा करणे आहे. पण त्याला माँट (डोंगर) असें भपकेदार नांव दिले आहे. त्यामुळे पहिल्यानें मनुष्याची फसगत होते. रेल्वे स्टेशनाकरितां जरा उंचवट्याच्या दोन्ही बाजू खोडून खोलगट रस्ता केला आहे. त्यावर छोटा पूल असून समुद्रांत घुसलेल्या भागावर टोलेजंग उंच जोत्याचें तांबड्या विटांचं हॉटेल आहे. या हॉटेलचा हॉल मात्र फार प्रशस्त, लांबरुंद, गुळगुळीत व तजेलदार लाकडी तक्तपोशीचा आहे. भिंतींना पांढरा शुभ्र रंग दिलेला आहे. हा भाग समुद्रांत घुसलेला असल्यामुळे हॉलच्या तिन्ही बाजूंनी समुद्राची मजेदार शोभा दिसते. असें हे निसर्ग- रमणीय ठिकाण असल्यामुळे शनिवारीं रविवारी युरोपियन युवायुवती येथें सहल करण्यास, येथल्या जलमंदिरामध्ये पोहण्यास व जलविहार करण्यास व रात्रीं नाच गायनाचे जलसे करण्यास येतात, येथें अर्धा- अधिक दिवस राहतात व हॉटेलांत मर्जीप्रमाणें व पैशाच्या पिशवीच्या लांबीप्रमाणे फराळ चहा जेवण उरकतात. मात्र या निसर्गरमणीय देखाव्याचें भाडें धरून की काय येथें नुसत्या चहा केकला १ रुपया पडतो. त्या दिवशी पाऊस असल्यामुळे सुंदर केशरीरंगी वाळवंटावर आम्हांस सहल करावयास सांपडलें नाहीं. पण त्या मन प्रसन्न करणाऱ्या सुंदर दिवाणखान्यांत एक रुपयाचा चहा केक पिऊन व खाऊन व कांहीं वेळ तेथल्या मनोहर देखाव्याचा आस्वाद घेऊन आम्ही नजीक असलेल्या स्टेशनवर येऊन आगगाडीनें परत बिऱ्हाडी आलों.
कोलंबो शहर नीटनेटकें, स्वच्छ व हवाशीर आहे यांत शंका नाहीं. पण येथे दोन प्रहरीं पुष्कळ उष्मा भासतो असा मला अनुभव आला. मात्र रात्री व सकाळी नेहेमीं थंड व गार हवा असते हें खरें.
मी ज्या बोटीनें आलों त्याच बोटींत मुंबई येथील एग्युमिक्श्चर व इंडोबाम नांवाच्या तयार औषधांचे कारखानदार रा. कर्णिक हे गृहस्थ

मुंबई इलाख्याच्या मुंबईप्रमाणें लंका बेटाचें कोलंबो हे समुद्र किनाऱ्यावर व समुद्र सपाटीवर असलेलें मोठें बंदर, व्यापाराचें मुख्य केन्द्र व नव्या ब्रिटिश राजवटीचें राजधानीचें, शहर आहे; तर पुण्याप्रमाणें कँडी हे जुन्या राजवटींचें राजधानीचें, समुद्र सपाटीपासून सुमारें सोळाशे सतराशें फूट उंचीवर असलेलें व डोंगरटेंकड्यांनी तटबंदी केलेले शहर आहे. कोलंबोपासून कँडीला रेलवेनें किंवा मोटारबसनें जातां येतें. मी ता. ५ दिजंबर १९३३ रोजी दुपारच्या दोन वाजतांच्या गाडीनें कँडीस जाण्यास निघालों. कोलंबोपासून कँडी ७४ मैल आहे. सेकंड क्लासचें भाडे सुमारें साडेतीन रुपये पडले. कोलंबोपासून पोलगहवेला नांवाच्या पंचेचाळीस मैलांवर असलेल्या स्टेशनपर्यंत साधारण सपाटीच्याच भागांतून आगगाडी जाते. कारण पोलगहवेला समुद्रसपाटीपासून अवघ्या २४० फूट उंचीवर आहे. हा भूमिभाग पाणथळ जमिनीचा आहे. वाटोवाट तलावासारखा पाण्यानें तुडुंब भरलेला भूमिभाग लागत होता. या सखल जागेत अर्थात् भातांचीं पिके लावलेलीं होतीं; उंचवट्याच्या जागांवर, टेकड्यांवर व डोंगराळ भागांवर नारळी, पोफळी, केळी (लंका बेटांतील सर्वगामी पिकें) व मधून मधून रबराच्या उंच उच झाडांच्या रायाच राया लागत होत्या. तुरळक चहाचीं झुडपेंही दृष्टीस पडत होती. पण लंकेच्या हवापाण्याची व पावसाच्या मुबलकतेची मौज ही कीं येथली एक इंचभर जागाही नापीक नव्हती. जिकडे पहावें तिकडे धान्यपिके, फळपिकें व पेयपिके दिसत होतीं. पीलगहवेला स्टेशनपासून चढावाच्या व घाटाच्या रस्त्याला सुरवात होते. जिकडे तिकडे गर्द झाडांनी आच्छादिलेले डोंगरच डोंगर दिसूं लागतात; येथें आपल्या घाटासारखे काळ्या खडकाचे उघडे बोडके व निर्वृक्ष असे डोंगर दिसत नाहींत. हा घाटाचा रस्ता खंडाळ्याच्या घाटाप्रमाणे मोठ्या बोगद्यांतून बाहेर पडून कर्जतपर्यंत गेलेल्या डोंगराच्या शिडीवजा रांगेच्या डाव्या उजव्या बगलेनें व बोगद्या-बोगद्यांतून जात नाहीं, तर एका घोड्याच्या नालासारख्या डोंगराच्या रांगेच्या एकाच बगलेच्या बाजूबाजूनें अर्धवर्तुळाकार पण वरवर चढत जातो. पण सर्व डोंगर नारळ, पोफळ व केळी यांच्या झाडांनी घनदाट भरलेले दिसतात. डोंगराच्या वरच्या बाजूस चहाचीं झुडपें व त्यांना सावली व्हावी म्हणून मधून मधून लावलेलीं सिल्व्हर ओक व भेंडीसारखी दडव नांवाचीं झांडें दिसत होती. कोलंबो- कँडीचा हा घाट कांहींसा वाई पांचगणी घाटासारखा आहे.
आरबी भाषेतील गोष्टीप्रमाणें एखाद्या जादुगारानें वाई नजीकच्या त शेतजमिनीचा भाग धान्यपिके व फळपिके यांनी हिरवाहिरवा गार केला व वाईपासून पांचगणीपर्यंतची अर्धवर्तुळाकार डोंगरांची रांग नारळ पोफळ, केळी व इतर झाडे यांनी गर्दछाय केली तर वाई-पांचगणी घाटामध्यें व कोलंबो-कँडी घाटामध्यें पुष्कळ साम्य उत्पन्न होईल. भर पावसाळ्यांत ज्याप्रमाणे खंडाळ्याच्या घाटामध्यें जिकडे तिकडे नदी नाले खळखळ वाहणाऱ्या पाण्यानें तुडुंब भरलेले असतात व जिकडे पहावें तिकडे पाणीच पाणी दिसतें, तसाच देखावा या घाटांतून दिजंबर महिन्यांत सुद्धां दिसतो. याप्रमाणें आश्चर्यचकित मनानें मी सारखा सभोंवारचा सुंदर देखावा पहात होतो. घाट चढल्यावर आम्ही कडूगनवा नावाच्या घाटमाथ्यावरील स्टेशनला येऊन पोहोंचलों. या स्टेशनचा गांव बराच मोठा वाटला. येथें एक स्मारकस्तंभ बांधलेला दिसला. मार्गदर्शक पुस्तकावरून कळलें कीं हा स्तंभ या घाटाच्या गाडीरस्त्याच्या योजक एंजिनीयराच्या स्मारकार्थ बांधलेला आहे. हें स्टेशन सुमारें सतराशें फुट उंच असून तें पोलगहवेला स्टेशनपासून वीस मैल अंतरावर आहे. अर्थात् हा कँडीचा घाट वीस मैलांचा आहे व वीस मैलांत गाडी पंधराशें फुट चढते. येथून मग डोंगराळ पण साधारण उंच सखल असा भाग लागला व लवकरच पेरेडॅनीया हे जंक्शन स्टेशन आले; पुण्याच्या शेतकी कॉलेजचे प्रो. सहस्रबुद्धे यांचे जुने विद्यार्थी ज्यांना त्यांनीं माझ्या लंकाप्रवासाबद्दल कळविलें होतें व ज्यांना मी आदल्या दिवशीं कार्डानें कोणत्या गाडीनें कँडीला जाण्याकरितां निघतों याबद्दल कळविलें होतें ते गृहस्थ रा. कंदिया हे अचानक माझ्या डब्यांत आले. त्यांच्या चौकस नजरेने पाहण्यावरून हेच रा. कंदिया असें मी ताडलें. मग पुढल्याच पेरडॅनिया बागेच्या स्टेशनवर त्यानी मला उतरून घेतलें व आपल्या बंगल्यावर नेलें. या प्रमाणें माझी कँडीला न जातां राहण्याची सोय झाली. मी कंदिया यांचे येथें पांच दिवस राहिलों. त्या चार पांच दिवसांत पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचे वर्णनास आतां लागणें बरें.
रा. कंदिया हे पेरेडॅनिया बागेजजीकच राहत असल्यामुळे प्रथम आम्ही पेरेडॅनिया बाग पाहिली. मी या बागेत तीनदां तीन तीन तास घालविले. यावरून या बागेच्या विस्तीर्णपणाची व सुबकपणाची सहज कल्पना करितां येईल. या बागेनें सुमारे दीडशे एकर जागा व्यापिली आहे. हिची उपस्थिति थेट लंडन मधल्या क्यु नांवाच्या वनस्पतिशास्त्रीय बागेसारखी आहे. ज्याप्रमाणें लंडनची क्युबाग टेम्स नदीच्या एका लांब दांड्याच्या चिमट्याच्या आकाराच्या वाकणांत बसविली आहे, त्याप्रमाणें पेरडॅनीया बाग महावेली गंगा नांवाच्या लंका बेटांतील सर्वांत मोठ्या नदीच्या चिंचोळ्या वाकणांतील जागेंत बनविली आहे. पायाच्या पावलाच्या आकाराचें विचित्र वाकण करून महावेली गंगा नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वहात जाऊन एकदम आग्नेय दिशेस (दक्षिण-पूर्वेस) वळून मग पूर्व दिशेने वहात गेली आहे. म्हणजे या बागेच्या पूर्व पश्चिम व उत्तर या दिशांस नदी आहे. दक्षिण दिशा मोकळी आहे. तिकडून बागेचें प्रवेशद्वार असून तेथून थेट सरळ रस्ता नदीनें केलेल्या आंगठ्यासारख्या टोकाला नेण्यांत आला आहे. या रस्त्याचे मधोमध मोठें वर्तुळ हिरव्यागार हरळीचें ठेविलें आहे. त्यांत तीन चार छोटे पाम लावले असून त्याचे सभोवतीं एक पायवाटेचें छोटे वर्तुळ केलें आहे. प्रवेशद्वारानें आंत गेल्याबरोबर फुलझाडांचें व छोट्या पाम वृक्षांचें एक वर्तुळ मनुष्याचें लक्ष वेधतें. समोर लांबच लांब पांढऱ्या शुभ्र रेतीचा रस्ता केला आहे. त्याचे दोन्ही बाजूंस वेलींनीं वेष्टिलेल्या वृक्षांच्या राजी लावल्या आहेत. त्या वृक्षांच्या खांद्यांनी त्या सर्व रेतीच्या रस्त्याभर जणूं कांहीं कमानदार बोगदा बनविला आहे, असा प्रवाशांस त्या रस्त्याने जातांना भास होतो. या रस्त्यानें बागेत जाऊं लागलें म्हणजे बाग बनविणाऱ्या योजकाच्या रचना-कौशल्याचें कौतुक केल्यावांचून रहावत नाहीं. हा शीतल सावलीचा बोगदा टाकून पुढे यावें तो खुलेंच खुलें पण जिकडे तिकडे हिरवेंगार दिसणारे वर्तुळाकार मैदान लागतें. या वर्तुळाचे परीघावर लहानमोठे नानावृक्ष सतेज पानाफुलांनी डहुरलेले दृष्टीस पडतात. हे सर्व वृक्ष ही बाग पहावयास येणाऱ्या राजवंशीय प्रख्यात पाहुण्यांच्या हस्ते त्यांच्या भेटीच्या स्मरणार्थ लाविलेले असून त्या प्रत्येक वृक्षाचे बुंध्याशी पाहुण्याचें नांव व त्यांचे हस्ते वृक्ष लावल्या दिवसाची तारीख लिहिलेले फलक जमिनींत खोचून ठेवलेले दृष्टीस पडतात. या स्मारक वृक्षांचेही मोठे कौतुक वाटतें. हें वर्तुळ टाकून पुढें जावें तो 'रायल पाम' नांवाची वृक्षराजी मनुष्याचें मन आकर्षण करून घेते. हे पामवृक्ष साहा साहा फुटांचे अंतरानें दुतर्फा लावलेले आहेत. या रस्त्यानें जाण्यास तब्बल पांच मिनिटे लागतात. हा वृक्षराजीनें अलंकृत केलेला रस्ता टाकला की बागेचें चिंचोळें टोंकच येते. येथून नदीपलीकडे जाण्यास होडी असून त्यानें नदीपलीकडील प्रयोगक्षेत्राला जातां येतें.
एकदां मी सबंद बागेला फेरी घातली. नदीच्या तिन्ही बाजूंना अगदीं नदीकांठानें पायवाट ठेविली आहे; ती पायवाट सुमारें तीन मैलांची आहे; ती चालण्यास मला एक तास लागला. प्रवेशद्वाराकडून डाव्या बाजूने गेलं म्हणजे एक छोटासा तलाव लागतो. हा तलाव मात्र बागेच्या मानानें फार लहान वाटतो व अगदीं डबक्याप्रमाणे भासतो. यांत अर्थात् पाणवेली व कमलवेली आहेत. या तलावाचे बाजूनें पायवाट जाते तीच नदीकाठची पायवाट. या वाटेनें गेलें म्हणजे खोल पात्राच्या

या बागेच्या जागेची ही मौज आहे कीं येथें उंचसखल, सपाट व टेकडीवजा अशा निरनिराळ्या प्रकारच्या जमिनी आहेत. यामुळे बागेच्या रचनेला मोठी विविधता आली आहे. वनस्पतीच्या बहुतेक वर्गांचे मासले या बागेंत मोठ्या व्यवस्थितपणें लाविले आहेत हें सांगणें नकोच. सारांश सर्व जगांतील वनस्पतींचें येथें जितें प्रदर्शन करून ठेवलेलें आहे असें वाटतें! फार दुर्मिळ असे वृक्ष पैदा करून येथें लाविले आहेत. उदाहरणार्थ ज्या झाडाच्या सालींपासून ऋषिकाळीं नेसावयाचीं वल्कलें करीत तें झाड येथें प्रवेशद्वाराचे नजीक लावलेलें आहे. त्याचें इंग्रजी नांव Antiaris Innoxid. याची बाहेरची साल काढून आंतली साल कुजविली म्हणजे विणलेल्या तागाच्या वस्त्रापेक्षां किंचित् खरखरीत अशी लांबरुंद साल निघते. त्याचीं वल्कलें करतां येतात. येथल्या वनस्पतिशास्त्र- विषयक संग्रहालयांत या सालीची केलेली तुमान व कुडतें मी पाहिलें. ती पाहून मला आश्चर्य वाटलें. खरोखरी आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेल्या कापडाप्रमाणे त्या सालीचे कपडे दिसत होते. हातालाही ते फारसे खरखरीत लागले नाहींत. येथें थेट मेणबत्तीसारख्या शेंगा येणारें मेणबत्ती झाड पाहिलें; वानराच्या शेपटीसारखीं फुलें येणारे वृक्ष येथें दृष्टीस पडले; थेट तोफेच्या गोळ्यासारखीं येणारी फळें तोफगोळा झाडें (Cannontall tree) येथें नजरेस पडली, मुकुटासारखीं सोनेरी झालरीचीं फुलें येणारे व म्हणूनच नेपीलियन मुकुटवृक्ष (Napoleon crown tree) नांवाचे वृक्ष दिसले; थेट सर्पाच्या अंगासारख्या वाढणाऱ्या वेली या बागेत झाडावर चढतांना दृष्टोत्पत्तीस आल्या; मुळे जमिनीवर असून तीं दुरून थेट मगरासारखी दिसणारी रबराचीं व बदामाचीं झांडें या बागेंत पहावयास सांपडली; पानाचा छत्रीसारखा उपयोग करतां येण्यासारखी पानें असलेले पाम; पोथ्या लिहिण्याचीं ताडपत्री पानें असलेले पाम, दुहेरी जोड नारळ येणारे पाम; प्रवाशांना पानांतून पाणी पिण्यास पुरविणारे पाम असे नाना तऱ्हेचे पाम वृक्ष व त्यांच्या रायाच्या राया येथें पहावयास मिळाल्या; येथें रुद्राक्षाचे वृक्ष पाहिले; असें किती वर्णन करावें? या बागेंत निरनिराळे ताटवे व निरनिराळीं गृहें केलीं आहेत व त्यामध्यें निरनिराळ्या जातीच्या पण एका सामान्य गुणांच्या वनस्पती एके ठिकाणी लावलेल्या आहेत. उदाहरणार्थ, एके ठिकाणीं जगांतील सर्व प्रकारच्या मसाल्यांची झाडें व झुडपें एकत्र हारीनें लाविलीं आहेत; एका गृहामध्यें दुसऱ्या झाडावर होणारीं नाना आकाxचीं व नाना रंगाची फुलें येणारी ऑरचिड्स संग्रहित केलेलीं आहेत; एका गृहांत नाना तऱ्हेचीं फर्नस (सीतेचे केश) एकत्र जमविलीं आहेत; एका गृहांत सावलींत वाढणाऱ्या वनस्पती व वेली लाविल्या आहेत; एका गृहांत नानातऱ्हेचीं फुलझाडें संग्रहित केलीं आहेत; सारांश बहुरत्ना वसुंधरेप्रमाणें ही पेरेडॅनिया बाग आहे. वनस्पतिशास्त्रीय बागेंतील एक उत्तम बाग म्हणून या बागेची जगभर कीर्ति झाली आहे ती यथार्थ आहे असें ही बाग पाहिल्यानें मनाला पटतें.
कँडीचा शेवटचा राजा श्री. विक्रमराजसिंह याला ब्रिटिश लोकांनी सन १८१५ मध्ये पदच्युत केलें. तेव्हां राजाच्या बागा व राजवाडें ब्रिटिश सरकारच्या हातीं आले. या ठिकाणीं त्या राजाच्या वेळेपासून बाग होती. त्याच जागीं शास्त्रीय पद्धतीवर बाग करण्याचें सन १८२१ मध्ये ठरलें. या बागेवर तेव्हांपासून किती तरी अधिकारी आले पण त्या सर्वामध्यें थ्वेट्स या वनस्पतिशास्त्रज्ञाची कारकीर्द चिरस्मरणीय झाली. सन १८४९ मध्ये या बागेच्या कामावर मुख्य अधिकारी म्हणून त्याची नेमणूक झाली व तो या जागेवर सतत तीस वर्षे होता. त्यानेंच या बागेला हल्लींचें सुंदर रूप दिलें. त्यानें सर्व लंका बेट फिरून निरनिराळ्या ठिकाणची झाडें आणून लाविलीं व त्यांची जोपासना व वाढ केली; त्यानेंच या बागेला वनस्पति-शास्त्रीय बागेचें स्वरूप दिलें व या बागेची कीर्ति जगभर पसरविली.
मागें सांगितल्याप्रमाणें नदीच्या वाकणाचे ठिकाणीं पलीकडे जाण्यास होडी असून तिकडे या बागेचें प्रयोगक्षेत्र आहे. तें पहाण्यास मी एके दोन प्रहरी निघालों. येथला देखावा कांहींसा नरसोबाच्या वाडीसारखा वाटला. कारण जरी येथें नदी एकच आहे तरी तिचें वाकण इतकें तिकोनी आहे की एका नदीला दुसरी नदी येऊन मिळाली आहे कीं काय असा भास होतो. येथें प्रवाह जोराचा आहे. पण पात्र लहानच असल्यामुळे होडी तेव्हांच पलीकडे जाते. पलीकडे गेल्यावर प्रथम प्रयोगक्षेत्राच्या इमारती लागतात. तेथें काफी भाजून तयार करण्याकरितां एक एंजिन बसविलेले दिसले; तसेच तेथें नळीच्या पत्र्याप्रमाणें बनविलेले रबराचे पत्रे पाहिले. तेव्हां ते बनविण्याचें यंत्रही तेथें असले पाहिजे. नंतर आम्ही मळ्यांकडे व शेताकडे गेलों तों प्रथमतः आम्हांला काफीचीं खूब झाडें लागलीं. त्यांवर लहान मोठ्या काफीच्या फळांचे घोसचे घोस लोंबत असलेले दिसत होते. काफीची झाडें फार उंच वाढलेली नव्हतीं. दुरून त्यांचीं पानें व ठेवण करंजाच्या झाडाच्यासारखी भासली; मात्र या झाडांचीं पुष्कळ पानें तांबूस रंगाचीं होतीं. नंतर आम्हांला कोकोचा एक लांबच लांब मळा लागला. या मळ्याच्या मधून पायवाट गेली होती. हीं झाडें कॉफीच्या झाडापेक्षां जरा मोठीं होतात; त्यांची पानेंही कॉफीच्या पानापेक्षां जरा मोठीं व लांबट असतात, मात्र तीं पुष्कळ तांबडसर रंगाची असतात. कित्येक झाडांवर कोकोचीं लाल फळंही दिसत होतीं. कोकोचें झाड व कोकोचे फळ हीं दोन्हीं दिसायला फार सुंदर आहेत यांत शंका नाहीं. हीं झाडें बरीच दाट लावतात. दुरून कांहीं अंशी आपल्या इकडच्या पेरूसारखीं कोकोचीं झाडे व कोकोची बाग दिसते असे मला वाटलें. एक पिकलेलें कोकोचें फळ माझ्या बरोबर आलेल्या विद्यार्थ्यानें तोडलें. "मी शेतकी शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे मला फळ तोडण्यास हरकत नाहीं" असे तो म्हणाला, तेव्हां आम्हीं तें फळ बिनदिक्कत फोडलें व चाखून पाहिलें. या फळामध्ये सीताफळासारख्या पण जरा कमी काळसर अशा बिया असतात व या बियांना लागून गीर असतो. गीर किंचित आंबटगोड लागतो. बिया वाळवून मग त्यांतून कोकोचें पीठ काढतात व मग तें किंचित् परतून त्याचा कोको किंवा चाकोलेट करतात. पुढे आम्हांला रबराचें मोठें अरण्य लागलें. या प्रयोगक्षेत्राच्या आवारांत मोठा एक डोंगर असून त्या सर्व डोंगरावरही रबराची लागवड केली आहे. पण त्या डोंगरावर आम्ही गेलों नाहीं; पुढे निरनिराळ्या जातीचे नारळ हारीनें अर्धवट पुरलेले. दिसले, कांहींतून कोम बाहेर येत होते. तेव्हां ही नारळीची रोपें तयार करण्याचें शेत आहे असें आम्हीं ताडलें. पुढें आम्हाला एक खोलगट खाचर लागलें. त्यांत भात लावलेलें होतें. इतकें पाहून झाल्यावर आम्ही दुसऱ्या एका वाटेने परत फिरलों. तेव्हांही एक रबराचा मळा लागला. व दुसरा तसल्याच मोठ्या झाडांचा मळा लागला. त्याच्या चिकापासून दोर करतात असें कळलें. याप्रमाणें हें प्रयोगक्षेत्र एका दृष्टीनें बागेपेक्षांही आश्चर्यकारक आहे. लंकाबेटामध्यें कितीतरी तऱ्हेच्या उपयुक्त झाडांची लागवड यशस्वी झाली आहे हे या प्रयोगक्षेत्रावरून दिसून आलें. लंकेत सोन्याच्या विटा आहेत असें मी लहानपणापासून ऐकत असे. त्या प्रत्यक्ष सोन्याच्या विटा मला या क्षेत्रामध्ये दिसल्या नाहींत खऱ्या पण सर्व जगभर ज्यांचा प्रसार झाला आहे अशा पेयांची पैदास करणारी झाडे व अर्वाचीन दळणवळणाच्या साधनांतील एक आवश्यक घटक उत्पन्न करणारे वृक्ष यांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून लंका बेटांत सर्व जगांतून सोन्याच्या विटा पैशाच्या रूपानें याव्या अशी लंकेची सद्यःस्थिति झाली आहे ही गोष्ट हे क्षेत्र पाहून मनाला पटली यांत शंका नाहीं.
कँडी शहर मी दोनदां- एकदां मोटारीनें व एकदां कँडीस्टेशनपर्यंत आगगाडीनं व पुढें पायीं चालत जाऊन पाहिलें. कँडी कोलंबोच्या मानानें फारच लहान शहर आहे. पेरेडॅनीया बागेपासून कँडी तीन साडेतीन मैल आहे. पेरेडॅनीयाकडून येणारा नवा रस्ता शहरामधून पश्चिमेकडून पूर्व दिशेनें जातो व तो थेट कँडीच्या सरोवराच्या बाजूनें बुद्धाच्या दंतदेवळापर्यंत सरळ जातो. कँडीचा हा एक मुख्य व मोठा रस्ता आहे. दुसरा उत्तरेस त्रिंकोमालीकडे जाणारा त्रिंकोमाली नांवाचा रस्ता आहे. या दोन रस्त्यांच्या दुतर्फा कँडीची सर्व वस्ती बसलेली आहे. दोन्ही रस्ते अगदी सरळ असून प्रशस्त आहेत व त्याचे बाजूस मोठमोठ्या इमारती व दुकानें आहेत. त्रिंकोमाली-स्ट्रीट तर सुतासारखा सरळ व किंचित् चढता असल्यामुळे फार दूरवर गेला आहे असे भासतें. त्यामुळे शहराचा हा भाग मोठा उठावदार दिसतो. शहराचे रस्ते स्वच्छ दिसले. घरें व बंगलेही रंगविलेले, नीटनेटके सुबक व बागबगीच्यांनी शोभायमान केलेले दिसले. पण कँडीशहराचा अद्वितीय अलंकार म्हणजे कँडी सरोवर होय.
पेरडॅनीयाकडून येणारा प्रशस्त रस्ता सरळ सरोवराच्या डाव्या बाजूनें जातो. कोपऱ्यावर पिवळसर, केशरी रंग दिलेलें तीन मजली टोलेजंग क्कीन्स हॉटेल नांवाचें निवासस्थान लागतें. या निवासस्थानाला फारच नाक्याची जागा मिळाली आहे. दोन्ही बाजूंस कँडीमधील दोन मुख्य प्रशस्त रस्ते व समोरच तें लांबच लांब सरोवर व त्याचे पलीकडे गर्द झाडांनीं आच्छादिलेले उंच उंच डोंगर हा देखावा निवासस्थानी राहणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचें मन मोहून टाकणारा आहे यांत शंका नाहीं. या रस्त्यानें पुढे गेलें कीं पूर्वीच्या कँडीच्या राजवाड्याचें विटांच्या बांधणीचें तटवजा पण खुजा भिंतीचें आवार लागतें. पुढ डाव्या हाताला हिरव्यागार हरळीनें हिरव्यागालीच्याप्रमाणे दिसणारें खेळाचं मैदान लागतें. लगेच बुद्धाचें दंत-देवालय लागतें. या देवालयाला राजवाडयाच्या धर्तीची तटवजा भिंत आहे. नव्हे हें देवालय राजवाडयाचा एक भागच आहे व देऊळ धरून मोठ्या थोरल्या आवाराला सुंदर जोतें व सुंदर तटवजा खुजी भिंत बांधलेली आहे. आतां राजवाड्याचें सर्व आवार व त्यामधील सर्व इमारती व राजवाडे हे सिलोन सरकारचे असून मुख्य राजवाड्यात सिलोनचे गव्हरनर कँडीस आले म्हणजे राहतात व दुसऱ्या इमारतीत न्याय कचेरी भरते. न्याय कचेरीची इमारत लांकडी असून त्याचे लांकडी खांब फार नक्षीचे आहेत. या इमारतींची नवलाईची गोष्ट म्हणजे या इमारतीचें छप्पर नेहेमींसारखें कवलारू नसून ते विटांनी बनविलेले आहे.
दंतदेवालयाची इमारत विटांचीच आहे; त्याच्या प्रवेशद्वारा नजीक पाण्याचा हौद आहे व उजव्या हाताला दुमजली वाटोळी व कंगोऱ्या कंगोऱ्याची छोटी इमारत आहे. त्यांत बुद्ध धर्माचे ग्रंथसंग्रहालय आहे. देवळांत गेलें म्हणजे एक सोपा लागतो, तेथे एक कारंजें आहे. पुढें बुद्धाच्या बैठ्या व हातावर डोके ठेवून आडव्या निजलेल्या दगडी मूर्ति आहेत. बुद्धाचा दंत ठेवण्याकरितां मोठ्या कुलुपानें रक्षण केलेलें गृह आहे. बुद्धाचा हा दंत बाहेर काढून दर आगष्ट महिन्यांत त्याची मोठी मिरवणूक काढतात. या महायात्रेला पुष्कळ यात्रेकरू जमतात. मोठमोठ्या शृंगारलेल्या हत्तींनीं पुरस्कृत अशी ही प्रचंड मिरवणूक असते. या दंत-देवळाला बरींच दालने आहेत. बुद्धलोकांमध्ये तांबड्या व पिवळ्या चाफ्याची फुलें मूर्तीपुढें व स्तूपासभोंवार वाहण्याची पद्धती दिसली. कालिनी येथील बुद्धमंदिराप्रमाणे येथेही भली थोरली एक नवी इमारत चालू आहे.
हिंदुस्थानांतील बुद्धधर्माचे अवशेष— स्तूपविहार चैत्य वगैरे- हे पूर्वकाळी बांधलेले किंवा कोरलेले जे काय आतांपर्यंत शिल्लक राहिले

या सहलवाटेला मी एके दिवशीं तिसऱ्या प्रहरीं साडेतीन वाजतां पेरेडॅनीया बागेपासून निघालों तो तीन तासांनी कँडी शहरांतील मोटार बसस्टँडवर गेलों व मग दमल्यामुळे व उशीर झाल्यामुळे मोटार बसने परत बंगल्यावर आलों.
पेरेडॅनीया बाग टाकून कँडी रस्त्याला लागल्या वर गटांबे नांवाचें खेडें लागतें. या खेड्याचे डाव्या बाजूला 'लेडी ल्बेकड्राईव्ह' अशी पाटी लागते; मोटारीला इकडून जातां येत नाहीं; कँडी गांवाकडच्या टोंकाने फक्त येतां येते. लहानशा ओढ्याचा पूल टाकला कीं, महावेली गंगा पेरेडॅनीया बागेच्या पूर्व टोंकाकडून संथपणे वाहत येतांना दृष्टीस पडते. येथे नदीचे दोन्ही किनारे लालमातीचे आहेत असें दिसतें. त्या खोल, गंभीर गंगेचें पात्र पाहून मनाला आनंद होतो. पण या रस्त्यानें थोडे चाललें नाहीं तोंच नदीच्या दोन्हीं तीरांकडे प्रचंड पर्वत असून नदी मातीचे तीर टाकून खळखळ करीत खडकाळ भागांतून जात आहे असें दृष्टोत्पत्तीस येऊन नदीच्या स्वरूपांतील तो विरोध विस्मयकारक वाटतो तोंच नदी जास्त भीषण स्वरूप धारण करते व सहलवाटेच्या उजव्या बाजूस काळे काळे कुट्ट कातळ सहल वाटेला खेटून येतात.
या कातळावर हिरवें गवत किंवा रोंपडें नांवाला सुद्धां दिसत नाहीं; तर नदीच्या दुसऱ्या तीराला किर्र, निबिड रानाने भरलेले उंचच उंच डोंगर दिसतात व दोन्हींकडचे डोंगर इतक्या जवळ येतात कीं, नदी अगदीं चिळणींतून आंग चोरून चालली आहे असें वाटतें व आपल्या अप्रतिहत प्रवाहाला अडथळा करणाऱ्या दोन्हीं बाजूंच्या खडकांवर व पात्रांतील दगडांवर चवताळून जणूं कांहीं दांतओठ खात मोठ्यानें रोरावत विलक्षण वेगानें धांवत नदी पुढे चालली आहे असें भासतें. इतक्यांत तिच्या रोरावण्याला व रागाला भिऊन जणूं कांहीं दोन्ही बाजूंचे खडक परस्परांपासून दूर गेले आहेत असें भासतें येथें नदीचें पात्र पुष्कळच रुंदावतें व मग नदीचे लहान मोठे वेगवेगळे प्रवाह बनून जरा संथपणें नदी वाहूं लागते. पण उजवीकडून नदीला मिळणारा एक खोल व डोंगराकडून जोरानें पाण्याचा लोंढा आणणारा ओढा आल्यामुळे सहलवाट डावीकडे डोंगराच्या आंत आंत जाते व मग तेथें पूल ओलांडून पुनः डोंगराच्या पलीकडच्या बगलेला मनुष्य येतो. यामुळे सहलवाटेला केवढे तरी भलें मोठें वाकण येते. येथून उजव्या बाजूचे खडक संपतात व तांबूस रंगाच्या मातीचे डोंगर लागतात व त्या डोंगराच्या माथ्यापर्यंत चहाची लागवड केलेली दृष्टोत्पत्तीस येते. पुढे उजव्या हातांचा डोंगर जरा दुरावतो मग तेथें कोकोच्या सुंदर झाडांची बाग लागते; इकडे नदीमध्यें एक बेट बनून प्रवाहाचे दोन फांटे होतात व म्हणून नदी लहान दिसते व तिचें उग्र स्वरूप नाहींसें होऊन ती संथपणें वहात आहे असें दिसतें. याप्रमाणे क्षणोक्षणीं बदलणारे देखावे पहात सुमारें तासभर चालल्यावर नदी व डोंगर दूर जाऊन खोलगट सपाट जमीन लागली. तेथें आपल्याला चिरपरिचित अशीं हिरवीं हिरवीगार भाताची शेतें लागतात. भीषण व भयप्रदरूप टाकून निसर्गदेवीनें सुंदर हिरवा शालू नेसलेल्या स्त्रीचें रूप धारण केल्यामुळें भय, आश्चर्य, विस्मय इत्यादि मनोवृत्ति जाऊन सुख व समाधान या कोमल मनोवृत्ति मनांमध्ये जागृत होतात. ही भात शेती टाकली तोंच पुनः डोंगराचा भाग लागला व रबरांच्या झाडाचें मोठें बन लागलें. मधून मधून चहाचे मळे लागतच होते व एक चहाचा कारखानाही लागला.
पुढे डोंगरामधला एक उतरता भाग दिसला. तेथे पुनः भाताची शेतें लागली. पण त्यांची ठेवण मोठी मजेची होती. ज्याप्रमाणे नदीला एखादा लांबरुंद पायऱ्या पायऱ्यांचा घाट असावा त्याप्रमाणें भातशेतीच्या लांबच लांब व अरुंद पट्ट्या एकावर एक घाटाच्या पायऱ्यांसारख्या दिसत होता. हा देखावा मोठा नयनमनोहर आहे. अशा लागवडीला येथें terraced cultivation (घाटाची लागवड) म्हणतात. यानंतर मी पुनः चढत्या अशा दाट रबराच्या वनांतून चाललों. जवळ जवळ दोन तास होत आले तरी कँडी येण्याचें लक्षण दिसेना; म्हणून एका बंगल्याच्या खुल्या सोप्यांत बसलेल्या गृहस्थास विचारलें तेव्हां तो म्हणाला, "या वाटेनें कँडी अझून पुष्कळच दूर आहे; पण तुम्हीं या रबराच्या बनांतून मळलेल्या पाऊल वाटेने डोंगराच्या माथ्यावर जा व तेथून डाव्या हातास खालीं जाणाऱ्या पाऊलवाटेनें उतरा म्हणजे तुम्ही कँडीला फार लवकर पोहोंचाल; सरळ रस्त्याने गेल्यास तुम्हांला कँडीस पोहोंचण्यास काळोख होईल. तेव्हां या मधल्या वाटेनें जा" त्या गृहस्थाचे आभार मानून मी त्यानें दाखविलेल्या मळलेल्या पाऊलवाटेने चालूं लागलों. जिकडे तिकडे रबरांची झाडेच झाडे! या उंच उंच वाढणाऱ्या झाडांची सावलीही खुब पडते; झाडाचे खालीं हिरवे हिरवें दाट गवत; फक्त एक पाऊल रुंदीची वाट काय ती मोकळी. या वाटेने जातांना मनाला सरपटणाऱ्या जनावरांची भीति वाटली; पण शेवटीं एकदां माथ्यावर आलों तोंच खाली जाणारी पाऊलवाट लागली. ती वाट बरीच बिकट व घसरडी होती. पूर्वीची जीवाणूंबद्दल भीतिं गेली पण आतां घसरून पडण्याची भीति वाटू लागली. परंतु लवकरच काळीकाळी सडक दृष्टीस पडली व मग जीवांत जीव आला. इतक्यांत जोराचा पाऊस आला. मी रस्ता चालू लागलों तों पुन्हां कँडी दूर राहिली असें वाटलें. इतक्यांत पाऊसही थांबला. वाटेने जाणाऱ्या इसमास विचारतां तो म्हणाला "तुम्ही उलट वाटेने चालला आहांत" तेव्हां मी परत फिरलों. थोड्याच वेळांत कँडी शहराच्या वरच्या रस्त्याला आलों असें पाटीवरून दिसलें व मग मोटार बस उभी राहण्याची पाटीही लागली. दहा मिनिटें थांबतों तों मोटारबसही आली. अडीच तीन तास चालून मी दमलों होतों. मोटारबसमध्यें बसल्याबरोबर व मोटार चालू झाल्याबरोबर वारा वाहूं लागला व त्यानं श्रमपरिहार झाला. मी मोठ्या प्रमुदित-मनानें बिऱ्हाडीं पोहोंचलों. झालें, माझें कँडीपुराण संपलें व माझा कँडी येथील निवासही संपला. कँडी हे शहर हवापाणी व सृष्टिसौंदर्य या दोन्हीं दृष्टीनें सिलोनमधील एक नामांकित व पुराणप्रसिद्ध शहर आहे. याचा मला पांचसहा दिवस तेथें राहिल्यामुळे प्रत्यक्ष अनुभव आला. येथें कोलंबोप्रमाणें केव्हांही उन्हाळा भासला नाहीं. हवा नेहमीं थंड व गार वाटली. थोडथोडा पाऊस पडत असल्यामुळें व बरेच वेळां आकाश अभ्राच्छादित असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा ताप किंवा उन्हांचा रखरखीतपणा केव्हांच भासला नाहीं. येथली हवा थेट विलायतेंतील हवेसारखी वाटली.
दुसरे दिवशीं मी खडक-देऊळ व खडक-किल्ला पाहण्याकरितां रा. कंदिया यांचे आभार मानून मार्गस्थ झालों.
मीपेरेडॅनीया बागेच्या स्टेशनहून ता. ११ डिसेंबर १९३३ रोजीं सकाळी ७॥ वाजतां मातले गांवास जाण्याकरितां निघालों. दुसऱ्याच कँडी स्टेशनला आगगाडी बदलावी लागते. स्टेशन टाकलें कीं चढता रस्ता लागतो व रस्त्याचे दोन्ही बाजूंस दाट फळ पिकेंच पिकें दिसतात; केव्हां कोकोचीं तांबूस रंगी मोठ्या पानाची व तांबड्या फळांनी शोभणारी झाडें लागतात, तर केव्हां किंचित् लहान पानांची व लहान काळसर फळांनी भरलेली कॉफीची झाडें लागतात, तर केव्हां झाडाच्या सालीला पाडलेल्या वाटोळ्या खाचेंतून पांढऱ्या शुभ्र चिकाची धार नारळी करटींत पडत असलेली रबराची झाडे लागतात; मधून मधून चहाचे मळेही लागतात; नारळीपोफळीकेळी हीं तर घरोघरीं व झोपड्याझोपड्यांत असतात हे पुनः पुनः सांगावयास नको. असा सर्वसुंदर देखावा मातले स्टेशनपर्यंत दिसत असतो. पेरेडॅनीयाकडून मातलेकडे डोंगराळ पण उतरता रस्ता आहे. कारण मातले कँडीपेक्षां ४०० फूट खालीं आहे. मातलें हा बराच मोठा गांव असून तेथली बाजारपेठ लांबच लांब आहे. येथें मी डांबुला गांवाला जाणाऱ्या मोटारबसमध्यें बसलों व मोटार ९ वाजतां चालू झाली. मातलेपासून डांबूल २८ मैल आहे. भाडे आठ आणे पडलें. येथून सुमारें १४ मैल नालंदपर्यंत उतरता रस्ता आहे. लागवड कमी दाट होत गेली असून मधून मधून भातशेती लागते. नालंदापासून सपाटीचा रस्ता लागतो. आतां लागवडीचा व पिकाचा मुलूख सरून सिलोनचा जंगली मुलख सुरू होतो. मातलेला मोटारबसमध्ये बसल्यापासून झीम झीम पाऊस पडूं लागला होता तो त्या सबंध दिवसरात्रभर पडत होता. सुमारें साडे आकरा वाजतां मी डांबूला गांवाला पोहोंचलों. डांबूला हे अनुराद्धपुर त्रिंकोमाली व पुलनरूवा या तीन्ही शहरांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या आधींचें व म्हणून रहदारीचं ठिकाण आहे. गांव अगदीच लहान आहे. जिकडे तिकडे रानचरान! पण येथला विश्रांतिबंगला गांवाच्या मध्यावर असून त्यांत चांगल्या प्रशस्त खोल्या व मोठा खुला व्हरांडा आहे. सिलोनमध्यें असे विश्रांतिबंगले गांवोगांव सरकारी खर्चाने बांधलेले असून तेथें सर्वांची राहण्या-जेवणाची सोय केलेली आहे. सरकारी अंमलदार व खासगी प्रवाशी एकाच विश्रांतिबंगल्यांत राहतात व सर्वांना ठरलेल्या दराप्रमाणें राहण्याजेवणाचे पैसे द्यावे लागतात. मी येथें दीड दिवस होतों; त्याचें बिल सुमारें सात रुपये आलें. हे बिल जरा जास्तच वाटलें.
दोनप्रहरचा फराळ झाल्यावर मी डांबूल येथील खडकावरील बुद्ध धर्मी देवळें पाहण्यास निघालों. हा खडक म्हणजे दोनशे फूट उंचीची ग्रनाईट खडकाची किंचित् घुमटाच्या आकाराची टेकडी आहे. रस्त्याच्या अगदीं लगत हा खडक भिंतीसारखा उभाचा उभा आहे. हजारों वर्षे पाऊसपाण्याने व थंडीवाऱ्याने काळाकभिन्न झालेला हा खडक भयंकर भासतो यांत शंका नाहीं. पण हिरव्यागार गवतानें वा नाना फळपिकानें अलंकृत झालेल्या लंकेंत पाऊल ठेवल्यापासून येवढी सुळक्यासारखी उभी निर्वृक्ष सलग काळी काळीभोरे खडकाची टेकडी प्रथमतः पाहून फारा दिवसानें चिरपरिचित मित्र भेटल्याने जी मनाची स्थिति होते तशी माझी गत झाली. ज्याप्रमाणें विलासी स्त्रीपरिवारांत, केव्हां वीरांच्या आखाड्यांत तर केव्हां मुत्सद्यांच्या मजलसींत मग्न असणाऱ्या व सुंदर राजवाड्यांत राहणाऱ्या कृष्णाला फाटक्या तुटक्या पिशवींत पोहे घेऊन भिकार वेषांत येऊन भेटणाऱ्या सुदाम्याला पाहून आपला लहानपणचा बालमित्र भेटला म्हणून आनंद झाला त्याप्रमाणें ही टेकडी पाहून मला अत्यंत आनंद झाला. अर्थात् देवळाला जाणे इकडून शक्यच नाहीं. देवळाला जावयाचा रस्ता टेकडीच्या कमी उभ्या व खालच्या अंगास थोडीं फार झाडेझुडपें असलेल्या बाजूकडून आहे. झिमझिम पाऊस पडतच होता. तरी मी टेकडीवर चढत गेलों. जरा चढल्यावर इकडूनहीं सारखा खडकच लागतो. मात्र इकडल्या बाजूनें टेकडी मजगी मजगीनें उंच होत गेली आहे. खडकांत कांहीं कांहीं ठिकाणीं खोदलेल्या पायऱ्यांच्या खाणाखुणा दिसत होत्या. कांही ठिकाणीं बांधलेल्या पायऱ्या होत्या, कांहीं ठिकाणी प्रचंड खडकाच्या चिळणींतून पायऱ्या बांधल्या होत्या. पावसामुळे पायऱ्या व कातळ घसरडा झाला होता. म्हणून जपून जपून व सावकाश चालत व मध्यें मध्यें सभोवारचा देखावा पाहण्याकरितां थांबत थांबत मी शेवटीं एकदां टेकडीच्या बराचवर आलों तोंच लेण्याप्रमाणं खडकांत खोदलेली बुद्धधर्मी देवळांची रांगच रांग दिसली. ज्याला महाराष्ट्रांत आपण कोरीवलेणी म्हणतों त्याच तऱ्हेचीं सिलोनांतील हीं बुद्धधर्मी देवळें आहेत. मुख्य देऊळ अगर लेणें बरेंच मोठें आहे. समोरच बुद्धाची बसलेली मूर्ति आहे. नंतर दुसऱ्या उभ्या बुद्धाच्या शिष्यांच्या व बुद्धधर्मी राजांच्या मूर्ति आहेत. ज्याप्रमाणें म्हैसूर मद्रासेकडे मुख्य देवळाच्या प्रदक्षिणामार्गात देवांच्या मूर्तीची रांगच रांग ठेवलेली असते त्याप्रमाणें येथें व्यवस्था दिसली. उजव्या बाजूला उशीवर डोकें टेकलेल्या व आडवा असलेल्या बुद्धाची प्रचंड मूर्ति असून त्याचे शेजारीं आनंद नांवाच्या त्याच्या शिष्याची उभी असलेली प्रचंड मूर्ति आहे. लेण्याच्या दगडी तक्तपोशीला रंग दिलेला असून त्यावर व प्रदक्षिणेच्या वाटेच्या सर्व भिंतीवर रंगाची चित्रे काढलेलीं आहेत. मुख्य मूर्तीच्या मागून प्रदक्षिणा करतां येते. डाव्या हाताच्या बाजूला देऊळ बांधणाऱ्या राजाची मूर्ति व त्याची राणी हिंदु असल्यामुळे विष्णूची मूर्ति हीं या देवळांत आहे. बुद्धधर्मी देवळांत अशा तऱ्हेनें हिंदुधर्माच्या देवाच्या मूर्ति ठेवण्याची पूर्वापार पद्धति दिसते; तर इकडल्या हिंदु देवळांत बुद्धाची मूर्ति अर्वाचीन काळीही बसवितात हे मला पुढील प्रवासांत हबर्ने येथें नव्याच बांधलेल्या शंकराच्या देवळांत पहावयास सांपडलें.

दुसरे दिवशीं सकाळची न्याहारी करून मी मोटारगाडी चार रुपयांस ठरवून 'सिगिरीया' नांवाच्या खडकाच्या टेकडीवरील किल्ल्याचें ठिकाण पहाण्यास गेलों. डांबूला पासून ते सुमारें बारा मैल आहे. पण पहिल्यांदा एकदोन मैल अनुराधपुर रस्त्यानें उत्तरेस जावें लागतें, मग डाव्या हातास ईशान्य (उत्तर पूर्व) दिशेला त्रिंकोमाली रस्त्याने सुमारें चार पांच मैल जावें लागतें व मग पुनः डाव्या हाताला वळून पांच मैल जावें लागतें. तिन्ही रस्त्यांना सारखें दाट जंगल आहे. रानरेडे वाटोवाट चरत असलेले दृष्टोत्पत्तीस येतात. या रानांत इतर हिंस्र पशू, व रानटी हत्ती ही आहेत, पण ते या पावसाच्या दिवसांत इकडे येत नाहींत असें कळलें. वाटोवाट लहान मोठे तलाव लागतात. यावरून पूर्व काळी हा सर्व भाग लागवडीला- विशेषतः भातशेतीच्या पिकाच्या लागवडीला आणलेला असावा असें मधून मधून येणाऱ्या सपाटच्या सपाट पण पाणथळ बनलेल्या भूमिभागावरून वाटल्याखेरीज रहात नाहीं. तसेंच हें जंगलही निर्मनुष्य व शतकाच्या शतकें निसर्गस्थितींत असलेलें असें अरण्य भासत नाहीं; तर हयगयीनें व बंदोबस्ताचे अभावी वस्ती नाहींशी झाल्यामुळे उपवनाला वनाचें स्वरूप यावें त्याप्रमाणें हा भाग जंगली बनला आहे असें पदोपदीं वाटतें. शेवटी एकदां सिगीरीया गांव लागलें. उजव्या हाताला सुंदर बागबगीच्यानें शोभणारें नीटनेटकें टुमदार विश्रांतिगृह लागलें. तें टाकून अर्धा अधिक मैल पुढे गेलों तोंच त्या एकाकी प्रचंड खडकाच्या टेकडीशीं आलों. तेथें पायथ्याच्या दरवाजाशीं सरकारी मार्गदर्शक उभा होता. किल्ल्याच्या खऱ्या व बिकट चढावाला सध्यां लोखंडी कुलपाचें फाटक कैलें असल्यामुळे या मार्गदर्शकास प्रवेशद्वाराशीं किल्ल्या घेऊन प्रवाशाची मार्गप्रतीक्षा करीत उभे राहावें लागतें. हा खडक ग्रानाईट जातीचा तांबूस-रंगी आहे. पण हजारों वर्षे पाऊस, पाणी, थंडी व बारा खाऊन हा काळा पडला आहे. माथ्याजवळ मात्र त्याचा तांबूस रंग अजून राहिला आहे.
प्रवेशाच्या दाराच्या खांबापासून बांधलेल्या पायऱ्या लागतात. सभोंवार उंच उंच झाडें व प्रचंड राक्षसी धोंडे (Boulders) इतस्ततः पडलेले दृष्टोत्पत्तीस येतात. मधून मधून दगडी खांब, चवथरे व इमारती दगड व घडलेले अर्धवट मोडलेले तुटलेले छिन्नविछिन्न मूर्तीचे तुकडे वाटोवाट दिसतात. हीं सर्व चिन्हें गतकाळच्या वैभवशाली राजवटीचें दीनवाणीनें प्रवाशांस जणूं कांहीं स्मरण करून देत आहेत असा चढतांना भास होतो. टेकडीची पहिली मजगी चढून गेलें म्हणजे डाव्या हातास प्रचंड खडकचे खडक खोदकाम केलेलें दृष्टीस पडलें. वर जाऊन पाहतों तों एका मोठ्या खडकांत खोदलेली स्नानाची सुंदर पुष्करणी आहे असें दिसून आलें. अर्थात् त्यांत आतां पाणी नव्हतें. कारण खडकाला बारिक चिरा पडल्या होत्या. त्याच्या जवळच्या खडकाला उंच जोतेवजा भाग खोदलेला असून मध्यें सिंहासनासारखी उंच दगडी बैठक होती व चवथाऱ्याच्या खालीं बऱ्याच मोठ्या दालनासारखी जागा होती. सभोंवार खडकांत भोके होतीं. यावरून येथें तात्पुरता मंडप किंवा तंबू देत असावे व हें स्नानगृह व बैठकगृह राजाकरितां केलेलें असावें असें वाटलें; कारण या गिरीशिखरावरून कश्यपराजा अठरा वर्षे राज्य करीत होता, हे पुढील ऐतिहासिक हकीगतीवरून कळून येईल. ही या डोंगराची पहिली मजगी होय. येथपर्यंत चढाव सुलभ असून येथे थोडीशी तरी सपाट जागा आहे. आतां या सपाटीवर उंच उंच झाडें झालीं आहेत. पण खरा सुळक्यासारखा काळा तांबडा एकसंधी खडक येथूनच लागतो. याच्या आकाराचे स्वरूप सांगणे कठीण आहे. पण अतिशयोक्तीची थट्टा करण्याकरितां सांगितलेल्या गोष्टींतील प्रचंड लांबट पण खुबजाड अशा राक्षसी वांग्याचीच उपमा या खडकाला शोभेल. त्या वांग्याप्रमाणें हा खडक काळसर तांबूस रंगाचा आहे; त्याचें मधले अंग किंचित् फुगीर आहे; त्यावर पाऊल ठेवायला सुद्धां जागा नाहीं असा हा खडक दुर्गम नव्हे तर अक्षरशः अगम आहे यांत शंका नाहीं. पण पूर्वकालीन एका राजाच्या इच्छेनुरूप त्याच्या शिल्पशास्त्रज्ञ सल्लागारांनीं हा अगम खडक त्या काळीं सुगम केला व त्या खडकाच्या माथ्यावर सुंदर राजवाडा बांधून या गिरीशिखरावर परिवारासह राजाला राहण्याची सोय केली, व या अगम ठिकाणीं राजानें आपल्या आयुष्याचीं अठरा वर्षे काढलीं व येथूनच सर्व राज्याचा कारभार हांकला. तेव्हां ही कृति जगांतील आठवें आश्चर्य नव्हें काय? हें आश्चर्यकारक काम कसें केलेलें होतें तें आतां प्रत्यक्ष पाहूं या.
या किंचित् सपाटीच्या मजगीपासून आपल्याला चुन्याविटांची दोन्ही बाजूस साधारण कठड्याप्रमाणे बांधलेली भिंत दिसते व मध्यें पांढऱ्या दगडाच्या पायऱ्या दिसतात. पहिल्या पायरीच्या दोन्ही बाजूंस बरेंच रुंद विट काम दिसतें. आतां त्यावरचा चुन्याचा गिलावा पार गेला आहे; पण जरा बारकाईने पाहिलें कीं त्या विटकामावरून व अवशिष्ट राहिलेल्या गिलाव्यावरून येथें प्रचंड सिंहाच्या मोठ्या जबड्याचे चित्र चुन्याच्या गिलाव्यांत केलें होतें असें कळून येतें व या खडक-किल्ल्याला 'सिगिरीया ' (मूळ संस्कृत सिंहगिरी) कां नांव देण्यांत आलें हें स्पष्टपणे कळतें व हें ठिकाण बनविणाऱ्या शिल्पकाराच्या कौशल्याचें विलक्षण कौतुक वाटतें. एखाद्या राजवाड्याला जसा गिलाव्यानें गुळगुळीत केलेला सुंदर चित्रांनीं व नाजुक नक्षीकामानें सुशोभित केलेला जिना असावा तसा जिना या सिंहाच्या जबड्यांतून केला आहे असें वाटतें. पण हा जिना चढू लागलें म्हणजे त्या खडकाचा भीषणपणा ध्यानांत येतो. कारण जरा चढल्याबरोबर उजव्या बाजूला डोक्यावर लोंबणाऱ्या निसरड्या खडकाखेरीज कांहीं एक नाहीं असें ध्यानांत येतें. डाव्या बाजूस मात्र विटांची गुळगुळीत गिलाव्याची कठड्यासारखी छातीभर उंच भिंत लागते. पण पुढे हा जिना एकाएकीं संपलेला व तुटलेला दिसतो व या खडकाचें भीषण स्वरूप ध्यानांत येऊन घेरी आल्यासारखें वाटतें. कारण आपला जिना अधांत्रीं असून डाव्या हातास खोल खोल दरी व उजव्या हातास भिंतीसारखा खडकच आहे असें दिसतें. मग या राजवाड्याच्यासारख्या सुगम जिन्याच्या कौशल्याच्या कृतीनें मन थक्क होऊन जातें. या भिंतीसारख्या खडकाला फूट दोन फुटाची भिंत बांधतां येईल अशा अंतरावर खडकांत दोन दोन भोकें थोड्या थोड्या अंतरावर केलेलीं दृष्टीस पडतात व या जिन्याच्या कृतीचें कसब ध्यानांत येतें. या भोकांत लोखंडी किंवा लाकडी गज घट्ट न निसटतील अशा तऱ्हेनें बसविले असले पाहिजेत; व मग त्या गजांना भिंतींत बुजवून पण त्या गजांचे आधारावर जिन्याची चढती चढती भिंत बांधीत आणली असली पाहिजे. अशी भिंत बांधीत आणल्यावर खडक व भिंत यांचेमध्यें जी दोन चार फूट जागा झाली त्यांत पायऱ्या

पण सभोवारचा हिरवागार व म्हणूनच नयनमनोहर देखावा मात्र मनाला फार आनंद देणारा आहे यांत शंका नाहीं. जीवापाड मेहनत करून या दुर्गम स्थळी आल्याचें सार्थक झाले अशा प्रकारचेंच माझ्या मनाला समाधान वाटलें. हा खडक अगर डोंगर सपाट भागांत एकाकीच उभा आहे असें दिसतें. भूगर्भशास्त्रदृष्ट्या हा एक अलौकिक चमत्कारच होय. जिकडे तिकडे सपाटच्या सपाट प्रदेश दिसतो व तो सर्व हिरव्यागार रानानें व्याप्त आहे असें दृष्टोत्पत्तीस येतें; मधून मधून पांढऱ्या शुभ्र पाण्यानें तुडुंब भरलेले तलाव दृष्टीस पडतात व हा हिरव्या पांढऱ्या रंगाचा विरोध विस्मयकारक वाटतो. पण या तलावावरून पूर्वीच्या राजवटींत हा सर्व भाग भातशेतीसारख्या धान्यपिकांनी व केळी नारळासारख्या फळ- पिकांनीं सदा शोभिवंत दिसत असला पाहिजे असें कळून येऊन लंकेच्या पूर्वकाळच्या वैभवाचें व प्रगतीचं कौतुक वाटल्यावांचून रहात नाहीं. अशा प्रकारचे नाना विचारतरंग येथे उभे असतांना मनांत उभे राहिले. पण आतां बराच वेळ झाला. ठिकाणास परत जाण्यास उशीर होईल या भयानें मी या सुंदर गिरीशिखरावरून आलेल्या दुर्गम मार्गानें परत खाली आलों व मग मोटारीत बसून पाहिलेल्या अपूर्व स्थळाचें आश्चर्यचकित मनानें मनन करीत गांवच्या विश्रांतिगृहाला येऊन पोहोचलों. हें आठवें आश्चर्य निर्माण करविणाऱ्या राजाची हकीकत येथें देणें अयोग्य होणार नाहीं. अगम खडकाला सुगम बनवून तेथें बांधकला, मूर्तिकला व चित्रकला यांच्या ललितकलाकृतीचें जणूं कांहीं प्रदर्शन भरविणाऱ्या कलाप्रिय राजाचें चरित्र मात्र नैतिकदृष्ट्या ओंगळ व कुरूप अर्थात् अनीतिमान् असें आहे याचें राहून राहून आश्चर्य वाटतें. सिगिरिया दुर्ग बांधणारा पहिला कश्यप राजा हा प्रख्यात धातुसेन राजाच्या असवर्ण राणीपासून झालेला राजपुत्र होय. थोरला राजपुत्र मोगलान हा सवर्ण राणीपासून झालेला युवराज होता. पण कश्यपाला राज्याचा लोभ उत्पन्न झाला. तेव्हां त्यानें आपल्या बापाच्या सेनापतीला वश करून घेऊन बंडाचे निशाण उभारलें व धातुसेनाला कैद करून आपण राज्यावर बसला. पुढें बापाच्या खजिन्याच्या लोभानें कश्यपानें सेनापतीच्या नादीं लागून बापाचे हाल करून त्याला जीवंत भिंतींत चिणलें. थोरल्या भावाची तीच अवस्था करण्याचा त्याचा मानस होता. पण मोगलान हिंदुस्थानांत पळून गेला व तेथें त्यानें आपलें राज्य परत मिळविण्याकरितां सैन्याची जुळवाजुळव सुरू केली. कश्यपाचें पापी मन ही बातमी ऐकून घाबरून गेलें. म्हणून त्यानें आपली अनुराद्धपूर राजधानी सोडली व सिगिरियाच्या अगम खडकावर किल्ला व राजवाडा बांधण्याचा बेत केला. त्यानें आपल्या पदरच्या शिल्पशास्त्रकलानिपुण नोकरांकडून सिगिरीयाचें आठवें आश्चर्य निर्माण केलें. येथून त्यानें १८ वर्षे निर्धास्तपणें राज्याकारभार चालविला. पण मोगलान कांहीं स्वस्थ बसला नव्हता. त्याने मोठ्या सैन्यानिशीं येऊन लंकेवर स्वारी केली व अनुराद्धपुर राजधानी काबीज केली. नंतर तो सिगिरिया किल्याला वेढा देऊन बसला. आतां आपली धडगत नाहीं असें पाहून कश्यपानें आत्महत्या करून घेतली! याप्रमाणें अन्यायाने व अघोरपणानें मिळविलेलें राज्य कश्यपानें नरकवासाला नेणाऱ्या आत्महत्येसारख्या पापकर्मानें घालविलें! पापाचा शेवट पापांत व्हावयाचा हेच खरें. त्याप्रमाणें कश्यप राजाची अवस्था झाली. कोठें कश्यपाची आश्चर्यानें मन थक्क करून टाकणारी व आठवें आश्चर्य होण्यायोग्य ललितकलाकृती! व कोठें त्याची पितृवधासारखी अमानुष पापकृती! कोठें तीं गुहेतील सदा आनंद देणारीं चित्रे व कोठें कश्यपाची भेदरलेल्या मनःस्थितीची द्योतक आत्महत्येची कृति! मानवी कृतींतील व चरित्रांतील हा विरोध म्हणजे एक जगांतील अनिर्वचनीय गूढ होय! याचा उलगडा करण्याची शक्ति मानवी मनाला नाहीं हे खास. अशा प्रकारचे विचार कश्यप राजाच्या विरोधी व विसंवादी वागणुकीनें माझ्या मनांत उभे राहिले. सिगिरिया किल्ल्याचें हे दुःखपर्यवसायी पुराण येथें पुरें करणें बरें.
सिलोनचा पूर्व किनारा पश्चिम किनाऱ्याप्रमाणें अर्वाचीन सुधारलेल्या दळणवळणाच्या साधनानीं, लोकवस्तीनें व नव्या नव्या पिकांच्या लागवडीनें संपन्न झालेला नाहीं. अजून या पूर्वबाजूला अरण्यमय, बिनलागवडीचा खाजगी मालकीचा व बिनवस्तीचा भाग पुष्कळ आहे. पण या किनाऱ्यावर दोन शहरें पुष्कळ पुरातन काळापासून वसलेलीं व प्रसिद्धीस आलेलीं आहेत. ती शहरें म्हणजे त्रिंकोमाली व बॅटीकोला हीं होत. यांपैकीं त्रिंकोमाली हें नांव हिंदुस्थानचा इतिहास व भूगोल मराठी शाळेत शिकतांना विद्यार्थीदशेपासून मला श्रुतिपरिचित होतें. बॅटिकोला ऐकिवांत नव्हतें व माझ्या प्रथम आंखलेल्या लंकाप्रवास कार्यक्रमांत तें शहर नव्हतें, पण तें शहर पाहण्याचा सहजासहजी योग आला तो असा.
मी खडक-देऊळ व खडक-किल्ला पाहून पराक्रमबाहू नांवाच्या सिंहली राजाच्या कारकीर्दीत वैभवशिखरास पोहोंचलेल्या 'पोलनरूवा' नांवाच्या जुन्या राजधानीस गेलों. तेथून त्रिंकोमालीस गेलों व तेथून बॅटिकोला शहरास जाऊन एक दिवसानंतर त्रिंकोमालीस परत आलों. पोलनरूवा ही जुनी राजधानी तिच्याहीपेक्षां जास्त जुनी राजधानी अनुराद्धपुर व त्यांचेही पूर्वीचें प्रसिद्ध पवित्र स्थळ मिहिंतले पर्वत यांचें एकत्र वर्णन मी पुढील प्रकरणांत करणार आहे. या प्रकरणांत बॅटिकोला व त्रिंकोमाली या प्रेक्षणीय शहरांचें वर्णन यथाक्रम करतों.
मी पोलनरूवा येथून मोटारनें त्रिंकोमालीस गेलों. हा सर्व मार्ग रानावनांतून गेला असल्यामुळे, वस्ती व गांवें फार तुरळक तुरळकच लागतात. पोलनरूवा येथून सकाळी साताच्या सुमारास निघालों तों नवाचे आधी हाबनें गांवी २८ मैल आलों. येथें अर्धातास थांबावें लागलें. याच गांवीं मीं एक छोटेसें नवें हिंदु शिवालय पाहिलें. त्यांत मागें उल्लेखिल्याप्रमाणें बुद्धाची मूर्ति पाहिली. अर्ध्यापाऊण तासानें मातलेहून त्रिंकोमालीस जाणारी मोटार आली व त्यांत बसून मी त्रिंकोमालीस बारा वाजतां पोहोचलों. सर्व वाटभर रानच रान! कांहीं भुरटे व कांहीं उंच उंच वृक्षांनी बनलेलें असें दुतर्फा सारखें लागत होतें. या भागांत लागवड अगदीं नाहींच म्हणाना! मात्र त्रिंकोमालीच्या वीस मैल आधीं भला मोठा कांतलाई नांवाचा तलाव लागला. गाडीरस्ता या तलावाच्या मातीच्या बंधाऱ्यावरून एक मैलभर जातो. केवढा मोठा प्रचंड तो बंधारा! किती तरी रुंद; पण तो सर्व मातीचा आहे. येवढ्या मातीचा लांब-रुंद तलाव करण्याला त्या जुन्या काळीं लाखो माणसांची आंगमेहनत कित्येक वर्षे लागली असली पाहिजे. हा तलाव पाहिला कीं भाटघरच्या प्रचंड तलावाची आठवण होते. हल्लीं गाडीरस्ता या तलावाच्या दगडी भिंतीच्या कठड्याच्या मधूनच नेला आहे; व तो एक मैलच आहे. अर्थात् अर्वाचीन बंधारा सर्व चुना दगड सिमेंट यांनी बांधलेला आहे पण जवळ जवळ येवढाच मोठा कांतलाई तलाव मातीच्या बंधाऱ्यानें केलेला असून तो हजारों वर्षे टिकला आहे. हे जुन्या काळचें प्रचंड काम पाहून मन आश्चर्यानें थक्क झालें. येथून खरोखरीं फारच रमणीय देखावा दिसतो. या तलावाच्या आसपास थोडी भातशेती व बागाईती आहे. पण पुढें पुनः रानावनाचा प्रदेश लागतो तो त्रिंकोमाली गांवांत शिरेपर्यंत सरत नाहीं.
त्रिंकोमालीस मी रा. बालसिंघम् या नांवाच्या सुशिक्षित सुधारलेल्या तामीळ गृहस्थाकडे (हे गृहस्थ अबकारी खात्यांतील सुपरिंटेंडेंटच्या दर्जाचे मोठे अंमलदार आहेत) उतरणार होतों. त्यांना रा. कंदिया यांनीं पेरेडॅनीयाहून पत्र लिहिलें होतें व पोलनरूवाहून मी तार केली होती. मोटार- स्टँडवर आल्यावर मला तेथे उतरून त्यांचे बिऱ्हाडीं जावयाचें होतें. पण मला हमालाची भाषा येत नव्हती, म्हणून मीं मोटार ड्रायव्हरला इंग्रजीत सांगितलें व त्यानें हमालाला तामीळमध्यें “अबकारी अंमलदाराकडे न" म्हणून सांगितलें. हमाल गांवांतील दुसऱ्याच अंमलदाराकडे मला नेऊं लागला होता हे मला वाटेने जाणाऱ्या गृहस्थाशीं बालसिंघमची चवकशी करतां कळलें.
पाऊस तर धोधो पडूं लागला. बालसिंघमचा बंगला किल्ल्यांत आहे व येथून तो अर्धा मैल लांब आहे असें कळलें. तेव्हां शेजारी असलेल्या विश्रांतिगृहांत मी जाण्याचा बेत केला. त्याचवेळीं सुदैवानें अबकारी खात्यांतील एक शिपायी भेटला. तेव्हां बालसिंघमना मी विश्रांतिगृहांत उतरल्याचे कळवा असें त्या शिपायास सांगितलें व मग मी विश्रांतिगृहांत गेलों. प्रवास करीत असलेल्या देशाची भाषा येत नसली म्हणजे केव्हां केव्हां कशी फजिती होते याचा मला चांगला अनुभव आला. पण माझें जेवण आटोपून मी इकडे तिकडे पहात होतों तोंच बालसिंघमकडून मोटार आली व त्यांत बसून मी त्यांचे बंगल्यावर गेलो.
त्यांनीं पूर्वीची ओळख नसतांना मोठ्या आदरानें व आनंदानें माझें स्वागत केलें; मग ते म्हणाले "दुसरे दिवशीं सकाळींच मला माझ्या मुलीला आणण्याकरितां बॅटिकोला शहराला जावयाचें आहे; तेव्हां तुम्हीही चला; तुम्हाला तें शहर पाहण्यास सांपडेल." प्रवासाच्या आराखडयांत नसलेलें प्रेक्षणीय शहर पाहण्याचा अनायासें योग येत आहे असें पाहून मीं मोठ्या आनंदानें त्यांच्या म्हणण्यास रुकार दिला. अशा तऱ्हेनें त्रिंकोमालीचे आधींच माझें बाटिकोला शहर पाहून झाले, म्हणून त्याचेंच वर्णन आधीं देतो.
त्रिंकोमालीपासून बॅटिकोला हें दक्षिण दिशेला ऐशी मैल दूर आहे. पूर्व किनाऱ्यानें तेथें जाण्यास चांगला रस्ता आहे खरा; पण वाटेंत चार पांच खाड्या तरीनें उतराव्या लागतात; म्हणून बालसिंघमची स्वतःची मोटार असतांना ते मोटारनें न जातां आगगाडीनें जाणार होते. बॅटिकोलाला जाणारा आगगाडीचा रस्ता म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू होत. या आगगाडीच्या रस्त्यानें त्रिंकोमालीहून बॅटिकोला १२० मैल पडते. सायंकाळीं मी बालसिंघमच्या घरीं राहण्यास आलों हे सांगावयास नको. सकाळीं न्याहारी करून व बरोबर जेवणाचें घेऊन आम्ही बॅटिकोलास जाण्यास निघालों. मोठे अंमलदार म्हणून बालसिंघम् पहिल्या वर्गानें प्रवास करणारे असल्यामुळे मलाही त्याच वर्गाचें तिकीट काढावें लागलें. सिलोनमधील पहिल्या वर्गाची व्यवस्था कशी असते हे या योगानें सहजीं पहावयास मिळणार होतें. 'आठवडा अखेर' च्या परत तिकीटाला साडेबारा रुपये पडले. सिलोन रेल्वेचे पहिल्या वर्गाचे डबे हिंदुस्थानांतील रेल्वे प्रमाणेंच आहेत; पण आगगाडी मात्र सावकाश चालते. मला आमच्या जुन्या एम. एस. एम. च्या गाड्यांची आठवण झाली. गालोया जंक्शन स्टेशनला तर तीन साडेतीन तास थांबावें लागतें. यामुळे या आगगाडीच्या प्रवासाचा फार त्रास वाटतो. एकशेवीस मैलाच्या प्रवासाला दहा तास लागल्यासारखें होतें. मोटार रस्त्यानें येतांना ज्याप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूंस घनदाट रानच रान लागतें त्याचप्रमाणें आगगाडीने जातांना लागतें. पण आगगाडीच्या रस्त्याला लागून दोन्ही बाजूंस बरीच जमिनीची पट्टी रान कापून खुली केल्यामुळे व आगगाडीच्या रुळाखालच्या लाकडी कड्या त्याच रानांतून काढल्या गेल्यामुळें आगगाडीनें जातांना किंचित् खुलास वाटतें व रानही तितकें घनदाट वाटत नाहीं. त्यामुळे मोटार गाडीनें जसा प्रवास भयाण अरण्याच्या बोगद्यांतून होत आहे असा भास होतो तसा हा आगगाडीचा प्रवास वाटत नाहीं. पोलनरूवा स्टेशन टाकल्यावर लवकरच महावेली गंगा या सिलोनमधील सर्वात मोठ्या नदीवरील पूल ओलांडून आगगाडी पुढे जाते. गंगानदी येथें बरीच रुंद व खोल असून प्रवाह दुथडी भरून वहात असतो. पूल व नदी यांचा येथला देखावा प्रेक्षणीय आहे. पुढें आगगाडी थेट पूर्वेकडे जाऊन समुद्रकांठाच्या बरीच जवळ येते. हा भाग समुद्रसपाटीवर असून बिलकूल उंच सखल नाहीं. या भागांत भात शेती व केळी नारळी यांच्या बागा दिसूं लागतात, तेव्हां रान टाकून वस्तीच्या व लागवडीच्या भागांत आलों असें कळून येतें. त्रिकंडीमाडू स्टेशन टाकलें कीं अगदीं निराळ्या प्रकारचा भूमिभाग लागतो. आतां पांढरी रेताड जमीन लागते व त्यांत भुरटें बारिक काटेरी झुडपांचें तुरळक तुरळक रान लागतें. पुढें जमीनींत घुसलेल्या समुद्राच्या लांब फाट्यावर एक मोठा पूल लागतो. तो टाकल्या बरोबर बेलाचना स्टेशन लागते. येथून पुनः लागवडीचा व केळी नारळी पोफळीचा प्रदेश लागतो; पण जमीन पांढरी व रेताड आहे. हा भाग गोव्यारत्नागिरीच्या समुद्रकांठानजीकच्या वाळवंटी जमीनीसारखा वाटतो. जिकडे तिकडे नारळाची झाडेच झाडे दिसतात. बॅटिकोला जसजसें जवळ येतें तसतशी उत्तम भातशेत जमीन व हिरवीगार भातशेतें लागतात. बॅटिकोला प्रांतांत उत्तम भात व नारळ पिकत असले पाहिजेत हें प्रवाशाच्या तत्काळ ध्यानांत येतें. रात्रीं सात वाजतां आम्हीं बॅटिकोला स्टेशनला पोहोंचलों. रा. बालसिंघमचे मित्र डिस्ट्रिक्ट एंजिनीयर मिस्टर वुइल्यम्स हे स्टेशनवर आले होते. त्यांचे मोटारींत बसून आम्ही बॅटिकोलाच्या उथळ व खाऱ्या पाण्याच्या सरोवराला लागून असलेल्या एंजिनीयरच्या बंगल्यांत आलों.
बॅटिकोला शहराची रचना व उपस्थिति मोठ्या नवलाईची आहे. उथळ खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे कांठीं शहराचा कांहीं भाग आहे; तर शहराचा सरकारी बंगल्याचा व किल्ल्याचा भाग सरोवरांतील एका छोट्या बेटावर आहे; शहराला व बेटाला जोडणारा एक मोठा पूल आहे. उत्तरेकडून येणारा आगगाडीचा रस्ता व मोटारचा रस्ता हे बेटापलीकडे आहेत. या सरोवराचें समुद्राला मिळणारें मुख बेटापासून तीन मैल दूर आहे. हें सरोवर सुमारें पंचवीस तीस मैल लांब असून त्याचें समुद्रास मिळणारे उत्तरेकडील मुख पालमिनमाड येथें आहे; तर दक्षिणमुख मारुतमुनाई या गांवानजीक आहे; या सरोवराची रुंदी मात्र कांहीं ठिकाणीं फारच चिंचोळी असून मधून मधून तें सरोवर रुंदावून त्याचे विलक्षण आकाराचे फाटे जमीनींत घुसले आहेत; समुद्राच्या बाजूस मात्र अरुंद सारख्या रुंदीची तीस मैल लांबीची जमिनीची पट्टी दोन मुखांमध्यें सलग आहे. या अरुंद पट्टींतून लंकेच्या पूर्व किनाऱ्याने थेट दक्षिणेस जाणारा रस्ता गेला आहे. हा सर्व भूमिभाग एका पातळीत असून समुद्रसपाटीपेक्षां पांच फूट सुद्धां उंच नाहीं. यामुळे वरच्या भागांत पुष्कळ व एकदम पाऊस पडल्यास या शहराचा कांहीं भाग जलमय होतो व आसपास जिकडे तिकडे पाणीच पाणी पसरतें. बॅटिकोला शहराची व आसपासच्या भूमिभागाची अशी मोठी मजेदार रचना आहे.
आम्हीं डिस्ट्रिक्ट एंजिनीयरचे बंगल्यांत उतरलो होतों. या बंगल्यासमोरच सुंदर सरोवर असून सरोवराच्या कांठानें सुंदर तांबड्या रेतीचा रस्ता गेला आहे. न्याहारी झाल्याबरोबर रा. बालसिंघम आपल्या मित्रमंडळीस भेटण्यास निघाले. अर्थात् मलाही त्यांनी बरोबर घेतलें. बालसिंघम हे संगतिप्रिय गृहस्थ असून ते बॅटिकोलाहून नुकतेच त्रिंकोमालीस बदलून गेले होते. मुलीला आणण्याकरितां स्वतः बॅटिकोलाला जाण्यांत आपल्या तेथल्या मित्रमंडळीस भेटण्याचा त्यांचा एक उद्देश होता. यामुळें सिलोनमधील निरनिराळ्या जातींच्या सुशिक्षित सुधारलेल्या मंडळीशी माझा सहज परिचय झाला. बडोदा शहरांतील सुशिक्षित अंमलदारांप्रमाणे येथले बहुतेक अंमलदार इंग्लंडांत जाऊन पदवी घेऊन आलेले दिसले. कारण, सिलोनमध्यें विश्वविद्यालय नाहीं. तेथलें एकच कॉलेज पदवीपर्यंत शिकविणारे असून तें लंडन विश्वविद्यालयाला जोडलेलें आहे. यामुळें पुष्कळ लोक विलायतेंत जातात. शिवाय लंडनची पदवी असल्याखेरीज निरनिराळ्या खात्यांतील वरच्या दर्जाच्या अंमलदारांच्या जागा मिळत नसल्यामुळे विलायतेंत जाऊन डाक्तर, एंजिनीयर, बॅरिस्टर व इतर पदव्या घेऊन आलेले पुष्कळ गृहस्थ बॅटिकोला येथें मला भेटले. आम्हीं तेथला सरकारी दवाखाना पाहिला. तेथें पन्नाससाठ रोग्यांची राहावयाची सोय केलेली असून सर्व तऱ्हेच्या शस्त्रक्रिया करण्यांत येतात. शिवाय नवीनच सूतिकागृह बांधण्यांत आलें होतें व त्यांत साहा बाळंत बायांची राहण्याची सोय केली होती. येथें तीन पदवीधर डाक्तर होते. रोग्यांची संख्या भरपूर असते असे दिसलें. मग आम्ही बॅटिकोलाचा मुख्य बाजार पाहिला. नंतर बंगल्यावर परत आलों.
दोन प्रहरीं बालसिंघम् यांना व त्यांच्या केंब्रिज सीनीयर लोकल परीक्षेस बसलेल्या मुलीला (हिलाच परीक्षेनंतर परत घेऊन येण्यास रा. बालसिंघम मुद्दाम बॅटिकोलास आले.) एका डॉक्टराकडे पार्टींग फीस्ट देण्यांत आली. त्याकरितां सायंकाळी बरीच स्त्री-पुरुष मंडळी व बालसिंघमच्या मुलीला निरोप देण्यास तिच्या मैत्रिणी जमल्या होत्या. पुरुष मंडळी तर पत्ते खेळण्याकरितां साडेतीन वाजल्यापासूनच जमली. त्यांत नाना जातीचे व नाना धर्माचे लोक होते; एक आय. सी. एस. झालेलेही गृहस्थ होते. सगळी मंडळी मोठ्या मजेनें खेळत होती; खेळ सिंहली सहाजणांनी खेळण्याचा होता; त्यांत दोघे किंवा एकटा एका बाजूनें खेळत व बाकीचे एक होत. हा खेळ कांहींसा ब्रिजसारखा व कांहींसा निराळा आहे. अर्थात् येथें थोडा फार जुगार चालतो; एका पॉइंटला दहा सेंट पैजेचा दर दिसला. मी पैजेचा खेळ खेळत नाहीं व मला खेळ येत नाहीं, या सबबीवर- या दोन्ही सबबी खऱ्या होत्या- मी निष्काम प्रेक्षक राहिलों. याप्रमाणे हे खासगी संमेलन मोठे मजेदार होतें खरें, पण त्यांतली एक पठाडी गोम सांगणं आवश्यक आहे. या सर्व वेळ मंडळी मधून मधून खातपीत होती. मात्र पिण्याचें पाणी शुद्ध साधें नव्हतें, तर तें लाल पाणी होतें, त्या लाल पाण्याचे ग्लासावर ग्लास उडत होते. सारांश, सिलोनच्या सुशिक्षित सुधारलेल्या मंडळींत मद्याचें व्यसन सर्वसामान्य झालें आहे असे मला कळून आलें. आपल्या इकडे ज्याप्रमाणें कोणीही गृहस्थ भेटावयास आला तर त्याला आपण चहा किंवा पान- सुपारी देऊ, त्याप्रमाणें सिलोनमध्यें लाल पाण्याचा ग्लास पुढे करतील. हिंदुस्थानांत सुशिक्षितांच्या पहिल्या पिढीत ज्याप्रमाणें मद्यपानाचें व्यसन सररहा झालें होतें तीच सध्यां सिलोनच्या सुशिक्षितांची स्थिति आहे असें माझ्या अनुभवास आलें. मद्यपानाचें व्यसन येथें सररहा आहे याचे प्रत्यंतर सिलोनमधील सुखासीन खुर्चीच्या रचनेवरूनही कळते. सिलोनमध्यें सुखासीन खुर्चीना पाय पसरण्याकरितां हिंदुस्थानच्याप्रमाणे फिरते दोन हात असतात; इतकेंच नाहीं, तर उजव्या हाताखालीं एक छोटा हात असतो; व त्याला काचेचे दोन ग्लास राहतील पण खाली पडणार नाहींत अशा बेताचीं भोके ठेवलेलीं असतात. पण, येथें मद्यपानाचा किती मोठ्या प्रमाणावर प्रचार चालू आहे याचें एक विलक्षण द्योतक मला अनुराद्धपुर येथील सेंट्रल हॉटेल नांवाच्या वसतिगृहाच्या आवारांत मिळालें. या आवारांत बदामी आकाराची छोटीशी बाग आहे. वाटोळ्या रस्त्याच्या बाजूला व बंगल्याच्या जोत्याच्या बाजूला पाम झाडें व फुल झाडें लाविलीं आहेत. ही छोटीशी बांग सुंदर आहे खरी; पण या बागेतील झाडासभोंवार व बदामी आकाराच्या ताटव्या सभोंवार नेहमीं बसवितात तशा अर्धवट तिरकस तांबड्या विटा बसविलेल्या नाहींत! तर दारूच्या एका सांचाच्या बाटल्यांचा विटांचे ऐवजीं उपयोग केला आहे. यावरून या छोट्याशा वसतिगृहांत किती बाटल्या दारू खपत असेल, याची सहज कल्पना होईल. पण हे मयपुराण अप्रस्तुत होत चालले. तरी बॅटिकोला शहराच्या प्रेक्षणीय स्थळांकडे वळू या.
डाक्टराच्या येथें जमलेल्या मंडळींत रा. नटराजन नांवाचे सर्वे खात्यांतील एक तरुण अंमलदार माझ्याप्रमाणेंच मुक्तमद्य नव्हे अपेयमद्य होते. त्यांना तो सिंव्हली पत्त्याचा खेळही येत नव्हता. तेव्हां आम्ही दोघे समानशील जमल्यामुळे शहराचे प्रेक्षणीय भाग पाहून येण्याचें ठरविलें. रा. नटराजन यांच्या मोटारींतून प्रथमतः आम्हीं बॅटिकोला शहराच्या सरोवराच्या मुखाच्या जरा अलीकडे दक्षिण दिशेला जाणाऱ्या मोटाररस्त्यावर असलेला सरोवरावरील पूल पाहण्यास गेलों. हा पूल शहरापासून तीन साडेतीन मैल दूर आहे. रस्त्याच्या दुतर्फा केळी-नारळीच्या बागाचबागा लागतात. यामुळे रस्ता फार सुंदर दिसतो. पूल लोखंडी असून त्याला डोक्यावर लोंबता असा मोठा लोखंडी कठडा आहे. पुलाला साहा कमानी असून प्रत्येक कमान पन्नास फुटांची आहे. पूल सुमारें पांच सहाशें फूट लांबीचा आहे. हाच पूल सिलोनमध्ये सर्वांत मोठा पूल होय असे मला समजलें. पुलाचा देखावा प्रेक्षणीय आहे खरा. पुलाचे पलीकडे केळीनारळीच्या दाट बागा आहेत व समुद्राच्या अंगाला पांढऱ्या रेताड जमिनींत हिरवें पण भुरटें झुडपी रान आहे. थोडा वेळ पायीं चालल्यावर आम्हीं तेथून परतलों व मग शहराकडे येऊन बॅटिकोलाचें दीपगृह व बंगालचा उपसागर पहाण्यास गेलों. हे ठिकाणही शहरापासून तीन साडेतीन मैल दूर आहे. रस्ता सरोवराच्या दरेनें जातो. ती दरा दमडी धक्क्याने सबंद बांधून काढली आहे. उजव्या बाजूस त्या धक्क्याची पांढरी कडा, मध्ये काळा डामरी रस्ता व डाव्या बाजूस हिरवीगार पायवाट व पलीकडे नारळीच्या बागा असा हा देखावा मोठा रमणीय आहे. हा भाग फार शांत व निर्मक्षिक वाटतो. येथें डाव्या हाताला एक छोटेसें सरकारी विश्रांतिगृह आहे. उजव्या हातास पांढरा शुभ्र रंग दिलेलें चौकोनी बांधणीचें दीपगृह आहे. त्याच्या प्रत्येक मजल्याला चारी बाजूस एक एक खिडकी राखली आहे. छोटेसें हे दीपगृह सुबक आहे. येथें सरोवर संपते; पण बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यास जाण्याकरितां मध्यें थोडें उथळ पाणी लागतें. तेव्हां उल्डी असलेल्या अगदी अरुंद तोंडाच्या होडींत आम्ही बसलों, होडीवाल्याने लागलीच आम्हांला समुद्राच्या तीराला नेलें. त्या होडीवाल्याचें वल्हें म्हणजे नारळाच्या झाडाच्या पानाच्या देठाचा चार हाताचा तुकडा होता हें पाहून मला मोठें नवल वाटलें. उपसागराचा सर्व किनारा बारिक पांढरट पिवळसर रेतीचा आहे. त्या रेतींत तुरळक रेतीसरशी वाढणारी वेलवजा झुडपे आहेत. या रेतीच्या वाळवंटावरून आम्ही सुमारें अर्धा मैल गेलों. तेथें बंगालच्या उपसागराच्या पाण्याचा रंग हिरवट कबरा दिसत होता. मोठमोठ्या पांढऱ्या फेसानें युक्त अशा लाटा वाळवंटावर येऊन आदळत होत्या. उपसागराचा देखावा भव्य वाटतो. तो अफाट समुद्र पूर्वेकडे किती तरी दूरवर पसरला आहे हें ध्यानांत येऊन आश्चर्यानें मन थक्क होतें! नंतर आम्ही परत फिरून दवाखान्यांत आलों. तरी मंडळीचं खाणेपिणें चालू होतें; आम्ही आल्यावर डॉक्टर साहेबांनी "बालसिंघमच्या कुटुंबांतील सर्व मंडळींच्या संगतिप्रियतेची व सर्वांशी मित्रत्वाच्या नात्यानें वागण्याच्या स्वभावाची येथल्या मंडळीस वारंवार आठवण होते" असें सांगितलें व सर्व मंडळीचा काढलेला फोटो मिस लीला इजला नजर केला. मग सर्व बायकामंडळी घरोघरीं गेली. रा. नटराजननीं रात्रीं मला सरोवरावर होडींतून हिंडावयास व त्या सरोवरांत रात्रीच्या वेळी गाणाऱ्या माशांचें (हा बाटिकोला सरोवराचा एक अलौकिक चमत्कार आहे) गाणे ऐकविण्यास न्यावें असें ठरलें असल्यामुळे ते आपल्या बंगल्यावर जेवावयास गेले व मी एंजिनीयर साहेबांच्या बंगल्याला आलों. मागें पुरुष मंडळी रेंगाळत राहिली. आणखी बऱ्याच रात्रपर्यंत त्यांचा पानविधि चालावयाचा होता. रात्री नऊ वाजतां रा. नटराजन बंगल्यावर आले. आम्हीं एंजिनीयर साहेबांच्या बंगल्या शेजारींच असलेल्या सरकारी पण एंजिनीयरसाहेबांच्या ताब्यांत असलेल्या होडीमध्यें बसलों व सरोवराचे बरेच आंत गेलों. या रात्रीच्या जलसहलेनें मला माझ्या विद्यार्थीदशेतील डेक्कन कॉलेजांतील बोट क्लबाच्या अनुपम अनुभवाची आठवण झाली. मला होडींतून सहल करतांना फार आनंद वाटला. सरोवराच्या पाण्यांत रस्त्याच्या दिव्यांचीं प्रतिबिंबें पडत होतीं. यामुळे दिव्यांची रांग जणू कांहीं द्विगुणित झाल्यासारखी वाटत होती. बॅटिकोला सरोवरांतील गाणारे मासे हा एक या शहराचा अद्वितीय चमत्कार आहे; पण हा चमत्कार चांदण्या रात्रीं उन्हाळ्याच्या दिवसांत व सरोवराचें पाणी अगदीं खारें असतांना ऐकण्यास मिळतो; पण आम्हीं गेलों ती काळोखी रात्र असल्यामुळे व नुकत्याच पडलेल्या पावसानें सरोवराच्या पाण्याचा खारटपणा पुष्कळ कमी झाला असल्यामुळें हें माशांचें गाणें ऐकावयास सांपडावयाचें नाहीं असें रा. नटराजन म्हणाले. तरीपण आम्ही जेथून हें गाणें ऐकावयास सांपडण्याचा संभव होता, अशा सरोवराच्या पलीकडच्या तीरानजीक वल्हवीत गेलों, व तेथें बराच वेळ एकचित्ताने गाण्याचे स्वर ऐकूं येतात कीं काय हें पहात बसलों. पण पलीकडच्या तीराच्या भुरट्या रानांतील रानकिड्यांच्या किरकिर या कर्कश आवाजाखेरीज आम्हांला कसलाही गाण्याचा सुस्वर ऐकूं आला नाहीं. तेव्हां आम्ही परतलों. जरी मला माशांचें गाणे ऐकावयास सांपडलें नाहीं तरी कैक वर्षांपूर्वीच्या जलसहलीच्या अनुभवाच्या पुनरुक्तीनें मला आनंद वाटला व मोठ्या प्रमुदित मनानें आम्ही परत होडींतून घरीं आलों. रा. नटराजन यांनी बॅटिकोला शहराची प्रेक्षणीय स्थळें व सरोवर सहलीची मजा दाखविल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानून मी त्यांचा निरोप घेतला. दुसरे प्रातःकाळींच एंजिनीयर साहेबांचे आभार मानून मी बालसिंघम व त्यांची मुलगी यांचे समवेत त्रिंकोमालीस येण्याकरितां आगगाडी गांठली व पूर्वी वर्णन केल्याप्रमाणें १२० मैलांचा अत्यंत सावकाशीचा व मध्येच थांबावे लागत असल्यामुळें अत्यंत कंटाळवाणा वाटणारा प्रवास संपवून परत त्रिंकोमालीस आलों.
त्रिंकोमाली हे शहर पुरातन काळापासून पूर्वेकडील एक सुरक्षित व स्वाभाविक बंदर म्हणून प्रख्यात होतें. म्हणून युरोपियन लोकांच्या व्यापारी स्वाऱ्या पूर्वेकडील देशावर होऊ लागल्यापासून हे बंदर आपल्या ताब्यांत ठेवण्याबद्दल या युरोपियन राष्ट्रांची सारखी धडपड चालू होती. म्हणूनच त्रिंकोमाली येथें युरोपियन राष्ट्रांच्या तीन अंमलाच्या खाणाखुणा अद्याप दृग्गोचर होतात. पहिल्यांदां हे बंदर पोर्तुगीझ लोकांनी हस्तगत केलें व येथील लोकांना ख्रिस्ती केलें. म्हणून या शहरीं पुष्कळ रोमन कॅथॉलिक लोक आहेत. पण पुढें डच लोकांनीं हे बंदर पोर्तुगीझ लोकांकडून हिसकावून घेतलें व आपला अंमल चालू केला. तो बऱ्याच वर्षे चालल्यामुळें डच लोकांचें वर्चस्व व त्यांची वस्ती दाखविणाऱ्या किती तरी गोष्टी त्रिंकोमाली येथें आहेत. आधीं मूळच्या डच लोकांचे वंशज व त्यांच्यापासून तत्रस्थ स्त्रियांना झालेली मिश्र संतती येथें व एकंदर सिलोनमध्यें बरीच आहे. त्यांना बर्जर म्हणतात. हे लोक चांगले सुशिक्षित असून सरकारदरबारीं यांचें बरेंच वजन आहे. डच राजवटीच्या वेळच्या किती तरी इमारती व त्यांचे अवशेष अजून त्रिंकोमालींत पाहण्यास सांपडतात. डच नांवें व डच तऱ्हेची घरबांधणी येथें दिसून येते; शेवटीं लंका हें बंदर इंग्रज लोकांच्या ताब्यात आलें. आतां तर त्रिंकोमाली येथें ब्रिटिश आरमारी आड्डा- सिंगापुरच्या पुरवणी दाखल करण्याचा ब्रिटिश सरकारचा बेत असल्यामुळें या बंदराला जास्तच महत्त्व आलें आहे व कालेकरून जास्त जास्तच येणार असा रंग दिसतो.
त्रिंकोमाली हे मुंबई बंदराप्रमाणें एक स्वाभाविक बंदर आहे. त्याची भौगोलिक उपस्थिति थेट मुंबईच्याप्रमाणे आहे. मात्र मुंबई बंदर हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील व आरबी समुद्रावरील बंदर आहे, तर त्रिंकोमाली हे सिलोन बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील व बंगालच्या उपसागरावरील बंदर आहे. यामुळे दिशांची अदलाबदल झाली आहे. बाकी बंदराची स्वाभाविक ठेवण सारखी आहे. मुंबई बंदर मुंबई बेटाच्या पूर्वेस आहे तर त्रिंकोमाली बंदर शहराच्या पश्चिमेस आहे. मुंबई बंदराचें मुख दक्षिणेकडे आहे, तर त्रिंकोमाली बंदराचें उत्तरेकडे आहे, मुंबई बंदराच्या नजीक पनवेलची खाडी येऊन मिळते; तर त्रिंकोमाली बंदराच्या नजीक महावेली गंगा नदीची खाडी येऊन मिळते; मुंबईची मलबार टेकडी समुद्रावरील वारा व लाटा यांपासून बंदराचें संरक्षण करते; तर त्रिंकोमालीची गर्दछाय टेकडी बंदराचें वादळापासून संरक्षण करते; मुंबईला जसा बॅकवे नांवाचा उथळ पाण्याचा अर्धवर्तुळाकार भाग आहे; तसा त्रिंकोमालीस डचबे नांवाचा अर्धवर्तुळाकार भाग आहे. मुंबईचें कुलाबा टोंक बंदराच्या पश्चिमेस मुख्य समुद्राच्या बाजूचें टोक असून तेथें दीपगृह आहे; तर त्रिंकोमालीचे पूर्वेस मुख्य उपसागराच्या बाजूचें टोंक फाऊल पॉईंट म्हणून आहे व तेथें दीपगृह आहे. ज्याप्रमाणें मुख्य समुद्रासमोर व मुख्य समुदाच्या लाटा व वारा मिळणारे नेपीयनसी व महालक्ष्मी हे भाग आहेत, त्याप्रमाणें त्रिंकोमालीस फ्रेडरिक किल्ल्याचा किनारा व बॅकबे हा भाग आहे. दोन्हींही बंदरें खूप खोल पाण्याचीं व

याप्रमाणे त्रिंकोमालीचें महत्त्व आहे. अद्याप शहर फार मोठे नाहीं; पण शहर दुमदार, नीटनेटकें व निसर्गरमणीय आहे. शहरांत जिकडे तिकडे केळी नारळी पोफळीची रेलचेल आहे.
त्रिंकोमालीस मी अबकारी खात्यांतील सुपरिंटेंडेंटच्या मोठ्या हुद्यावर असलेल्या रा. बालसिंघम् (जाफना शहरचे रहिवाशी एक तामील गृहस्थ यांचे बंगल्यावर उतरलों होतों म्हणून मागे सांगितलेंच आहे. यांचा बंगला हे एक त्रिंकोमालींतील प्रेक्षणीय स्थळ आहे. तरी तेथपासूनच त्रिंकोमालीच्या स्थलवर्णनास प्रारंभ करणें ठीक होईल.
हा बंगला फ्रेडरिक फोर्ट नांवाच्या डच राजवटींत बांधलेल्या किल्ल्याचे आंत आहे. बंगालच्या उपसागरांत जरा पुढे घुसलेल्या त्रिकोनाकृति भूमिभागावर हा किल्ला बांधलेला आहे. हा भाग टेकडीवजा असून बराच उंच आहे. त्रिकोनाच्या समुद्राकडल्या दोन्ही बाजू निवळ भिंतीसारख्या उभ्या असलेल्या खडकाच्या असल्यामुळे त्या बाजू समुद्राच्या पाण्याच्या पातळीपेक्षां पन्नास फूट उंच असून, समुद्रांत घुसलेलें चिंचोळें टोंक तर दोन अडीचशें फुट उंच असल्यामुळे या बाजूनें किल्ल्याला स्वाभाविक तटच झाला आहे. फक्त किल्ल्याचा शहराला जोडणारा प्रवेश भाग सखल आहे. त्या बाजूसच रुंद व मजबूत तट बांधलेला आहे. किल्ल्याचें प्रवेशद्वार या सखल भागांतून आहे. सध्यां किल्ल्याला लष्करी महत्त्व कांहींच नाहीं; येथें सध्यां सरकारी बंगले असून सरकारी बरेच अंमलदार या बंगल्यांतून राहतात. बालसिंघमचा बंगला किल्ल्याचे एका टोकास असून बऱ्याच उंचवट्यावर आहे. बंगल्याचें जोतेंही खुप उंच आहे. यामुळें बंगला उठावांत दिसतो. बंगला एक मजलीच आहे. पण त्याची खुप उंच मांडावण आहे. पूर्वी हें एक छोटे प्रार्थनामंदिर होतें. त्याचीच दुरुस्ती व डागडुजी करून सध्यांचा बंगला बनविण्यांत आला आहे. बंगला उंचवट्याच्या टोकावर असून समुद्राच्या बाजूस त्याला खुला रुंद व्हरांडा आहे. यामुळें या बंगल्यांतून बंगालचा उपसागर व त्याचें भव्य स्वरूप मोठें चित्ताकर्षक भासतें. बंगालच्या उपसागराचें अफाट पसरलेलें हिरवट निळसर पाणी, थाडथाड आवाज करीत बंगल्याच्या खडकावर आपटणाऱ्या त्या प्रचंड लाटा; त्या लाटांनी फेसाळलेलें तें पाणी, समोरच असलेला फाऊल पॉईंट व तेथलें पांढरें शुभ्र दीपगृह; हा देखावा अद्वितीय आहे; प्रातःकाळीं तर हा देखावा अधिकच रमणीय दिसतो. अरुणोदय झाला की पूर्वदिशा रक्तवर्ण होऊं लागते व समुद्राच्या निळसर हिरवट पाण्यावर उदय पावणाऱ्या सूर्यनारायणाचा प्रकाश पडला म्हणजे समुद्र विविध रंगी प्रचंड धनुष्याकार धारण करतो. उजव्या बाजूस डच पॉईंट व बंदराला संरक्षिणाऱ्या टेंकडीचें एक टोक आहे. त्यावर जिल्ह्याच्या कलेक्टरचा (याला लंकेंत गव्हर्मेंट एजंट म्हणतात) बंगला आहे.
सूर्यनारायणानें समुद्रांतून आपले डोके वर काढलें म्हणजे जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो; सकाळीं क्षितिजावर ढग असले तर निराळीच शोभा दिसते; त्यावेळीं प्रत्यक्ष सूर्यनारायण ढगाचे मागें लपलेला असतो, पण सूर्य किरणांमुळे ढगांवर तांबडा, केशरी पिवळा

या फ्रेडरिक किल्ल्यावर आतां पाहण्यासारखें फारसें कांहीं एक नाहीं. किल्ल्याच्या सर्वांत उंच भागावर निशाण लावण्याचा उंच खांब आहे. त्याच्या जवळच एका जुन्या बराकीच्या छपराला लागून चार विटांच्या भिंतीवर एक लोखंडी तुळयांचा व लांकडी पटईचा मोडकळीस आलेला प्लॅटफार्म आहे. पूर्वी याचा टेहेळणी बुरुजासारखा उपयोग करीत असले पाहिजेत. या प्लॅटफॉर्मवर जाण्यास लांकडी जिना केलेला आहे. या प्लॅटफॉर्मवरून त्रिंकोमाली शहर व बंदर यांची रचना व ठेवण उत्तम तऱ्हेनें दृष्टोत्पत्तीस येते. सभोवार हिरवी हिरवी झाडी व जंगल दिसतें. हा प्रदेश साधारणतः सपाट आहे; व आसपासचा सर्व मुलूख जंगलमय आहे. येथून फ्रेडरिक किल्ल्याच्या मागच्या टोकाला गेलें म्हणजे सृष्टीचा एक अलौकिक चमत्कार दृष्टोत्पत्तीस येतो. हें ठिकाण बौद्धधर्मी व हिंदुधर्मी अशा दोन्ही धर्मांच्या लोकांना फार पूज्य वाटतें. ह्याबद्दलची दंतकथा तर रामायणकाळाला जाऊन भिडते; इतकी ती पुरातन आहे. हल्ली त्या ठिकाणाला स्वामी खडक म्हणतात. येथला देखावा खरोखरी आश्चर्यकारक आहे. येथें सुमारें ४०० फूट खोल असा खडक तुटलेला आहे. हा खडक ग्रानाईट जातीचा आहे. त्याला तिरप असं प्रचंड थर आहेत. समुद्राच्या लाटांनी म्हणा किंवा तोफांच्या गोळीबारानें म्हणा हा पदरापदराचा खडक पायऱ्या पायऱ्या सारखा उतरता फुटला आहे. एक पायरी पंचवीस किंवा पन्नास-फुट उंचीची राक्षसी पायरी बनली आहे. अशा तऱ्हेनें हा खडक थेट समुद्राच्या पाण्यापर्यंत पायरी पायरीनें उतरत गेला आहे. एक भला मोठा खडक तर मुख्य खडकापासून एका भल्या मोठ्या भेगेनें विभागला आहे. काय आश्चर्यकारक, भव्य व भीतिप्रद येथला देखावा आहे! मी उभा होतों त्याच्या उजव्या हाताला दोन प्रचंड खडकांचे राक्षसी आकाराचे मोठे थोरले काळे, भीषण धोंडे कलंडते असे उभे होते. हे केव्हां कलंडून पडतील याचा भरंवसा वाटत नाहीं; इतके ते बुंध्याकडून पोखरलेले आहेत. त्यांपैकी एकावर छोटासा एक स्तंभ आहे. तो शेंदराने तांबूस काळसर झाला आहे. तेथून या प्रचंड खडकाच्या पायऱ्या पाण्यापर्यंत गेल्या आहेत. अगदीं समुद्राचे सपाटीजवळ असलेल्या प्रचंड खडकाला जोत्याप्रमाणे कंगोरा व गलथा आहे. याच खडकावर रावणाच्या काळापासून एक शिवालय होतें. तें रावणानें या प्रचंड खडकासकट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या बाणानें त्या खडकाला एक भली थोरली भेग पडलेली त्या खडकाकडे जातांना दाखवितात. अक्राळ विक्राळ राक्षसाच्या जबड्याप्रमाणें ती भेग भयंकर दिसते खरी. ही झाली फार जुनी रामायण कालीन दंतकथा. ती येथल्या खडकाच्या राक्षसी स्वरूपावर केलेलें रूपक असावें असें वाटतें. पण जास्त विश्वसनीय व जिचीं दृश्य चिन्हें जोत्यासारख्या खोदलेल्या भागावरून अजून शाबूत आहेत ती दंतकथा अशी : येथलें देऊळ पोर्तुगीज लोकांनी पाडून टाकण्याचा प्रयत्न केला. तेव्हां महादेवानें देवळासकट समुद्रांत उडी घेतली अशी ही दंतकथा आहे. महादेवाचें देऊळ व पिंडी अजून समुद्रांत आहेत अशी भाविक हिंदूंची समजूत आहे. म्हणून या ठिकाणी दर सोमवारी व शुक्रवारीं तामीळी स्त्री-पुरुष या स्वामी खडकांवर येतात; अति बिकट वाटेनें व मोठ्या प्रयासानें समुद्र-सपाटीच्या खडकावर जातात व तेथें समुद्रांत अंतर्धान पावलेल्या महादेवाची पूजा करतात! महादेवानें समुद्रांत उडी घातली असो अथवा नसो; येथें एक मोठें देवालय असून पोर्तुगीझ लोकांनीं हे ठिकाण किल्ल्याकरितां पसंत केलें तेव्हां तें देऊळ पाडून टाकलें असावें, हा दंतकथेचा भाग खरा असला पाहिजे. पण हल्लींसुद्धां हे ठिकाण आश्चर्यकारक आहे यांत शंका नाहीं. येथून बंगालच्या उपसागराचें भव्य व अफाट स्वरूप दिसून येतें. खडकावर आपटणाऱ्या लाटांचा तो मेघगर्जनेसारखा आवाज; प्रचंड लाटांनीं उत्पन्न झालेला तो समुद्रफेस व एकामागून एक वेगानें येणाऱ्या त्या प्रचंड लाटा हा देखावा अद्वितीय आहे यांत शंका नाहीं. हे ठिकाण भीतिप्रद वाटतें खरें; पण सृष्टीचा हा एक विलक्षण चमत्कार पाहिला म्हणजे येथून लवकर हालूं नये असें वाटतें. तो भीतिप्रद, भव्य पण रमणीय देखावा सारखा पहात रहावेसें वाटतें. पण सायंकाळ झाल्यामुळे मला तेथून परतावें लागलें.
दुसरे दिवशीं सकाळीं मी त्रिंकोमालीचें दुसरें प्रेक्षणीय स्थळ- कनीया नांवाच्या सात ऊन झऱ्यांच्या विहीरी- पहाण्यास गेलों. हे ठिकाण त्रिंकोमाली- अनुराद्धपुर रस्त्यावर पांच सहा मैलांवर डाव्या हाताकडच्या हिरव्यागार बागेसारख्या सुंदर भागांत आहे. येथें झाडी खूप आहे. यांना इंग्रजीत विहीरी असें म्हटलें आहे खरे; पण हा एक ऊन पाण्याचा झरा आहे. तेथल्या पाण्यावर झालेली सुपारीची बाग दाट गर्दछाय आहे. या उन्हाळ्यासभोंवार भिंत असून आंत सभोंवार हिंडण्यास ओटा आहे. वीस पंचवीस फूट लांब व दहा पंधरा फूट रुंद अशी तांबूस पांढऱ्या वाळूची पुष्करणी आहे. ती सदोदित पाऊलभर पाण्याने भरलेली असते. त्या वालुकामय पुष्करणींत तीन चार फूट लांबी-रुंदीचे व दीड-दोन फूट उंचीचे असे सात हौद बांधलेले आहेत; त्यांतला एक हौद जरा मोठा आहे. बाकीचे त्यापेक्षां जरा लहान आहेत. या मोठ्या हौदांत सारखे बुडबुडे येत असतात. हेच खरें उन्हाळें होय. याचें पाणी खुपच कढत आहे. त्याला गंधकाचा मात्र वास येत नाहीं; बाकीच्या हौदांत असे बुडबुडे येत नाहींत व त्यांचें पाणी मोठ्या हौदाच्याइतकें गरमही नाहीं. तेव्हां या हौदांना या मुख्य हौदांतून वाळूच्या थरांतून पाण्याचा पुरवठा होत असावा. येथें मी आंघोळ केली हें सांगावयास नको. येथें हौदांत शिरतां येत नाहीं; बालडीने पाणी काढून आंघोळ करावी लागते. पण या निसर्गानें सदा तापलेल्या हौदामधून ऊन ऊन पाण्याच्या बादल्याच्या बादल्या डोक्यावर ओततांना मोठी मौज वाटते. या साधारण थंड दिवसांत ही कढत पाण्याची आंघोळ मोठी सुखदायक वाटते यांत शंका नाहीं. हे ठिकाण थेट आपल्या इकडल्या उन्हाळ्यासारखें आहे. पण हे खासगी मालकीचें नाहीं; तर तें सरकारी मालकीचें ठिकाण आहे. येथे एक सरकारी रक्षक असतो. शेजारी विश्रांतिगृह आहे. येथेही पुष्कळ भाविक लोक येऊन स्नान करतात. या ठिकाणची दंतकथाही रामायणकाळापर्यंत पोहोंचते. रावण येथें आला असतांना विष्णूने वृद्ध माणसाचें रूप धारण करून रावणाला आपली आई कनीया वारल्याची बातमी सांगितली. तेव्हां रावणानें तेथल्या तेथें आईच्या नांवानें अर्घ्योदक देण्याकरितां जमिनींत बाण मारला; तोच हे गरम पाण्याचे झरे येथें उत्पन्न झाले. तेव्हांपासून ते अद्याप वहात आहेत.
संध्याकाळी आम्ही त्रिंकोमालीचें बंदर पहाण्यास गेलों. डाव्या बाजूस ती हिरवीगार गर्दछाय टेकडी व हिरवट नीळसर सरोवराच्या पाण्यासारखें निवाऱ्याचें, खोल पाण्याचें बंदर व त्या सरोवरसमान बंदरामधील छोटी हिरवीगार बेटें व बंदराच्या सर्व बाजूंना दूरवर दिसणारी नारळीची झाडी हा देखावाही अपूर्व वाटतो. टेकडीच्या बाजूनें उत्तम सडक गेली आहे. तिकडे आरमारी डॉकयार्ड आहे. आरमारी दवाखाना, आरमारी लोकांकरितां बराकी, बंगले व इतर इमारती थेट टेकडीच्या टोकापर्यंत पसरलेल्या दिसतात. आरमारी डॉक यार्डला दोन छोटे मनोरेवजा बुरूज केले आहेत व मोठें फाटक आहे. याचेनजीक ॲडमिराल्टी हाऊस म्हणून डच काळापासूनचा एक बंगला आहे. या बंगल्यांत एक फार जुना पिंपळाचा वृक्ष (बौद्धाचा ज्ञानवृक्ष) आहे. त्याचे सांवलींत हजार माणसें बसतील, इतका तो मोठा आहे. अर्थात् हा बंगला व त्यांतील वृक्ष आम्हांला पहावयास मिळाला नाहीं. पण या डॉकयार्डमध्ये जितक्या आंत प्रवाशांना जाऊं देतात, तितकें आंत आम्ही गेलों व मग तेथून परतलों. नंतर बंदराच्या बाजूच्या रस्त्यानें बालसिंघमच्या बंगल्याला परत आलो. त्रिंकोमाली बंदर फार खोल व निवाऱ्याचें आहे खरे; परंतु अजून येथें बोटींची किंवा गलबतांची फारशी जा-ये दिसली नाहीं. कारण आपल्या इकडच्या एखाद्या छोट्या तालुक्यासारख्या आंतल्या बंदराइतकीही गलबतें या येवढ्या मोठ्या बंदरांत दिसली नाहींत. झाले. माझे त्रिंकोमालीचें वर्णन संपले व माझा तेथला निवासही संपला. बालासिंघमचा निरोप घेऊन दुसरे दिवशीं प्रातःकाळीं मी पुढील दृश्य- दर्शनाकरितां मार्गस्थ झालों.
लंका बेटांतील बांधकला व मूर्तिकला यांचे आगर म्हणजे पुलनरुवा राजधानी, अनुराद्धपुर राजधानी व मिहिंतले धर्मगिरी हीं होत.
या तीन प्रेक्षणीय स्थळांचा कालक्रम अर्वाचीनाकडून प्राचीनाकडे आहे. तेव्हां याच अनुक्रमानें त्याचें वर्णन करणें युक्त आहे व आपोआप मीं हीं स्थानें वर्णिलेल्या क्रमानें पाहिलीं.
खडक-देऊळ व खडक-किल्ला पाहून मी दाबूलगांवाहून तिसऱ्या प्रहरी चार वाजतां मोटारबसनें पोलनुरुवा राजधानीस जाण्यास निघालों. दांबूल गांव टाकल्याबरोबर जंगलास सुरवात होते. पांच सहा मैल गेल्यावर अनुराद्धपुरचा रस्ता डावीकडेस टाकून मोटार त्रिंकोमाली रस्त्याला लागते. आतां जंगल दाट व मोठेही होतें. नंतर हावर्न गांव लागतें; दांबूलपासून हावर्न १६ मैल आहे. येथें मोटार थोडा वेळ थांबते. येथें पोस्ट ऑफिस असून त्याचे जवळच नवें शिव-देवालय पोस्टमास्तरनें बांधलें आहे. येथून रस्ता थेट पूर्वेस वळतो. आतां मात्र मोटार निबीड अरण्यांतून जाते; वाटोवाट केसाळ काळेभोर, भीषण भासणारे रानरेडे रस्त्याच्या बाजूला चरतांना दिसतात. येथून चवदा पंधरा मैलांवर मिनेरिया गांव लागतें. या गांवांत बरीच लागवड दृष्टीस पडली. हें गांव मिनेरिया नांवाच्या मोठ्या तलावाचे कांठीं आहे. हा तलाव महासेन राजानें सन ३०० च्या सुमारास बांधला; हा सिलोनमधला फारच मोठा तलाव असून याच्या आसपास जलचर व स्थलचर प्राण्यांची शिकार मुबलक मिळते. हा तलाव सतराशें वर्षांचा आहे. यावरून सध्या अरण्यमय बनलेला भाग त्या काळीं उत्तम भातशेतीचा व पुष्कळ वस्तीचा होता हें कळून येतें; व मागच्या राजांच्या राजवटीं तील प्रगतीचें कौतुक वाटतें. आमची मोटार निघाली तो अगदी काळोख पडला. येथून पोलनुरुवा चवदा पंधरा मैल आहे. हा सर्व भाग जंगलमय आहे. अरण्यांत सर्वत्र अंधार झाला. मोटारच्या दिव्याच्या प्रकाशानें समोरचा काय तो रस्ता दिसत होता; आतां रानकिड्यांचा किरकिर स्वर सारखा सुरू झाला. दोन्ही बाजूंस गुडूप अंधार, तो रानकिड्यांचा कर्णकटु स्वर, रस्त्याला लागून असलेल्या हिरव्यागार झाडावर पडणारा तो विजेच्या दिव्याचा धावता प्रकाश व मोठ्या वेगाने जाणारी ती एकाकी मोटारबस या सर्व गोष्टी मनांत भीति उत्पन्न करीत. अशा या निबीड अरण्यांत रात्रीचेवेळी जर मोटार बंद पडली, तर काय होईल असा भयप्रद विचार वारंवार मनांत येई; पण इतक्यांत अरण्य कमी होऊन तुरळक खुला भाग व मग क्वचित् झोपडी दिसूं लागली. तेव्हां आपण अरण्य टाकून शहरानजीक आलों असें कळलें व जीवांत जीव आला. मी सुमारें साडेसात वाजतां पोलनुरुवा येथें पोहोंचलों. मी रा. हँडी नांवाच्या तेथील पोस्टमास्तरना पेरेडॅनीयाहून रा. कनकरत्न नांवाच्या शेतकी खात्यांतील एका अंमलदाराचे परिचय-पत्र आणलें होतें. मोटारनें सरळ रस्त्यावर असलेल्या पोस्टमास्तरचे बंगल्याशी मला उतरविलें. बंगल्यांत कोणींच नव्हतें. पण पुढचा व्हरांडा खुला होता. तेथें सामान ठेवतों तोंच बंगल्यांतील नोकरानें माझें सामान हॉलमध्ये नेवून ठेवलें व मला बसावयास खुर्ची दिली. मी बराच वेळ वाट पाहिली, पण पोस्टमास्तरांचा पत्ता नाहीं, शेवटीं साडेआठ वाजल्यावर ते गृहस्थ आले. त्यांनीं तार पोहोंचल्याचे सांगितले व माझें आदरानें स्वागत केलें. पोस्टमास्तर बंगल्यांत एकटे रहात असून त्यांनी बायकामुळे मुलांच्या शिक्षणाकरितां जाफना येथें ठेविलीं आहेत असें कळलें. जेवणखाण आटोपून मी लागलींच निजलों. सबंद दिवसाच्या प्रवासाच्या श्रमानें व त्रासानें दमल्यामुळे मला लागलींच झोप लागली. मी सकाळी उठतों तों सारखा पाऊस पडत आहे. न्याहारी झाली तरी "पाऊस थांबण्याचें चिन्ह नाहीं. पण पाऊस फार जोराचा नव्हता,

पोलनरुवाचें टपाल-घर गांवाचे दक्षिणेस डाव्या हातास आहे. त्याच्या मागून उत्तरेकडे पाऊलवाटेनें गेलें म्हणजे पोलनरुवाच्या जुन्या राजधानींतील अवशिष्ट इमारती वगैरे प्रेक्षणीय स्थळे क्रमानें अर्ध्या पाऊण मैलाच्या अंतरावर लागतात; शहराचा विस्तार तीन चार मैल असल्यामुळें जाऊन येऊन दहा मैलांची मजल करावी लागली. त्याला साडेतीन तास सारखें चालावें लागलें. पण इतक्या श्रमांत बिनखर्चानें माझें पोलनरुवाचें दृश्य-दर्शन पुरें झालें.
टपालघराच्या मागें गेलें कीं, लागलीच पूर्वीच्या शहरांतील किल्ल्याचा खंदक लागतो. आतां खंदकांत पाणी नाहीं व तो बहुतेक ओहोरला आहे; पण खंदकाच्या दोन्ही बाजूंस जमिनीचे उंच बंधारे दृष्टीस पडले. या किल्ल्यांत राजवाडा होता तेथें राजवाड्याचा प्रचंड चवथारा व तितक्याच प्रचंड भिंती दृष्टीस पडल्या; त्यावरून वाड्याचा विस्तार याची चांगली कल्पना मनांत येते. पण जिकडे तिकडे कोरलेले खांब, नक्षीदार घडलेले दगड, उत्तम घडलेल्या पायऱ्या व कठड्याचे दगड जागोजाग दिसत होते व त्यावरून राजवाड्याच्या शिल्पकामाची कांहींशी कल्पना मनांत येत होती; येथे एक मोठें स्नानगृह किंवा जलमंदिर आहे. हा राजवाडा व किल्ला यांच्या तटबंदींतून बाहेर आलें कीं जुन्या शहरास सुरवात होते. प्रथमच एकावर एक वरचढ अशा विलक्षण व आश्चर्यकारक इमारती दृष्टीस पडतात. या बांधकलेच्या आगराचें जणूं कांहीं पूर्व प्रसाद-चिन्ह असें लहानसें शिव-देवालय लागतें. या देवालयाचें काम हिंदू पद्धतीचे असून फार सुबक आहे. या गाभाऱ्यांत सध्यां शिवाची पिंडी नाहीं; पण समोर नंदी आहे यावरून हे शिव-देवालय आहे हें कळून येतें. या देवालयावरून पुढे गेलें कीं प्रथम विटांची प्रचंड इमारत आपले लक्ष वेधते. हिला थूपाराम विहार म्हणतात. केवढी प्रचंड इमारत ही! तिच्या भिंती तर विलक्षण रुंद! आंत बुद्धाची विटांची इमारतीला शोभेशी भव्य मूर्ति! इमारतीला साजेसा प्रशस्त जिना! या इमारतीचा प्रमाणशीरपणा व एकंदर बांधणी पूर्वकाळच्या बांधकलेच्या प्रगतीची उत्तम साक्ष पटवितात. जिन्यावरून वर गच्चीवर गेलें म्हणजे सभोवारचा हिरवागार देखावा व जागोजाग इमारतीचे व स्तूपांचे उंच मनोर दृष्टीस पडतात व या राजधानीच्या पूर्ववैभवाचें व विस्ताराचं मोठें आश्चर्य वाटतें. थूपाराम विहारानजीक निसंक लतामंडप नांवाचा मंडप लागतो. हा अष्टदल कमळाच्या आकाराचा, दगडी खांबाचा व दगडी कठड्याचा सुंदर मंडप आहे. या कठड्याचें काम सांची येथील कठड्याच्या कामापेक्षां साधें पण सुबक आहे. मंडपांत प्रवेश केला म्हणजे या बांधकलेच्या कामाचा मनावर फारच अनुकूल परिणाम होतो. याचेजवळ सत्तावीस फूट लांब, चार फूट रुंद व दोन फूट उंच असा मोठा दगडी फलक आहे व त्यावर मोठा शिलालेख खोदलेला आहे. पुढे हेतदागे नांवाची बुद्धाचे अवशेष ठेवण्याची इमारत आहे. ही इमारत बरीच पडलेली आहे; पण अवशेषावरूनही तिचें शिल्पकाम उच्च दर्जाचं आहे हें समजतें. याचे बाजूस सातमहाल नांवाची एक विलक्षण इमारत आहे. हिचे नावांप्रमाणें सात मजले असावे; पण सध्यां साहा मजलेच आहेत. या इमारतीच्या आंत मुळीं जातांच येत नाहीं. हिचा शंकूसारखा निमुळता आकार आहे. या इमारतीचा काय व कसा उपयोग करीत किंवा ती बांधण्याचा काय उद्देश हे एक मोठें गूढ आहे. या ठिकाणच्या इमारतीचा मुकुटमणी म्हणजे वतदागे नांवाची इमारत होय यांत शंका नाहीं. वर्तुलाकार बुद्धावशेष गृह असा या नांवाचा अर्थ आहे. नांवाप्रमाणें हें बांधकलाकाम वर्तुलाकार आहे. त्याचे एकावर एक चढते वर्तुलाकार असे प्रदक्षिणा मार्ग आहेत. पहिला वर्तुलाकार प्राकार छातीभर उंच असून त्याला उत्तरेस एकच प्रवेशद्वार आहे; मध्ये प्रदक्षिणेकरतां वाटोळा मार्ग आहे. याचे पुढचा प्राकार फारच कलाकौशल्याचा आहे. त्याला बरोबर चार दिशेला चार प्रवेशद्वारें असून, त्या प्रवेशद्वारांतून आंत जाण्याकरितां कठड्याच्या दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्या व

लंकेतील जुन्या इमारतीच्या प्रवेशद्वारांत ही अर्धचन्द्राकृती पायरी असावयाचीच! पोलनरुवा येथील या पायऱ्यांची सर दुसऱ्या कोणत्याही पायऱ्यांना यावयाची नाहीं हे खास. काय नवलाची या पायरीची योजना! या दगडी अर्धचन्द्राकार पायरीच्या बाहेरच्या कोरीवर फुलांची सुंदर माळ कोरलेली असते; मग त्याचे आंत हंसपंक्ति; नंतर हत्तीचा तांडा व शेवटीं दौड करणाऱ्या घोड्यांची रांग कोरलेली असते. किती हुबेहुब हीं कोरलेलीं चित्रे असतात; अर्धचन्द्राकृती पायरीच्या मधल्या भागांत सुंदर कमल कोरलेलें असतें. अशा चार अर्धचन्द्राकृती पायऱ्या चार प्रवेशद्वाराच्या प्रारंभीं आहेत. पायऱ्यांच्या कठड्याच्या पारंभीं द्वारपालांच्या मूर्ति खोदलेल्या आहेत. सर्व भिंतीवर सिंह व खुज्या माणसांची चित्रे आहेत. या इमारतीची शेवटची भिंत विटांची आहे. चार प्रवेशद्वारासमोर बुद्धाच्या बैठ्या ध्यानस्थ मूर्ति आहेत! सर्व इमारतीच्या मध्यबिंदूचे ठिकाणीं पूर्वी एक स्तूप होता. पण तो आतां कोसळून त्याच्या विटांचा ढिगारा मात्र राहिला आहे. या बांधकलेच्या कामाबद्दल एका युरोपीयनानें खालील उद्गार काढिले आहेत.
"In the present writer's opinion the Watdage is the most beautiful ancient building in Ceylon. It stands upon a paved platform approached by four entrances each with its balustrades and "moon-stones." The centre part is circular with a dado of carved stone slabs and four entrances to correspond to those on the lower platform. At the head of each flight of steps sits a smiling Budha, one facing each point of the compass. It is impossible to convey in cold words the beauty of this great work. It can only be felt by those who have stood on the sunny pavement. The poorest imagination must respond to this exquisite creation of a brain and heart long since passed away, the embodiment of a spirit that once lived and rejoiced and sorrowed here."
या इमारतींच्या नंतर जवळ जवळ एक मैल चालत गेल्यावर रणकोटविहार नांवाचा मोठा दागबा किंवा स्तूप आपली दृष्टि वेधतो. या स्तूपाचें काम विटांचें आहे. आतां विटांचा गिलावा बहुतेक पडला असून विटांच्या भेगांतून गवत व झुडपें वाढत चालली आहेत.
हा दागबा पाहून पुढे गेलें म्हणजे बुद्धसिंह प्रासाद नांवाची इमारत लागते. नंतर लंकातिलक अथवा जेतवाराम विहार नांवाचा दागबा लागतो. याचें अवशिष्ट काम सुद्धां मनुष्याचें मन थक्क करून सोडणारें आहे. प्रारंभीच एखाद्या युरोपांतील प्रार्थनामंदिराप्रमाणें लांबच लांब पायऱ्या लागतात व अष्टपैलू उंच प्रचंड खांबावर उभारलेली भव्य कमान लागते. आंत बुद्धाची चाळीस फूट उंचीची भव्य मूर्ति दृष्टीस पडते. या दागबाचा प्रमाणशीरपणा व भव्यता आश्चर्यकारक आहे यांत शंका नाहीं. हा दागबा वातदागेच्या तोडीचा आहे. त्यांतील तरतमभाव शोधून काढणे कठीण आहे. नंतर किरीविहार नांवाचा छोटा दागबा लागतो. जरा पुढे गेल्यावर एक खडकांतील खोदलेलें गोलविहार नांवाचें देऊळ लागतें. खडकांत खोदलेली बुद्धाची बैठी ध्यानस्थ मूर्ति आहे. ती नेहमीच्याप्रमाणें आहे, पण या देवळाला लागून असलेल्या लांबच लांब खडकांत बुद्धाची निर्वाण स्थितींतील निजलेली भव्य मूर्ति आहे व त्याचे डाव्या बाजूस बुद्धाचा आवडता शिष्य आनंद याची दुःखाश्रुपूर्ण अशी मूर्ति आहे. या दोन मूर्ति व पुलनरुवाच्या विश्रामगृहा नजीकच्या इमारतींतील हातांत पुस्तक असलेली पराक्रमबाहूची मानलेली तिसरी मूर्ति; या तीन मूर्ति भव्यता, गंभीरता, भावनादर्शकता, इत्यादि गुणांमध्यें लंकेतील पहिल्या प्रतीच्या मूर्ति होत असे सर्व कलाभिज्ञांचे मत आहे, या मूर्ति प्रत्यक्ष पाहिल्यावांचून त्या मूर्तीमध्यें दिसून येणारें मूर्तिकलाकौशल्य याची खरी कल्पना येणें शक्य नाहीं. गोलविहार हें पोलनरुवाचें उत्तर दिशेचें या रस्त्यानें पाहतां येणारें शेवटचें प्रेक्षणीय स्थळ होय. तेथून परत येऊन मुख्य रस्त्याला मिळण्यापूर्वी पुनः उत्तरेकडे एक पाऊलवाट फुटतें; त्या पाऊल वाटेने गेलें म्हणजे प्रथम एक अष्टदल-कमलाकृति पुष्करणी लागते. लंकेसारख्या उष्ण देशामध्यें स्नानाच्या व जलविहाराच्या विशेष सोयी जुन्या राजवटींत केल्या जाव्या हें स्वाभाविक आहे. अशा स्नानगृहांची व पुष्करण्यांची विपुलता लंकेतील पुराणवस्तूंमध्ये दिसून येते. हीं स्नानगृहें व जलविहार मंदिरें या संबंधींची योजकता व कल्पकता अवर्णनीय आहे. हे जागोजाग असलेल्या दगडी स्नानगृहावरून तर दिसून येतेंच; पण लंकेतील अद्वितीय तीन भव्य मूर्तीप्रमाणें लंकेंत तीन अपूर्व अशी स्नानगृहें आहेत. त्यापैकीं पुलनरुवाचें कमलदल स्नानगृह हें एक होय. हे स्नानगृह अष्टपैलू असून प्रत्येक पैलू कमलदलाप्रमाणें घडविलेला आहे. आंत उतरण्यास सभोंवार तशाच कमलदलाकार पायऱ्या आहेत. या स्नानगृहाच्या कलाकुसरीची कल्पना तें पाहिल्याखेरीज येणें शक्य नाहीं. दुसरीं दोन स्नानगृहें मिहिंतले डोंगरावर आहेत. एकाचें नांव नागपुष्करणी होय. हे एक जीवंत खडकांत खोदून तयार केलेलें जीवंत पाण्याचें कुंड आहे. त्याला नागपुष्करणी म्हणण्याचें कारण कुंड खोदतांना खडकाचें वरच्या बाजूस पांच-फडी नागाची सुंदर व हुबेहुब आकृती पुष्करणीवर कोरली आहे. दुसरें सिंह-स्नानगृह नांवाची दगडाची बांधलेली पुष्करणी आहे. त्यांत दगडी नळानें पाणी येण्याची सोय असून, पुष्करणींतून पाण्याची धार सिंहाच्या जबड्यांतून पडते असें दाखविलें आहे. हेंही कोरलेलें सिंहाचें चित्र हुबेहुब आहे व सिंहाच्या जबड्यांतून येणाऱ्या पाण्याच्या धारेखालीं स्नान करण्याची कल्पना व योजना किती नवलाईची आहे.
या कमलदल पुष्करणीचे पुढें गेलें म्हणजे आणखी एक दमालामहासेया नांवाचा थूपाराम व जेतवनाराम विहारांच्या धर्तीवर बांधलेला दागबा दृष्टीस पडतो. हे तीन्ही दागबे एकाच पद्धतीवर बांधलेले आहेत. दक्षिणेकडून उत्तरेकडे जातांना साधारण सारख्या अंतरावरच ते बांधलेले आहेत असें दिसतें. या दागबाचा विशेष म्हणजे तेथल्या भिंतीवरील रंगीत चित्रे होत. तीं सिगिरीया लेण्यांतील चित्राप्रमाणें आहेत. या तीन दागबावरून पुलनरुवा शहराचा विस्तार केवढा होता; व या शहरीं ललितकलांची प्रगती किती पराकाष्ठेची झाली होती हे दिसून येतें.
इतकी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास जवळ जवळ अडीच तास लागले. मग मात्र उशीर झाला म्हणून मी तडक टपाल घरीं आलों. या सर्व वेळ झीमझीम पाऊस पडत होता. शिवाय, तीन चार तास पावसांत फिरलों होतों; खेरीज पोलनरुवा येथें हिवतापाची सांथ सदा असते म्हणून पोष्टमास्तर म्हणाले "तुम्हीं पुनः दृश्यदर्शनास निघू नका; पांच वाजल्यानंतर मी परत येईन व मग आपण सरकारी विश्रामगृहाकडे जाऊन तोपा तलाव पाहूं व पोलनरुवाचीं चित्रकार्डे विकत घेऊं व मी तुम्हांला अर्वाचीन काळचें एक बुद्ध देऊळ दाखवीन; उदईक सकाळी आपण पुढील मुक्कामास त्रिंकोमालीस मोटारनें जा." हा सल्ला मला पसंत पडला. म्हणून रा. हँडी बंगल्यावर परत येईपर्यंत मी बंगल्यांत बसून राहिलों व लंकेचीं मार्गदर्शक पुस्तकें चाळलीं. सायंकाळीं रा. हँडी हे परत आल्यावर त्यांचेबरोबर विश्रामगृहाला गेलों. हें विश्रामगृह मुख्य रस्त्याच्या उजव्या हातास जरा उंचवट्याच्या जागेवर बांधलेलें असून तोपावेवा तलावाच्या अगदीं काठांवर आहे. या विश्रामगृहाच्या व्हरांड्यांतून तोपा तलावाचा अवर्णनीय देखावा दिसतो यांत शंका नाहीं. केवढा विस्तीर्ण तो तलाव! तो थेट उत्तरेच्या डोंगरापर्यंत पसरलेला आहे असें भासतें. सभोवार दाट झाडांची गर्द छाया दिसते; ह्यायोगें पाणी काळसर हिरवट दिसतें. विश्रामगृहाचें पुढें खडक असल्यामुळे तलावाच्या मंद मंद लाटा खडकावर आपटत होत्या; या विश्रामगृहाची उपस्थिति व तेथून तलावाचा दिसणारा देखावा कितीही वेळ पाहिला तरी मनाचें समाधान होत नाहीं; पाऊस पडत असल्यामुळे व सायंकाळ होत चालल्यामुळे तलावाच्या बंधाऱ्याच्या पाऊल वाटेकडे आम्ही गेलों नाहीं. पोलनरुवाची दहाबारा चित्रकार्डे विकत घेऊन आम्हीं परत फिरलों; मग बुद्धधर्मी अर्वाचीन देऊळ पहाण्याकरितां गावांत गेलों. लंकेमध्यें बौद्धधर्म हा जीवंत व लोकांचा चालू धर्म असल्यामुळें बुद्धधर्मी नवीं देवळें बांधण्यांत येतात अशा देवळापैकीं हे देऊळ होतें; देऊळ फार मोठं नव्हतें. पुढें छोटेसें प्रवचनमंदिर होतें; देवळांत बुद्धाची बैठी ध्यानस्थ मूर्ति होती व त्याचे पुढे रुंद कठडा होता. या कठड्यावर बुद्धधर्मी लोक बुद्धाला अर्पण करावयाचीं फुलें ठेवतात. देवळाच्या सर्व भिंती व छताची तक्तपोशी या रंगविलेल्या असून त्यावर गौतम- बुद्धाच्या चरित्रांतील प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली होती; तसेंच कांहीं सृष्टिसौंदर्याचे देखावेही काढलेले होते. चित्रे बऱ्याच वरच्या दर्जाचीं होतीं. पण या देवळाचा आश्चर्यकारक विशेष म्हणजे देवळांच्या प्रदक्षिणामार्गाच्या आंतल्या भिंतीवर विजयापासून (म्हणजे ख्रिस्तपूर्व ३८३ पासून) कँडीच्या शेवटच्या विक्रमसिंह राजापर्यंत (इसवी सन १८१५) सर्व राजांचीं तैलचित्रें काढलीं असून त्याचे खालीं संगमरवरी दगडावर त्या राजांचीं नांवें व कारकीर्दीचे सन देणारे शिलालेख इंग्रजी व सिंहली भाषेत कोरलेले आहेत. हा या देवळाचा विशेष पाहून मला ब्रिटिश पार्लमेंटगृहांतील राजांच्या चित्रांची आठवण झाली. तीं चित्रे पाहून ज्याप्रमाणें लहान मुलांस लहानपणीं इंग्लंडचा इतिहास सहज समजण्याची सोय केलेली आहे तशी येथे लंकेच्या इतिहासासंबंधींची सोय केलेली पाहून मला आनंद व आश्चर्य वाटलें. आम्ही देवळांत शिरलों तेव्हां काळोखच पडला होता; पण माझे जवळ विजेचा दिवा होता म्हणून चित्रे पहाण्यास अडचण पडली नाहीं. नंतर बराच काळोख झाला म्हणून आम्ही तडक बंगल्यावर आलो. प्रातःकालीं रा. हँडी यांचा निरोप घेऊन मी मार्गस्थ झालों. झालें! पोलनरुवाचें माझें दृश्यदर्शन येथे संपलें. खरोखरीं या जुन्या राजधान्या सावकाशपणें पहाणें आवश्यक आहे. पण असें करण्यास लागणारा वेळ व पैसा कोठून आणणार? म्हणून मला आंथरूण पाहून पाय पसरावे लागले.
दुसरी जुनी राजधानी अनुराद्धपुर तिला मी त्रिंकोमालीहून मोटर मधून गेलों. तेव्हां त्या प्रवासवर्णनाकडे आतां वळणें बरें.
त्रिंकोमालीपासून अनुराद्धपुर ६७ मैल दूर आहे. सकाळी साडेसात वाजतां निघून सवा दहा वाजतां मी अनुराद्धपुरास पोहोंचलों. सर्व रस्ता डामरी व निर्धुळ होता. त्रिंकोमाली नजीकचें स्टेशन चायनाबे टाकलें तो लागलीच दाट व उंच अरण्यच अरण्य लागलें. शहरानजीक इतका दाट जंगलाचा मुलुख हिंदुस्थानांत फारच क्वचित् दृष्टीस पडतो. यामुळे या सडकेनें सारखे भरधाव चाललें असतांना मोठी मौज वाटते. कोठेंही वस्ती किंवा गांव लागत नाहीं; मोटारबस कोठेही थांबत नाहीं. सिनेमांतील देखाव्याप्रमाणें दोन्ही बाजूच्या दाट जंगलांतून सुंदर सरळ व गुळगुळीत सडकेनें आपली मोटारबस सारखी पळत राहते. हा देखावा होरावापोटाना गांवापर्यंत बदलत नाहीं; येथून पुढे मिहिंतले गांवापर्यंत जंगल कमी दाट व कमी उंच होतें; मधून मधून भाताची हिरवीगार शेतें दृष्टीस पडतात; लंकेचे विशेष नारळी केळी पोफळी यांच्या बागाही लागू लागतात व खेडीं व त्यांतील घरें डोकावतात; तसेंच मधून मधून तलावही लागतात. मिहिंतलेच्या नजीक तर फारच मोठें सरोवर लागतें. मग पुढील आठ मैलामध्यें तर भातशेती व बागाईत हीं सर्वत्र दिसूं लागतात. आपण पुष्कळ लोकवस्तीच्या पुष्कळ लागवडीच्या सुधारलेल्या भागांत आलों असें दिसून येतें तोंच अनुराद्धपुर शहराचा मुख्य रस्ता लागतो. या मुख्य रस्त्यावरच सेंट्रल हॉटेल नांवाचें हॉटेल लागतें. तेथें मीं उतरतों तों सवा दहा वाजले.
पोलनरुवा ही अनुराद्धपुरानंतर हजार वर्षांनीं झालेली लंकेची राजधानी होय; तर अनुराद्धपुर ही फार पुरातनकाळची राजधानी होय. पण या दोन राजधान्यामध्यें सध्यां किती जमीन-अस्मानाचें अंतर वाटतें.

येथें निरनिराळ्या सरकारी खात्याच्या कचेऱ्या आहेत; येथे मोठी बाजारपेठ आहे; येथें पुष्कळ खांसगी बंगले व घरें आहेत; येथे खासगी हॉटेलें आहेत. अर्थात् पोलनरुवाप्रमाणें हें पडकें जुन्या इमारतीचें अवशेष असलेलें "गडप झालेलें शहर" वाटत नाहीं; तर पुनरुज्जीवित गजबजलेलें व रस्त्याच्या दोन्ही बाजूस मधून मधून जुन्या इमारती अंसलेलें लोकवस्तीचें चालू शहर वाटते. येथें नारळी पोफळी केळीच्या स्वतंत्र बागा व बंगल्याभोंवतींच्या बागा व फळझाडें जिकडे तिकडे दृष्टीस पडतात.
सामान खोलींत टाकून चहा घेऊन मी लागलीच दृश्यदर्शनास बाहेर पडलों.
"ब्रेझन पॅलेस" किंवा जुनें नांव लोहप्रासाद हा मुख्य रस्त्याला लागून सेंट्रल हॉटेलनजीक आहे. आतां या प्रासादाचे तळमजल्याचे बिन घडलेले एकसंधी खांबच शिल्लक आहेत; पण हे खांब सहज न मोजतां येण्याइतके आहेत; खांबाचें हें एक रानच आहे असें वाटतें. हा पूर्वकाळी मोठा नऊ मजली बुद्ध भिक्षूंना राहण्यास बांधलेला मोठा प्रचंड विहार होता. या विहाराच्या प्रचंडतेची कल्पना हल्लीं उभ्या असलेल्या खांबांच्या रानावरून सुद्धां येते यांत शंका नाहीं; सध्यां या खांबानीं व्याप्त जागेच्यामध्यें लहानशी कुडलेली निवाऱ्याची व राहण्यासारखी जागा बांधण्यांत आली आहे व त्यांत दोन चार बुद्ध भिक्षू राहतात. मुख्य रस्त्याला आडवा रस्ता लागतो. त्या रस्त्यानें डावीकडे गेलें म्हणजे अनुराद्धपुराला पवित्र यात्रास्थानाचा मान मिळवून देणारें पिंपळवृक्षाचें देवालय लागतें. लंकेंत बौद्धधर्माचा फैलाव झाला, त्याकाळीं अशोकाच्या सुमित्ता नांवाच्या मुलीनें हिंदुस्थानांत ज्या पिंपळवृक्षाखालीं गौतमबुद्धाला धर्मज्ञान झालें, त्या पिंपळाची एक खांदी लंकेत आणली व ती देवानांपियतिस्स राजानें या ठिकाणीं लावली व त्याचा वृक्ष झाला. तोच वृक्ष अजून जीवंत असून त्याचें दर्शन घेण्याकरितां हजारों बौद्धधर्मी यात्रेकरू अनुराद्धपुरास येतात. जगांतील हा सर्वांत जुना जीवंत वृक्ष होय असें समजतात. या वृक्षदेवालयाचे मोठे आवार आहे. सभोवार विटांची भिंत असून प्रवेशद्वार उंच व भव्य आहे. प्रवेशद्वाराजवळ बूट टोपी काढून आंत प्रवेश केला, तों पिंपळाचे पारच पार सर्व आवारांत दिसून आले. मूळच्या पवित्र पिंपळाच्या झाडासभोवती तर पारावर पार असा तिहेरी पार आहे व त्याला उजव्या बाजूनें वर जाण्यास पायऱ्या केलेल्या आहेत. पहिल्या पाराच्या चवथऱ्यावर समोरच गणपतीची मूर्ति पाहून मला आश्चर्य व आनंद वाटला. ही गणपतीची मूर्ति इलाला नांवाच्या लंकेच्या तामिळ राजानें तेथें बसविली, तेव्हांपासून ती तेथेंच आहे. पुढील बौद्ध राजांनीं ती काढून टाकली नाहीं. लंकेमध्यें हिंदुधर्मी व बौद्धधर्मी लोकांमध्ये इतकी सहिष्णुता व सलोखा पाहून मला त्या लोकांचे मोठं कौतुक वाटलें. गणपतीचे दर्शन घेऊन मी पायऱ्यांनी पहिल्या पारावर गेलों; प्रत्येक पारावर प्रदक्षिणेपुरती वाट आहे; असे आणखी दोन पार लागतात; तेव्हां पिंपळवृक्षाच्या शेवटच्या पाराचे बंद केलेले फाटक लागतें; हा जुना पिंपळवृक्ष फार मोठा नाहीं; सध्यां त्याच्या दोन फांद्या स्वतंत्र वृक्षाप्रमाणे वाढलेल्या आहेत; आडव्या वाढलेल्या वृक्षाच्या फांद्यांना पितळेच्या खांबाचा आधार किंवा धिरा दिलेला आहे. या पिंपळाची गळलेली किंवा जून पानें बौद्धधर्मी लोक पवित्र म्हणून घरी घेऊन जातात! मी सुद्धां एक पान घेऊन खिशांत घातलें व कांहीं दिवस तें माझ्या ट्रंकेत होतें. या पिंपळाचे पारानजीक बुद्धाची मूर्ति असलेलें एक सभामंडपवजा देऊळ आहे. तेथें बुद्धाची नेहेमीची बैठी ध्यानस्थ मूर्ति असून त्याला फुलें अर्पण करण्यास एक लांकडाचा रुंद कठडा मूर्तीच्या गाभाऱ्यापुढे आहे. त्यांवर नाना रंगाचीं व नाना जातीचीं फुलेंच फुलें दिसली. मागें उल्लेख केल्यानुमाणे त्या आवारांत किती तरी पिंपळाचे वृक्ष असून त्या प्रत्येकाला लहानमोठा दगडी पार बांधलेला आहे. अर्थात् हे सर्व पिंपळ वृक्ष मूळ वृक्षाच्या फांद्या, पारंब्या यापासून झालेले आहेत. ज्याप्रमाणें कँडी शहरामध्यें बुद्धाचें दंत देवालय हें मुख्य यात्रास्थान होय, त्याप्रमाणें अनुराद्धपुरामध्यें हा पिंपळाचा पार हें पवित्र यात्रास्थान होय. या पिंपळवृक्षाच्या देवळावरून 'पवित्र सडक' नांवाची आडवी सडक लांबवर जाते व या सडकेच्या दोन्ही बाजूस जुन्या इमारती व देवळें यांचे अवशेष दृष्टीस पडतात. ही पूर्वी मोठी मेघवन नांवाची बाग होती; अझून ही जागा मोकळीच असून, त्यांत उंच उंच जुनाट वृक्ष पुष्कळ आहेत. पवित्र सडकेनें जरासें पुढें गेलें म्हणजे रुवनेवली दागबा नांवाचा अनुराद्धपुरांतला सर्वांत जुना स्तूप यांचें आवार व फाटक लागतें. या आवारांतील नीटनेटक्या पाऊलवाटेनें आंत गेलें की उजव्या हातास बुद्ध भिक्षूंना राहण्याच्या अर्वाचीन इमारती लागतात व समोर स्तूपाचें जोतें व पायऱ्या लागतात. याचे उजव्या हातास एक बौद्धधर्मी मंडळाच्या कचेरीची छोटी इमारत लागते. बूट टोपी येथेंच काढून ठेवावी लागते. पायऱ्या चढून वर गेलें कीं, समोरच छोटेसें देऊळ लागतें, त्यांत बुद्धाची मूर्ति आहे. डाव्या हातास सोप्यावजा इमारत आहे. त्यांत पांचसहा उभ्या मूर्ति बसविलेल्या आहेत; पायऱ्याच्या दोन्ही बाजूस राजा-राणी यांच्या मूर्ति आहेत. पण या सर्व नव्याच मूर्ति असाव्यांत असें वाटतें. कारण हा दागबा पुष्कळ वेळा पडून पुनः पुनः बांधण्यांत आलेला आहे. सध्यांसुद्धां छोट्या देवळाच्या मागच्या प्रचंड स्तूपाचें बांधकाम नवेंच चालू असून तें बहुतेक पुरें होत आलें आहे. या स्तूपाच्या मुख्य घुमटाचें व त्याच्यावरील चवथऱ्याचे काम संपले असून फक्त चवथऱ्यावरचा मनोरा व छत्री फक्त व्हावयाची राहिली होती; पण केवढे प्रचंड हें बांधकाम आहे. त्या घुमटाच्या सभोंवार कितीतरी फरसबंदी खुली जागा आहे. यामुळे या स्तूपाची भव्यता वाढते यांत शंका नाहीं. या स्तूपाचें काम चालू असल्यामुळें घुमटाचे वर जाण्यास तात्पुरत्या शिड्या व जिने केलेले होते; त्यानीं आम्हीं वर गेलों. दहावीस जिने व शिड्या चढाव्या लागल्या असतील; जसजसे वर चढत जावें तसतसा सभोंवारचा अधिक अधिक मनोवेधक देखावा दिसूं लागे. वरच्या चवथऱ्यावर चढल्यावर तर फारच दूरवरचा हिरवा हिरवागार देखावा दिसत होता. हा सर्व भूमिभाग अगदीं सपाट असून त्यावर दाट जंगल आहे; मधून मधून पांढऱ्या पाण्याचे तलाव व पाट दृष्टीस पडत होते. यांवरून पूर्वीच्या राजवटीमध्ये हा सर्व प्रांत पूर्ण लागवडीस आणलेला व दाट वस्तीचा असावा असें वाटल्यांवाचून रहात नाहीं. या उंच चवथऱ्यावरून अनुराद्धपुराचा पूर्वीचा विस्तार केवढा मोठा होता हे स्पष्टपणे कळलें. तेथून तीन मोठे स्तूप व दोन लहान स्तूप असे पांच स्तूप दिसतात. राजवाडे, विहार, चैत्य व खासगी घरें यांचे अवशेष तर जिकडे तिकडे पिसकारलेले दृष्टीस पडतात. अभयगिरी व जेतावराम दागबा हे थेट पुलनरुवा येथील दागबासारखेच दिसत होते; त्यावर हिरवेगार गवत व झाडेझुडपें उगवलेली दिसत होतीं. या शहरांत बसवकूल, तिसावेवा, न्यूवारावेवा असे तीन तलाव आहेत; शिवाय लहान लहान तलाव व पुष्करणी व स्नानगृहें तर किती तरी आहेत. ज्याप्रमाणें अर्वाचीनकाळीं पाश्चिमात्य देशांतील शहराच्या एखाद्या टॉवरच्या माथ्यावर गेले म्हणजे एकसमयावच्छेदेंकरून शहराची शोभा पाहण्यास सांपडते त्याप्रमाणें या दागबावर चढून जाण्याची सध्यां सोय असल्यामुळें अनुराद्धपूर शहर व त्याची नवी वस्ती व जुने अवशेष हे सर्व एकसमयावच्छेदेंकरून पाहण्यास सापडलें. या स्तूपाचें काम प्रचंड आहे. वरच्या चवथऱ्यावरून खालीं पाहिलें म्हणजे माणसें बाहुल्याप्रमाणें दिसतात; इतकें तें शिखर उंच आहे. या बांधत असलेल्या स्तूपावरून पूर्वीचे स्तूप कसें बांधीत असतील याची उत्तम कल्पना आली. भाविकपणानें किती तरी बौद्ध लोकांनीं डागडागिने व इतर मौल्यवान् वस्तू या स्तूपाचे बांधकामामध्ये टाकण्यास दिल्या असें मला कळलें. यावरून बुद्ध धर्माच्या जीवंतपणाची मला साक्ष पटली. खाली उतरून या रस्त्यानें पुढें गेलें म्हणजे उजवे बाजूस मोठें महा मेघवन नांवाचें उपवन लागतें. त्यांत कितीतरी विहार, स्नानगृहें व दागबा यांचे अवशेष लागतात. त्याचें बऱ्याच उजव्या हाताला अभयगिरी दागबा लागतो. हा रुवनवेली सारखाच प्रचंड दागवा आहे. पण तो हल्ली बराच जीर्ण झालेला आहे. विटांवरील गिलावा जाऊन त्यावर गवत व झाडझाडोरा वाढला आहे. जरा पुढें गेलें कीं डाव्या बाजूस थूपाराम हा छोटा सुबक, सुंदर व सलग असलेला दागबा लागतो. आणखी सुमारें अर्धा पाऊण मैल चालल्यावर उजव्या बाजूस लंकाराम हा छोटा व जेतवानराम हा प्रचंड दागबा लागतो व इतर इमारतीचे अवशेष लागतात. अनुराद्धपुरचीं प्रख्यात पुरातन देवळें मुख्यतः याच पवित्र सडकेच्या बाजूला आहेत; बाकी अनुराद्धपुर हें त्याच्या वैभव काळीं लंडन शहरासारखें फारच विस्तीर्ण शहर असल्यामुळे दहावीस मैलांच्या घेरांत इमारतीचे पडके अवशेष- कोरलेले खांब, मोडक्या मूर्ति, घडलेले दगड, खांबाच्या वरची व खालची उथळी, अर्धचन्द्राकार पायऱ्या, जाळीदार खिडक्या- इत्यादि नाना खोदकलेचीं कामें दृष्टीस पडतात. बाहेरील वाटोळी सडक नांवाच्या सडकेनें मोटारींतून गेलें म्हणजे या अवशेषाचे धावतें दर्शन होतें व अनुराद्धपुराच्या पूर्ववैभवाचें व विस्ताराचें आश्चर्य वाटते. या शहरामधील तीन मोठमोठे तलाव फार प्रेक्षणीय आहेत. स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यानें गेलें म्हणजे अनुराद्धपुरच्या पाण्याच्या विपुलतेचा व विलक्षण लागवडीचा प्रत्यय येतो. आधीं सतत वाहणाऱ्या मलवातु ओया नांवाच्या नदीचा सुंदर पूल लागतो; मग धोधो वाहणारे पाट लागतात व सभोवारच्या सपाट प्रदेशामध्यें भाताची हिरवी हिरवीगार शेतेंच शेतें व केळी, नारळी व पोफळी यांच्या बागाच बागा लागतात. त्यावरून त्या प्रांताच्या सुपीकतेबद्दल व पूर्वीच्या राजवटीत केलेल्या पाणीपुरावठ्याच्या सोयीबद्दल आश्चर्य व आनंद वाटतो. या वाटेने जातांना व शहरांतील मुख्य रस्त्यांच्या बाजूला किती तरी लहान लहान तलाव व स्नानगृहें लागतात. उष्ण देशांत थंड पाण्याच्या स्नानासारखी सुखकारक गोष्ट नाहीं हें जाणून पूर्वीच्या काळीं सुंदर स्नानगृहें व पुष्करणी बांधण्याचा फार प्रघात होता असें पदोपदीं दिसून येतें. खरोखरी अनुराद्धपुरासारखी शतकेच्या शतकें असलेली वैभवसंपन्न राजाची राजधानी पहाण्यास आठवडेच्या आठवडे घालविले तरी पुरे पडणार नाहींत. मग एक दोन दिवसांत शहर कितीसें पाहून होणार; पण सकाळ संध्याकाळ तीन तीन तास चालून मला जितके पाहतां आलें तितकें मीं तें शहर पाहिलें. त्यावरून त्या जुन्या राजधानीच्या पूर्व वैभवाची त्यांतील बांधकला, खोदकला व मूर्तिकला या ललितकलांच्या मासल्याची व एकंदर पूर्वकाळच्या सुधारणेची उत्तम कल्पना मला आली यांत शंका नाहीं. या शहरांतील प्रेक्षणीय स्थळांचें वर्णन कितीही केलें तरी तीं स्थळें संपावयाचीं नाहींत तेव्हां झालें वर्णन तेवढ्यांत समाधान मानून पुढच्या मिहिंतले पर्वताचें वर्णनास लागणें बरें.
महेन्द्र पर्वत अथवा हल्लीचें नांव मिहिंतले हे स्थळ त्रिंकोमालीच्या रस्त्यावर अनुराद्धपुरापासून आठ मैलांवर आहे. प्रथम मी या रस्त्यानें अनुराद्धपुरांत आलों त्यावेळींच या गर्द झाडीनें शोभायमान झालेल्या पर्वतराजीचें दुरून दर्शन घडलें होतें. पण पर्वतावर चढून तेथली प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास मी मोटारीने गेलों. हें माझें दृश्यदर्शन सिगिरीया दर्शनाप्रमाणे एकाकीं व घाईघाईनें झालें नाहीं; तर मित्र- मंडळींच्या मेळ्यानें झालें. यामुळे दृश्यदर्शनाचा आनंद द्विगुणीत झाला.
मी त्रिंकोमालीहून अनुराद्धपुरच्या रा. विक्रमरत्न नांवाच्या एक्साईस इन्स्पेक्टरला रा. बालसिंघम जवळून परिचयपत्र घेतलें होतें. अनुराद्धपुरला पोहोंचल्याबरोबर व हॉटेलमध्ये उतरल्याबरोबर मी तें पत्र त्या गृहस्थांकडे पाठवून दिलें. पत्र मिळाल्यावर ते गृहस्थ मला येऊन भेटले व त्यांनी "मिहिंतलेला जाण्याकरितां दुसरे दिवशीं सकाळीं आठ वाजतां मी मोटार घेऊन येतों" असें सांगितलें. त्याप्रमाणें दुसरे दिवशी सकाळीं न्याहारी करून मी तयार होतों तोंच विक्रमरत्न आपली बायकामंडळी व मित्रमंडळी यासकट दोन मोटारी घेऊन आले. मग आम्ही लागलीच मिहिंतले पर्वतास जाण्यास निघालों. त्रिंकोमालीरस्त्यानें आठ मैल मोठ्या बागेमधून आपण चाललों आहोंत असें वाटतें; आठव्या मैलाशीं मिहिंतले पर्वताकडे जाणारा रस्ता उजव्या बाजूस फुटतो. गांवांतून पलीकडे गेलें म्हणजे दाट व उंच उंच वृक्षांचें उपवन लागतें व मोटार थेट पर्वताचे पायथ्याच्या पायऱ्याशीं जाते.
मिहिंतले पर्वत हा सिगिरिया किंवा दांबूल यासारखी एकाकी चारपांचशें फुटच उंचीची निर्वृक्ष खडकाची टेकडी नाहीं; तर ही एक बरीच लांब पर्वतराजी आहे; तिची उंची हजार बाराशे फुटांचे वर असून तिच्यावर खूप गर्द असें रान आहे.
या पर्वतराजीचे एका शिखरावर बुद्धधर्मी पुष्कळ देवळें व स्मारकें आहेत. दंतकथात्मक प्रकरणांत उल्लेख केला आहे की पर्वतावर देवानांपियतिस्स राजा शिकार करीत असतां या पर्वत शिखरावर अशोकाचा मुलगा महेन्द्र हिंदुस्थानांतून आकाशमार्गे उतरला व त्यानें राजास बौद्धधर्माचा उपदेश केला. तेव्हांपासून हा पर्वत पवित्र बनला व तेथें देवळें व विहार बांधण्यांत आले. व पर्वतावर यात्रेकरूंना सुखानें चढतां यावें म्हणून अठराशें दगडी पायऱ्या बांधण्यांत आल्या. आम्हीं मोटारींतून उतरलों व लागलीच त्या प्रशस्त पायऱ्या चढूं लागलों. केवढ्या रुंदच रुंद त्या पांढऱ्या दगडाच्या पायऱ्या व सभोवार ती हिरव्यागार वृक्षाची गर्द राई! हा देखावा मोठा चित्ताकर्षक वाटला. आम्ही सारख्या पायऱ्या चढत होतों; पण पायऱ्या संपतात कसच्या! या अनंत पायऱ्या जणूं कांहीं स्वर्गद्वारापर्यंत पोहोंचल्या आहेत असा भास होतो. चढतांना विसांवा घेण्याकरितां मधून मधून सपाट फरसबंदी रुंद असे टप्पे ठेवलेले आहेत. त्यामुळें त्या त्या टप्यावर आलें कीं, साहजिक थांबावयास सांपडे व आल्या मार्गाचें व सभोवारच्या देखाव्याचें सिंहावलोकन करावयास सांपडे. पुढे बांधलेल्या पायऱ्या सरून खडकांतून खोदलेल्या अरुंद पायऱ्या लागतात. या चढण्यास बरेच श्रम व त्रास पडतो. कारण, यावर सबंद पायही रहात नाहीं; इतक्या अरुंद या खोद-पायऱ्या आहेत.
शेवटी एकदां असंख्यप्राय पायऱ्या संपतात व श्रमानें धापा टाकणारा प्रवाशी एकदांचा बऱ्याच मोठ्या सपाट प्रदेशावर येतो. येथें नारळाच्या सुंदर झाडांची राई प्रवाशाचें मन प्रसन्न करते. त्या शीतल, शांत व गर्दछायेच्या ठिकाणी आल्याबरोबर मोठा पर्वत चढण्याच्या श्रमाचा परिहार होतो. येथेंच बूट टोपी काढून ठेवावी लागते. मग अंबस्थले नांवाच्या दागबाचें दर्शन घेतां येते. हें अनुराद्धपुर येथील थूपाराम दागबाप्रमाणें छोटेच पण उत्तम स्थितींत असलेलें बुद्धाचें देऊळ आहे. त्याचे सभोवार पूर्वी सभामंडप किंवा प्रदक्षिणामंडप असावा; त्याचे खांबच फक्त उभे असलेले दिसतात; पण देऊळाचा तो नीळसर रंग व सभोवारच्या वृक्षाचा तो हिरवा रंग व पांढरसर तांबूस रंगाच्या खांबाची वाटोळी रांग हा देखावा एकसमयावच्छेदेंकरून पाहिला म्हणजे या बुद्धधर्मी पवित्र स्थळाचा मनावर फार अनुकूल परिणाम होतो असा माझा अनुभव आहे. हा दागबा देवानांपियतिस्स राजाला महिन्द्र ज्या जागेवर भेटला त्या खुद्द जागेवर बांधलेला आहे. या सपाट प्रदेशाच्या जवळच शंभर सवाशें फूट उंचीचा एक खडकाचा सुळकाच्या सुळका आहे. हा मात्र सिगिरीयाप्रमाणें उभाच आहे. यावर जाण्याकरितां खडकांत पायाचा चवडा राहील इतक्या अरुंद पायऱ्या खोदल्या आहेत; व लोखंडी कठडा आधारास केलेला आहे. पण हा लोखंडी कठडा आतां डळमळीत झालेला आहे. यामुळें त्याच्यावर भार टाकतां येत नाहीं. तेव्हां हातपायाच्या आधाराने या उभ्या व बिकट खडकाच्या माथ्यावर जावें लागतें. मध्यें खडकाला केवढी तरी मोठी भेग पडलेली आहे ती वलांडून जातांना फार भय वाटतें. हा चढाव थोडा शंभर फूट उंचीचा आहे खरा; पण तो सिगिरीया किल्याप्रमाणें फार बिकट व भोंवळ आणणारा आहे. पण हा बिकट चढाव चढून एकदांचे आम्हीं त्या खडकाचे माथ्यावर आलों. या पर्वताचें हें सर्वात उंच शिखर होय. येथून सभोवारचा सपाट सुपीक भाताच्या शेतांनीं शोभायमान दिसणारा हिरव्या हिरव्यागार वृक्षांनी व बागांनीं भरलेला प्रदेश फार मनोहर

अनुराद्धपुराप्रमाणे या पर्वतावरही किती तरी जुनीं प्रेक्षणीय स्थळें आहेत. तीं सर्व पहाण्याच्या फंदांत आम्ही पडलों नाहीं. कारण आतां सूर्य बहुतेक डोक्यावर आला व आम्हांला रा. विक्रमरत्न यांचे बंगल्यावर दोन प्रहरच्या फराळास जावयाचें होतें. म्हणून आम्ही परत फिरलों. पहिला टप्पा उतल्यावर आम्हीं जरा बाजूस असलेलीं व मागें वर्णन केलेली सिंहस्नानगृह व नागकुंड हीं पाहून त्या बाजूनें खालीं येण्यास निघालों. कारण तिकडे डोंगर फार खडा नसून त्यावर खूप झाडी होती. यामुळें पाऊलवाट सोपी व सांवलीची होती. त्या पायवाटेनें आम्ही तळाशीं आलों; मग लागलीच मोठ्या प्रमुदित मनानें मोटारींत बसून आम्ही मार्गस्थ झालों. बंगल्यावर परत येतांना तिसावेवा या सुंदर सरोवराच्या बांध वरील हिरव्यागार सडकेनें परत आलों. ही सडक जवळ जवळ एक मैल आहे. या सडकेनें मोटारमधून जातांना फारच मनोहर देखावा दिसतो. डाव्या हातास तो प्रचंड तलाव, हिरव्यागार गवतानें शोभायमान झालेला तो मातीचा बंधारा, मधली ती तांबड्या मातीची सुबक सडक व बंधाऱ्या खालचीं तीं हिरवीं हिरवीगार भाताचीं शेतें व केळी-नारळीच्या बागा हा देखावा फारच मनोवेधक वाटतो यांत शंका नाहीं.
बंगल्यावर परत आल्यावर बोलत चालत आमचा फराळ झाला. रा. विक्रमरत्न यांच्या मित्रमंडळींत तीन चार लोक पुण्या-मुंबईमध्यें शिक्षणाकरितां राहिलेले होते. यामुळे बोलण्यास विषयाचा तोटा नव्हता. दोन प्रहरचा फराळ झाल्यावर मी हॉटेलमध्यें जाऊं लागलों. पण ती मंडळी कसची मला सोडतात? रा. विक्रमरत्न म्हणाले "आतां आपण थोड्या वेळाने चहा घेऊं व मग बाहेरील वाटोळ्या सडकेनें आपण मोटारीनें सहल करीत जाऊं म्हणजे अनुराद्धपुरांतील जुन्या बांधकलेचे अवशेष ओझरते पहातां येतील व मग सायंकाळीं आपण आपल्या हॉटेलांत जा."
माझ्यासारख्या प्रवासप्रिय माणसाला दृश्यदर्शनाचें आमिष पुरें होतें. अर्थात् मी तो सर्व वेळ विक्रमरत्न यांचे बंगल्यांत घालविला. चहापानानंतर आम्हीं पुनः मोटारींत बसून बाहेर पडलों व मग अनुराद्धपूर या जुन्या विस्तीर्ण राजधानीचें व विहार, दागबा राजवाडे वगैरे नानाविध इमारतींच्या अवशेषांचें धांवतें दर्शन घेतलें. शेवटीं रुनवेली दागबाच्या माथ्यावर चढलों व सभोंवारच्या सुंदर देखाव्याचें अवलोकन करून आम्ही खालीं उतरलों तों सायंकाळ झाली. तेव्हां मोटारी सेंट्रल हॉटेल समोर आणण्यांत आल्या. तेथें मी सर्व मंडळीचा निरोप घेतला व मग मोटारींतून खाली उतरलों. रा. विक्रमरत्नांचे त्यांनीं केलेल्या पाहुणचाराबद्दल आभार मानून मी आपल्या खोलींत आलों.
झालें. येथें माझें जुन्या तीन स्थळांचे वर्णन संपलें. दुसरे दिवशीं बाराच्या आगगाडीनें मीं लंकेतील अगदीं उत्तरेकडचें मोठं व जुनें शहर जाफना हें पाहण्याकरितां मार्गस्थ झालों.
ता. २१ डिसेंबर सन १९३३ रोजीं दोन प्रहरच्या एक वाजतांच्या ता. आगगाडीनें मी लंकेच्या उत्तरेकडील मोठे व जुनें शहर जाफना येथें जाण्यास निघालों. अनुराद्धपुरपासून जाफना १२० मैल आहे. जाफनास पोहोंचण्यास साहा तास लागतात. नाताळच्या सवलतीच्या सेकंड क्लासच्या परत तिकिटास सात रुपये पडले.
अनुराद्धपूर हे लंकेच्या मध्यप्रांताचें मुख्य शहर आहे. हा प्रांत अगदी सपाट पण सुपीक आहे. पूर्वकाळीं तो दाट वस्तीचा व उत्तम लागवडीचा प्रांत होता. पण हल्लीं तो बहुतेक अरण्यमय झाला आहे. तुरळक तुरळक भाताची शेतें व नारळीकेळीच्या बागा लागतात; लहान मोठे तलावही लागतात. दीड दोन तासांनी मडवाचीया नांवाचें जंक्शन स्टेशन लागते. येथून एक रेलवे रस्ता वायव्य दिशेनें मानार बेटामधून तलाईमानार या लंकेच्या रेलवेरस्त्याच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत जातो. येथूनच दक्षिण हिंदुस्थानच्या धनुष्कोडी स्टेशनला आगबोटीनें जातां येतें; दुसरा रेलवे रस्ता थेट उत्तरेस जाफना व कंकेसंतुराई या जाफना द्वीपकल्पाच्या उत्तर टोकाच्या शेवटच्या गांवापर्यंत जातो. अर्थात् मडवाचीया हे जंक्शन स्टेशन बरेंच मोठें आहे. आमची गाडी थेट कंकेसंतुराईला जाणारी होती; म्हणून मला येथें गाडी बदलावी लागली नाहीं; दक्षिण हिंदुस्थानाला जाणाऱ्या प्रवाशांना येथें गाडी बदलावी लागते. आमच्या डब्यांत सर्व मंडळी जाफनास जाणारी होती; म्हणून कोणीही येथें उतरलें नाहीं. मडवाचीया स्टेशन टाकलें, म्हणजे जंगलमय भाग कमी होऊन लोकवस्ती व लागवड जास्त प्रमाणांत दिसून येऊं लागली. हा सर्व भाग दक्षिण हिंदुस्थान किंवा आपल्या इकडील अष्टागर या भागासारखा थेट दिसला. आतां तांबडी माती जाऊन रेताड पांढुरक्या मातीचा भूमिभाग लागला. भातशेती जास्त प्रमाणावर दिसून येऊ लागली. नारळी पोफळीच्या बागाही खूब लागूं लागल्या. पालमिरा पाम नांवाच्या नारळीच्या सारख्या झाडांच्या राया दिसूं लागल्या. हीं झाडें शेताच्या बांधावर व माळावर लावलेली दिसत होतीं.
आतां स्टेशनें फार लवकर लवकर येऊ लागली; तसेंच तीं मोठीं नीटनेटकीं व सुंदर दिसत; स्टेशनला लागून चांगलीं सुबक घरें व दुकानें हीं दिसत. यावरून हा भाग फार दाट वस्तीचा असला पाहिजे असें मला वाटलें. किलिनाची व पॅरॅन्थम् हीं मोठीं सुंदर व सुबक स्टेशनें वाटली. पुढें पांढरा पांढरा शुभ्र वालुकामय प्रदेश लागला; व शांत, हिरवट रंगाच्या पाण्याचें खारें सरोवर आलें. हें सरोवर म्हणजे जाफना द्वीपकल्प व लंकाबेट यामधील समुद्राचा चिंचोळा फाटा होय. तो रस्त्याचे दोन्ही बाजूंस दिसूं लागला. व लगेच एलिफंटपास नांवाचा सरोवरावरील बैठा पूल आला. हा पूल माहिम व वांद्रे यामधील खाडीवरील पुलासारखा ठेंगणा बैठा पूल आहे; पण माहिम व वांद्र्यासारखें घाणेरडें खारटण येथें नाहीं. रेलवे-रस्त्याच्या दोन्ही बाजूंस सुंदर तलावाचें शांत व निळसर हिरवट पाणीच पाणी आहे. यामुळें येथें मोठा मनोहर देखावा दिसतो. या पुलावरून गेलें कीं, जाफना किंवा त्याचें संस्कृत नांव नागद्वीप या प्रांतांत आगगाडी येते. दोन तीन स्टेशनें लवकर लवकरच लागतात व मग जाफना स्टेशन येतें. आमची आगगाडी जाफना स्टेशनला सात वाजतां पोहोंचली. त्रिंकोमालीच्या रा. बालसिंघम या माझ्या नव्या मित्रानीं जाफनास असलेल्या आपल्या चुलत्यांना (यांना सरकारनें मुदलीयार ही पदवी दिली आहे.) माझ्याबद्दल आधींच पत्र लिहिलें होतें. त्यामुळें मोटार घेऊन ते गृहस्थ स्टेशनवर मला नेण्यास आले. ते स्टेशनवर भेटल्यामुळे माझी उतरण्याची उत्तम व्यवस्था झाली. त्यांच्या एका नातलगानें आपले घरीं एक छोटेसें देवालय बांधलें होतें. आपले पश्चात् ती सर्व जागा व घर त्यांनीं सार्वजनिक उपयोगाकरितां मुदलीयरांचे स्वाधीन केलें होतें; म्हणून येथें छोटेसें पुस्तकालय व वाचनालय ठेवण्यांत आलें होतें; एका वाङ्मयीन सभेच्या बैठकी येथल्या दिवाणखान्यांत भरत असत; व एक बहुश्रुत स्वामी येथें रहात असत; व ते 'कलानिलय' नांवाचें मासिक तामीळ भाषेंत चालवीत असत. अशा सुशिक्षित समाज जमण्याच्या ठिकाणीं माझी राहण्याची सोय मुदलीयार यांनीं केली. यामुळें जाफनामधील पुष्कळ सुशिक्षित मंडळीच्या सहज गांठी पडल्या. स्वामी महाराजाशी चांगला स्नेह जमला व यामुळे जाफनास माझा निवास एक दोन दिवसांनी वाढला. तेव्हां जाफनाच्या माझ्या निवासाचें व दृश्यदर्शनाचें वर्णन रोजनिशीवार करणेंच बरें. पण विशिष्ट प्रेक्षणीय स्थळांचें वर्णन करण्यापूर्वी जाफना द्वीपकल्पाचें सामान्य स्वरूप सांगणें योग्य होईल.
ज्याप्रमाणें लंकेच्या वायव्य दिशेस मानार हे बेट असून तें हल्लीं आगगाडीच्या पुलानें व मोटार गाडीच्या कॉजवेनें लंकेला जोडलेलें आहे, त्याप्रमाणें जाफना हे लंकेच्या थेट उत्तरेस असलेलें एक बेटच आहे. तें आग्नेय (पूर्व-दक्षिण) टोकाकडे अत्यंत अरुंद- पुरा एक मैलही ती रुंदी नसेल- अशा जमीनीच्या पट्टीनें व एलिफंटपास येथील आगगाडीच्या व मोटार गाडीच्या ठेंगण्या पुलांनीं मुख्य लंका बेटाशी जोडलेलें आहे. म्हणून त्याला द्वीपकल्प म्हणणें प्राप्त आहे; बाकी जाफनाच्या सर्व बाजूंस समुद्र आहे. या द्वीपकल्पाचा आकारही विलक्षण आहे. लंकेच्या ईशान्य (पूर्व उत्तर) टोंकास जोडणारी एक मैलाची अत्यंत चिंचोळी जमीनीची पट्टी रुंदावत जाऊन तिचा जाफना शहराशीं बारा मैल रुंदीचा पट्टा बनतो. म्हणजे हा द्वीपकल्पाचा तुकडा सदऱ्याच्या कळीच्या आकाराचा असून तो मुख्य लंकाबेटाचे डोक्यावर जणूं कांहीं टांचणीनें अडकवून ठेवला आहे. या कळीवजा द्वीपकल्पाच्या पश्चिमेस पांच-सहा लहान मोठी बेटें एकमेकांनजीक आहेत व तीं अर्थात् या जाफना द्वीपकल्पामधेच मोडतात. याच बेटांपैकीं लेडन नांवाच्या लांबट बेटांवर काईट्स म्हणून एक बंदर व शहर आहे; हेंच जाफना द्वीपकल्पाचें खोल व शांत पाण्याचें बंदर होय.
या द्वीपकल्पाचें हवा पाणी व निसर्गस्थिति थेट दक्षिण हिंदुस्थानासारखी आहे. येथील वस्तीही दक्षिण हिंदुस्थानांतील तामीळ लोकांचीच आहे. या द्वीपकल्पाची पूर्वपरंपरा व इतिहास लंकेच्यापेक्षां अगदीं वेगळा व स्वतंत्र आहे. पण या द्वीपकल्पाची पूर्वपीठिका किंवा सद्यःस्थिती. पाहिली म्हणजे असें वाटतें कीं, दक्षिण हिंदुस्थानचा एक लचका काढून निसर्गदेवीनें तो एका बारिक धाग्यानें लंकेला जोडून दिला; म्हणून त्याला लंकेचा एक प्रांत म्हणावयाचा. बाकी येथला निसर्ग- देखावा लंकेच्याहून वेगळा; येथली हवा वेगळी येथलें ऋतुमान वेगळें येथल्या चालीरीती व संस्कृती वेगळी. सारांश, जाफना भौगोलिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या लंकेंत मोडतें खरें; पण तें एक वेगळें व स्वतंत्र बेट आहे असें प्रवाशास वाटल्याखेरीज रहात नाहीं. येथल्या तामिळ संस्कृतीला विलायती पोशाखाचें वावडें आहे असें कळल्यावरून मी तो पोशाख टाकून धोतरटोपीचा साधा पोशाख स्वीकारला तो दक्षिण हिंदुस्थानचें पर्यटन आटपून ट्यूटिकोरिन येथें येईपर्यंत सारखा वापरीत होतों. या एका गोष्टीवरून जाफना हे लंकेपेक्षां किती वेगळें आहे हें दिसून येईल. तारिख २१ डिसेंबर १९३३ रोजीं मी जाफनास सायंकाळी सात वाजतां पोहोंचलों म्हणून सांगितलें आहे. त्या सायंकाळीं वाचनालयांत आलेल्या मास्तर मंडळीशीं मुदलीयार यानी माझा परिचय करून दिला. जाफना हें शिक्षणाचें मोठें केन्द्र असून येथें लंकेंतील सर्वांत जुनें हायस्कूल आहे व त्याचा शतसांवत्सरिक समारंभ लवकरच आहे असें मला कळले; तसेंच या ठिकाणीं शिक्षणाचा प्रसार पुष्कळ झाला असून सर्व लंकेभर येथील सुशिक्षित लोक निरनिराळ्या सरकारी खात्यांत नोकरीस राहिलेले आहेत असें मला कळलें. स्वामीजींचा परिचय करून देण्यांत आला. ते गृहस्थ बहुश्रुत असून बराच प्रवास केलेले असल्यामुळें त्यांचा माझा स्नेह ताबडतोब जमला. ता. २२ डिसेंबर सन १९३३ सकाळीं इटली, दोशे व काफी असा शुद्ध तामीळ पद्धतीचा फराळ झाल्यावर मी कांहीं मास्तर मंडळींबरोबर मोटारींतून जाफना शहराच्या थेट उत्तरेस असलेल्या संतुराई या गांवाला गेलों. जाफना हे किती दाट लोकवस्तीचें द्वीपकल्प आहे; तसेंच या भागांतील लोक किती उद्योगी व कष्टाळू असून ते भातशेती व बागायती पिके काढण्यांत किती वाकबगार आहेत याची उत्तम कल्पना या रस्त्यानें जातांना आली. या बारा मैलांत मला कोठेंही ओसाड, नापीक, पडिक जमीन दृष्टीस पडली नाहीं; तसेंच एक खेडेगांव संपून दुसरें कोठें लागलें हें कळलें नाहीं; बारा मैलामध्यें घरें, बागा व भातशेती अशी सारखी रांगेनें लागत होती. प्रत्येक घराच्या आवाराला नीटनेटकें व बंदिस्त कुंपण आहे असें पाहिलें. येथलीं कुंपणें तरी किती सुबक व बंदिस्त! कुंपण काटेरी कोरड्या वाळलेल्या डांभ्याचें न करितां जीवंत झाडाचें करण्याची रीत दृष्टीस पडली. तें झाड म्हणजे भेंडीचें झाड होय. येथें भेंडीच्या झाडाचें बारिक सरळ सोट साहा इंचांचें अंतरानें कुंपणाच्या डांभ्यावजा लावतात; एका पावसाळ्यांत जीव धरून त्यांना वर पानांचा झुपकाच्या झुपका फुटतो. हे सोट फार दाट लावल्यामुळे ते फार वाढत नाहींत, किंवा त्यांचा फाजील विस्तार होत नाहीं; पण माथ्यावरील हिरव्यागार पानाचा झुबका मोठा सुंदर दिसतो. त्यानें कुंपणीचा वरचा भाग फार गर्दछाय व हिरवागार राहतो.
भेंडीच्या जित्या डांभ्यांना एकावर एक असे दोन दोन झाप (नारळीच्या पानाचे विणलेले) सुंभानें बांधून टाकतात. यामुळें आवाराला पूर्ण बंदिस्ती येऊन बाहेरच्या माणसास आंतील कांहीं एक दिसत नाहीं व आवाराला भिंतच जणूं कांहीं घातली आहे असें वाटतें. खरोखरी या कुंपणीचें मला नवल वाटलें; व येथल्या सामान्य लोकांच्या नीटनेटकेपणाबद्दल कौतुक वाटलें. या भेंडीच्या डांभ्याच्या कुंपणी सुबक व बंदिस्त असून त्यांच्या विपुल पानांचा शेताला हिरव्या खताकरितां उपयोग करतां येतो असें मला कळलें. भेंडीच्या पानानीं भरगच्च भरलेल्या बैलाच्या गाड्या शेताकडे जातांना मीं प्रत्यक्ष पाहिल्या. हीं भेंडीची पानें शेत नांगरतांना जमीनीमध्यें टाकलीं म्हणजे तीं कुजून त्यांचे शेताला चांगलें खत होतें हें मला प्रत्यक्ष दिसून आलें.
या भागांतील भेंडीपेक्षांही जास्त उपयोगी झाड म्हणजे पालमिरा पाम नांवाचें झाड होय. हे झाड शेतकऱ्यांना हजारों तऱ्हेनें उपयोगी पडतें. तामीळ भाषेत तर यालाच कल्पवृक्ष म्हणतात. एका मार्गदर्शक पुस्तकांतील खालील उताऱ्यावरून या झाडांच्या उपयुक्ततेची कल्पना होईल.
"या झाडांच्या पानांनीं छप्पर व कुंपण करतां येतें. या झाडांच्या पानापासून चटया, टोपल्या, छत्र्या व पंखे करतात; याचे कुजल्यावर चांगलें खत होतें. पूर्वी या झाडांच्या पानांवर खोदून अक्षरे काढीत व त्यांच्या पोथ्या करीत; या झाडांचीं फळें भाजींत घालतात व त्यांचें वाळवून पीठ करतात; या फळांच्या कवटीचें चांगलें जळण होतें. या झाडांच्या रसापासून गूळ व दारू होते; या झाडाचें लाकूड कठीण असतें व त्यापासून लाकडी सामान व घरांचें वासिक व छप्पर करतात; या झाडांचें आयुष्यही हजारों वर्षांचें आहे व याचें लाकूडही तितकेंच टिकाऊ आहे." अशा उपयुक्त झाडांची लागवड शेतकऱ्यांनीं जागा सांपडेल तेथें करावी हे स्वाभाविक आहे.
याप्रमाणें नाना प्रकारच्या वस्तूंचें व लोकस्थितीचें अवलोकन करीत बारा मैलांचा रस्ता केव्हां संपला हे मला कळलें सुद्धां नाहीं. कंकेसंतुराई हें गांव लंकेच्या उत्तरेकडच्या समुद्रकिनाऱ्यावर आहे. येथून हिंदुस्थानचा किनारा फक्त वीस बावीस मैल दूर रहातो. पूर्वकाळीं येथूनच गलबतानें हिंदुस्थानला लोक जात येत असत. आतां तलाई मानार कडून रेल्वेनें जाणें येणे सोयीचें व सोपें झालें आहे खरें पण जाफना द्वीपकल्पास प्रवास लांबीचा व खर्चाचा झाला आहे. पूर्वकाळीं गलबतानें एका रात्रीत हिंदुस्थानाला जावयास सांपडत असे. कंकेसंतुराईपासून समुद्र किनाऱ्यानें एक रस्ता पूर्वेकडे जातो; या रस्त्यानें फार सुंदर देखावा दिसतो; आपल्या डाव्या हातास तो हिरवट रंगाचा मंदमंद लाटांचा समुद्र व त्याच्याकडेचें तें केशरी रंगाचें वाळवंट; मधला तो तांबडा रस्ता व सभोवार पालमिरा पामचीं तीं झाडेच झाडें हा देखावा चित्ताकर्षक आहे. या रस्त्यानें आम्हीं पालेगांवापर्यंत गेलों. तेथें अगदी समुद्रकांठावर शुद्ध हवाशीर खुल्या जागीं सातव्या एडवर्ड बादशाहाच्या स्मारकार्थ सॅनिटेरियमचीं गृहें (क्षयरोग्याकरितां आरोग्यगृहें) बांधण्यांत आली आहेत. तीं आम्हीं पाहिलीं. ती हवाशीर जागा अशा गृहांना फार योग्य आहे हें तें स्थळ पहातांक्षणीं माझ्या ध्यानांत आलें. याप्रमाणे सुमारें दोन तास जाफना द्वीपकल्पाचा उत्तर भाग पाहून मग आम्हीं कंकेसंतुराईच्या पश्चिमेस दोन मैलांवर असलेल्या किरीमलाई नांवाच्या नैसर्गिक पुष्करणीशीं स्नान करण्याकरितां आलों. ही पन्नास फूट लांब रुंद व दहा बारा फूट खोल अशी उत्तम कोरल दगडाची चौकोनी दहा दहा पायऱ्याची बांधलेली पुष्करणी आहे. या पुष्करणीमध्यें नेहेमीं पांचच फूट पाणी राहील अशी व्यवस्था केलेली आहे. या पुष्करणीचे तळाला स्फटिका सारखी शुभ्र वाळू आहे. या पुष्करणीच्या तळाशी एका बाजूला वाहता झरा आहे व वालुकामय तळांतून पाण्याचे पाझर असावे; झऱ्याचें पाणी स्वच्छ पण किंचित् पोपटी रंगाचें आहे. हा झरा फार मोठा आहे. पुष्करणीच्या एका बाजूस पाणी जाण्यास वाट ठेवली आहे. त्यानें पाणी बाहेर पडून त्याचा लहानसा ओढा बनला आहे व तो समुद्राला जाऊन मिळालेला आहे. किती आश्चर्यकारक हा झरा व ही पुष्करणी आहे! या झऱ्याचें पाणी खारें नाहीं. गोडे आहे पण किंचित् मचूळ लागतें, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा गोड पाण्याचा झरा समुद्रापासून पुरा पन्नास फूटही दूर नसेल! ही पुष्करणी व हा विपुल पाण्याचा झरा म्हणजे एक सृष्टिसुंदरीनें बनविलेले पोहण्याचें जलमंदिर होय यांत शंका नाहीं. किती तरी लोक या पुष्करणींत पोहत होते. आम्हींही येथें अर्धाअधिक तास पोहत राहिलों. या ठिकाणची हवा कोरडी असल्यामुळें व या पुष्करणीचें पाणी युरोपांतील स्पा (आरोग्यवर्धक पाण्याची ठिकाणें) प्रमाणें आरोग्यवर्धक व रोगहारक असल्यामुळें दूरदूरचे लोक येथें महिना महिना येऊन राहतात व येथल्या पुष्करणींत दररोज दोनदां स्नान करतात; स्नानानें व येथल्या उत्तम हवेनें लोकांची प्रकृति लवकर सुधारते असें मला कळलें. ही माहिती ऐकून तर मी आश्चर्याने थक्क झालों व हा झरा म्हणजे या प्रांताला एक मोठी निसर्गदत्त बिनमोल देणगी होय असें मला वाटलें. पोहोणें व आंघोळी आटोपून आम्ही बारासाडेबारा वाजतां बिऱ्हाडीं आलों.
सायंकाळीं काफीपानानंतर आम्ही चारपांच मंडळी जाफना शहराचें बंदर व नवी केलेली जमीन (Reclamation) पाहण्यास गेलों. क्षार सरोवराच्या बाजूला दगडी धक्का बांधून मुंबईच्या बॅकबेकडील नव्या जमिनीप्रमाणें ही नवीन जमीन तयार केली आहे. धक्यावरून गेलें म्हणजे डावे अंगास सरोवराचें नीळसर हिरवट पाणी उजवे अंगास सपाट पांढरट तांबूस नवीन जमीन, त्याचेपलीकडे हिरव्यागार बागा व तांबड्या इमारती हा देखावा चित्ताकर्षक आहे यांत शंका नाहीं.
बंदरांत बरीच गलबतें नांगरलेली दिसत होतीं. या बंदरावरून आम्हांला येथल्या सूर्यास्ताचा देखावा मोठा मजेदार दिसला. जसजसें सूर्यबिंब सरोवराच्या पाण्याजवळ व क्षितिजासंन्निध येऊं लागलें तसतसें तें तांबडें तांबडेंलाल दिसूं लागलें; व त्यानें दशदिशांना आपल्या समवर्ण करून टाकलें. इतक्यांत सूर्यबिंबाची खालची बाजू सरोवरांत बुडाली व हां हां म्हणतांम्हणतां सर्व बिंब पाण्यांत बुडालें; व त्यानें सरोवराचें पाणी लालच- लाल करून टाकलें.थोड्याच वेळांत तांबडा रंग कमी होऊन सर्वसृष्टि काळवंडूं लागली! जणूं कांहीं सूर्यनारायण अस्तास गेल्यामुळे दुःखानें सृष्टिसुंदरीचें मुख म्लांन झालें व त्यावर दुःखाची काळसर छाया पडली! असा हा सूर्यास्ताचा मनोहर देखावा पाहून आम्ही परत बिऱ्हाडीं आलों.
ता. २३ डिसेंबर सन १९३३. आज सर्व सकाळभर मी आपल्या इष्ट मित्रांस झालेल्या प्रवासाबद्दल व दक्षिण हिंदुस्थानच्या भावी प्रवासाच्या कार्यक्रमाविषयीं बरींच पत्रे लिहिलीं व पुढील प्रवासाची सामुग्री- पैसे तारेनें मदुरेस गेल्यावर मिळावे अशाबद्दल तजवीज केली. यामुळे सकाळीं दृश्यदर्शनास जातां आलें नाहीं. पण दोन प्रहरीं आम्ही मोटारमध्यें बसलों व रात्रपर्यंत किती तरी प्रेक्षणीय स्थळें पाहिली. प्रथमतः आम्ही उत्तरेस दहा बारा मैलावर असलेलें पॉइंट पालमिरा नांवाचें टोंक पहाण्यास गेलों. या भागांत जिकडे तिकडे पालमिरा पामची राई नव्हे, रानच्या रान आहे. पालमिरा पामचें हें रान मोठें मजेदार दिसतें. आम्ही जमीनीच्या टोकाशीं आलों तोंच पोपटीरंगी पाण्याचा व श्वेत- फोनयुक्त लाटांनी डोलायमान होणारा बंगालचा उपसागर आमच्या दृष्टीस पडला! काय तो चित्ताकर्षक देखावा! वंग देशांतील विजयकुमार आपल्या सवंगड्यासकट या बंदराला आला व येथून मग तो पुढें अनुराद्धपुराकडे गेला अशी एक दंतकथा या भागांत प्रचलित आहे. विजयकुमार बंगालच्या उपसागराच्या मार्गानें प्रथम लंकेंत आला किंवा हिंदी महासागराच्या मार्गानें प्रथम लंकेंत आला- कारण दंतकथा दोन्ही तऱ्हेच्या आहेत असें दिसतें- हा शोध करण्यासारखा प्रश्न आहे असें मला वाटलें. पण सध्यां त्या भानगडीत न पडतां आम्ही दंतकथा खरी मानून या केशरीरंगी सुंदर वाळवंटावर थोडा वेळ हिंडलों व बंगालच्या उपसागराच्या लाटांच्या तांडवाचें निरीक्षण केलें. येथून हिंदुस्थानचा किनारा केवळ वीसबावीस मैलच दूर असून हिंदुस्थानच्या आग्नेय (पूर्वदक्षिण) किनाऱ्यावरील कॅलिमर नांवाचें टोंक या ठिकाणाच्या समोरच आहे; व या टोंकाचे थेट उत्तरेस नागापट्टम् नांवाचें मद्रास इलाख्यांतील बंदर असून तेथून लंकेंतील गॉल बंदरावरून कोलंबो बंदरापर्यंत आगबोटीची रहदारी चालू आहे असें मला सांगण्यांत आलें. सुमारें अर्धा तास या ठिकाणच्या निसर्गरमणीय देखाव्याचा आस्वाद घेऊन आम्ही परत फिरलों व मग समुद्रालगतच्या सडकेनें कंकेसंतुराईवरून जाफना द्वीपकल्पाच्या पश्चिम टोकाला आलों. या बाजूस साहासात बेटें असून तीं जाफना जिल्ह्यांत मोडतात. जाफना द्वीप कल्पाचें पश्चिम टोक व करेटिव्ह नांवाचें पहिलें बेट यामध्ये एक मैल अंतर आहे. पण येथें पाण्याचे सपाटीबरोबर बसका पूल व धक्का बांधला आहे. या पुलावरून व धक्यावरून जातांना मला एलिफंट पास या पुलाची आठवण झाली. दोन्ही ठिकाणच्या देखाव्यामध्ये बरेच साम्य आहे. करेटिव्ह हें बेट साधारण चौकोनी पण लहानच आहे. त्याच्या दक्षिणेकडचें लेडन बेट हे लांबच लांब बेट असून तें या द्वीपसमूहामधील सर्वात मोठे बेट आहे. या बेटामध्यें काईट्स म्हणून मोठा गांव आहे. या द्वीपसमूहाचें हें मुख्य ठाणें आहे व येथें सरोवराचे पाणी खोल असल्यामुळे येथेंच जाफनाचें मोठीं गलबतें येणारें बंदर आहे. करेटिव्ह व लेडन या बेटांमधील खाडी अर्धा मैल असेल; पण ती बरीच खोल असल्यामुळे या खाडीवर पूल नाहीं; पण तराफ्यावर मोटारी हांकीत नेण्याची सोय केलेली असल्यामुळें व तराफा खाडींतून बिन वल्हवितां दोरीच्या साहाय्यानें पलीकडच्या तीराला नेण्याची मोठ्या युक्तीची तजवीज केली असल्यामुळे फारसा त्रास न पडतां व फाजील वेळ न मोडतां मोटार काईट्स गांवाला जाऊं शकते. येथील तराफा पैलतीरास नेण्याची युक्ती आपल्या इकडल्या तारेच्या साहाय्याने नदीपार तर नेण्याच्या पद्धतीपेक्षां जरा निराळी आहे. खाडीच्या दोन्ही तीरांस पाण्यांत मोठमोठे लाकडी ओंडे पुरलेले असतात व पाण्याच्या सपाटीच्या किंचित् वर त्या दोन्ही बाजूच्या ओंड्यांना भलें मोठें दोरखंड घट्ट बांधलेलें असतें. तराफ्याच्या दोन्ही टोंकांस दोन कप्या दोनतीन हात उंचीच्या खांबावर बसविलेल्या असतात. तराफा सुरू करावयाचा झाला म्हणजे खाडीचे पाण्यावर असलेलें तें दोरखंड त्या कप्यावर चढविलें जातें. मग खलाशी तें दोरखंड ओढीत तराफ्याच्या या टोंकापासून त्या टोकापर्यंत मोटेच्या बैलाप्रमाणें पुढें मागें जातात. या दोरखंडाला ओढण्याच्या शक्तीनें दोरखंड तर सरकत नाहीं, (कारण तें दोन्ही तीरांच्या ओंड्यांना घट्ट बांधलेलें असतें) पण ती शक्ती तराफ्याला मिळते व तराफा झरझर पुढे सरकतो. ही योजना मी प्रथम पाहिली तेव्हां मला असा भास झाला की खरोखरी दोरखंड मागे ओढले जात आहे; पण बारकाईनें पाहतां तराफा पुढें जात आहे असें माझ्या ध्यानांत आलें. तराफ्यावरून मोटारबस रस्त्यावर आली तोंच काईट्स गांवांतील सरकारी इमारती दिसूं लागल्या व बंदरांत मोठमोठी जहाजें नांगरलेली दृष्टीस पडली. येथें थेट रंगूनहून गलबतें तांदूळ घेऊन येतात असें मला कळलें. या बेटावरही जाफना द्वीपकल्पाप्रमाणें नारळी पोफळी केळी यांच्या बागा व भातशेती विपुल आहे. गांवांतून आम्हीं माझ्या नव्या मित्रांच्या एका सहाध्यापकाचे बंगल्यावर गेलों. हा बंगला गांवापासून जरा दूर असून त्याचे सभोंवार जिकडे तिकडे हिरवीगार भाताची शेतेंच शेतें असून बंगल्यांत पुष्कळ नारळीचीं झाडें व बरींच फुलझाडें होती. तेथें थोडा वेळ बसून संध्याकाळ झाली म्हणून आम्ही आल्या तरीनें परत फिरलों. लेडनबेट बरेंच लांब असून त्याच्या दक्षिण टोकाला व जाफना किल्ल्यासमोर तराफ्यानें पलीकडे जाण्याची सोय आहे. पण त्या ठिकाणीं पैलतीरास जाण्यास जास्त वेळ लागतो; म्हणून आम्ही त्या लांबीच्या रस्त्यानें न जातां पूर्वीच्या तराफ्याच्या रस्त्यानें जाफना द्वीपकल्पांत आलों. तेथून मात्र खाऱ्या सरोवराच्या कांठच्या सडकेनें परत बिऱ्हाडीं आलों. यामुळे सायंकाळच्या सूर्यास्ताचा चित्ताकर्षक देखावा व एकंदर सरोवराचा सुंदर देखावा यांचें पुनर्दर्शन घडलें.
ता. २४ दिजंबर सन १९३३. आज मी सर्व दिवसभर विश्रांति घेतली. कारण दुसरे दिवशीं मी रामेश्वरास जाण्याकरितां निघणार होतों. शिवाय त्या संध्याकाळीं तेथल्या वाङ्मयसभेच्या आश्रयाखाली मी 'ललितकलांचें स्वरूप' या विषयावर सार्वजनिक व्याख्यान देण्याचें कबूल केलें होतें. तेव्हां व्याख्यानविषयासंबंधीं माझे विचार व माझा अनुभव यांची मनांत जुळवाजुळव करण्यास मला सवड पाहिजे होती. मी रहात होतों तेथल्या दिवाणखान्यांत माझें व्याख्यान होतें. व्याख्यानाला गांवांतील सुशिक्षित मंडळी जमली होती. व्याख्यानाचे शेवटीं नव्या मंडळींशीं माझा परिचय करून देण्यांत आला. त्यांत एक बाहेर गांवचे पेन्शनर गृहस्थ होते. हे गृहस्थ एका जुन्या प्रेक्षणीय देवळाचा जीर्णोद्धार करीत होते; व दुसरे दिवशीं दोन प्रहरीं ते स्वतंत्र मोटारनें त्या ठिकाणी जावयाचे होते. माझी प्रवासप्रियता व दृश्यदर्शनाची आवड पाहून ते मला म्हणाले "उद्यां दोनप्रहरीं माझ्या बरोबर मोटारीमध्ये आपण यावें व जीर्णोद्धार होत असलेलें देवालय पाहावें; तें पाहिल्यावर रात्रींच्या गाडीच्या वेळेवर मी आपल्यास मनकूलम् स्टेशनला पोहोंचतें करण्याची तजवीज करीन; म्हणजे जाफनाहून सायंकाळी सात वाजतां निघणारी गाडी आपल्याला गांठतां येईल व ता. २६ दिजंबर रोजी सकाळीं साहा वाजतां आपल्याला तलाईमानारला पोहोंचतां येऊन आगबोटीनें धनुष्कोडीस व पुढें रामेश्वरास जातां येईल." ता. २५ रोजी सायंकाळी सात वाजतां जाफनाहून आगगाडीनें जाणें काय किंवा दोन प्रहरी दोन वाजतां मोटारीनें निघून तीच आगगाडी / मधल्या एका स्टेशनवर गांठणें काय मला सारखेंच असल्यामुळे मी त्या गृहस्थाच्या म्हणण्याला ताबडतोब रुकार दिला. दोन प्रहरी मोटारकार घेऊन येतों असें सांगून त्या गृहस्थानें माझा निरोप घेतला.
ता. २५ डिसेंबर सन १९३३. आज माझ्या जाफना निवासाचा शेवटचा दिवस होता. तेव्हां मी माझ्या सामानांची बांधाबांध केली व नव्या मित्रांचा निरोप घेतला. या नव्या मित्रांत जाफनाच्या हिंदु ऑर्गन नांवाच्या इंग्रजी द्विसाप्ताहिक वर्तमानपत्राचे एक सहसंपादक होते. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेच्या माहितीबद्दल माझी मुलाखत घेतली. ती त्यांना मीं लिहून दिली. शिवाय, त्यांनीं आपल्या इंग्रजी पत्रांत 'लंकेबद्दल माझे ग्रह' (My impression of Ceylon) नांवानें कांहीं लेख लिहावे अशी मला आग्रहाची विनंति केली व मलाही त्यांना नकार देववेना; म्हणून मी ती गोष्ट कबूल केली. दोन प्रहरीं अडीच वाजतां आदल्या दिवशीं ठरल्याप्रमाणें ते गृहस्थ मोटार घेऊन आले. मी मुडलीयार साहेब, स्वामीजी व इतर तेथें असलेल्या मित्र मंडळींचा निरोप घेऊन मार्गस्थ झालों. पण आम्हीं गांव टाकून मैलभर आलों नाहीं तोंच आमच्या मोटारने त्रास देण्यास सुरवात केली; मोटार चालतां चालतां मध्येच थांबे; ड्रायव्हरनें दुरुस्ती करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण मोटार पांच पन्नास यार्ड चालावी व पुनः बंद पडावी असा क्रम सुरू झाला. रात्रीची आगगाडी चुकणार की काय अशी मला धागधुग वाटूं लागली. माझ्या बरोबरच्या गृहस्थासही तीच धास्ती वाटत असावी असें दिसलें. अशा मनाच्या अधीर व अस्वस्थ स्थितींत दोन तास गेले व सायंकाळ होत चालली. तेव्हां हमालाच्या डोक्यावर सामान देऊन जाफना स्टेशनला चालत जाणें जरूर आहे असें मी त्या गृहस्थास सांगितलें. त्यांनाही केलेला बेत फसल्यामुळे वाईट वाटलें. पण तेथें हमाल तरी कसा मिळणार? एक दोघांना विचारतां ते जाण्यास तयार होईनात. पण इतक्यांत मोटार दुरुस्त झाली. पण आतां चाळीस मैल मोटारीनें प्रवास करून मनकूलम स्टेशन वेळेवर गांठणे शक्य नाहीं असें पाहून आम्हीं मोटारं मागें फिरवून जाफना स्टेशनला आलों.
प्रेक्षणीय स्थळ पाहण्याचा बेत फसला म्हणून माझा हिरमोड झाला. त्या गृहस्थाला तर अधिक वाईट वाटलें. पण "अर्वाचीन यांत्रिक प्रवास- साधनामध्ये केव्हां केव्हां असा बिघाड होऊन बेत बिघडावयाचाच. त्याला इलाज नाहीं; तेव्हां वाईट वाटून घेण्याचे कारण नाहीं." असे म्हणून मी त्या गृहस्थाचे आभार मानले व मग ते गृहस्थ परत शहरांत गेले व मी स्टेशन मधील वाटपाही खोलींत बसलों. लवकरच आगगाडी प्लॅटफार्मवर आली व मी आगगाडींत सेकंड क्लासच्या डब्यांत जाऊन बसलों. डब्यांत गर्दी नव्हती. साडेसातला आगगाडी चालू झाली. मी मडवाची स्टेशनला रात्री बाराच्या सुमारास आलों. आजची नाताळची रात्र असल्यामुळे स्टेशनांतील सर्व एंजिनांना फुलांच्या व पानांच्या माळा घातल्या होत्या व बारा वाजतां त्यांनी शिट्याही फुंकल्या. अनुराद्धपुरास मी परतीचें तिकीट घेतलें होतें. त्यामुळे जाफनापासून मडवाचीपर्यंत माझें तिकीट होतेच. तेव्हां बारा वाजल्यानंतर मी मडवाची ते धनुष्कोडीचें सेकंड क्लासचें एकेरी तिकीट घेतलें. कारण, लंकेला परत जातांना ट्युटिकोरिन या बंदरापासून कोलंबोला बोटीनें प्रवास करावयाचा माझा बेत होता. मडवाचीपासून धनुष्कोडी स्टेशनपर्यंत आगबोटीच्या भाड्यासकट भाडें साहा रुपये व साठ सेंट पडलें. रात्री एकाच्या सुमारास तलाईमानारकडे जाणारी आगगाडी आली व मग आमचे डबे त्या आगगाडीला जोडण्यांत आले व आगगाडी चालू झाली. डब्यांत रात्रींसुद्धां फारशी गर्दी नव्हती म्हणून मी बाकावर आडवा झालों खरा. पण ऊष्मा पुष्कळ होत असल्यामुळे मला चांगली झोप आली नाहीं. पहाटेस पावणेसहा वाजतां आमची आगगाडी तलाईमानारच्या धक्क्यावर आली; धक्क्याला आगबोट लागलेली होती. यामुळे एका आगगाडींतून प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या आगगाडींत बसावें त्याप्रमाणें आगगाडीतून आगबोटीत ताबडतोब बसतां आलें. झालें. अर्ध्या पाऊण तासानें आगबोट चालू झाली व 'पुनरागमनायच' असें म्हणून लंका बेटाचा मी मनांतल्या मनांत निरोप घेतला. कारण वर उल्लेख केल्याप्रमाणें दक्षिण हिंदुस्थान व विशेषतः केरल प्रांत येथील तीन आठवड्यांचा प्रवास करून मला लंकेला परत यावयाचें होतें. याप्रमाणे माझा लंकेच्या उत्तरेकडचा व जाफना द्वीपकल्पाचा प्रवास पुरा होऊन मीं तात्पुरतें लंका बेट सोडून हिंदुस्थानास परत आलों.
जरी या खेपेचा माझा प्रवास बरोबर तीन महिन्यांचा म्हणजे ता. २२ नवंबर सन १९३३ ते २१ फेब्रुवारी सन १९३४ पर्यंतचा झाला, तरी माझा लंकेचा निवास व पर्यटन दोन महिनेच झाले व तें दोन हप्त्यांनीं झालें. ता. २४ नवंबर ते २५ दिजंबर सन १९३३ हा पहिला हप्ता व ता. १७ जानेवारी ते १९ फेब्रुवारी सन १९३४ हा दुसरा हप्ता. लंकेचें माझें पहिलें दृश्यदर्शन ता. २५ दिजंबर सन १९३३ रोजी संपलें. महाराष्ट्रांतील एका विख्यात विभूतीच्या आयुष्यांतील एका विलक्षण प्रसंगानंतर त्यांनीं आपला नित्य व्यवसाय पुनः सुरू केला तेव्हां म्हटलेला व म्हणून सर्वतोमुखी झालेला मन्त्र 'पुनश्चहरिः ओम्' हा म्हणून मी आपल्या लंकेच्या दुसऱ्या हप्त्याच्या दृश्यदर्शनास सुरवात ता. २८ जानेवारी १९३४ रोजी केली. लंकेतील प्रेक्षणीय स्थळांचा मुकुटमणी म्हणजे श्रीपादशिखर (ज्याला इंग्रजीत ॲडॅम्स पीक असें नांव दिलेलें आहे) हे होय. तेव्हां या मुकुटमण्याचें वर्णन माझ्या लंका वर्णनाच्या मधोमध यावें हें योग्यच झाले.
या शिखरास जाण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला कोलंबोच्या आग्नेय दिशेस ६४ मैलांवर असलेल्या, रत्नाकरितां प्रसिद्ध असलेल्या व म्हणून अन्वर्थक नांवाच्या रत्नपूर गांवाकडून शिखरावर पाऊलवाटेने चढणें हा होय. या मार्गानें सबंध शिखराचा म्हणजे सुमारें सात सवा सात हजार फुटांचा चढ पायीं चढावा लागतो. कारण रत्नपुर हे गांव साधारणतः समुद्रसपाटीवरच आहे. या जास्त बिकट व दुर्गम मार्गानें शिखर चढल्यास अधिक पुण्यप्राप्ति होते असें भाविक बुद्ध लोक मानतात. म्हणून या बाजूनें पुष्कळ यात्रेकरू शिखरावर चढतात. दुसरा मार्ग कोलंबोपासून रेल्वे- रस्त्यानें १०८ मैलांवर असलेल्या हॅटन गांवी आगगाडीनें जाऊन व तेथून मोटारीनें जाऊन शिखरावर पायीं चढणें हा होय. या मार्गानें जवळजवळ निम्मा चढ आगगाडीनें चढला जातो. माझ्या वयाकडे नजर देऊन मी या दुसऱ्या कमी दुर्गम मार्गानें जावयाचें ठरविलें; शिवाय या मार्गानें गेलें म्हणजे लंकेतील युरोपीयन लोकांनी घडवून आणलेली क्रांतिकारक सुधारणा- वनाचें बन बनविणें व माळाचे मळे बनविणें आपोआप व जातां जातां दृष्टीस पडतें. म्हणून हा मार्ग मी पसंत केला. ज्याप्रमाणें हिमालयांतील बद्रिकेदार, गंगोत्री, अमरनाथ वगैरे ठिकाणें पहाण्यास ठराविक काळींच जावें लागतें, त्याप्रमाणे या शिखरावरही ठराविक काळांत जावें लागतें. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत शिखरावर चढणें शक्य आहे. बौद्धधर्माप्रमाणें पौर्णिमा हा खरा पर्वणीचा दिवस. त्या रात्रीं यात्रेकरू शिखरावर चढू लागतात व पहांटेस वर पोहचतात. या चार पौर्णिमांस पुष्कळ बुद्ध यात्रेकरू दूरदूरच्या ठिकाणांहून येतात.
जानेवारी ३० सन १९३४ हा पौर्णिमेचा दिवस होता. म्हणून मी कोलंबोहून ता. २८ जानेवारी रविवार रोजी दोन प्रहरच्या तीन वाजतांच्या आगगाडीनें पेरेडॅनीयास जाण्याकरितां निघालों. कोलंबोपासून कँडी या सुंदर रेल्वे-रस्त्याचें व घाटाचें मी मागें वर्णन दिलें आहे. त्याची पुनरुक्ति करण्याचें कारण नाहीं. मला मात्र या रस्त्यानें जातांना चिरपरिचित नसला तरी एकदां परिचित प्रवासाचा व निसर्गरमणीय प्रदेशाच्या पुनर्दर्शनाचा लाभ झाल्यामुळे फार आनंद वाटला. अर्थात् मी माझ्या नव्या मित्राकडे रा. कंदया यांजकडे उतरण्यास गेलों. दुसऱ्या दिवशीं उंच चढाव चढून जातां यावें म्हणून मी एक दिवस विश्रांति घेतली. त्या दिवशीं मी पेरेडॅनिया बागेत फेरफटका करून आलों हें सांगावयास नकोच. ही बाग पाहून मला दीड महिना होऊन गेला होता. पूर्वीपेक्षां यावेळी बाग जास्तच सुंदर दिसूं लागली होती. कारण त्यावेळी झाडांना फारशी फुलं नव्हती पण आतां वृक्षवेलींना नवी पालवी व फुलें येऊ लागली होती. त्यामुळे वृक्ष वेली सतेज दिसूं लागल्या होत्या. मागच्या खेपस पाहिलेलें साधें एक रंगी वस्त्र बदलून सृष्टिसुंदरीनें दुसरें नानारंगी वस्त्र परिधान केलें आहे व बाहेर जाण्याकरितां नवा बुट्टीदार तांबूस रंगी शेला अंगावर पांघरला आहे असा मला भास झाला.
ता. २९ रोजी सकाळच्या सव्वा नवाच्या आगगाडीनें मी रा. कंदिया यांचा निरोप घेऊन हॅटन गांवीं जाण्यास निघालों. पेरेडॅनियाबागेच्या स्टेशनपासून हॅटन सदतीस मैल आहे. हा सर्व रेलवे रस्ता चढावाचा आहे. कारण पेरेडॅनिया बागेची समुद्रसपाटीपासून सुमारें सोळाशें फुट उंची आहे, तर हॅटनची चार हजार फूट उंची आहे. गांपोला, उपलाने व नवलपिटिया या स्टेशनपर्यंत रेल्वे-रस्ता उंच सखल व डोंगराळ मुलुखांतून जातो खरा; पण उंची फारशी वाढत नाहीं. या भागांत सखल जागेत भातशेती व चढत्या जागेत घाटाची भातशेती (Terraced cultivation ) बरीच आहे. जिकडे तिकडे हिरवी हिरवीगार शेतें दिसलीं. कारण हा भाताच्या दुसऱ्या पिकाचा हंगाम होता. जरा उंचवट्याच्या व मुरमाड जागेंत नारळी- पोफळी- केळीच्या बागा लागल्या. नवलपिटिया हे लंकेंतील अत्यंत पावसाचें ठिकाण होय. रत्नपुर गांवाप्रमाणे या गांवची डोंगरांनी जणूं एक कोंडी बनविली आहे. यामुळें येथें पाऊस पुष्कळ पडत असावा असें प्रवाशास ताबडतोब दिसून येतें. मार्गदर्शक पुस्तकावरून येथें वर्षांत दीड इंचाच्यावर पाऊस पडतो व वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकीं दोनशे बारा दिवस- सुमारें दोन तृतीयांश वर्ष- पावसाळी असतात असें कळलें. येथून मात्र चढावयास प्रारंभ होतो व पिकाचें स्वरूपही बदलतें. आतां सर्व डोंगर, माळ व दऱ्याखोरीं हीं चहाच्या झुडुपांनीं भरलेलीं असून हिरवी हिरवीगार दिसतात. चहाचें झुडूप आपल्या इकडल्या तगरी मोगरीच्या झुडूपासारखें दुरून दिसतें. त्याचीं पाने काळसर हिरवी पण तजेलदार असतात व त्या झुडूपाला खूप व बारक्या बारक्या खांद्या असतात. हें झाड न खडतां वाढविलें तर बरेंच उंच व मोठें होतें. पण मग त्यापासून चहा तयार करतां येत नाहीं. त्याला जितक्या बारक्या खांद्या फुटतील, तितकें चांगलें. कारण चहाच्या झुडूपाचीं सर्व पानें चहा करण्यास उपयोगी पडत नाहींत; तर नव्या डिकशीची दोन पानें व न उमललेलें कळीसारखें एक पान येवढ्याच पानांचा चहा बनूं शकतो. म्हणून चहाच्या झाडाला उंच नीटस, सरळ वाढूच देत नाहीत; म्हणजे त्याचें नाना खांद्याचें ठेगणें झुडूप बनतें व मग त्याला आपल्या तुळशीच्या झाडाप्रमाणे हव्या तितक्या कोवळ्या डिकशा येतात. त्या खुडून त्याचा चहा बनवितात. नवलपिटियापर्यंत महावेली-गंगा नदी आपल्या डाव्या हाताला असते. नवलपिटीया स्टेशनच्या पुढें महावेली गंगेवरील सुंदर लोखंडी पूल आगगाडीने ओलांडल्यावर ती नदी आपल्या उजव्या हातास येते. साधारणतः हा रेलवे रस्ता या नदीच्या डाव्या उजव्या बाजूनें जातो; व नदीचीं विलक्षण रूपें आपल्यास पहावयास सांपडतात. केव्हां नदी फार खडकाळ व चिंचोळ्या चिळणीतून फेसाळलेल्या शुभ्र पाण्याच्या लोंढ्यानिशीं खळखळ असा मोठा आवाज करीत वहात जाते; तर कोठें ती रुंद होऊन सावकाश, संथपणें व गढूळ पाण्याच्या प्रवाहाने वहात जाते. नदीच्या बाजूस कोठें काळे काळे भोर खडक दिसतात; तर कोठें दाट व उंच अशी रबरवृक्षांची बनेंच्या बनें दृष्टीस पडतात; तर कोठें नदीच्या पाण्यापर्यंत पसरलेले चहाचे मळेच्या मळे दिसतात.
चहाच्या मळ्यांत मधून मधून सिलव्हर ओक हीं बारिक पानाची पण उंच वाढणारी झाडें सांवलीकरितां लावलेलीं दृष्टीस पडतात; एक रांग या उंच वृक्षांची तर दुसरी रांग कमी उंच वाढणाऱ्या पण जाड पानांच्या दडब नांवाच्या झाडाची असते. चहाच्या मळ्याची रचना अशी मोठी मजेची असते. पण मळा हा शब्द चहाच्या लागवडीस लावणें बरोबर नाहीं. कारण मळ्याप्रमाणें चहाच्या पिकाला कुंपण लागत नाहीं; त्याला सपाट जमीन लागत नाहीं; त्याला पाणी देण्याकरितां आळीं करावी लागत नाहींत; किंवा पाण्याचे पाट लागत नाहींत. खरोखरी चहाचें झुडूप हे आपल्या इकडल्या करवंदीप्रमाणे मोठें राकट व चिवट आहे; त्याचीं पानें गुरें खात नाहीत; तें हव्या तसल्या जागेवर उगवतें व वाढतें; जागा सखल असो, उंचवट्याची असो, घसरंडीची असो किंवा खोलगट असो, अशा सर्व ठिकाणी हीं झुडपें वाढतात; जास्त पावसाचे पाणी निघून जाण्याकरितां मधून मधून खोल चर खणलेले असतात. झुडुपांच्या डिकशा हातांनीं व नखांनी खुडता यांच्या म्हणून मजूरांना जाण्यासाठी सर्व डोंगरभर पाऊल वाट केलेली असते. हिरवे हिरवेगार ते डोंगर व मधल्या त्या वळणवळणाच्या उंच-सखल तांबड्या तांबड्या पाऊलवाटा; मधून मधून सांवलीकरितां हारीने लावलेलीं तीं दर जातीची झाडें; सिलव्हर ओक झाडांचीं तीं एका बाजूस पांढरी तर दुसऱ्या बाजूस हिरवीं बारिक पाने व दडब झाडांचीं तीं पोपटी रंगी जाड पानें, चहाचीं तीं काळसर हिरवट पानें व तांबड्या जमीनींमधील ते चर; हा सर्व देखावा एकसमयावच्छेदेकरून पाहिला म्हणजे मनाला मोठा विस्मय वाटतो.
गालबोडा स्टेशन आलें कीं आगगाडी बरीच उंचावर येते व सभोंवार डोंगरच डोंगर दिसतात; येथून रस्ता मागें गेल्याप्रमाणें डोंगरांच्या आंत आंत जातो व मोठें थोरलें लंब अर्धवर्तुळाकार वळण घेऊन मग पुढे वाटावाला स्टेशनला येतो. डोंगर चढून वर आल्यापासून श्रीपाद-शिखर दिसूं लागतें तें सारखे दिसत राहतें. या सर्व डोंगराळ प्रदेशाची तें शिखर जणूं कांहीं सारखी टेहेळणीच करीत आहे असें वाटतें. वाटावाला स्टेशननंतर रोझेला म्हणून एक स्टेशन लागते. येथून हॅटन चार मैल आहे. हॅटनला मी दुपारी एक वाजतां पोहोंचलों. हॅटन हे बरेंच मोठें शहर असून तें समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचीवर आहे. येथून सभोवारचा दूरवरचा देखावा मोठा सुंदर दिसतो. हिंदुस्थानांतील काय किंवा काश्मीरांतील काय डोंगराळ भागाची शोभा म्हणजे नुसत्या निर्जन जंगलाची शोभा होय. पण या भागांतील सर्व डोंगर चहाच्या व रबराच्या पिकानें व्यापलेले आहेत इतकेंच नाहीं तर मनुष्यांनी गजबजलेले आहेत. जिकडे पहावें तिकडे नीटनेटक्या झोंपड्या, बंगले व चहाच्या गिरण्यांच्या खूप कांचेच्या खिडक्या असलेल्या व तांबड्या कौलाराच्या किंवा तांबडा रंग दिलेल्या पत्र्याच्या छपराच्या लांबच लांब दोन तीन मजली इमारती दृष्टोत्पत्तीस येतात. चहाच्या मळ्यांत म्हणजे सर्व डोंगरभर-पाठीवर लोंबत्या टाकलेल्या उभंट्या व बारिक तोंडाच्या टोपलींत हातांनीं खुडून चहाच्या डिकशा टाकणारे बायका-पुरुष रानोमाळ दृष्टीस पडतात. चहाच्या व रबराच्या पिकांच्या शोधांनी लंकेमध्यें क्रांतिकारक सुधारणा घडून आली आहे ती हीच. या सर्व भागांत एक इंच जागा वाया गेलेली नाहीं; या पिकांनीं पूर्वीच्या निरुपयोगी वनाचीं रबरांचीं उत्पादक बनें बनलीं व पूर्वीच्या ओसाड माळाचे जगाला मोह पाडणाऱ्या चहाच्या पिकांचे मळे बनले. जेथें पूर्वी हिंस्त्र पशूंचीच फक्त वस्ती होती, तेथें आतां सुधारलेल्या व संपन्न लोकांची वस्तीच वस्ती झाली आहे.
हॅटनच्या दक्षिणेस मस्केलिया म्हणून एक बारा मैलांवर ठिकाण आहे. तेथपर्यंत मोटार बस सर्व्हिस आहे; तेथून डलहौसी म्हणून एक चहाची गिरणी आहे. ती मस्केलियापासून पांच मैल आहे. पुष्कळ यात्रेकरू मस्केलियापासून चालत श्रीपादशिखरावर जातात. पण पांच मैल चालण्यापेक्षां स्वतंत्र मोटारकार करणें श्रेयस्कर आहे. कारण शिखराचा चढाव खरोखरी ऊरफोडी व जीवजाई आहे. तेव्हां या पहिल्या पांच मैलांच्या चालीमध्यें शक्तिव्यय करणें इष्ट नाहीं. माझ्या वयोमानाच्या दृष्टीने जास्त विश्रांति मिळावी म्हणून मी हॅटनहून डलहौसीपर्यंत स्वतंत्र मोटार केली. त्याला दहा रुपये पडले. पण साधारणतः साहा सात रुपयांपेक्षां जास्त पडत नाहींत. भाषेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन माझ्या बरोबर आणलेल्या माणसानें मला फसविल्यामुळे मला दहा रुपये पडले. हॅटनपासून डलहौसीपर्यंत चहाचे मळे व रबराचीं बनें व कोठें कोठें युकॅलिप्टसच्या राया लागल्या. हा भागही विलक्षण डोंगराळ व चढउताराचा आहे; हॅटनपेक्षां हा चार-पांचशे फुटांनी सखल असावा. म्हणूनच शिखर या

श्रीपादशिखर हें शंकूसारखें उंचच उंच गेलेलें एकाकी शिखर आहे. त्याच्या दोन बाजूंना डोंगरांची एक रांग आहे खरी, पण ती त्या शिखरापेक्षां पुष्कळच ठेंगणी आहे. बाकी या डोंगराच्या बगलेनेंच शिखरावर चढण्यास प्रथम पाऊलवाट व पुढे पायऱ्या केलेल्या आहेत. या डोंगराच्या रांगेमुळें हे शिखर सिगिरिया खडकाइतकें अगम नाहीं; तरी पण शिखर दुर्गम आहे हे खास.
मस्केलियाहून चार हजार फुट उंचीच्या शिखरावर चढण्याच्या पाऊलवाटेचे साधारण सारख्या उंचीचे तीन टप्पे पडतात. पहिला टप्पा बाराशें तेराशें फूट उंचीचा आहे; हा टप्पा डलहौसी गिरणीपासून सुरू होतो व या खोऱ्यांतून निघणाऱ्या नदीवरील पुलाचे अलीकडे संपतो. ही पाऊलवाट आपल्या इकडल्या सिंहगड, पुरंदर वगैरे किल्ल्यांना जाणाऱ्या पायवाटेसारखी आहे. चढाव बेताबेतानें व वांकणा-वांकणानें असल्यामुळें फार भासत नाहीं; कांहीं चढावापर्यंत चहाचीं झुडपें लागतात; मग मात्र किर्र रान लागतें. या पहिल्या टप्याचे ठिकाणी थोडी सपाटी आहे व येथे दोन चार झोंपड्यावजा घरें व एक दोन चहा-कॉफीचीं दुकानें आहेत. इकडे अशा दुकानांना बुटी म्हणतात. मी डलहौसी येथून जो चढाव चढू लागलों तो एका तासानें या पहिल्या टप्याच्या दुकानाशीं आलों. येथें कॉफीचा एक कप घेतला व थोडी विश्रांति घेतली. येथून निघालें कीं, लागलीच डलहौसी गिरणीनजीक लागलेली नदी पुनः ओलांडावी लागते. येथें छोटासा पूल आहे; शिवाय प्रवाहा-पर्यंत पायऱ्या केल्या असून, येथें फराळ वगैरे करण्यासारखी सोय केली आहे; नदीचं पाणी फार गोड व स्फटिकासारखें शुभ्र व स्वच्छ आहे. येथला देखावा खरोखरी मनोहर आहे. येथपर्यंत पाऊलवाट फार बिकट किंवा शिडीसारखी उभी नाहीं. यामुळे येथपर्यंत मी मोठ्या मजेनें व आनंदानें आलों.
शंकूसारख्या निमुळत्या झालेल्या श्रीपादशिखराचा रुंद पायावजा भाग येथून सुरू होतो. आतां पाऊलवाट सरून कोठें ओबड धोबड तर कोठें बऱ्या बांधलेल्या, कोठें चढत्या पण लांबट, तर कोठें सपाट पण पावलाच्या रुंदीच्या व फूट फूट उंचीच्या दगडी पायऱ्या लागतात; दोन्ही बाजूस दाट रान लागतें. हा चढ व पायऱ्या उभ्याच असल्यामुळे पहिल्या टप्प्याप्रमाणें सावकाशपणें कां होईना पण सारखें चढतां येत नाहीं. दहा पंधरा वीस पायऱ्या चढल्या म्हणजे मला दम लागे; म्हणून मी पांचदहा पायऱ्या- लांबड्या अथवा छोट्या- चढल्यावर थांबत होतों व मागें वळून सभोंवारच्या किर्र रानाचा व गर्द झाडीचा देखावा हात व थोडी थोडी विश्रांति घेत डोंगर चढत होतों. अशा तऱ्हेनें दोन तास चालल्यावर मी दुसऱ्या टप्प्याशीं आलों. येथें सुंदर पाण्याचा झरा वहात होता; तो पाहनच श्रमपरिहार झाला. येथें आलों तों सात वाजले होते. येथें एक बुटी होती. तेव्हां येथें रात्रींचा फराळ करून पहांटेपर्यंत विश्रांति व झोंप घेण्याचा मी बेत केला. बुटीवाल्यानें एक कापडी- नव्हे- गोणपाटाची खाट व त्यावर एक गवताची चटई अशा चिजा निजावयास दिल्या. मी बरोबर ओव्हरकोट आणला होता. फराळ केल्यावर मी त्या खाटेवर आडवा झालों. ओव्हरकोट अंगावर घेऊन मी खाटेवर पडलों खरा; पण झोंप कसची येते? त्या ओव्हरकोटानें थंडी मुळींच थांबेना; सारखी हुडहुडी भरत होती. पायांतले बुट काढले होते. पण पाय फार गार पडले म्हणून पुनः बुट घातले. पण काय! येरे माझ्या मागल्या! मला ती रात्र थंडीत कुडकुडत काढावी लागली; शिवाय मध्यरात्र होऊन गेली तो यात्रेकरूंची गडबड, बोलणीं व हांकाहांक ऐकूं येऊं लागली. कारण या शिखरावर चढण्याचा सररहा प्रघात म्हणजे रात्रभर शिखरावर चढत राहून, उजाडण्यापूर्वी माथ्यावर पोहोंचणे हा होय. एकदम व एका दमांत सर्व चढाव चढणें कदाचित् कठीण जाईल व एकदां झालेलें छातीचें दुखणें उमटेल ही माझ्या मनांत दहशत होती; म्हणून मी स्वतंत्र मोटारकार करून पायथ्याला लवकर येऊन दुसऱ्या टप्यावर आदले रात्रीं आलों होतों. जरी मला रात्रभर झोप लागली नाहीं तरी खाटेवर पडल्यामुळे व सहा तास पायांना विश्रांति मिळाल्यामुळे मला पहांटेस हुशारी वाटली. तेव्हां मी अडीच वाजतांच उठलों व बुटीवाल्याकडून चहाचा एक गरम पेला तयार करविला. पेलाभर चहा घेऊन मी पावणे तीन वाजतां तिसरा टप्पा चढू लागलों. हा शिखराचा टप्पा मात्र फार बिकट, ऊरफोडी व जीवजाई आहे यांत शंका नाहीं. आतां बहुतेक उभ्या जिन्यासारख्या पायऱ्या लागत होत्या; कांहीं ठिकाणीं तर खडकांत बारिक बारिक सबंद पायसुद्धां न राहील इतक्या लहान पायऱ्या खोदलेल्या होत्या. त्यांवरून जाणें फार धोक्याचें वाटलें यांत शंका नाहीं. अशा बिकट व खडकी खोदलेल्या पायऱ्यांच्या ठिकाणीं लोखंडी कठडा केलेला आहे खरा; पण तो जुना कठडा; त्यावर भार टाकणें धोक्याचेंच. तेव्हां उत्तम व सुरक्षित उपाय म्हणजे मनुष्यानें आपली वानरवंशी वृत्ती अंगिकारणें होय. मी तोच उपाय योजला हें सांगावयास नको. याप्रमाणें हातापायांनीं चढत कसाबसा दोन तासांनीं मी एकदांचा शिखराच्या माथ्यावर आलो. तेथें आधींच पुष्कळ यात्रेकरू आले होते व त्यांनी धुम्या पेटविल्या होत्या. तेव्हां त्या धुम्यांजवळ मी जाऊन बसलों. बाकी चढण्याच्या श्रमानें अंगांत बरीच उष्णता आल्यामुळें खाली बुटींत जितकी थंडी वाजली तितकी येथें थंडी वाजली नाहीं.
लंकेंत यावयाचा बेत केल्यापासून ॲडॅम्स पीक वर जावयाचें असा मी मनाशी निश्चय केला होता; अर्थात् माझ्या पूर्वीच्या छातीच्या दुखण्यामुळे येवढ्या उंचीच्या शिखरावर चढतांना केव्हांही दम लागूं द्यावयाचा नाहीं अशीही पण मी मनाशी खूणगांठ घालून ठेविली होती. त्याप्रमाणें म्हणण्यासारखा त्रास न होतां मी या शिखरावर सुखरूप येऊन पोहोंचलों म्हणून माझ्या मनाला विलक्षण समाधान वाटलें. आज आपण एक दिव्यच केलें असें मला वाटलें.
थोडी विश्रांति घेतल्यावर मी येथल्या बुद्धाच्या पावलाचें दर्शन घेतलें व यात्रेकरूंच्या तेथें दिसून आलेल्या रिवाजाप्रमाणें गुडघे टेकून मी तीनद मस्तक त्या पावलांवर ठेवलें. श्रीपादशिखर हें या शिखराचें बुद्धधर्मी नांव होय. कारण गौतमबुद्ध सीलोन बेटाला तीनदा आले व आपल्या येण्याचें प्रत्यक्ष प्रमाण म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा या शिखरावरील खडकावर आपल्या पावलाची प्रतिमा उठविली अशी बुद्धधर्मी लोकांची दृढ भावना व श्रद्धा आहे. म्हणूनच हें शिखर इतकें पवित्र गणले जाऊन तें बुद्धधर्मी लोकांचें एक प्रमुख यात्रास्थान बनलें आहे. या शिखरावर मोठा पठार मुळींच नाहीं. शिखराचे माथ्यावर सहासात फुट उंचीचा व सात आठ फूट लांब रुंद असा एकसंधी सपाट खडक आहे. या सपाट खडकावर चार पांच फूट लांबीची व दीडदोन फूट रुंदीची पायाच्या पाऊलाची ओबडधोबड आकृति आहे. त्यावर छोट्याशा मंडपाप्रमाणें चारी बाजूंनी सर्वस्वी खुली अशी लहान इमारत बांधलेली आहे. खडकाला एका बाजूनें जाण्यास व दुसऱ्या बाजूनें परत येण्यास पायऱ्या केलेल्या आहेत. या खडकाचे सभोवार सात आठ फूट रुंदीचा प्रदक्षिणामार्ग आहे व त्या सभोवार छातीभर उंचीचा भिंतीचा कठडा आहे. यामुळे इतकें उंच व इतकें संकुचित हे ठिकाण आहे तरी येथें भय वाटत नाहीं. पावलाच्या आकृतीचें दर्शन घेण्यास येथें कोणास मज्जाव नाहीं; येथें पंड्या सारख्यांचा त्रास नाहीं; येथें सर्वांना मुक्तद्वार आहे. फक्त सर्व बुद्ध देवळांना जो नियम सररहा व सक्त रीतीनें लागू आहे तो नियम येथें पाळावा लागतो; तो म्हणजे पायऱ्यांयांचे खालीं पादत्राण व शिरस्त्राण अशीं दोन्हींही काढून ठेवावी लागतात. बौद्ध यात्रास्थानें मुक्तद्वारें ठेवण्यांत बुद्धधर्माचा हा केवढा तरी उदारपणा आहे असें हें स्थान व बुद्धधर्माचीं इतर देवळें पाहून माझ्या मनांत आलें. लागलीच आमच्या हिंदु धर्मीत या मंदिर प्रवेशासंबंधी काय रणें माजली आहेत असा विचार मनांत आला. धर्माच्या बाबतींतील आपली संकुचित व कोतीवृत्ति टाकून हिंदुधर्मानें बुद्धधर्माचें उदार धोरण स्वीकारले पाहिजे तरच हल्लींच्या विचारजागृतीच्या व समानहक्काच्या भावनेच्या काळांत हिंदूधर्मीचा निभाव आहे; नाहींतर या धर्मातील एक मोठा वर्ग कालेकरून त्या धर्माला पारखा होईल असें माझ्या मनांत आलें.
श्रीपादशिखरावरील पहिलें काम बुद्धाच्या पावलाचें दर्शन घेणें हें उरकण्यास हिंदुधर्माच्या देवदर्शनाप्रमाणे वेळ लागत नाहीं किंवा यातायात पडत नाहीं. अर्थात् तें काम मी तेव्हांच उरकलें. मग येथलें तितकेंच महत्त्वाचे किंबहुना अधिक महत्त्वाचें व अधिक आश्चर्यकारक काम म्हणजे येथला सूर्योदय पाहणें हे होय. या कामाकडे माझे व इतर यात्रेकरूंचे डोळे सकाळच्या सहा वाजल्यापासून लागले. आम्हीं सर्व मंडळीं पूर्वदिशेच्या भिंतीशीं उभी राहून सूर्योदय केव्हां होतो तें पहाण्यास टपून बसलो. रात्र- नव्हे आतां उजाडता दिवस- प्रतिपदेचा होता. अर्थात् पश्चिम दिशेच्या क्षितीजाकडे चंद्र गेला होता; प्रथम त्याचा प्रकाश चकचकीत पडला होता व तो सतेज दिसत होता. इकडे साहाचे सुमारास पूर्वदिशेस किंचित् तांबूस अशी बारिक धार दिसूं लागली. क्षणोक्षणीं ती लांबच लांब व थोडीशी रुंद होत चालली; तोंच इकडे चंद्र निस्तेज होत चालला व त्याचा प्रकाश मंद होत चालला. यावेळी मला कालिदासाच्या एका प्रसिद्ध श्लोकाची आठवण झाली. कालिदासानें वर्णन केलेला चन्द्रसूर्याचा एकदम अस्तोदय मी त्यावेळी पहात होतों. पहातां पहातां पूर्वेकडे तांबड्या रंगाऐवजी सोनेरी पिवळ्या रंगाची किनार क्षितिजावर दिसूं लागली. दूरवरचे ढग तांबडेलाल दिसूं लागले व सर्वत्र भराभर प्रकाश बाहूं लागला; चन्द्र जास्त जास्त निस्तेज व निष्प्रभ होत चालला. इतक्यांत पिवळ्या रंगाला पांढरटपणा येत चालला व शुभ्र प्रकाश वाढत चालला. आतां तांबडा पिवळा रंग जाऊन शुभ्र पांढरा चकचकीत रंग होत चालला व सूर्याची सोनेरी रंगाची कोर दृष्टीस पडली. तेव्हां सर्व मंडळींचीं मनें आश्चर्यानें व आनंदाने भरून आली व सर्व मंडळींनीं कवाईती पलटणींतील शिपायाप्रमाणें सक्तीनें नव्हें पण आपखुषीनें सूर्यनारायणास हात जोडून नमस्कार केला; तोंच ती सूर्याची सुवर्णरंगी कोर मोठी होऊन सबंद सूर्यबिंब क्षितिजाच्या वर आलें. त्यानें सर्व आकाश व पृथ्वी प्रकाशमय करून टाकली. सूर्यबिंबालाही पांढराशुभ्र रंग आला; त्याचेसभोंवार निळसर असें वलय दिसूं लागलें; पुढें सूर्य बिंबही नीलवर्ण झालें! मग सूर्य बराच वर आला व त्याचेकडे दृष्टि देणें कठिण होऊं लागलें. या उंच ठिकाणावरून सूर्योदयाचा देखावा विलक्षण दिसतो यांत शंका नाहीं. अरुणोदयापासून सूर्योदयापर्यंत व नंतरही कांहीं काळपर्यंत क्षणोक्षणी क्षितिजावर, आकाशांत व पृथ्वीवर जो रंगपालट होतो व सूर्यबिंबाच्या बारिक कोरीपासून तो पूर्ण बिंब क्षितिजावर येईपर्यंत त्या सूर्याच्या रंगांत होणारे पालट आश्चर्यकारक आहेत यांत संशय नाहीं. काय तो अद्वितीय देखावा! त्रिंकोमालीस बंगालच्या उपसागरामधून होणारा सूर्योदय मी पाहिला होता. तो देखावाही प्रेक्षणीय आहे खरा. पण श्रीपादशिखरावरून दिसणारा सूर्योदयाचा देखावा अद्वितीय आहे. याचे कारण काहींही असो. सात हजार फूट उंचीवरून दाट व गर्द रानानें व्याप्त टेकड्यांच्या पलीकडून तो सूर्योदय आपण पाहतों म्हणून हे विलक्षण रंगपालट त्या ठिकाणाहून दिसत असावे. येवढी गोष्ट खरी कीं श्रीपादशिखरावरून पाहिलेला हा सूर्योदय आमरणांत माझ्या स्मरणांतून जाणार नाहीं.
सूर्योदयाचा दिव्य देखावा पाहिल्यावर माझें तेथलें कार्य संपलें. म्हणून मी साडेसहा नंतर त्या शिखरावरून खाली उतरूं लागलों. चढतांना जितके श्रम व त्रास पडला तितके श्रम व त्रास आतां झाला नाहीं. मात्र आतां शरीराचा तोल संभाळणें व बिकट घसरड्या पायऱ्यांवरून संभाळून जाणे आवश्यक होतें. त्याप्रमाणें काळजीपूर्वक व तोल संभाळून उतरल्यामुळे मला डलहौसी गिरणी नजीक येण्यास बारा वाजले. आदले दिवशी ठरल्याप्रमाणें मोटारवाला १ वाजतां तेथें आला व मग लागलीच मी हॅटनला एका तासानें परत आलों. मग तेथून पुढील दृश्यदर्शनास दुसरे दिवशीं नऊ वाजतां निघालों.
लंका बेट विषुववृत्ताच्या नजीक असल्यामुळे एकंदरीत ऊष्ण प्रदेशांत मोडतें. ज्या कोलंबोच्या हवाशीरपणाबद्दल युरोपियन प्रवाशी मोठी तारीफ करतात तें कोलंबो बंदर व शहर पुष्कळ वेळां फार उकाड्याचें ठिकाण वाटतें. परंतु लंका बेट समुद्र-वलयांकित असल्यामुळें येथें थोडा थोडा पाऊस थोड्या थोड्या अंतराने वर्षभर पडतो, म्हणून जमिनीवर सदा हिरवळ उगवलेली असते. पाण्याच्या विपुलतेमुळे बेटांत झाडी पुष्कळ आहे. या दोन कारणांनी लंका बेटाच्या विषुववृत्ताच्या नजीकपणामुळे उत्पन्न होणारी उष्णता व गरमी कमी होते यांत शंका नाहीं. शिवाय, लंका बेटामध्यें चार हजार पासून सात हजार फूट उंचीचे प्रांत व पठार असल्यामुळे असल्या उंचीवरच्या भागांत शीतल निवासस्थानें बनवितां आलीं आहेत. अशा शीतल निवासस्थानांतील दोन प्रख्यात स्थळांचें वर्णन या प्रकरणांत करण्याचा विचार आहे. ज्याप्रमाणें लंकेंतील प्रेक्षणीय स्थळांचा मुकुटमणी म्हणजे श्रीपादशिखर त्याप्रमाणें शीतलनिवासस्थानांचा मुकुटमणी म्हणजे न्युवारा एलिया किंवा प्रवाशांच्या आवडीचें नांव न्युरेलिया हे होय. तेव्हां त्याचें प्रथम वर्णन करणें योग्य होईल. माझ्या दृश्यदर्शनाच्या क्रमांतही मी तें निवासस्थान प्रथम पाहिलें.
मागच्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे श्रीपादशिखर पाहून मी तारीख ३१ जानेवारी रोजी दोन प्रहरीं हॅटन या स्टेशनला आलों. श्रीपाद- शिखर पाहण्यांत फार फाजील खर्च झाल्यामुळे मी थोडी काटकसर करून स्टेशनच्या सेकंड क्लास वेटिंग रूम मध्येच ती दुपार, रात्र व सकाळ इतका वेळ काढला. सिलोनमध्यें सेकंड क्लास प्रवाशांना अशा तऱ्हेनें राहतां येतें हे एक. शिवाय, लंकेंतील सुशिक्षित लोकांप्रमाणे रेल्वेचे नोकर प्रवाशांच्या सोयीकडे पाहणारे असल्यामुळे स्टेशनमास्तरानें मला याप्रमाणे राहण्याची परवानगी दिली. इतकेंच नाहीं तर मी हॅटन गांव पहाण्यास गेलों असतां माझ्या सामानाचा एक बोजा (या दुसऱ्या पर्यटनाकरितां मी सुटसुटीत असा सामानाचा एकच बोजा बरोबर घेतला होता) मास्तराने आपल्या ऑफिसांत ठेवून घेतला. हॅटन गांव बरेंच मोठे आहे. तें चार हजार फुट उंचीच्या डोंगरावर वसलेलें असल्यामुळे एक प्रकारें शीतलनिवासस्थानासारखें आहे.
ता. १ फेब्रुवारी सन १९३४ रोजी सकाळच्या नऊ पंचावनच्या आगगाडीनें मी न्युवारा एलिया या शीतलनिवासस्थानास जाण्यास निघालो; हॅटनपेक्षां न्युवारा एलिया हे दोन हजार फुटांनी उंच आहे. हॅटनपासून न्युवारा एलिया अवघें २७ मैल आहे. पण या सत्तावीस मैलांत आगगाडी दोन हजार फूट वर चढते. अर्थात् हा सर्व उंच डोंगराळ प्रदेश आहे. पण याची मौज ही की हा सर्व प्रदेश चहा, रबर इत्यादि उत्पन्नाच्या पिकांनी पूर्णपणे व्यापलेला असून जिकडे तिकडे चहाच्या गिरण्या, राहण्याचे बंगले व मजुरांच्या चाळी सारख्या दृष्टोत्पत्तीस येतात. हा इतका उंच प्रदेश आहे तरी येथें पाण्याची विल क्षण विपुलता आहे. नदी नाले व पाटबंधारे सारखे धों धों वहातांना दिसले. हॅटन स्टेशन सोडलें की लागलीच एक मोठा बोगदा लागतो व आगगाडीच्या डाव्या बाजूस मोठा डोंगर व उजव्या बाजूस वस्तीने गजबजलेली दरी दिसते. या सर्व भागांतून आगगाडी जातांना एकदां डाव्या हातास तर एकदां उजव्या हातास (रस्त्याला अशी विलक्षण वळणे आहेत) ॲडॅम्स पीक सारखे दिसत असतें. तलेवाकेले नांवाच्या स्टेशनच्या जरा आधी आणखी एक मोठा बोगदा लागतो. तलेवाकेले हे स्टेशन हॅटनच्या दोनशे फूट खाली आहे; पण पुढचें स्टेशन वाटेगोडा हें तलेवाकेलेच्या थेट उत्तरेस असून चार मैलांत आगगाडी पांचशे फुटांच्या उंचीवर चढते. याच्या पुढचें स्टेशन


न्युवारा एलिया हें शीतलनिवासस्थान एका पर्वताच्या अरुंद पण लांबट अशा पठारावर वसलेलें आहे. त्याचे उत्तरेस व दक्षिणेस अशा दोन डोंगरांच्या रांगा पूर्वपश्चिम दिशेनें समांतर गेलेल्या आहेत. या सर्व पर्वतराजी विलायती वृक्षांनी गर्दछाय झालेल्या आहेत. हे निवासस्थान छोटेखानी आहे. पण येथली रचना व देखावा शीत कटिबंधांतला आहे. येथें लंका बेटाचे विशिष्ट वृक्ष तर औषधाससुद्धां मिळावयाचे नाहींत. येथें नारळी पोफळी नाहींत; येथें केळीचें नांव नाहीं; येथें पालमिरा पाम नाहींत; भाकरीची झाडें नाहींत; ताडपत्री ताड नाहींत उष्ण कटिबंधाचें चिन्ह येथें कांहींच नाहीं. येथें सायप्रस, फर, पाईन, गम, कझॅरिना, युकॅलिप्टस इत्यादि वृक्ष अतोनात आहेत. येथें गुलाबाची रेलचेल आहे; काश्मीरप्रमाणें गुलाबांच्या कुंपणी मीं फक्त या ठिकाणी पाहिल्या. येथें नाना रंगांच्या लिली नांवाच्या वेली व फुलझाडें आहेत; येथें नाना रंगी क्रोटन आहेत; विलायती फुलझाडें आहेत; येथें सर्व भूमिभाग हिरव्या हिरव्यागार गवतानें सुशोभित झालेला आहे. येथें मोठें गोल्फ मैदान आहे. येथें एक छोटा पार्क आहे. पण त्याची रचनाही विलायती पार्कप्रमाणें आहे. पार्कच्या सभोंवार एक वृक्षराजी; मध्येमध्यें फुलझाडांच्या ताटव्यांनी युक्त अशा खुल्या हिरव्यागार गवताच्या जागा; मधून मधून उंच उंच वृक्षांच्या राई; कारंज्यानें युक्त व कमलवेलींनीं आच्छादलेली पुष्करणी; छोटेसें सर्पाकार सरोवर व सर्व पार्कभर तांबूस वाळूच्या खडीच्या पायवाटा अशी रचना या पार्कची आहे. लंडनमधील एखादा छोटा पार्कच पहात आहों कीं काय असा मला भास झाला. येथें हँप्टन कोर्टपार्टच्याप्रमाणे छातीभर लताच्या सुंदर कुंपणानें बनविलेला छोटासा चक्रव्यूह आहे. पण या चक्रव्यूहाला चार फेरे असतील नसतील; यामुळें या चक्रव्यूहांत सांपडून अडकून बसावयाची मुळींच धास्ती नाहीं; एक दोनदां प्रयत्न केला कीं परतावयाचा मार्ग सांपडून मनुष्य चक्रव्यूहाबाहेर येतो. येथें छोटेसें शर्यतीचें मैदान आहे; पण त्याचा घेर फारतर एका मैलाचा असेल. येथें एक सरोवर सुद्धां आहे. पण कोठें कँडीचें नयन- मनोहर सरोवर व कोठें हे सखल लांबट जागेंत सांठवलेल्या पाण्याचें सरोवर याचें सभोंवार फिरण्यास पायवाट नाहीं; याच्या बाजू बांधलेल्या नाहींत; याच्या दरेस शेवाळ, लव्हाळा व गवत वाढलेलें आहे. सारांश न्युवारा एलियाचें हें सरोवर पर्वतराजीच्या दरींत सहज साधलेलें साधें सरोवर आहे. त्याला मुद्दाम बांधलेल्या, नक्षीदार विटांच्या कठड्यानें सुशोभित केलेल्या, सभोंवार सुंदर पायवाटा ठेवलेल्या, व कँडीचा अद्वितीय अलंकार बनलेल्या सरोवराची सर कशी येणार? न्युवारा एलियाचें हें सरोवर नसून एक महाबळेश्वराच्या वेण्या तलावासारखा दरींत साधलेला तलाव आहे.
ज्याप्रमाणें पुण्यांतील उदबत्त्याचे दुकानदार 'पुण्यांत म्हैसूर' अशी जाहिरात देतात; त्याप्रमाणें न्युवाराएलियाचें 'लंकेत इंग्लंड' या दोन शब्दांत अन्वर्थक वर्णन करतां येईल. कारण येथे इंग्लंडसारखी थंडगार हवा आहे.
दुसरे दिवशीं सकाळीं न्याहारी करून विंडसर हॉटेलचे एका दिवसाचें साडेतीन रुपयांचें बिल चुकतें करून व सामानाचा बोजा रा. थंबी पिल्ले ओव्हरसीअरच्या माणसाच्या स्वाधीन करण्यास सांगून मी हगाला बाग पाहण्यास मेल मोटारबसनें आठ वाजतां निघालों. चार मैलांवर उजव्या बाजूस डोंगराच्या उतारावर अशोक वृक्षाची मोठी राई दिसली. डाव्या हातच्या ओढ्यामध्ये काळसर पाण्याचा छोटासा डोह दिसला.
येथल्या लोकांमध्यें प्रचलित असलेल्या दंतकथेप्रमाणें सीतेला रावणानें राहण्यास दिलेलें अशोकवनाचें ठिकाण हे होय. पण येथले अशोकवृक्ष आपण ज्यांना अशोकवृक्ष म्हणतो त्यासारखे मुळींच नाहींत. हे आपल्या अशोकासारखे सरळसोट वाढत नाहींत. ह्यांना आपल्या अशोक वृक्षासारखी बारिक लांबट करवती तजेलदार पानें नाहींत; हे अशोकवृक्ष कांहीं से खुजे, वांकडे तिकडे वाढणारे; पुष्कळ खांद्या असलेले पण एकंदर डौलदार दिसणारे वृक्ष आहेत; यांचीं खालच्या बाजूस किंचित् पांढरट तर वरच्या बाजूस काळसर हिरवटरंगाची जाडसर पानें आहेत; हें झाड कांहींसे कोंकणांतील काजूच्या झाडासारखें दुरून तरी दिसतें. पण या झाडाच्या फुलांची शोभा मात्र खरोखरीं अवर्णनीय आहे. या झाडांना वसंतऋतूंत फुलेंच फुलें येतात. त्यांचा रंग काळसर तांबड्या गुलाबाच्या फुलासारखा फार मनोहर आहे; पण रंगापेक्षां सुद्धां या पुष्पाची रचना विलक्षण नवलाची आहे. हें पुष्प नव्हें तर हा फुलांचा सुष्टिसुंदरीनें आपल्या नाजुक हातांनीं गुंफलेला एक पुष्पगुच्छ होय. कारण हे पुष्प म्हणजे तेरा पुष्पांचा एका देठावर वाढलेला पुष्प-समुदाय होय. त्याची रचना किती आश्चर्यकारक! या पुष्पाचे मधोमध एक फूल असतें व त्याचे सभोवार सहा सहा फुलांच्या दोन रांगा असतात; त्या अशा कीं मधलें फुल धरलें म्हणजे तीन तीन फुलांची एक उतरती ओळ अशा सहा ओळी होतात; म्हणजे वास्तविक तेराच फुलें या एका फुलांत असतांना आठरा फुलें असल्याचा भास होतो. या सर्व पुष्पांमिळून एकच देठ असतें व त्या देठाला दोन तीन पानें असतात. किती विलक्षण व आश्चर्यकारक ही फुलांची रचना! रावणाला सामान्य स्त्री हृदयाची उत्तम पारख असावी. कोणत्या स्त्रीला अशा अद्वितीय फुलांनी फुललेल्या उपवनांत राहण्यास आवडणार नाहीं? कोणत्या स्त्रीला हा निसर्गनिर्मित पुष्पगुच्छ आपल्या केसांच्या खोप्यांत खोवावासा वाटणार नाहीं? कोणत्या स्त्रीला या सुंदर उपवनानजीक असलेल्या सुंदर ओढ्याच्या शीतलस्पर्श व शांतजल डोहांत स्नान करणें व जलक्रीडा करणें आवडणार नाहीं? रावणाने सीतेला जेव्हां या निसर्गरमणीय स्थानांतील अशोकवनांत ठेवण्याचे ठरविलें असेल त्यावेळी त्याला खात्रीनें वाटलें असेल कीं अशा सुंदर उपवनाचा व आपल्या राजवैभवाचा मोह सीतेस आवरणार नाहीं व ती आपल्यास खुषीनं वश होईल. पण सीता काय सामान्य स्त्री पडली? येथें रावणाचा कयास चुकला. सीतेसारख्या पतिव्रता स्त्रीला रावणाच्या संपत्तीचा, त्याच्या राजवैभवाचा किंवा सुंदर व निसर्ग रमणीय निवासस्थानाचा मोह पडला नाहीं. रावणाला सीतेला सारखी प्रतिबंधांत ठेवावी लागली व म्हणूनच रामाला वानरांचे साहाय्य घेऊन अलंघ्य समुद्रावर सेतू बांधून लंकेवर स्वारी करून रावणाचा वध करून सीतेची सुटका करावी लागली. याप्रमाणे येथें उभा असतांना मला लहानपणापासून परिचित असलेलें सर्व रामायण आठवलें.
अशा तऱ्हेचे मनोहर विचारतरंग मनांत उठत असल्यामुळे मला येथला निसर्गसुंदर पण साधा देखावा फारच आवडला व येथें आल्याबद्दल मला आनंदीआनंद झाला. या आनंदामध्यें किंचित् विरजण घालणारी गोष्ट म्हणजे रामरावणाची दंतकथा ही केवळ कविकल्पना कीं काय ही कुशंका होय. पण या कुशंकेची मनांतून हकालपट्टी करून आज आपण सीता निवासस्थान- अशोक वन- पाहिले अशा मनाच्या समाधानानें मी मार्गस्थ झालों व हगाला बागेच्या फाटकाजवळ मोटारींतून उतरलों. "परत जातांना मला घेऊन जा; मी पांच वाजल्यापासून येथें तुमच्या मेल मोटारची वाट पाहात राहीन" असें ड्रायव्हरला सांगून मी त्याचें चार आण्याचें भाडें देऊन बागेत प्रवेश केला.
हगाला बाग न्युवारा एलिया निवासस्थानापासून साहा साडेसहा मैलावर आहे. तो न्युवारा एलियाच्या सुमारें पांचशे फूट खालीं आहे. तो


ता. ३ फेब्रुवारी सन १९३४ रोजी साडेबारा वाजतां मी भंडारवेला येथें येऊन पोहोंचलों. न्युवाराएलियापासून भंडारवेला तीस मैल आहे. मोटार भाडें सवा रुपाया पडलें. न्युवाराएलियापासून सतरा मैलांवर वेलीमाडा म्हणून गांव लागलें; हें न्युवारा एलियापेक्षां सुमारे हजार फुटांनी खालीं आहे. मात्र हें गांव रत्नपुरासारखें सर्व बाजूस डोंगरांनी तटबंदी केल्याप्रमाणें आहे. रत्नपुराकडे जशी रबराची, नारळी-पोफळी-केळीची खूप लागवड दिसली तशी इकडे लागवड दिसली नाहीं. इकडल्या डोंगरांचा बराचसा भाग आपल्या इकडच्या डोंगराप्रमाणें भुरट्या रानानें व्याप्त दिसला. मात्र या भागांत घाटाची भात शेती बरीच पहाण्यांत आली. ती भंडारवेलापर्यंत सारखी लागत होती. भंडारवेला हे शीतलनिवासस्थान हॅटनप्रमाणें चार हजार फूट उंच आहे. न्युवारा एलियापेक्षां हे अगदी निराळें आहे. येथें सपाटी मुळींच नाहीं; गांव दोन टेकड्यांच्या रांगांवर वसलेलें आहे. त्या मधून बाडुला शहराकडे जाणारा रस्ता पूर्व दिशेकडे उतरत गेला आहे. अशी गांवाची रचना असल्यामुळें, भर गांवांत सुद्धां घाटाची भातशेती आहे. या शीतलनिवासस्थानाच्या दोन्ही बाजूंस मोठमोठे डोंगर आहेत; त्यांवर मात्र उंच उंच वृक्ष पुष्कळ आहेत; विलायती झाडें, वेली व फुलझाडें बरीच आहेत; पण न्युवाराएलियाप्रमाणें हें शीतलनिवास स्थळ निर्भेळ विलायती नाहीं. येथें थोड्याफार केळी, नारळी पोफळी यांच्या बागा दृष्टीस पडतात; भातशेतीही दिसते. त्यामुळे हें उष्ण कटीबंधांतील लंका बेटांतील शीतलनिवासस्थान आहे हें पदोपदी प्रत्ययास येतें. या स्थानाला 'लंकेंत इंग्लंड' असें म्हणतां येणार नाही; फार तर 'लंकेंत अर्धहिस्सा इंग्लंड' असें या निवासस्थानाचें वर्णन करतां येईल. न्युवाराएलियाइतकी येथें थंडी किंवा गारवा नाहीं. तरी पण येथली हवा निरोगी व शीतल आहे यांत शंका नाहीं. न्युवाराएलिया हें युरोपीयनास जास्त प्रिय आहे; तर भंडारवेला लंकावासीयांना प्रिय आहे. कारण येथें लंकेची थोडीफार चिन्हें दृष्टोत्पत्तीस येतात.
मोटारच्या समोर असलेल्या हॉटेलांत मीं सामान ठेवलें व चहा घेऊन लागलींच बाहेर पडलों. प्रथम बाडुला रस्त्यानें दोन तीन मैल गेलों. हा रस्ता खोल खोल उतरत जातो; रस्त्याचे बाजूनें लहानशी नदी जाते. तिच्या दोन्ही बाजूंस घाटाची भातशेती दिसली. येथें कांहींसा आंबोली (सावंतवाडीकरांचें शीतलनिवासस्थान) सारखा देखावा दिसतो. परत आल्यावर थोड्या वेळानें मी रेल्वे-रस्त्याचे खालून. बोगदी पायवाट केली आहे तिनें उत्तरेकडच्या टेकड्यांवर असलेले नळाच्या पाण्याचे तलाव पहाण्यास गेलों. हे शहरापेक्षां तीनशें फुट उंचीवरच्या टेकडीवर आहेत. येथून उत्तरेखेरीज बाकी सर्व बाजूंचा देखावा मोठा मनोहर दिसतो. नंतर खालीं येऊन पुनागली या गांवाकडे उत्तर दिशेनें जाणाऱ्या रस्त्यानें चालत गेलों. हा चढावाचा रस्ता असून, त्याला विलक्षण खोल खोल गेलेली अशीं वाकणें आहेत. या रस्त्यावरील वैद्यकीय कचेरीवरून शहराचा उत्तम देखावा दिसतो. परत येतांना लांब लांब वाकणाच्या दूर रस्त्यानें न परततां मी एका टेकडीवरील पाऊलवाटेनें खालीं उतरलों. ही वाट मात्र फारच उभी व घसरडी होती. यामुळे एकदोन ठिकाणीं चतुष्पादत्व पत्करावें लागलें. पण भरकन् रेल्वेरस्त्यावर शहरांत आल्यानें या पाऊलवाटेने येण्याची मौज वाटली. नंतर मी भंडारवेला गांव पहाण्यास गेलों. गांव कसचें तें! मुख्य बाडुला रस्त्यावर काय ती गांवाची बाजारपेठ आहे; बाजूला गेलें कीं, तुरळक तुरळक बंगले व त्यांचे लांबच लांब खासगी रस्ते लागतात! नंतर एंजिनीयरिंग खात्याच्या कचेरीकडे वळलो. ही कचेरी पाण्याच्या तलावाप्रमाणे एका टेकडीच्या टोकाला सपाट जागा करून तेथें बांधलेली आहे. येथून दक्षिण दिशेला असलेला हापुतलेचा प्रचंड पर्वत व त्या पर्वतावरून खालीं सखल व सपाट प्रांताला जाणाऱ्या रस्त्याचें जणूं कांहीं प्रवेशद्वार अशी खिंड दिसत होती. येथून दिसणारा देखावा फार आकर्षक आहे. पण दुरून दिसणाऱ्या या प्रवेशद्वारांतून मला दुसरे दिवशीं सकाळीं जावयाचें आहे हे मनांत येऊन हा दुरूनचा देखावा आधी दृष्टीसमोरून गेला हें चांगलें झालें असें मला वाटलें. याप्रमाणें भंडारखेला गांवाच्या चारी दिशांकडील रस्ते व देखावे मीं पाहिलें. बाकी दुसरें दर्शनीय तें येथें काय असणार?
दुसरे दिवशी सकाळी सात वाजतां मी पुढच्या दृश्यदर्शनाकरितां मार्गस्थ झालों.
आतांपर्यंत केलेल्या लंकावर्णनावरून लंकाबेटाचें सामान्य स्वरूप वाचकांच्या लक्षांत आलें असले पाहिजे. तरी पण त्या स्वरूपाचें एकदां सिंहावलोकन करणें वावगे होणार नाहीं. लंकाबेट हें पेरूच्या आकाराचें बेट आहे. त्याची दक्षिणोत्तर लांबी मातर ते कंकेसंतुराई गांवापर्यंत सुमारें तीनशें साडेतीनशे मैल आहे; तर पूर्वपश्चिम रुंदी- कोलंबोपासून पोटुव्हिल गांवापर्यंत सुमारें दोनशें मैल होईल. या बेटाच्या भौगोलिक रचनेचा हा विशेष आहे कीं, बेटा सभोवारच्या किनाऱ्या लगतचा भूमिभाग हा अत्यंत सपाट व समुद्र सपाटीपासून फक्त दहा वीस फुटाचे उंचीवर असलेला सखल भाग आहे; तो रेताड व तांबड्या मातीचा असल्यामुळें सुपीक आहे. शिवाय, बेटाच्या निरनिराळ्या प्रांतांत दरसाल पन्नास ते दीडशें इंचपर्यंत पाऊस पडतो व तो वर्षाचे निम्मे दिवसांत पडतो. बेटाच्या रुंद भागांत व मध्याच्या बऱ्याच खालीं दक्षिणोत्तर शंभर मैल व पूर्वपश्चिम ऐशी मैल असा भूमिभाग मोठमोठ्या पर्वतराजींनीं व पर्वतपठारांनी व्यापलेला आहे. या भागाला डोंगर- पठार (up country) म्हणतात. तो भाग उत्तरेस मातले शहरापासून दक्षिणेस हापुतले शहरापर्यंत पसरलेला आहे; तर पश्चिमेस रामबुखानापासून पूर्वेस बाडुलापर्यंत पसरलेला आहे. हल्लींची चहा, रबर, कोको, कॉफी इत्यादि पिकांची लागवड याच डोंगरपठारी भागांत होते. हा डोंगरपठाराचा भाग लंकेच्या अर्वाचीन युरोपियन सुधारणेचा केन्द्र आहे, तर बेटाच्या किनाऱ्यालगतचा सपाट सखल भाग हा लंकेच्या जुन्या सुधारणेचा केन्द्र होता. दोन हजार वर्षेपर्यंत हा केन्द्र मातलेच्या उत्तरेच्या सपाट प्रदेशांत होता. त्याकाळी डोंगरपठाराचा भाग हा दुर्गम व दुर्लघ्य असून दाट अरण्यानें व्याप्त होता व रानटी हिंस्र पशूंनी गजबजलेला होता. अर्थात् त्या काळीं तो निर्जन व बिनलागवडीचा जंगली प्रदेश होता; तर सपाटीचा प्रदेश हा दाट मनुष्यवस्तीचा व पूर्ण लागवडीस आलेला प्रदेश होता. पण हल्लीं या दोन स्थितीची उलटापालट झाली आहे. डोंगर पठार हे पूर्ण लागवडीस आलेले व शहरें, गांवें व खेडी यांनी गजबजलेले दळणवळणाच्या साधनांनी संपन्न असे भाग बनले आहेत; तर पूर्वीचे सपाट सुपीक पूर्ण लागवडीस आलेले व दाट वस्तीचे भाग निर्जन जंगलें बनले आहेत. अर्वाचीन पिकांच्या शोधानें काय विलक्षण स्थित्यंतर घडून आलें आहे पहा! जुन्याकाळी लंकेच्या दक्षिणच्या सपाट व सुपीक प्रदेशामध्यें एका सिंव्हली राजानें लंकेच्या आग्नेय (पूर्व-दक्षिण) टोंकास एक राजधानी स्थापन केली. तिचें नांव तिसामहाराम लोकांमधलें प्रचलित नांव तिसा- हें होय. त्या जुन्या राजधानीच्या ठिकाणाचे व तिकडे जातांना लागणाऱ्या प्रांताचें वर्णन या प्रकरणांत करण्याचा मानस आहे.
मागच्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें तिसामहारामास जाण्याकरितां मी भंडारवेला या शीतलनिवासस्थानाहून ता. ४ फेब्रुवारी सन १९३४ रोजीं सकाळीं सात वाजतां निघालों. भंडारवेलापासून आदल्या दिवशीं दुरून पाहिलेलें हापुतलें गांव सात साडेसात मैलच आहे. पण भंडारवेला शीतलनिवासस्थानापासून हापुतलेपर्यंत चढावाचा रस्ता आहे. कारण हापुतले भंडारवेला गांवाच्यापेक्षां सातशे फुटाच्या अधिक उंचीवर आहे. भंडारवेलापासून सात आठ मैलाचा हा प्रांत पर्वतपठाराचा व दऱ्याखोऱ्यांचा असून, तो हॅटन ते ॲडम्स पीक पर्यंतच्या प्रांताप्रमाणें फार सुपीक व चहाच्या मळ्यांनीं शोभायमान झालेला भाग आहे. जिकडे तिकडे सतेज हिरवीगार चहाचीं झुडपेंच झुडुपें दृष्टीस पडतात. न्युवाराएलिया व हापुतले या ठिकाणीं लंकेतील सर्वांत उत्तम चहा पिकतो. याला पर्वतपिकी चहा (high-grown tea) म्हणतात. हा चहा चार हजार ते सहा हजार फूट उंचीच्या पर्वतावर पिकतो; दोन हजार ते चार हजार फूट उंचीच्या डोंगरावर पिकणाऱ्या चहाला डोंगरपिकी चहा (middle-grown tea) म्हणतात; व एक हजार ते दोन हजार फूट उंचीच्या टेंकाडावर पिकणाऱ्या चहाला टेकाडपिकी चहा (low-grown tea) म्हणतात. लंकेतील चहाच्या अशा तीन प्रती आहेत.
हापुतले हा पठार दक्षिणेकडे किंचित् चढता आहे; अर्ध्या पाऊण तासांत आम्ही हापुतले रेल्वे स्टेशनशीं आलों व तें वलांडलें. पुढें हापुतलेची छोटी बाजारपेठ लागली. तरी आपण सपाट जागीं आहों असें वाटे. पण बाजारपेठेच्या टोंकाशीं आलों तों आश्चर्यानें मन थक्क होई असा अद्वितीय देखावा दिसला. कारण हापुतले गांव हें पांच हजार फूट उंच असलेल्या पर्वताच्या अगदीं कडेवर वसले आहे. या टोकाला आल्याबरोबर खालीं खोल अफाट व सपाट जणूं कांहीं हिरवा समुद्र असा हिरवाहिरवागार जंगलमय दक्षिण प्रांत एकदम दृग्गोचर होतो व मनुष्य आश्चर्यानें तोंडांत बोटें घालतो. येथून हापुतले पर्वताच्या प्रचंडपणाचें व त्याच्या विलक्षण उंचीचे दृष्टि दिपविणारें दर्शन होतें. आपण स्वर्गाच्या कडेवर उभे असून खालीं खोल अपरंपार पाताळ पहात आहों कीं काय असा मनाला भास होतो. आपल्या हातून न कळत कांहीं पाप घडलें म्हणून देवानें आपल्याला या स्वर्गाच्या कड्यावर आणून आतां आपला पाताळांत कडेलोट करणार की काय अशी शंका व भीत मनांत उभी राहावी अशा तऱ्हेचा मोठा भीषण देखावा येथें दिसतो यांत शंका नाहीं. पण असले भीतिप्रद विचार क्षणभरसुद्धां टिकत नाहीत. उलट लंकेचा पर्वतपठार ज्याला कडुगनवा या कँडीच्या घाट माथ्यावरील स्टेशनपासून सुरवात होते, तो लांब रुंद व उंच सुपीक व युरोपीयन सुधारणेच्या साधनांनीं युक्त असा सुरक्षित व सुलभ दळणवळणाचा प्रांत आहे; आपण एका निर्धूळ काळ्या गुळगुळीत रस्त्यावर उभे आहोंत; व थोड्याच वेळांत मोटारबसनें आपण सुरक्षितपणें दक्षिणेतील सपाट प्रदेशावर जाऊं अशा प्रकारची जाणीव मनांत उद्भवते. मग भीतिप्रद विचार पार विरघळून जातात व त्यांची जागा आश्चर्य व आनंद या मनोविकारांनीं भरून जाते. माझ्या मनाची अशीच आनंदमय स्थिति झाली. येथें मी थेट तिसामहारामाला जाणाऱ्या मोटारींत जाऊन बसलों. हापुतलेपासून तिसामहारामा ही जुनी राजधानी सदुसष्ट मैल आहे. तरी मोटारचें भाडें सारें एक रुपया पडलें. पण येथून जवळ जवळ पांच हजार फुटांचा सारखा उतार असल्यामुळे मोटारबसला पेट्रोलचा खर्च पडत नाहीं. गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीनें खाली उतरण्याचें काम बिनखर्चानें होतें. या घाटानें मोटार खालीं जाऊं लागली म्हणजे डोळे फिरतात व घेरी आल्यासारखी वाटते. हा घाट महाबळेश्वर महाड घाटापेक्षांही भयंकर वाटतो. कारण, महाबळेश्वराहून कोंकणचा भाग हापूतलेपासून तिसामहारामा इतका सखल आहे खरा; पण त्या घाटानें उतरतांना प्रतापगढचा किल्ला व कोयनेची दरी (जी दोन हजार फुटांच्यावर आहे) प्रथम दृष्टीस पडतात व एक घाट. उतरून प्रतापगडाच्या डोंगरांच्या द्वारांतून बाहेर आलें म्हणजे कोंकणाचा अगदीं सखल भाग दिसूं लागतो. पण हापुतले घाट हा सव्वीस मैलांचा घाट सारखा उताराचा आहे; त्याला मध्यें डोंगर आडवे आलेले नाहीत; हापुतलेसारखा देखावा महाबळेश्वराच्या आर्थर सीट वरून दिसतो खरा. हापुतले बाजारच्या टोंकापासून मोटरबस पावणे आठ वाजता निघाली. त्या काळ्याभोर गुळगुळीत रस्त्यावरून आम्ही भराभर खालीं उतरत चाललों. एकशें तेरा, बारा, अकरा असे मैलांवर मैल दृष्टीसमोरून जात होते; पुढें आमचा रस्ता पर्वताच्या डाव्या बाजूस गेला. उजवीकडचा रस्ता रत्नपुरावरून कोलंबो शहराला गेला हे मला मागाहून कळलें. प्रथम मला वाटलें कीं तो रस्ता एखाद्या चहाच्या मळ्याला गेला असावा; पण या डाव्या रस्त्याला वळल्यानंतर पाहतों पुन्हां एकशेंनऊ दहा, आकरा, बारा, असे मैल लागू लागले. या मैल-मोजणीचा मला मोठा अचंबा वाटत होता. पण इतक्यांत त्या मोटारबस कंपनीचा चेकर (तपासनीस) मोटारमध्यें आला. (तिसामहारामाला जाणारी मोटारबस ही एका कंपनीच्या मालकीची असून, त्या कंपनीच्या एकंदर १०० च्या वर मोटार बसेस असून त्यांच्या मोटारी पुष्कळ रस्त्यांवर चालू असून कंपनीचे तपासनीस आहेत असें कळलें.) या तपासनीसांच्या पाहुणचारी स्वभावामुळे तिसामहारामास मला कंपनीच्या कचेरीत रात्रीं राहावयास सांपडलें. त्यानें मैलमोजणीचें कोडें उलगडलें. त्यानें सांगितलें कीं, कोलंबोकडून हापुतलेकडे मैल मोजीत आले आहेत; त्यामुळे हातपुलेकडून खालीं येतांना पहिले चार मैल कमी कमी होत जातात; तिसामहारामाकडे जाणारा रस्ता १०९ मैलांवर फुटतो म्हणून १०९ पासून तिसामहारामाकडे मैलांची वाढती मोजणी झाली आहे. हापुतलेच्या दक्षिणेकडील उतारावर चहा व रबर यांची लागवड पुष्कळ आहे; पण हा भाग तितका सुपीक नाहीं; कोसलांडे गांव हापुतलेपासून साडेतेरा मैलांवर आहे; पण इतक्यांत आम्ही दोन हजार फूट घाट उतरलों होतों. कोसलांडे हें लंकेतील अर्वाचीन युरोपीयन सुधारणेचें मागलें दार आहे. पोलग हवेला या जंक्शन स्टेशनपासून रबर, चहा, कोको या नव्या लागवडीस व त्यांच्या बरोबर आलेल्या युरोपीयन सुधारणेस जी सुरवात होते ती थेट कोसलांडे गांवापर्यंत सर्व पर्वतपठारभर चालू राहते. कोसलांडे गांव डोंगरांत आहे खरें; पण तेथें नळाचें पाणी आहे; उत्तम सीमेंट काँक्रीटची गटारे बांधलेली आहेत; आसपास चहाच्या गिरण्या, राहण्याचे बंगले व मजूरांच्या चाळी आहेत; चहाचे मळे व त्यांतील सिल्हर ओक, दडव वृक्ष, व एकंदर देखावा नव्या लागवडीचा आहे. कोसलांडे टाकल्यावर चहाचे मळे संपतात; पण अझून रबराची लागवड मधूनमधून दिसते, व रानही दिसूं लागतें. कोसलांडे गांव टाकून पांच एक मैल मोटार उतरत येते तोंच डाव्या हातास मोठा धबधबा दृष्टीस पडतो. हा धबधबा कमींत कमी दीडशे दोनशें फूट उंच अशा खडकावरून सारखा खाली पडतो; काय त्या धबधब्याचा वेग व फेसानें पांढरें पांढरें शुशुभ्र दिसणारें पाणी! हा धबधबा गोवं प्रांतांतील दुधसागरासारखा आहे असें मला वाटलें. हा धबधबा वलांडून खालीं आलों म्हणजे सपाट प्रदेश व जंगल याला सुरुवात होते; मधून मधून भातशेती लागू लागते. येथून लंकेच्या जुन्या सुधारणेचा पण हल्लीं जंगलमय निर्जन बनलेला व हिंस्र पशूंनी गजबजलेला प्रांत लागतो. वेलवाया हें गांव घाट संपल्यावर लागतें. हें गांव हापुतलेपासून सव्वीस मैल आहे. येथें थोडीशी भातशेती व केळी-नारळीचीं झाडें दृष्टीस पडलीं. येथून रस्ता सारखा सरळ थेट दक्षिण दिशेनें जातो. दोन्ही बाजूंस फार खुजें नाहीं, फार दाट नाहीं, किंवा फार विरळ नाहीं असें सारखें रान व मध्ये काळा-पांढरा तांबूस रस्ता ही माळका मैलच्या मैल लागते; रान व रस्ता यांखेरीज सर्व वाटभर दुसरें कांहीं एक दृष्टीस पडत नाहीं; नाहीं म्हणायाला कोठें कोठें झाडावरून उड्या मारणारीं वानरें भेटतात; केव्हां गुरें चरतांना दृष्टीस पडतात; व अगदी क्वचित् ठिपक्याचे हरिण पळतांना दिसतात. वर निळें आकाश, बाजूस हिरवें रान व मध्ये काळा-पांढरा तांबूस रस्ता हा तिरंगी देखावा थेट तिसामहारामा गांवचा रस्ता फुटेपर्यंत सारखा दिसत राहतो. तिसामहारामां हें गांव मुख्य रस्त्यावर नसून मुख्य रस्त्याच्या डाव्या हाताला एक तांबडसर रस्ता लागतो त्या रस्त्यावर आहे. जुनी राजधानी सन्निध आली याची पूर्वखूण व प्रसादचिन्ह असें मोठें एक सरोवर माझ्या उजव्या बाजूस दृष्टीस पडलें. दुसरे दिवशीं पुढे मार्गस्थ होतांना तर या सरोवराच्या मधून काढलेल्या रस्त्यानें आमची मोटार गेली. त्यावेळीं सरोवराचा अवाढव्य विस्तार व त्याचें निसर्गरमणीयत्व हीं प्रत्यक्ष व जवळून पाहतां आलीं. मार्गदर्शक पुस्तकावरून या सरोवराचें नांव विराविलावेवा आहे हें कळून आलें. या रस्त्यानें चार साडेचार मैल गेल्यावर एकदांचा तिसामहारामा हा गांव आला. मागें सांगितल्याप्रमाणें माझ्या निघतांच्या बेताप्रमाणें मी तिसामहारामाच्या सरकारी विश्रांतिगृहांत उतरण्यास गेलों नाहीं; तर तपासनीसाच्या सूचनेप्रमाणें मोटारबसच्या कचेरींत उतरलों. कचेरीची जागा म्हणजे बराच लांब रुंद असा सोपा होता. त्याचे मागें एक लहानशी खोली होती. तेथल्या म्यानेजरास जरी इंग्रजी बोलतां येत नव्हतें तरी तो मोठा पाहुणचारी माणूस दिसला. त्यानें मला उतरण्यास जागा व रात्रीं निजण्यास तरटाची खाट, मऊ चटई व उशी देऊन माझी राहण्याची सर्व तजवीज केली; इतकेंच नाहीं तर रात्रीचें सिंहली तऱ्हेचें भाजीभाताचें भोजन व सकाळची हॉपर्स व कॉफी यांची न्याहारी ही आपल्या खर्चानें मला दिली. मला लंकेंत सर्वत्र असा अनुभव आला कीं सिंहली लोक फार आदरातिथ्यशील असून हिंदी प्रवाशाबद्दल तर त्यांना जास्त आपलेपणा वाटतो. माझा आतांपर्यंत सुशिक्षित अर्धशिक्षित व अशिक्षित अशा सर्व दर्जाच्या सिंहली लोकांशीं संबंध आला व सर्वत्र माझें उत्तम आदरातिथ्य झालें.
मी एक वाजतांच्या सुमारास तिसामहारामास पोहोंचलों. कचेरींत इंग्रजी जाणणारा त्या कंपनीतील एक कंडकटर मला भेटला. त्यानें तिसामहाराम गांवांतील प्रेक्षणीय स्थळे दाखविण्याचे कबूल केलें. दोन अडीचच्या सुमारास आम्ही दोघांनीं एका फराळाचे दुकानीं केळी कॉफीचा फराळ केला; इतक्यांत तेथें आंबे दिसले. नवीनवाळ म्हणून दोन आंबेही विकत घेतले व दोघांनीं खाल्ले. मग आम्ही बाहेर पडलों. येथें प्रेक्षणीय स्थळ असें एकच आहे, व सुदैवानें तें राजधानी बांधल्यावेळचें आहे; तरी मोडकळीस आलेलें नाहीं; उलट त्या देवळाला त्या गांवच्या जमीनीचें कायमचें उत्पन्न असल्यामुळे देऊळ चांगल्या स्थितींत असलेले दिसलें. अर्थात् हें देऊळ म्हणजे बुद्धाचा अवशेष ठेवलेला स्तूप किंवा डागबा होय. बौद्धधर्मी डागबाचा आकार व बांधण्याची तऱ्हा अगदीं ठरलेली आहे. त्याप्रमाणें हे देऊळ आहे. याचे आवारांत पुष्कळ नारळीची झाडें आहेत; शेजारून एक मोठा पाट वहात जातो व सभोवारची सपाट जमीन हिरव्यागार भातशेतीनें भरून गेलेली आहे असा या देवळाचा मोठा मनोहर देखावा आहे. हे स्थळ प्रेक्षणीय आहे. पाटाचे पलीकडे दूर अंतरावर दुसरा एक स्तूप दिसत होता; पण तो निवळ विटामातीचा ढिगारा बनला होता व त्यावर गवत व भुरटें रान उगवलें होतें; म्हणून तें पहाण्यास मी गेलों नाहीं. वाटेने जातांना कांहीं इमारतींचे उभे असलेल खांब व घडलेल्या दगडांचे ढीग एक दोन ठिकाणीं दिसले. तेही पहाण्यांत अर्थ नाहीं; म्हणून मोठ्या तलावाचे कांठावर असलेलें सरकारी विश्रांतिगृह पहाण्यास आम्ही गेलों. हें विश्रांतिगृह तलावाच्या अगदीं कांठावर आहे. या तलावाचें नांव तिसावेसा असें आहे. या तलावाचें काम जुन्या राजवटीतील कामाप्रमाणें प्रचंड आहे. तलावाचे सभोंवार सारखी हिरवीगार झाडी दिसत होती. विश्रांतिगृहाच्या शेजारच्या उंचवट्याच्या बंधाऱ्याखालून दोन पाट दोन दिशांनीं वहात जात होते. किती तरी वेगानें पाटाचें पाणी वहात चाललें होतें. कारण तलावाचा हा भाग बराच उंचवट्यावर आहे व खालची भातशेती बरीच सखल आहेत. हें विश्रांतिगृह व तलाव पाहून परत गांवच्या रस्त्याला आलों. मग आम्ही आणखी एका मैलावर तिसावेवापेक्षांही मोठा असा दुसरा वोडावेवा नांवाचा तलाव आहे तो पहाण्यास गेलों. हा तलाव तिसामहारामाच्या दक्षिणेस आहे. त्या तलावाच्या कांठानें तिसमहारामाकडे वळलेला रस्ता थेट दक्षिणेस समुद्र कांठच्या किरिंद गांवापर्यंत जातो. तिसामहारामापासून किरिंद व समुद्र सहा मैल दूर आहे असें कळलें. अर्थात् समुद्रापर्यंत जाऊन येणें शक्य नव्हते; पण त्या रस्त्यानें तलावापर्यंत आम्ही गेलों. तिसावेवापेक्षांही हा तलाव मोठा आहे. या येवढ्याशा टापूंत तीन प्रचंड तलाव पूर्वराजवटींत बांधलेले पाहून जुन्या राजवटीबद्दल आश्चर्य व कौतुक वाटलें. मी मनांत म्हटलें, काय त्या काळच्या राजांची प्रजेच्या हिताबद्दल कळकळ! त्या राजांनीं या दक्षिण भागाच्या उत्तर दिशेला असणाऱ्या पर्वतराजीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंबसुद्धां समुद्राकडे व्यर्थ जाऊं दिला नाहीं; तर प्रचंड तलावाचीं कामें करून त्यांनीं आपल्या प्रजेला पिकांकरितां मुबलक व वेळेवर पाणी मिळावें म्हणून मोठमोठ्या तलावांत पावसाचें सर्व पाणी सांचवून ठेविलें व त्यांतून पाट काढून सर्व प्रातांला पाण्याचा विपुल पुरवठा केला. म्हणून त्या काळी हे सपाट प्रदेश लोकवस्तीनें गजबजलेले होते; व जिकडे तिकडे भातादि पिकांची लागवड दिसून येत होती. लोकांना मुबलक अन्नपाणी मिळावें व प्रजेनें आपल्या मेहनतीनें हवं तितकें पीक काढावें व सुखानें आयुष्य कंठावें अशा प्रकारची स्वयंपूर्ण स्थिती त्यांनीं घडवून आणली हें त्या राजांचें काम कमी कर्तबगारीचें किंवा कमी कौतुकास्पद खास नाहीं." तिसामहारामामधील प्रेक्षणीय स्थळे म्हणजे हे तलावच होत. बाकीच्या इमारती वगैरे कामें काळाच्या नाशक शक्तीनें नष्टप्राय झालीं. तेव्हां सध्यां तिसामहारामा येथें अधिक कांहीं पहाण्यासारखें शिल्लक नसावें हें साहजिक आहे. झालें. दक्षिणेतील जुन्या राजधानीचें माझें वर्णन संपलें.
लंका बेटाचा किनारा सपाट, रेताड व तांबड्या मातीचा व नियमित पावसाचा असल्यामुळे सुपीक असून तेथें लंकेचीं विशिष्ट पिकें नारळ पोफळ व केळी- फार प्राचीन काळापासून होत आलेलीं आहेत. म्हणून या किनाऱ्यावर प्राचीन काळापासून गांवें व शहरे वसलेलीं आहेत; युरोपियन राष्ट्रांतील लोकांचा लंका बेटांत प्रथम प्रवेश या किनाऱ्याच्या बाजूनें झाला व या किनाऱ्याचा ताबा त्यांना आधीं मिळाला. त्या राष्ट्रांचा सुव्यवस्थित अंमल या प्रांतीं सुरू झाल्यामुळे या किनाऱ्याच्या गांवांची, शहरांची, किंवा वस्तीची मधल्या सपाट प्रदेशाप्रमाणें नासाडी केव्हांच झाली नाहीं; सारांश या किनाऱ्याच्या भागामध्यें जुन्या व नव्या सुधारणेचा बेमालुम सांधा जमला. म्हणून हल्लीं लंकेंतील किनाऱ्याचा भाग सुधारलेला, दाट वस्तीचा व उत्तम लागवडीचा प्रांत बनलेला आहे. या किनाऱ्यावर वाटोवाट लहान मोठीं गांवें व शहरें लागतात. अशीं दक्षिण किनाऱ्यावरील प्रख्यात शहरें म्हणजे हंबनटोटा, मातर व गॉल हीं होत. हीं सर्व शहरें ओझरतीं व घाईघाईनें कां होईना पण मीं एकाच दिवशीं पाहिलीं. तेव्हां त्या तिन्ही शहरांचें वर्णन एकत्र व एकाच प्रकरणांत करणें रास्त आहे.
ता. ५ फेब्रुवारी सन १९३४ रोजी सकाळी साडेसात वाजतां थेट मातर गांवाला जाणाऱ्या मोटारीनें मी तिकडे जाण्यास निघालों. तिसामहारामाचा तांबडा रस्ता टाकून मी गुळगुळीत काळ्या डामरी मुख्य रस्त्याला लागलों; तोंच विराविलावेवा नांवाचा मागच्या प्रकरणांत उल्लेखिलेला प्रचंड तलाव आमच्या वाटेवरच दिसूं लागला. येवढ्या प्रचंड तलावाला वांकडातिकडा वळसा घालून मुख्य रस्ता करण्यापेक्षां तलावामध्यें मातीचा भराव टाकूनच रस्ता करणें अधिक सोयीचें व कमी खर्चाचें वाटलें असावें; म्हणून मुख्य रस्ता भर तलावाचे मधून काढला आहे. यामुळें अनायासें मोटारींतून जातांना हा सबंद तलाव पहाण्यास सांपडतो. तलाव मागे टाकून पांच सहा मैल मजल मारली नाहीं तोंच वेलीगाटा गांवानजीक डाव्या हाताला एक रस्ता फुटला. हा रस्ताही तिसामहारामाच्या रस्त्याप्रमाणें समुद्रावरील बुंडाला गांवाला जातो असें कळलें. येथेंही एक लहानसा तलाव डाव्या हाताला दिसला. येथून पुनः पांचसहा मैल जातों तों रस्त्याचे दोन्ही बाजूंस दोन तलाव दिसले. हे गोड्या पाण्याचे तलाव नसून समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे तलाव आहेत व येथें मीठ आपोआप तयार होतं असें कळलें. लागलीच हंबनटोटा हें गांव आलें. येथें मोटार नवाचे सुमारास आली व दहापंधरा मिनिटें मोटार स्टँडवर थांबली. हंबनटोटाचा मोटार स्टँड अगदीं समुद्रकिनाऱ्याला लागून असून येथें गलबतांतून उतारूंना व मालाला चढण्या- उतरण्याकरितां समुद्रांत लहानसा लांकडी धक्का केला आहे. येथें किनारा मुंबईच्या बॅकबेप्रमाणे अर्धवर्तुळाकार आहे. ता. २८ जानेवारी सन १९३४ रोजीं पर्वतपठार प्रांतांत पर्यटन करण्याकरितां मी कोलंबो शहर सोडलें, तेव्हां पासून एक आठवडाभर माझें हिंदीमहासागराचें दर्शन अंतरलें होतें. यामुळे मला हिंदी महासागराच्या दर्शनाची जणूं कांहीं तहान लागली होती; ती हंबनटोटा येथे आल्यावर त्याचें पुनर्दर्शन घडून तृप्त झाल्यामुळे मला फार आनंद झाला. येथें सोनेरी रेतीचें सुंदर वाळवंट आहे. त्या वाळवंटावर जाऊन तेथून हिंदी महासागराच्या हिरव्या निळ्या पाण्यावरील फेसाच्या शुभ्र पुष्पमालांनीं अलंकृत झालेल्या लाटांचें चित्ताकर्षक तांडव मी सारखा पहात बसलों. मी हा सुंदर देखावा पाहण्यांत इतका गढून गेलों की मला पुढे जाण्याचें भान राहिलें नाहीं. पण मोटारवाल्यानें निघण्याच्या निशाणीचें शिंग फुंकलें. तेव्हां नाइलाजानें मी मोटारींत जाऊन बसलों; तोंच मोटार सुरू झाली व तो नयनमनोहर सागराचा देखावा तेव्हांच दृष्टिआड झाला. हंबनटोटा टाकलें कीं रस्ता किंचित् आंत जातो व समुद्र दिसेनासा होतो. पण लंकेचा माझ्या पूर्ण परिचयाचा केळी नारळी-पोफळींच्या बागांचा देखावा सुरू होतो. त्यांत दुसऱ्या एका मला अज्ञातनाम झाडाची भर पडते. या झाडाला भलीं थोरली कातरलेली लांब व जाड पानें असतात. या पानाचा कोंब मेणबत्तीसारखा दिसतो. हे झाड डौलदार व व मोठें तजेलदार दिसतें. या भागांत या झाडांची लागवडही बरीच दिसली. याला भाकरीचें झाड म्हणतात. हें मला कोलंबोस पोहोंचल्यावर कळलें. पुढें टांगाला म्हणून बरेंच मोठे गांव लागलें. हें समुद्रकांठावर आहे पण रस्ता गांवाचे वरच्या बाजूनें जात असल्यामुळे समुद्र दिसत नाहीं. येथून मोटारवाला सरळ किनाऱ्यांच्या रस्त्यानें न जातां बेलियाटा नांवाच्या पांच मैल आंत असलेल्या गांवावरून गेला. थोड्याच वेळांत पुनः आम्ही डिकवेला नांवाच्या समुद्र किनाऱ्यावरील गांवीं आलों. हें गांव म्हणजे हंबनटोटा गांवाची छोटेखानी आवृत्ति होय. येथेंही हिंदी महासागर मोटाररस्त्यानें जातांना डाव्या हातास लागतो. येथून रस्ता बहुतेक किनाऱ्याला लागून गेलेला आहे. यामुळे मोटार हिंदी महासागराशीं लपंडाव खेळत आहे कीं काय असा भास होतो. कारण क्षणांत महासागर दिसतो तर क्षणांत तो दिसेनासा होतो. असा लपंडाव खेळत खेळत गडारा गांवाशीं आलें म्हणजे दोंद्रा नांवाचें समुद्रांत घुसलेलें जमीनीचें टोंक आपल्याला दिसतें. हेंच टोंक लंकाबेटाचें सर्वांत दक्षिणेकडलें टोंक होय. हे टोंक म्हणजे लंकेचें केप कामोरिन किंवा कन्याकुमारी होय. येथून रस्ता जरा आंत जातो; दोंद्रा टोंकामुळें महासागर दिसत नाहीं. पण थोडक्याच वेळांत मी मातर शहरी पोहोंचलों. तेथें आलों तों दुपारचा १ वाजला होता. मोटार स्टेशनपर्यंत आली. गॉल बंदरास जाणारी आगगाडी निघण्यास तीन तास अवकाश होता. तेव्हां इतक्या अवकाशांत मातर शहराचे ओझरतें दर्शन घेऊन गॉलला वस्तीला जावें असा मी बेत केला. म्हणून सामान स्टेशनच्या क्लोकरूममध्ये ठेवलें; त्याला १५ सेंट (दोन आणे) भाडें पडलें. तें देऊन स्टेशननजीकच्या दुकानी चहा घेऊन मी तडक शहर पाहण्यास निघालों. मातर शहराची रचना मोठी चमत्कृतिजनक आहे. हें शहर लंकेच्या थेट दक्षिणेस आहे. येथें नीलगंगा नांवाची नदी येऊन समुद्रास मिळते. ही नदी उत्तरेकडील पर्वतांतून निघून दक्षिणेकडे वहात जाते; पण सरळ दक्षिणेस समुद्रास मिळत नाहीं; तर समुद्रकिनाऱ्यानजीक आल्यावर ही नदी एकदम पश्चिमवाहिनी बनते व मग समुद्राला जाऊन मिळते. यामुळें नदी व समुद्र यांमध्यें अत्यंत चिंचोळी पूर्वपश्चिम लांबट अशी जमिनीची पट्टी पडते. या चिंचोळ्या पट्टीच्या पश्चिम टोकाकडे म्हणजे नदीच्या मुखाच्या अंगास डच लोकांनी बांधलेला किल्ला आहे. हंबनटोटाकडून येणारा हमरस्ता पूर्वेकडून पश्चिमेकडे पण नदीच्या दक्षिण किनाऱ्यानें गेला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस मातरचा बाजार व बंगले वसलेले आहेत; किल्ल्याच्या पूर्व कोपऱ्यावर नदीवर लोखंडी पूल आहे. तो पूल वलांडला म्हणजे मातरशहराचा मुख्य व उत्तरेकडचा भाग लागतो. मुख्य शहराच्या उत्तरेस रेलवे स्टेशन आहे. कोलंबोकडून येणारा रेलवेरस्ता मातरपर्यंतच आहे. म्हणजे मातर हें रेलवेचें टरमिनस आहे. नदीवर पूल दक्षिणोत्तर आहे व रस्ता दक्षिणोत्तर असून तो थेट उत्तरेस हकमना गांवाकडे गेला आहे. स्टेशन या रस्त्यावर आहे. पश्चिमेकडे गॉलला जाणाऱ्या रस्त्याचे स्टेशनच्या अलीकडे दोन समांतर फाटे होतात. एका रस्त्याचें नांव मेनस्ट्रीट व दुसऱ्याचें नांव ब्रॉडवे; शहराबाहेर गेल्यावर हे रस्ते एकत्र मिळतात व मग तो रस्ता थेट गॉलला पोहोंचतो. अशी मोठी चमत्कृतिजनक मातर- शहराची रचना आहे. या रचनेमुळे शहराचे स्वाभाविक तीन तुकडे पडले आहेत; मेनस्ट्रीट व ब्रॉडवे या रस्त्याच्या मध्यें मुख्य मातर शहर आहे; नीलगंगा नदीचे दक्षिण तीराला मातरची बाजारपेठ व राहते बंगले आहेत; किल्ल्यामध्यें सरकारी कचेऱ्या, व खासगी बंगले व दुकानें आहेत. रहाते बंगले थेट नदीच्या मुखापर्यंत पसरले आहेत. हे टोंक म्हणजे लंकाभूमीचें अंत्य टोंकच आहे; तदनुरूप Land's end असें या भागाला नांवही आहे. मी स्टेशनमध्यें सामान टाकून तडक दक्षिण दिशेला जाणाऱ्या रस्त्यानें पुलावर आलों. नीलगंगा नदी कोलंबो नजीकच्या कालिनीगंगा नदीप्रमाणें खोल व रुंद आहे. पूल वलांडून खालीं आलें कीं किल्ल्याचा दरवाजा लागतो. त्रिंकोमालीच्या फ्रेडरिक किल्याप्रमाणे जमिनीच्या बाजूला किल्ल्याला तट आहे; बाकी तिन्ही बाजूंस नदी व समुद्र आहेत; पण येथें त्रिंकोमालीप्रमाणे मोठमोठे व उंच भिंतीवजा खडक वगैरे कांहीं एक नाहीं. नदीच्या बाजूस काय किंवा महासागराच्या बाजूस काय किंवा नदीच्या मुखाकडे काय सारखी सपाट सखल जमीनच जमीन आहे. किल्ल्याच्या दरवाज्यांतून मेनरोडनें मी थेट नदीच्या मुखाजवळील लंकेच्या लँडसएंडपर्यंत गेलों. मग समुद्राकडील रस्त्यानें सरकारी विश्रांतिगृहाशीं आलों. हे ठिकाण समुद्रकिनाऱ्यास लागूनच आहे. विश्रांतिगृहांत शिरून गृहाच्या व्हरांड्यामधून समुद्रावरील रस्त्यावर आलों. समुद्रकिनाऱ्याच्या सडकेनें अर्धा पाऊण मैल फिरत गेलों. मातरचा समुद्रकिनारा वाळवंटी असून येथून देखावा चांगला दिसतो. मातर शहराचें दृश्य दर्शन येवढेंच. तें दोन तासांत सहज आटोपलें व मी स्टेशनवर परत आलों. सामान क्लोकरूममधून घेऊन गॉलचें तिसऱ्या वर्गांचें तिकिट घेऊन मी आगगाडींत येऊन बसलों. आगगाडींत बसण्यापूर्वी पोटपूजा केली हें सांगावयास नकोच. सवाचारच्या सुमारास आगगाडी चालू झाली. मातरपासून गॉल अवघें सत्तावीस मैल आहे. मोटारीचा रस्ता समुद्राच्या किनाऱ्यानें आहे व त्याचे उजव्या बाजूस म्हणजे जमिनीच्या बाजूस रेलवेरस्ता आहे. यामुळे हिंदी महासागर या आगगाडीच्या रस्त्यानें दृष्टीस पडत नाहीं. पण सर्व रस्ता लोकवस्तीमधून व नारळी पोफळी केळी पाम इत्यादि झाडांच्या बागांमधून जात असल्यामुळें लंकेच्या किनाऱ्याच्या लगतच्या भागाची सुपीकता पाहून मनाला आश्चर्य व आनंद होतो. सवातासानें म्हणजे साडेपांच वाजतां मी गॉल गांवाला आलों. हा गांव मात्र फारच मोठा दिसला. मी स्टेशनपासून नजीक असलेल्या सिडनेहॉटेलमध्यें उतरलों. दुसरे दिवशीं सकाळीं नऊ साडेनऊ वाजतां मोटारबसने किंवा आगगाडीनें कोलंबोस जायचा बेत हॉटेलवाल्यास मीं सांगितला. रात्रींचें जेवण, रात्रीची राहणी, पहांटचा शेज चहा व सकाळची न्याहारी मिळून चार्ज पावणे तीन रुपये पडेल असें त्यानें सांगितलें. सामान खोलींत टाकल्याबरोबर मी बाहेर पडलो. सिडनेहॉटेल समोरच हिरवेंगार खुलें मैदान आहे. त्याचे पलीकडे डच किल्ल्याचा तट व दरवाजा लागतो. तेव्हां मी थेट किल्ल्याच्या दरवाज्यांतून किल्ल्यांत गेलों; तो दीपगृह रस्ता नांवाचा नाकासारखा सरळ, सुंदर रस्ता लागला. दीपगृहाचा पांढरा मनोराही दृष्टीस पडला. तेव्हां सरळ त्या रस्त्यानें दीपगृहाकडे चाललों. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंस डच बांधणीच्या पद्धतीचे बंगले व दुकानें दिसली. या रस्त्याने निघालों तों थेट दीपगृहाच्या मनोऱ्याजवळ येऊन थांबलों. हा पांढरा शुभ्र मनोरा समुद्रांत घुसलेल्या एका एकसंधी तांबड्या खडकावर बांधलेला आहे. दीपगृहाचें फाटक अर्थात् बंद होतें. मी फाटकाशी जाऊन तेथें जरा उभा राहून सभोवारचा देखावा नजरेखालीं घातला.
गॉल हे खरोखरीं एक स्वाभाविक व सुरक्षित बंदर आहे. हे येथून उत्तम तऱ्हेनें दृष्टोत्पत्तीस येतें. रेल्वे स्टेशनपासून थेट दक्षिणेकडे महासागरांत घुसलेली ही अरुंद पण बरीच लांब अशी जमिनीची पट्टी आहे. त्याचे टोकास स्वाभाविक बुरुजासारखा तांबडा खडक दहा बारा फूट उंच आहे. येथून डाव्या हातास मोठें थोरले मुंबईच्या बॅकबेसारखें महासागराला अन्तर्वळण आहे; या लांब वर्तुळाकार वळणाच्या दुसऱ्या टोकाला एखाद्या बदकाच्या पायासारखे दोन खडक समुद्रांत आलेले दिसतात. या वर्तुळाकार भागांत गॉलचें उत्तम व सुरक्षित बंदर बनलें आहे. कारण किल्ला असलेली जमिनीची पट्टी पश्चिम दिशेकडून येणाऱ्या लाटांना व वाऱ्याला थोपून धरते. शिवाय या जमिनीच्या पट्टीसभोंवतीं किल्ल्याचा दहा बारा फूट उंचीचा तट बांधला गेल्यामुळे ही जमीनीची पट्टी पूर्वेकडील बंदरापेक्षां बरीच उंच झाली आहे. अर्थात् वारा व लाटा यांचा आपोआप बंदोबस्त झाला आहे. या किल्ल्याच्या पूर्व बाजूस उतारू व माल यांची चढउतार होण्याचे लाकडी धक्के आहेत. हा किल्ला बराच मोठा आहे. कारण पुढे घुसलेली सर्व जमिनीची पट्टी किल्ल्याच्या तटांत घेतली आहे; यामुळे या किल्ल्यांत सरकारी कचेऱ्या व बंगले यांखेरीज खासगी घरें व बंगले बरेच आहेत. किल्ल्याचा तट चांगला मजबूत असून तो सबंद शाबूद आहे; त्या तटाला ठिकठिकाणीं अधिक उंच असे टेहेळणी बुरूज केलेले आहेत. आतां मात्र तटाला नेहमीं असणारी बंदुका व तोफा मारण्याकरितां भोंकें असलेली पण शिपायांचें संरक्षण होण्यासारखी छाती इतकी भिंत पाडून टाकली आहे किंवा त्या भिंतीच्या माथ्यापर्यंत भराव टाकला आहे. पण सध्यां गॉलच्या किल्ल्याचा तट म्हणजे एक सायंकाळीं समुद्रकिनाऱ्याला भिडलेला व दहा पंधरा फूट उंचीचा असा मोठा थोरला धक्काच झाला आहे. मुंबईच्या बॅकबेच्या बाजूस कोट्यावधी रुपये खर्च करून नवा धक्का बांधल्यामुळे तो धक्काही एक सुंदर उंचवट्याची सहलसडक झाला आहे. तशीच हुबेहुब सहलसडक या गॉलच्या किल्ल्याच्या तटावर हल्लीं झाली आहे. मुंबईच्या धक्क्याच्या सहलसडकेपेक्षांही गॉलची सहलसडक जास्त मनोहर व आकर्षक झाली आहे. कारण ही मुंबईच्या बॅकबे धक्क्यापेक्षां पुष्कळ रुंद आहे. ती मातीची असल्यामुळे त्यावर हिरवीगार हरळी उगवली आहे. यामुळे हिरवा हिरवागार गालिचा पसरलेला, पायघड्या घातलेला हा सुंदर राजरस्ता बनला आहे. येथें जागोजाग व उंचवट्याच्या बुरुजाच्या ठिकाणीं बसावयास बाकें ठेविलीं आहेत. या सहल सडकेनें अर्धा अधिक किल्ला मी पाहिला. सायंकाळी सूर्यास्ताचे वेळीं तर या ठिकाणचा देखावा फार वाखाणण्यासारखा वाटला. जो किल्ला व किल्ल्याचा तट शत्रूच्या हल्ल्यापासून संरक्षण करण्याच्या केवळ बुद्धीनें पूर्व काळीं डच लोकांनीं बांधला होता तोच तट अर्वाचीन काळीं गांवांतील एक सुंदर सहलसडक बनून लोकांना आनंद व सुख देण्यास उपयोगी पडावा हे या तटाचे किती विलक्षण स्थित्यंतर झालें असें माझ्या मनांत आलें. युरोपियन लोकांना लंका बेट ठाऊक झाल्यापासून व लंका बेटावर त्यांचा ताबा झाल्यापासून गॉल हें बंदर भरभराटीस आलें. पण कोलंबोस कृत्रिम बंदर बनविल्यापासून गॉलचें महत्त्व व वैभव संपलें. मला वाटलें गॉलचा जलदेव 'गतवैभव झालों मी' असें सारखें गुणगुणत असेल व आपल्या गतवैभवाबद्दल दुःखाश्रू ढाळीत असेल. याप्रमाणें अगदीं अंधार पडेपर्यंत मी गॉलच्या या सहल सडकेवरून फिरत होतों. मग रात्र झाली म्हणून हॉटेलला परतलों. पहांटेस सहा वाजतां शेज चहा घेऊन मी गॉलच्या हायस्ट्रीट नांवाच्या अर्ध वर्तुळाकार बंदराच्या बाजूने गेलेल्या सडकनें बदकाच्या पायासारख्या थबकड्या टेकड्यांपर्यंत फिरावयास गेलों. मातरला जाणारा हाच रस्ता होय असें मला मातरला जाणाऱ्या मोटारबसेसवरून कळलें. या रस्त्याला गॉलची एक बाजारपेठ आहे. यामुळें रस्त्याच्या दुतर्फा दुकानेंच दुकानें आहेत. गॉल गांवाचें माझें दृश्य-दर्शन संपलें. फिरून परत आल्यावर मी न्याहारी करून स्टेशनवर आलों व पावणे दहाच्या आगगाडीनें कोलंबोस जाण्यास निघालों.
एखाद्या प्रवाशानें हिंदुस्थानच्या लोकवस्तीचें आपण आगगाडीतून जातांना अवलोकन केलें असें सांगितलें तर ती लोणकढी थाप आहे असें हिंदुस्थानची प्रत्यक्ष माहिती असणारा मनुष्य बेलाशक म्हणेल व हें त्याचें म्हणणे खरेही आहे. कारण हिंदुस्थानच्या बहुतेक प्रांतांतील व भागांतील लोकवस्ती खेडोखेडीं पसरलेली आहे. पण या खेड्याची सामान्य रचना अशी आहे कीं गांवची वस्ती एका गांवठणामध्यें घराला घर लागून नसली तरी बरीच दाट व एकत्र असावयाची व गांवची शेती ही गांवाच्या सभोंवार पसरलेली असावयाची; शेतावर वेगवेगळ्या जागीं व विस्कळीत तऱ्हनें राहण्याची पद्धति नाहीं; तर उलट एकोप्यानें एकत्र राहण्याची पद्धत आहे. अगदीं थोड्या भागांत दूर दूर व विस्कळीत वस्ती आहे; पण असल्या भागांत हिंदुस्थानांत रेल्वेरस्तेच झाले नाहींत. रेल्वे रस्ते असलेल्या भागांत लोकवस्ती जुटीनें बसलेली असल्यामुळे रेल्वे रस्ता खेड्यामधून न नेतां खेड्याबाहेरील खुल्या जागेतून किंवा शेतजमीनीतून नेलेला आहे. मोठमोठ्या शहरांमधून रेल्वे रस्ता काढणें फार खर्चाचं आहे म्हणून मोठमोठ्या शहरांना जरी रेल्वे रस्ता आहे तरी रेल्वे स्टेशन कमी अधिक पण लोकवस्तीपासून दूरच करण्यांत आलेले आहे. यामुळे आगगाडींतून लोकवस्ती अवलोकन करणें व त्यांची स्थिति राहणी व व्यवसाय यांचे ओझरतें कां होईना पण निरीक्षण करणें अशक्य आहे; पण लंकेमध्यें मात्र ही अशक्य गोष्ट नाहीं; इतकेंच नव्हे तर लंकेमध्यें- विशेषतः जुन्या सुधारणेच्या समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागांत असें धावतें व ओझरतें अवलोकन व निरीक्षण करणें शक्य असून असें अवलोकन व निरीक्षण मला आगगाडींतून प्रत्यक्ष करतां आलें. त्याचेंच वर्णन या छोट्या प्रकरणांत मी करण्याचें मनांत आणिलें आहे. लंकेतील जुन्या सुधारणेचा विशेष म्हणजे नारळ, पोफळ, फणस, भाकरीचे झाड, पाम झाड इत्यादि फळझाडांची बागायती लागवड व तांदूळ वगैरे धान्यांची शेतवाडीची लागवड हा होय; या प्रकारच्या लागवडीमुळें येथें लोकवस्ती बागांतून व शेतांतून विस्कळीत व सर्व प्रांतभर विखुरलेली अशी आहे. म्हणून लंकेंत या सपाट बागायती व शेतभातीच्या प्रदेशांत एक गांव संपून दुसरें गांव केव्हां लागलें हे मुळींच कळत नाहीं. कारण आधीं नापीक, ओसाड अशी जमीन या सुजल भागांत नाहीं; यामुळे सर्व प्रांत बागांनीं व शेतांनीं सारखा शोभायमान झालेला आहे. लोक या बागांत व शेतांत वेगवेगळी व दूर दूर अशीं घरे बांधून राहिलेले आहेत. या अशा बागांतून व शेतांतून रेल्वे रस्ता काढलेला आहे. यामुळे सर्व प्रांतभर रेल्वेरस्त्यानें आगगाडी जात असतांना आपण लोकांच्या मागल्या किंवा पुढल्या बाजूंच्या अंगणांतून व बागांतूनच जात आहों असें दिसून येतें. म्हणूनच आगगाडींत बसल्या- बसल्या लोकवस्तीचें व लोकस्थितीचें धावतें अवलोकन करतां येतें. असें माझें अवलोकन गॉलपासून कोलंबोपर्यंत दिवसाच्या दहा वाजल्यापासून दोन प्रहरच्या दोन वाजेपर्यंत व बाहात्तर मैलांच्या टापूमध्यें घडलें.
मागच्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें लंकेच्या दक्षिण भागाचें दृश्यदर्शन संपवून मी ता. ६ फेब्रुवारी रोजी सकाळीं पावणेदहा वाजतां गॉल येथें आगगाडीत बसलों व आगगाडी लागलीच चालू झाली.
लंकेच्या पश्चिम किनाऱ्यालगतचा भाग किती सुपीक व सुजल आहे, तेथें वस्ती कशी व किती विखुरलेली व प्रांतभर पिसकारलेली आहे, याचें प्रत्यंतर हे कीं या बाहात्तर मैलांच्या रेलवेरस्त्यांत साठ लहान मोठी स्टेशने आहेत; वाटोवाट आठ दहा तलाव लागतात; व जीनगंगा, बेंटोरा गंगा व कालुगंगा या तीन मोठमोठ्या नद्या या भागांतून वहात जाऊन हिंदी महासागरास मिळतात; नाले ओढे तर किती तरी लागतात याचा सुमारच नाहीं. या किनाऱ्यालगतच्या भागांतून रेलवे रस्ता व त्याच्यापेक्षाही जास्त सोयीची डामरी निर्धुळ गुळगुळीत सरळ सुतांत गेलेली सुंदर सडक आहे. रेलवे रस्ता व मोटार सडक यांची जणूं कांहीं शर्यतच लागलेली दिसते; रेलवे व सडक अगदीं एकमेकांनजीक असून केव्हां केव्हां एकमेकांना अगदी खेटून जातात; एकदां सडक समुद्राला अगदी खेटून तर केव्हां रेल्वे समुद्राला खेटून जाते; रेल्वे व सडक याप्रमाणें तीनदां सव्यापसव्य करतात. पण गॉलपासून कालुतारा या स्टेशनपर्यंत सडक सामान्यतः समुद्राचे कडेनें जाते, तर कालुतारा स्टेशनपासून कोलंबोपर्यंत रेल्वे सारखी समुद्राचे कडेनें जाते.
यामुळे रेल्वे व मोटार अशा कोणत्याही साधनानें कोलंबोस गेलें तरी लोकवस्ती अवलोकन करतां येते. पण रेल्वे जास्त ठिकाणीं थांबत असल्यामुळें व बराच प्रांतपर्यंत समुद्राच्या कांठाकडून न जातां जरा आंतून जात असल्यामुळे लोकवस्ती व स्थिति पाहण्याच्या दृष्टीनें आगगाडीनेंच प्रवास करणें अधिक चांगलें.
आगगाडींतून जातांना नारळीच्या बागांतील पहिली गोष्ट माझ्या नजरेस आली ती ही कीं कांहीं कांहीं नारळीच्या जुनाट वृक्षांशेजारी नवीं नारळीचीं रोपें लावलेलीं आहेत. केव्हां केव्हां एखादा माणूस जुनाट नारळीनजीक जमिनींत खाडा खणतांना माझ्या नजरेस पडे; तर कांहीं ठिकाणीं नीटनेटक्या सरळ काठ्याच्या कुडणींनीं कुडलेल्या जागेत बरीच नारळीचीं लहान मोठी रोपें जवळ जवळ हारीनें लावलेलीं दिसत. अर्थात् इतक्या जवळ जवळ नारळीच्या वृक्षांची जोरदार वाढ होणें शक्य नाहीं; तेव्हां मी कल्पना केली कीं नारळीच्या रोपांचे हे ताटवे आधींच तयार करून ठेवतात; म्हणजे बागेंतील एखादा नारळवृक्ष वठला किंवा वाऱ्यानें पडला किंवा किडीनें खाल्ला किंवा कांहीं कारणांनी त्याला नारळ येईनासे झाले तर अशा निरुपयोगी अनुत्पादक वृक्षांचे जागीं ताबडतोब नवे नारळाचे वृक्ष लावतां यावे. म्हणून असे नारळांच्या रोपांचे ताटवे सदां तयार ठेवीत असावे. या सर्वावरून मला असें वाटलें कीं नारळाची बाग नव्हे सर्व वृक्षांची लागवड ही मानवी प्राण्याला दूरदर्शीपणा, पुढील पिढयाबद्दल प्रेम, वक्तशीरपणा इत्यादि सद्गुण शिकविणारी शाळा होय. या दृष्टीनें धान्य लागवड म्हणजे 'तुरुतदान महापुण्य' अशा प्रवृत्तीची पोषक आहे. धान्य पेरलें कीं तीन चार महिन्यांत पीक तयार होते; पण वृक्षाची गोष्ट तशी नाहीं. नारळ, पोफळ, आंबे, फणस इत्यादि वृक्षांची दहा बारा वर्षे जोपासना करावी तेव्हां त्यांना फळे येणार व मग तीं मालकाला उत्पन्न देणार. पण अशा प्रकारचा बहुत काळानंतर फळ देणारा उद्योग दूरदर्शिपणा असल्याखेरीज कसा होणार? तसेंच ज्या वृक्षांचीं फळें आपण खातों व ज्यापासून आपल्याला उत्पन्न मिळतें ती झाडे आपल्या वाडवडिलांनी लावलीं म्हणून त्याचीं फळें आपणाला चाखतां येतात; तरी आपणही पुढल्या पिढीकरितां अशी तजवीज केली पाहिजे, अशी भावना वृक्षाची लागवड करणारास असावी लागते. सारांश, मला असें वाटलें कीं लंका बेटांतील सर्व शेतकरी इसापनीतीतील आक्रोडाचें झाड लावणाऱ्या वृद्धाच्या वंदनीय कोटींपैकीं असले पाहिजेत. म्हणूनच नारळीच्या बागा ओस पडूं नयेत म्हणून आधीपासून तजवीज करतांना ते दृष्टीस पडतात.
नारळाच्या बागेंत बायका पुरुषांना कामें तरी किती तऱ्हेची करावी लागतात व करण्यास सवड सांपडते हेंही मला, आगगाडींतून सहज पहातां आलें. कित्येक बायका नारळाच्या चोडांतून काथ्या बाहेर काढीत होत्या; तर कित्येक तो काथ्या पिंजीत होत्या. कित्येक पुरुष नारळ चोडांपासून वेगळे करीत होते; तर कित्येक नारळाचीं चोडे काठ्यांच्या कुंपणीनें केलेल्या खाडींतील खाऱ्या पाण्याच्या कुंडांत कुजण्याकरितां टाकीत होते; कित्येक बायका नारळाच्या पानाचे झाप विणीत होत्या; तर कित्येक पानांपासून हीर (हिराच्या केरसुण्या करण्याकरितां) वेगळे करीत होत्या; कांहीं बायका ताडाच्या पानाच्या बारिक बारिक चिरफळ्या करीत होत्या व त्यांच्या टोपल्या व चटया विणीत होत्या. अशा नाना व्यवसायांत गुंतलेले बायकापुरुष आपआपल्या अंगणांत व बागांत कामे करीत असतांना आगगाडींतून सहज माझ्या दृष्टीस पडले. या किनाऱ्यालगतच्या लोकांची राहणी पुष्कळच सुधारलेली आहे ही आगगाडींतून दृष्टोपत्तीस येतं. आधीं आपल्या इकडल्या खेड्यांप्रमाणें इकडल्या शेतकऱ्यांचीं घरें निव्वळ झोपड्यांवजा नाहींत. बहुतेक सर्व घरें भिंतीचीं व कवलारू छपरांचीं असतात. भिंतींना गिलावा केलेला असून त्यांना पांढरा, निळा, हिरवा किंवा गुलाबी रंग दिलेला असतो. निदान पिवळ्या व तांबूस मातीनें तरी तीं घरें चांगलीं सारवलेलीं व म्हणून स्वच्छ व नीटनेटकी दिसतात. बहुतेक सर्व घरांना खिडक्या असून त्यांना तावदानें असलेली दिसली. घरांच्या ओटीवर एखादी दुसरी खुर्ची व एखादें तरी टेबल हीही दृष्टीस पडली. प्रत्येक घरापुढें थोडीशीं तरी फुलझाडें, क्रोटनसारखीं शोभिवंत पानझाडें असावयाचींच. नारळी, पोफळी व केळी व लांबरुंद करवती पानाचें भाकरींचें झाड हीं तर उत्पन्नाचीं व उपयोगी झाडें असल्यामुळे घरापुढच्या अंगणांत दिसावीं यांत नवल नाहीं. या सर्व पश्चिम किनाऱ्यावरील भागांत एका सुंदर शोभिवंत झाडाचें कुंपण करण्याचा फार प्रघात दिसला. सबंद कुंपण निदान आवाराच्या खुज्या भिंतीला लागून या झाडांची एक रांग लावण्याची तरी रीत सर्वत्र दिसली. कोलंबोमध्यें हीं झाडें फार आहेत. मीं प्रथम कोलंबोमध्यें प्रवेश केला तेव्हां मला जिकडे तिकडे हीं सुंदर झाडें पाहून फार आनंद वाटला. तेथल्या दोघां तिघां गृहस्थांना झाडाचें नांव विचारलें. पण शोभेकरितां कुंपणाला लावावयाचीं विलायती झाडें यापेक्षां जास्त माहिती किंवा झाडाचें नांव कळलें नाहीं. माझ्या कोलंबो निवासाच्या अखेरच्या आठवड्यांत मात्र त्या झाडाचें नांव व इतिहास कळला. लंकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या भागालाच हीं झाडें फार कां याचें कारणही कळलें. खरोखरींच हे झाड फार शोभिवंत आहे. याचा मोठा वृक्षही बनतो; पण मधला सोट वाढूं न दिल्यास यांना खूप खांद्या फुटतात व त्या खांद्यांना अक्षरशः अनंत पानें येतात. या झाडाच्या इतकी पानांची वाढ फारचं थोड्या झाडांना असेल. या झाडाची पानें दुरून कांहींशी कोंकणांतील कुड्याच्या पानासारखी दिसतात. हीं बरींच लांब, रुंद वाढतात. या झाडाच्या नव्या पानांचा रंग पिवळा असतो. पण हा पिवळेपणा सोनचाप्याच्या फुलांच्या सोनेरी पिवळेपणा सारखा नसतो; तर तो केतकीच्या पानासारखा असतो; म्हणजे त्यामध्यें पांढरेपणाची किंचित् झाक मारते. या पानांच्या रंगाप्रमाणें त्यांचा तजेलदारपणाही विलक्षण असतो. खरोखरीच या पानावर नजर ठरणार नाहीं इतकीं तीं चकचकीत व तजेलदार असतात; या झाडांचीं मध्यम वाढीचीं पाने पोपटी रंगाची दिसतात; त्यांच्या पिवळेपणांत हिरव्याची झाक मारते; तर या झाडांचीं अगदीं जूनवान पाने हिरव्या रंगाची असतात; पण त्यांत काळसरपणाची झाक मारते. झाडाला पानें विलक्षण, दाट व सदा येत असतात. यांमुळे कोवळी पानें, मध्यम वाढीचीं पानें, जूनवान पानें अशा तीन तऱ्हेच्या पानांनीं हे झाड नेहमी त्रिफुल्ल झालेलें असतें; अशा या तिरंगी पानांचे झुबकेच्या झुबके सर्व झाडांवर व सर्व खांद्यांवर भरगच्च भरलेले असले म्हणजे या झाडाची शोभा अद्वितीय भासते यांत शंका नाहीं.
हे झाड "सौंदर्यसार समुदाय निकेतन" आहे असे उद्गार तोंडांतून सहज बाहेर पडतात. या झाडाच्या सौंदर्याला अनुरूप असें या झाडाचें सुंदर नांव शोधून काढणाऱ्याचें कौतुक करावें तितकें थोडेंच आहे. या झाडाला प्रमिला-प्रेम (lady love) असें नांव आहे. हें झाड बटेव्हिया बेटांतून प्रथम डच लोकांनी लंकेत आणलें. म्हणूनच या झाडाचा विशेष प्रसार डच लोकांच्या ताब्यांत असलेल्या प्रांतांत व शहरांत अर्थात् लंकेच्या पश्चिम किनाऱ्यालगतच्या भागांत झाला हे साहजिक आहे. कोलंबोपासून कोलंबोचें सौंदर्यस्थान मौंट लॅव्हिनीयांपर्यंत जी सरळ, सुंदर, निर्धूळ काळीकुळकुळीत सडक गेली आहे त्या सडकेच्या दोन्ही बाजूंच्या बंगल्यांच्या कुंपणाला किंवा आवारांत हीं झाडे जिकडे तिकडे दृष्टीस पडतात. या सडकेच्या सौंदर्यात या सुंदर झाडांच्या सान्निध्यानें भर पडली आहे यांत शंका नाहीं. सिंहल द्वीपांत पाहिलेले अत्यंत सुंदर वृक्ष कोणचे असें जर मला कोणी विचारलें तर मागें वर्णन केलेला सीतेचा अशोक वृक्ष, आतां वर्णन. केलेला प्रमिला प्रेम वृक्ष व अनहिस्टा नोबीलीस हा पेरेडॅनीया बागेच्या वर्णनांत उल्लेख केलेला वृक्ष ही वृक्षत्रयी सर्व सौंदर्याचें सार आहे असें मी निखालस उत्तर देईन; इतकीं हीं तीन्हीं झाडें मला आवडलीं. हें वृक्षाख्यान फार लांबलें. तेव्हां आतां हात आखडता धरून आगगाडींतून पाहिलेल्या निसर्गरमणीय देखाव्याच्या वर्णनाकडे वळणें बरें.
गॉल स्टेशन टाकल्यावर पंधरावीस मिनिटांनीं जिनटोटा स्टेशन लागलें. येथें जीनगंगा नदी समुद्राला मिळाली आहे. येथें सर्व नद्यांना नजीक नजीक रेल्वेचा व सडकेचा असे दोन पूल आहेत. त्याप्रमाणें या नदीवर दोन पूल आहेत; अशा खाडीच्या कांठींच चोडें कुजण्या करितां काठ्यांचे कुंपण घातलेल्या पाणकोंड्या केलेल्या असतात व त्यांत चोडें तरंगत असतात, याचें मोठें नवल वाटतें. मग मन आकर्षणारा तलाव डोडन डुवा स्टेशनपाशीं लागतो. पुनः असे मोठे तलाव अंबलन गोडा स्टेशन व त्याच्या पलीकडचें बालपिटिया स्टेशन या नजीक लागतात. मग. बराच वेळ समुद्र किंवा सरोवर लागत नाहीं; नुसता बागायती प्रदेश लागतो. पण अलुट गामा या स्टेशननजीक बेंटोटा गंगा नांवाची बरीच मोठी नदी समुद्राला मिळते. येथें रेल्वेचा व सडकेचा असे दोन मोठे सुंदर पूल असून येथें एक मोठें खारें सरोवर आहे. येथला एकंदर देखावा मोठा मनोहर आहे.
मग कालुतारा या मोठ्या शहरापर्यंत समुद्र, सरोवर किंवा खाडी यांपैकीं कांहींच दृष्टीस पडत नाहीं. पण याचा वचपा जणूं कांहीं कालुतारा येथें निघतो. कालुतारा हे पश्चिम किनाऱ्यावरील एक मोठें प्रख्यात शहर आहे. येथें महावेली गंगेप्रमाणे श्रीपाद शिखरापासून निघालेली कालुगंगा नांवाची मोठी नदी दोन फाट्यांनी समुद्रास मिळते.
यामुळें येथें मुंबई नजीकच्या वसईच्या खाडीप्रमाणें दोन फांट्यांवर दोन फारच मोठे पूल लागतात; शिवाय सडकेचे दोन पूल दृष्टीस पडतातच. या दोन फाट्यांमुळे दक्षिण कालुतारा व उत्तर कालुतारा असे शहराचे दोन भाग झाले असून कालुतारा दक्षिण व कालुतारा उत्तर अशीं दोन रेल्वे स्टेशनही झाली आहेत. वसईच्या खाडींच्यामध्यें बनलेलं बेट ओसाड आहे; पण कालु गंगानदीच्या फाट्यांनी बनलेल्या बेटावर बागाच बागा आहेत. हीं दोन्ही शहरें; त्यांना जोडणारें ते चार पूल; नदीच्या चारी किनाऱ्यांवरील त्या हिरव्यागार वृक्षांच्या गर्दछाय राई: शहरांतील सुंदर सुंदर बंगले व बाजार पेठ हा सर्व देखावा एकसमयावच्छेदेंकरून दृष्टीस पडतो व मन फार सुप्रसन्न होतें. एक हिरवेंगार गवताळ मैदान कागदाच्या कातरलेल्या माळा, नानारंगी निशाणें, नारळीच्या पानांच्या कमानी, वगैरेनीं शृंगारलें होतें; येथें नाना प्रकारच्या मर्दानी खेळाच्या शर्यती सुरू व्हावयाची तयारी चालू होती. आगगाडींतून हा सर्व देखावा मला पहावयास मिळाला. कालुतारा पासून कोलंबोपर्यंत आगगाडीचा रस्ता हिंदी महासागराला अगदीं खेटून गेला आहे. यामुळे डाव्या बाजूस महासागराचें हिरवें निळें पाणी अफाट पसरलेलें दिसतें, व पांढऱ्या शुभ्र फेसाच्या पुष्पमालांनी अलंकृत अशा लाटा सोनेरी वाळवंटावर, कोठें मोठ्या वेगानें तर कोठें मंद गतीनें येत असतांना दिसत होत्या. तुरळक तुरळक नारळीची झाडें या बाजूला दिसतात; पण एकंदरीत हे वाळवंट डाव्या बाजूस अर्थात् खुलेंच आहे. उजव्या बाजूस बागा लागतात. पण रेल्वे समुद्राला खेटून जात असल्यामुळे या भागांत लोकवस्ती व त्यांचे व्यवसाय क्वचितच दृष्टीस पडतात. कोलंबोपासून दक्षिणेस आठ मैलांवर असलेलं सौंदर्यस्थान मौंटलॅव्हिनिया हे स्टेशन आल्यापासून कोलंबो शहर आल्यासारखेंच वाटतें. कारण या आठ मैलांत आठ स्टेशनें असून गाडी दर स्टेशनला थांबते. यामुळे आगगाडी स्थानिक आगगाडीसारखी वाटते व आपण शहरांतूनच चाललों आहों असा भास होतो. गॉलपासून कोलंबो किल्ला या स्टेशनपर्यंत पोहोंचण्यास आगगाडीला चार तास लागतात. पण हा सर्व वेळ सृष्टिसुंदरीचीं नानाविध रूपें व लोकवस्तीचे नानाविध व्यवसाय पहाण्यांत केव्हांच निघून जातो हें कळत सुद्धां नाहीं. मलाही हाच अनुभव आला व मी मोठ्या प्रमुदित मनानें डोमिनीयन हॉटेलमध्यें आलों. पण माझी समुद्राकडची खोली गुंतलेली होती; म्हणून मी दुसऱ्या बाजूच्या खोलींत राहिलों. पण माझ्या सुदैवानें दुसरेच दिवशीं मला माझी आवडती खोली मिळाली व देशीं येण्यास निघेपर्यंत मला हिंदी महासागराच्या सांनिध्यांत रहाण्यास व रात्रंदिवस त्याचें दर्शनसुख अनुभवण्यास मिळालें. म्हणून माझा कोलंबो-निवासाचा अखेरचा आठवडा मला फार आनंददायी झाला.
आरंभलेल्या कामाची अखेरी मारणाऱ्या माणसांना उत्तम जनाची पदवी या प्रसिद्ध सुभाषितांत जरी दिलेली आहे तरी खरें पाहतां कामाची अखेरी मारण्याची स्वाभाविक प्रवृत्ति मानवी प्राण्यांत दिसून येते. गंजीफाच्या खेळांतच फक्त अखेरी मारण्याची मौज वाटते असें नाहीं. सर्व लहानमोठ्या कामामध्यें अखेर साधण्यापासून मनाला फार आनंद होतो. कोणतीही गोष्ट प्रारंभापासून शेवटपर्यंत पुरी करण्याची सर्वांची धडपड असते. सरळ लांबच्या रस्त्यानें अखेर गांठतां येत नसली तर मनुष्य जवळचा रस्ता किंवा मधला रस्ता शोधून काढतो; किंवा दुसरा कांहीं तरी तोडगा काढून काम पुरें केल्याचें खरें किंवा वरपांगी समाधान मिळविण्याची धडपड करीत असतो. केव्हां केव्हां विचाराला न पटणारी धर्माची शिकवणूक व धर्म समजूत याच प्रवृत्तीमुळे उत्पन्न झालेली असते. त्रिकाल सबंद संध्या करावी हा मूळचा धर्मनियम; त्यांचेमधले मार्ग व तोडग्याचे मार्ग कसे झाले पहा. त्रिकाल नाहीं तर सकाळसंध्याकाळ केली तरी पुरें; तेवढेंही होत नसेल; तर एक वेळ केली तरी चालेल; सबंद संध्या केली नाहीं तरी गायत्री मंत्र व चोवीस नांवें म्हटली तरी पुरें; शेवटीं संध्येचें पहिलें 'के' अक्षर व शेवटचें स्तु अक्षर मिळून 'केस्तु' म्हटलें तरी संध्या केल्याचें श्रेय आलें अशी समजूत झाली. तीच गोष्ट इतर धार्मिक विधिसंबंधांत दिसून येते; सचैल स्नान न करवेल तर डोक्यावर पाण्याचे चार थेंब टाकून स्नान केल्याचें श्रेय मिळवितां येतें. सारांश, कामाची अखेर मारण्याची किंवा व्यावहारिक भाषेंत साग्र गोष्ट करण्याची किंवा पाहण्याची प्रवृत्ति मनुष्यामध्यें सार्वत्रिक आहे असे मला वाटतें. निदान माझ्यामध्ये तरी ती प्रवृत्ति तरुणपणीं बलवत्तर होती व आतां वयपरत्वे तीं कमी झाल्याचे दिसत नाहीं. कारण या प्रकरणाचा विषय या प्रवृत्तीचें फळ आहे. साग्र गोष्टी पाहण्याची फार जुन्या काळची माझीच एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. हल्ली सिनेमा झाल्यापासून लोकांना संगीत नाटकें हीं दोन अडीच तासांपेक्षा जास्त वेळ नको असतात. म्हणून हल्ली दोन तासांच्या नाटिका भराभर प्रसिद्ध होऊं लागल्या आहेत. पण प्रथमतः आण्णा किर्लोस्करांनी संगीत नाटकास सुरवात केली, तेव्हां प्रयोगाला चारपांच तास सहज लागत. त्यांतल्या त्यांत सात अंकीं साग्रसंगीत शाकुंतल नाटक असलें तर बघावयास नको. आण्णा किर्लोस्कर हयात असतांना व भाऊराव कोलटकर, मोरोबा वाघुलीकर व बाळा नाटेकर, हे तीन प्रख्यात नट व गवई कंपनीमध्यें असतांना मला पक्के आठवतें कीं मी एकदां साग्रसंगीत शाकुंतल पहावयास गेलों होतों. मी त्यावेळीं पुण्यांत सदाशिव पेठेत रहात असें व नाटकगृह हमजाखानच्या प्रख्यात तालमीचें पलकिडे भवानी पेठेत असे. आम्ही बिऱ्हाडाहून रात्री आठ वाजतां निघालों तें नाटक आटोपून परत येतों तों सकाळचें साहा वाजले! नाटक दहा वाजतां सुरू झालें तें सबंध सात तासांनीं म्हणजे पहांटेस पांच वाजतां संपलें! माझ्या साग्र गोष्ट करण्याच्या किंवा पहाण्याच्या प्रवृत्तीमुळे या प्रकरणाचा विषय कसा निष्पन्न झाला तो पहा.
जेव्हां मी लंकेचा दक्षिण व पश्चिम किनारा व त्यांवरील शेवटलें प्रख्यात जुनें बंदर गॉल पाहून परत कोलंबोस आलों तेव्हां माझें सर्व लंकापर्यटन आटोपलें. आतां राहिलेले लंकानिवासाचे दिवस सकाळ संध्याकाळ समुद्र व सरोवर यांच्या काठांवर लंबवर्तुळाकार असलेल्या सहलसडकेनें सहल करावी, दोन प्रहरीं थोडेंफार लेखन करावें, नव्या झालेल्या मित्रांच्या गांठीभेटी घ्याव्या व १९ फेब्रुवारी रोजी आगबोट निघण्याच्या दिवशीं आगबोटीवर जावें अशा तऱ्हेनें कोलंबो निवासाचा माझा अखेरचा आठवडा घालविण्याचा मीं बेत केला होता. पण याप्रमाणें सहासात दिवस झाले नाहींत तोंच माझ्या मनांत आलें कीं लंकेच्या चारी दिशांकडील प्रांत व शहरें पाहिलीं खरीं. तरी पण लंकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या उत्तरेकडचा भाग तेवढा पहावयाचा, राहिला. या भागामध्ये पोर्तुगीझ लोकांचा प्रथम अंमल सुरू झाला व त्यांच्या धर्मवेडानें त्या भागांत त्या काळीं लोक बाटून रोमन कॅथलिक झाले; शिवाय लंकेंतील मूळ आर्य राजघराण्यांचा प्रस्थापक विजय हा सोपाऱ्याहून लंकेच्या पश्चिम किनाऱ्याला लागला; न्युवाराएलियाच्या बाजूच्या डोंगराळ मुलुखांत असलेल्या लंकापुरीमध्यें रावणाचा वध करून सीतेला सोडवून अयोध्येस परत जावयास निघालेला राम लंकेच्या पर्वतपठाराकडून हल्लीं चिलाँ शहर आहे त्या ठिकाणीं प्रथम आला व तेथें त्यानें मुक्काम केला व मग सेतूरामेश्वराकडे प्रयाण केलें. पश्चिमकिनाऱ्यासंबंधीं अशा प्राचीन व अर्वाचीन दंतकथा आहेत. तेव्हां जुन्या काळची रामाची दंतकथा; त्यानंतरचा विजयाच्या स्वारीचा दंतकथात्मक इतिहास व अर्वाचीन काळचा पोर्तुगीझ लोकांच्या स्वारीचा सत्यात्मक इतिहास अशा तीन दृष्टीनें पश्चिम किनाऱ्याचा उत्तर भाग प्रख्यात व प्रेक्षणीय आहे असें माझ्या मनांत आलें. तेव्हां हा भाग पाहिल्याखेरीज आपलें साग्र लंकादृश्यदर्शन झालें असें होणार नाहीं असें मला वाटूं लागलें. म्हणून निदान चिलाँपर्यंत पर्यटन करून येण्याचा मीं बेत केला. माझ्या बेताला अनुकूल अशा जायला यायला सोयीच्या गाड्या व अर्धआठवड्याची भाड्याची सवलत असा सर्व योग जुळून येऊन मी हा लंकेचा पन्नास मैलांचा प्रांत पाहून बेतला. तेव्हां त्याचें या प्रकरणांत वर्णन करतों.
ता. १७ फेब्रुवारी सन १९३४ रोजी सकाळची न्याहारी करून व दोन प्रहरकरितां केळीं व थोडें फराळाचें बरोबर घेऊन मी आठ वाजतां या चिलाँला जाणाऱ्या आगगाडीत बसलों. फोर्ट कोलंबोपासून रागमा नऊ मैल आहे. येथपर्यंत कोलंबोच्या उत्तरेस जाणाऱ्या आगगाड्या एकाच रेलवेरस्त्यानें जातात; येथून लंकेच्या पश्चिम- किनाऱ्यानें जाणारा आगगाडीचा रस्ता पुतालंपर्यंत ऐशी मैल आहे. तो थेट उत्तरेस किनाऱ्याला लागून जातो. दुसरा मुख्य रेल्वे रस्ता पोलगहवेलापर्यंत ४५ मैल ईशान्य (उत्तर पूर्व) दिशेनें जाऊन तेथें त्याचे दोन फाटे होतात. डाव्या हातचा फाटा थेट उत्तरेस लंकेच्या मध्य व उत्तर प्रांताकडे जातो; हाच रेल्वे रस्ता तलाईमनारकडे जाऊन दक्षिण हिंदुस्थानच्या धनुष्कोडी रेल्वेरस्त्याच्या अगदीं नजीक जातो; मध्ये फक्त २२ मैलांची खाडी आगबोटीनें वलांडावी लागते; हिंदुस्थानांतून खुष्कीनें लंकेस येण्याचा हाच मुख्य रेल्वेरस्ता; दुसरा फाटा आग्नेय दिशेस (दक्षिण पूर्वेस) लंकेच्या पर्वतपठार प्रांताकडे जातो.
लंकेच्या किनाऱ्याचा प्रांत समुद्रसपाटीच्या पातळीत असून अगदीं सपाट आहे. हा प्रांत किती सपाट आहे याचा मजेदार मासला मला मिळाला. फोर्ट व मर्दाना हीं कोलंबो, शहरांतील स्टेशनें टाकलीं कीं लागलीच केलानी नदीवरील पूल व लवकरच केलानी स्टेशन लागतें. हीं स्टेशन अर्थात् समुद्रसपाटीच्या पातळीवर आहेत. त्याच्यापुढचें स्टेशन हुनुपिटिया हे फक्त समुद्रसपाटीपासून १० फूट उंच आहे असें नांवाच्या पाटीवरून कळलें. म्हणून मी डायरींत ती संख्या लिहून ठेविली. त्याच्यापुढलें स्टेशन रागमा हे बारा फूट आहे असें कळलें; पुढे तर रेल्वे अधिकारी सुद्धां समुद्र सपाटीचा आंकडा देत नाहींसे झाले. कारण हा भाग खरोखरीच फार सपाट व समुद्रसपाटीच्या पातळीत प्रायः आहे. कारण, या भागांत खारी सरोवरें व खाड्या वाटोवाट लागतात. म्हणजे जमीन समुद्रापासून दहा फुटांपेक्षां कमी उंचीवर आहे. रागमा येथें लहानशी एक टेकडी आहे. तेथेंच फक्त रबराची लागवड दृष्टीस पडली. बाकी नारळाखेरीज दुसरी कसलीही लागवड दिसली नाहीं. जिकडे तिकडे नारळीच्या झाडांच्या बागाच बागा दिसत होत्या. मागें वर्णन केल्याप्रमाणें नारळीच्या लागवडीनें येणारे दूरदर्शीपणा इत्यादि गुण व नानाविध व्यवसाय हे या भागांतही दिसून आले. येथें तर नारळीची झाडें फारच सरळ ओळींत लावलेली दिसलीं; पन्नास पन्नास नारळीची झाडें एक एका रागेंत मला मोजतां आलीं. त्या

या प्रांतांतलें पहिलें मोठें शहर म्हणजे निगंवो होय. येथें एक मोठा तलाव आहे व तो रेल्वेतूनही दिसतो. निगंवो हे कोलंबोपासून चोवीस मैल आहे.
येथून चिलाँपर्यंतच्या प्रांतांत जरा निराळा देखावा आहे. आतां नारळाच्या बरोबरीनें भातशेती लागवड आहे असें दिसलें. भातांच्या शेतांत जारीने शेतीचीं कामें चालू होतीं. कारण भाताचें दुसरें पीक काढण्याची ती वेळ होती. कांहीं भातें अगदीं वाळून कापावयास तयार झालेली दिसलीं; थोडी हिरवीं होतीं; पुष्कळ भातें कापून बांधावर सुकण्यास टाकली होतीं व पुष्कळ भातांच्या उडव्या घालून झाल्या होत्या किंवा उडव्या रचण्याचें काम चालू होतें. कांहीं शेतांत जास्त पावसानें भातें पाण्यांत पडून गेलीं होतीं. त्या पाण्यांतून भाताचे चोथे कापून काढून ते कांहीं शेतकरी बांधावर टाकीत होते. कांहीं ठिकाणीं तर शेतकरी शेतें नांगरतांना पाहिलें. नारळीच्या लागवडीप्रमाणें या भातशेतीतही निरनिराळीं कामें चालू असलेलीं दृष्टोत्पत्तीस आली. निगंबो स्टेशन टाकलें कीं कॅलिनी नदीच्याप्रमाणे महाओया नांवाच्या नदीवरील मोठा लोखंडी पूल लागतो. पुढे सुमारें एका तासानें चिलॉ शहर आलें. येथें मी बरोबर ११ वाजतां आलों. स्टेशनवर उतरल्याबरोबर रामेश्वराप्रमाणें रामाच्या नांवाशी संबंध असलेल्या मुनेसरम् नांवाच्या देवळास जाऊन येण्यास छकडा ठरविला; जातां येतांचे भाडें पन्नास सेंट पडलें. हें देवालय चिलाँ- कँडी (कँडीपासून चिलाँ चवेचाळीस पंचेचाळीस मैल आहे) रस्त्यावर गांवापासून दीड मैलावर आहे. देवालय तामीळ पद्धतीचे आहे. गाभारा व त्यावरील शिखर व दरवाजावरचें एक मजली गोपुर हीं मात्र जुनीं कामें दिसली. बाकी सभामंडप व प्रदक्षिणा मार्ग नवाच, निदान सीमेंट- क्रांकीटनें दुरुस्त केलेला दिसला. मुख्य देऊळ शंकरपार्वतीचें आहे; शिवाय तामीळ देवळाच्या पद्धतीप्रमाणें मुख्य देवालयासभोवार उपदेवालयें व मूर्ति पुष्कळच आहेत; त्यांत सुब्रह्मण्याची मूर्ति आहे; गणपतीची आहे; नवग्रहांच्या मूर्ती आहेत. बालकृष्ण, विष्णु, नटराजन (एक पाय वर करून नृत्य करणारा शंकर) इत्यादि देवांच्या मूर्ती आहेतच. देवळासमोर एक लहानसा तलाव आहे. देवळाचें काम फार नक्षीचें नाहीं; नेहमीप्रमाणे पितळेचा स्तंभ आहे व पितळेच्या दिव्यांच्या माळाच्या माळा गाभाऱ्याच्या दरवाज्यासमोर आहेत. दक्षिण हिंदुस्थानांतील किंवा मलबारांतील पितळी दिव्याचा थाट या देवळांत दिसून आला. तेलाच्या विपुलतेचें हें लक्षण आहे यांत शंका नाहीं.
या देवळावर एक शिलालेखही आहे. तो पराक्रमबाहूच्या वेळचा आहे असें कळलें. या देवळांत ताडपत्रावर लिहिलेल्या बऱ्याच पोथ्या व दुसरी बरींच संस्कृत तामीळ व सिंहली भाषेत लिहिलेली पुस्तकें यांचा संग्रह दोन मोठमोठ्या कपाटांत केलेला दिसला. पण तेथल्या उपाध्यायास इंग्रजी येत नव्हतें व दुसऱ्या माणसासही अगदींच बेताबाताचें येत होतें. म्हणून त्या देवळासंबंधीं किंवा शीलालेखासंबंधी अथवा रामकालीन दंतकथेसंबंधी जास्त माहिती मिळवितां आली नाहीं; पण पाहिलें तेवढ्यांतच समाधान मानून मी परत स्टेशनवर आलों व मग थोडा वेळ गांव पाहिलें. हें गांवही मोठें आहे. येथें विजेचे दिवे दिसले; मोठा बाजार दिसला. निगंबोप्रमाणें येथेंही मोठा खारा तलाव नदीसारखा लांबचलांब दिसला. कदाचित् हा तलाव पुतालमच्या सरोवरास कालव्यानें जोडलेला असावा. कारण निगंबोपासून असा एक छोटासा कालवा व त्यामधून जाणाऱ्या लहान लहान होड्या मी आगगाडींतून पाहिल्या होत्या. त्या अर्थी हा जलमार्ग थेट पुतालमपर्यंत गेला असला पाहिजे. चिलाँ शहर सरोवराच्या पूर्वेस वसलेलें आहे. सरोवरावर मोठा पूल आहे. तो वलांडून गेलें कीं समुद्रकिनारा लागतो. हा किनारा जरा चढता आहे. यामुळे प्रथमतः समुद्र दिसत नाहीं. पण चढावाच्या वरच्या रस्त्यावर आलें म्हणजे कन्याकुमारीप्रमाणें एकदम अफाट निळा हिंदी महासागर दृष्टीस पडतो. येथें किनारा इतर शहरासारखा किंवा बंदरासारखा नाहीं. नदीला जशी दरड असते तशी वाळवंटाची दरड आहे व पुढे नदीच्या पात्राप्रमाणे खडकाळ पात्र आहे. या खडकावर समुद्राच्या लाटा येऊन सारख्या आदळत असतात. तेव्हां येथें समु- द्राच्या वाळवंटासारखा देखावा न दिसतां पाण्यानें खडकाळ कांठापर्यंत तुडुंब भरलेल्या एखाद्या मोठ्या नदीच्या किनाऱ्यासारखा किंवा पात्रासारखा दिसतो. अर्थात् येथें लाटांचा आवाज मोठा होतो; लाटा दाणादाण खडकावर आदळतात. येथें पाणीही फार फेसाळलेलें असतें व खडकामुळे हे फेसाचे पांढरे पांढरे तुषार खूप उंच उडतांना दिसत होते. असा मोठा नवलाचा समुद्राचा येथला देखावा आहे. समुद्राच्या कांठच्या खडकांवर हिरवेंहिरवे शेवाळ वाढलेले आहे. समुद्राचा तो पलीकडे नीळा अलीकडे हिरवट, फेसाचा तो शुभ्र रंग; खडकाचा काळा रंग, त्यावरील शेवाळाचा हिरवा रंग व समुद्राच्या दरेचा सोनेरी वाळवंटाचा तांबूस केशरी रंग असें रंगाचें मनोहर मिश्रण या ठिकाण एकदम दृष्टीस पडून मन आश्चर्यानें चकित होतें. सरोवर व समुद्र यांमधल्या उंचवट्याच्या पट्टीवर हल्लीं नवे सरकारी बंगले व इमारती झाल्या आहेत; त्या इमारतींची तांबड्या कवलारू छपरांची रांगच रांग, मध्यें खोल व लांबवर पसरलेलें तें धुसर रंगी सरोवर व गांवांतील नारळी- पोफळीची झाडी; हा देखावाही मोठा चित्ताकर्षक वाटतो. याप्रमाणे गांवाच्या आसपासच्या निसर्गरमणीय देखाव्याची शोभा पाहून मी जरासा गांवांतील रस्त्यानें हिंडलों. एका ओळीला हिंदुस्थानांतील शहराप्रमाणे वकीलाच्या सारख्या पाट्या दिसल्या. तेव्हां ही वकीलआळी असावी असें मी समजलों. लंकेत वकीलांना प्रॉक्टर व नोटरीपब्लीक असें जोड नांव आहे. याप्रमाणे शहरांतील रस्ते हिंडून मी स्टेशनवर परत आलों व परत जाणाऱ्या गाडीची वाट पहात बसलों. मागें एकदां सांगितल्याप्रमाणें प्रवासांतला कंटाळवाणा व त्रासदायक प्रसंग म्हणजे हा वाटपाही प्रसंग होय. पण असे प्रसंग प्रवासांत येणारच; तेव्हां त्याला कुरकुरून कांहीं एक उपयोग नाहीं असें मनाचें समाधान करीत मी ती वेळ काढली. मग आगगाडी प्लॅटफार्मवर आल्याबरोबर डब्यांत जाऊन बसलों. आतां मात्र खरोखरीच लंकेतील पर्यटन संपलें व लंकेचें दृश्यदर्शन साग्र झालें व तें सर्व यशस्वी तऱ्हेने पार पडलें असें पाहून माझ्या मनाला फार आनंद झाला व मी मोठ्या प्रमुदितमनानें कोलंबोस सायंकाळीं पांच वाजतां परत आलों. माझें लंकापर्यटन संपलें म्हणावयाचें. पुढील प्रकरणांत कोलंबोंतील माझ्या निवासाच्या अखेरच्या आठवडयाची हकीकत दिली म्हणजे माझें प्रत्यक्ष पाहिलेल्या गोष्टींचें वर्णन पुरें झालें.
देशी प्रत्यागमन
कोलंबो शहरांत मी तीन हप्यांनीं एकंदर एका महिन्याच्या वर वस्ती केली. आमच्या कोंकणांत भाताचे किंवा पेढ्यांचें माप घेतांना दहा आंकडा झाला कीं खुणेकरितां व आठवणीकरितां एक मूठभर भात किंवा एक पेंढा बाजूला टाकतात. माझ्या तीन हप्त्यांच्या निवासाची अशीच जरा वाढ झाली. मी प्रथम कोलंबोस ता. २४ नवंबर सन १९३३ ते ४ दिजंबर १९३३ म्हणजे बरोबर ११ दिवस (दहा दिवस व एक वाढदिवस) राहिलों. उत्तरलंकापर्यटन व दक्षिण हिंदुस्थानपर्यटन करून दुसऱ्यांदा कोलंबोत राहिलों तोही बरोबर ११ दिवस (ता. १७ जानेवारी ते २४ जानेवारी १९३४ पर्यंत) व दक्षिण लंकेच्या पर्यटनाहून परत आल्यावर तिसऱ्यांदाचा व अखेरचा कोलंबोनिवास ता. ६ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी सन १९३४ म्हणजे बरोबर १३ दिवसांचा झाला. असा मी एकंदर पस्तीस दिवस कोलंबोमध्यें राहिलों. डोमिनियन हॉटेलचा दररोजचा चार रुपये प्रमाणें आकार पडला. या हॉटेलचा मालक एक सेवानिवृत्त सिंहली गृहस्थ असून त्याची सर्व व्यवस्था युरोपियन पद्धतीची आहे.
हें हॉटेल फोर्टमध्यें समुद्रकाठी एका शांत व बिनगर्दीच्या रस्त्यावर असून मला मिळालेली चवथ्या मजल्याची खोली तर समुद्राच्या बाजूला असल्यामुळे कोलंबोंतील माझा निवास रात्रं-दिवस हिंदी महासागराच्या सांनिध्यांत व त्याच्या लाटांच्या कर्णमधुर आवाजांत व फेनपुष्पयुक्त लाटांच्या नयनमनोहर तांडवांत झाला. यामुळे माझा हा निवास फार आनंददायी व आरोग्यदायही झाला. ग्रँड ओरिएंटल हॉटेल, गॉल फेस हॉटेल असल्या राजविलासी व राजमंदिरासमान हॉटेलांत राहिल्यास याचे दीडी दुपटीनें खर्च आला असता. सिंव्हली तऱ्हेचेंच अन्न देणाऱ्या हॉटेलांत डोमिनीयनपेक्षां कमी खर्च येतो खरा; पण तेथें भातभाजी (इंग्रजीत ज्याला करी आणि राईस म्हणतात;) खेरीज दुसरें अन्न नाहीं. कारण दक्षिण हिंदुस्थान व मद्रास इलाखा याप्रमाणें भात हेंच लंकेतही लोकांचें नेहमींचें अन्न आहे. कोलंबो शहर एकंदरींत फार पसरलेलें नसल्यामुळें व मला रिक्शाचा उपयोग करावयाचा नसल्यामुळे येथें ट्राम किंवा गाडीभाडें याचा खर्च क्वचित् होतो. सिनेमा नाटके पाहण्याचें व्यसन किंवा नाद नसल्यामुळे मला दुसरा खर्च मुळींच झाला नाहीं. चारपांच रुपये काय तो धोबी-खर्च व एकंदर महिन्यांत दोन तीन रुपये फार तर भाडेंखर्च झाला असेल. मिळून कोलंबोमध्यें मला दीडशे रुपयांपेक्षां अधिक खर्च झाला नाहीं. भावी प्रवाशांना कोलंबोंतील राहणीची कल्पना यावी म्हणून येवढ्या विस्ताराने हा खर्चाचा हिशेब सांगितला.
या अखेरच्या आठवड्यांत लंकेतील एका नामांकित सेवानिवृत्त डॉक्टरची ओळख झाली. हे गृहस्थ उत्तम नेत्रवैद्य असून त्यांना जुन्या पूर्व वाङ्मयाचा फार अभिमान आहे. हे गृहस्थ युरोपला चार पांच वेळ जाऊन आलेले असून ते हिंदुस्थानांतील ओरिएंटल काँग्रेसला दोनदां आलेले होते. गृहस्थ मोठे बहुश्रुत असून ते कोलंबोमधील पुष्कळ सार्वजानिक संस्थांचे जनक व चालक आहेत. त्यांनी कोलंबोमधील पदार्थ-संग्रहालय उत्तम दर्जाचें करण्याकरितां पुष्कळ श्रम घेतले. त्यांनी स्वतः दोन तास माझ्या बरोबर येऊन मला सर्व पदार्थसंग्रहालय दाखविलें. कोलंबोचें पदार्थसंग्रहालय नेहमींच्या संग्रहालयासारखें सर्व जगांतील प्रेक्षणीय वस्तूंचें संग्रहालय नाहीं. तर तें लंकेतील निसर्गनिर्मित व कलानिर्मित पदार्थांचें संग्रहालय आहे. येथें लंकेंत सांपडणारे सर्व खनिज पदार्थ ठेवले आहेत; येथें लंकेतील पशुपक्षी, कृमिकीटक, जलचर प्राणी व सरपटणारे प्राणी यांचे प्रत्यक्ष नमुने (stuffed specimens) ठेविले आहेत; येथें लंकेमधील जुन्या तऱ्हेचे कपडे व जुन्या काळचें कापड व त्यावरील रंगाचें, कलाबतूचें व नक्षीचें केलेलें काम ठेविलें आहे. येथें डच लोकांनी येथल्या लांकडापासून केलेल्या खुर्च्या कपाटें टेबलें वगैरे सुंदर सामान ठेवलेलें आहे. येथें लंकेंत मिळणाऱ्या लांकूड, पितळ, चांदी, शिंगे, शिंपा, नारळाच्या करट्या वगैरेच्या निरनिराळ्या प्रकारच्या कळाकुसरीच्या नानाविध वस्तू ठेवल्या आहेत. पूर्वकाळच्या चित्रकलेच्या कामाच्या अर्वाचीन काळीं केलेल्या नकला करून ठेवल्या आहेत. येथें लंकेंत केलेल्या जुन्या काळच्या देवादिकांच्या सांपडलेल्या मूर्ती ठेवल्या आहेत. इमारतीच्या निराळ्या सोप्यांत पुराणसंशोधनखात्याला जेवढ्या शिल्पकलेच्या व मूर्तिकलेच्या जिनसा सांपडल्या व जेवढ्या उचलून आणणें शक्य होतें तितक्या सर्व हारीनें मांडून ठेवल्या आहेत. अशा तऱ्हेनें नानाविध वस्तूंनी भरलेलें हें पदार्थसंग्रहालय आहे. त्यावरून लंकेची पूर्वकाळीं उद्योगधंद्यांत काय किंवा उपयुक्त कलांत काय किंवा ललितकलांत काय किती विलक्षण प्रगति झाली होती याची उत्तम कल्पना मनांत येते.
या इमारतीला लागून असलेल्या बागेंत अगदीं छोटेसें पशुसंग्रहालय आहे. पण कोलंबोचें मोठें पशुसंग्रहालय डहीवले नांवाच्या गांवीं शहरापासून सात साडेसात मैलांवर आहे. त्याला जाऊन येण्यास सुमारें आठ आणे खर्च येतो व पाहण्याची फी चार आणे पडते. हे पशुसंग्रहालय कांहीं व्यक्तींनीं कंपनी करून खासगी रीतीने चालविलें आहे. एका दोन प्रहरीं तेंही मी पाहून आलों. मोटार बसच्या रस्त्यापासूनसुद्धां तें बरेंच आंत आहे. यामुळें बरेंच चालत जावें लागतें. या पशुसंग्रहालयाला उंचवठ्याची जागा मिळाल्यामुळे सखल उंचावर अशीं निरनिराळीं घरें निरनिराळ्या पशुपक्ष्यांकरितां बांधतां आलीं आहेत. दोन लहानशीं तळींही आहेत. पशुपक्षीसंग्रह नेहेमींच्या तऱ्हेचा आहे. त्यांत जाव्हा बेटातील पिवळ्या, पांढऱ्या अशा नानारंगी चिमण्या प्रेक्षणीय वाटल्या. बंगाली पट्ट्या वाघांची जोडी मोठी पहाण्यालायक आहे. पण हें पशु-संग्रहालय शहरापासून फार दूर आहे. सरकारी सार्वजनिक पशुसंग्रहालय शहरांत किंवा मुलाबाळांना व बायका- पुरुषांना सहज जातां येण्यासारख्या नजीक ठिकाणीं पाहिजे. तेव्हां सध्यांची पशुसंग्रहालयाची जागा त्या दृष्टीने सोयीची नाहीं यांत शंका नाहीं. अखेरच्या आठवड्यांतील केलेल्या कोलंबोच्या उत्तरेकडील पश्चिम किनाऱ्याच्या दृश्यदर्शनाचें वर्णन स्वतंत्र प्रकरणांत केलेच आहे.
निघण्याच्या आदल्या आदितवारची दोनप्रहर मी येथें नव्या झालेल्या मित्राच्या बिऱ्हाडीं वेलावेटा येथे मोठ्या आनंदाने घालविली. त्याचें बिऱ्हाड अगदीं हिंदी महासागराच्या कांठावर असल्यामुळे मी तेथें हिंदी महासागरांत समुद्रस्नान केलें. समुद्रस्नानाची फार मोठी मौज वाटली. लाटांवर लाटा येत व परत जाणारी लाट आपल्याला समुद्राकडे ढकली. त्यामुळे भय वाटे. पण येणारी लाट आपल्याला किनाऱ्याकडे ढकली. असे सारखे मागें पुढें शरीराला हेलकावे मिळत. वाळूत बसलें म्हणजे लाट आपल्या डोक्यावरून जाई. येथें स्नान करतांना मला सेतूरामेश्वराची आठवण झाली. सेतूरामेश्वरापेक्षां हिंदी महासागराच्या येथल्या लाटा जास्त मोठ्या व जोरदार होत्या असें मला वाटलें. पण लंकानिवास सरतांना हिंदी महासागरांत समुद्रस्नान केल्यामुळें मला फार आनंद झाला यांत शंका नाहीं. रा. चोरगे- माझे नवे मित्र- चिंचणी तारापूरचे राहणारे असून इकडे टॉमसकुक कंपनीत नोकर आहेत. मराठी बोलणारे येवढेच एक गृहस्थ मला लंकेंत भेटल्यामुळे कोलंबोत असतांना मी त्यांना एकदोन दिवसांनीं तरी भेटत असें व आम्हीं सहकाफीपान करीत असूं. हिंदुस्थानांत आल्यावर "आमच्या गांवीं आपल्या बायका- मुलांसह अवश्य यावें" असा त्यांना आग्रह करून मीं त्यांचा निरोप घेतला. निघतांना "चहा घेऊन जा" म्हणून मिसेस चोरगे या म्हणाल्या. पण तेव्हां चहाची वेळ झाली नव्हती म्हणून मी त्यांची विनंति अमान्य करून माझ्या निवासस्थानास परत आलों. पण या स्त्रीदाक्षिण्याच्या विरुद्ध वर्तन केल्याचें प्रायश्चित्त मला दुसऱ्या दिवशीं घ्यावें लागलें. ता. १९ फेब्रुवारी सन १९३४ हा माझा देशीं प्रतिप्रवासाच्या प्रयाणाचा दिवस होता. मी नित्यक्रमाप्रमाणे पहांटेस पांच वाजतां उठून सर्व प्रातर्विधी करून सहा वाजतां सहल करावयास गेलों. समुद्रसहलसडकेनें मी गॉल रस्त्याकडे वळून कोलपिटीया गांवापर्यंत गेलों. या रस्त्याला प्रमिलाप्रेम (Ladylove) वृक्षांच्या कुंपणीच्या कुंपणी व रांगाच्या रांगा लागतात. प्रमिलाप्रेमाला अंतरणार म्हणून मी डोळे भरून त्या वृक्षांकडे पाहून त्यांचा शेवटचा निरोप घेतला. या रस्त्याला कांहीं बंगल्यांत पूजापुष्प (Temple trees) वृक्षही पुष्कळ आहेत. या वृक्षांचीं फुलें बुद्ध धर्मी लोक बुद्धाच्या मूर्तीस वाहतात म्हणून त्यांना इंग्रजींत पूजापुष्पवृक्ष (Temple trees) म्हणतात. या वृक्षांना आतां नवीं पानें व फुलें आल्यामुळे हे वृक्ष मोठे मनोहर दिसत होते. हे वृक्ष म्हणजे आपल्या इकडील तांबड्या व पांढऱ्या चाफ्याचे वृक्ष आहेत हे पाहून तर मला पूर्वपरिचितमित्रदर्शनाप्रमाणे जास्तच आनंद झाला. कोलपिटीया गांवच्या शिवेवरून मी त्या लांब, सरळ, सपाट, स्वच्छ व काळ्या डामरी तुळतुळीत रस्त्याकडे शेवटची नजर टाकून व अशा सुंदर सडका आपल्या मातृभूमींत कधीं तरी होतील काय असा आशाळभूत प्रश्न मनाला करून मी परत फिरलों व मग सरोवरसडकेनें हॉटेलांत येऊन न्याहारी केली. नंतर आगबोट शांघायहून किती वाजतां येणार व किती वाजतां पुढील प्रवासास निघणार हे कळण्याकरितां व रा. चोरगे यांचेकडून आंगठ्यांची पेटी घेण्याकरितां मी टॉमसकुकच्या कचेरींत गेलों. पण ते पेटी आणण्यास विसरले होते. म्हणून ते आपल्या घरी जाण्यास निघाले. पण "मी काल आपल्या पत्नीच्या विनंतीचा अव्हेर केल्यामुळे तुम्हांला हा विसर पडला असावा. तेव्हां प्रायश्चित्तादाखल मीच तुमच्या घरीं जाऊन ती पेटी घेऊन येतों " असें म्हटलें व मग मी लागलीच फोर्ट स्टेशनवर जाऊन वेलवाटा स्टेशनला गेलों. चोरगे यांचे घरीं जाऊन आंगठ्याची पेटी घेतली. अर्थात् आदल्या दिवशीं नाकारलेल्या चहाच्या ऐवजीं फराळ व मधुरमठ्ठा (लंकेंत सहसा न मिळणारें पेय) यांचा समाचार घेतला. अनपेक्षित रीतीनें वेलावाटापर्यंतच्या सहा मैलांच्या हिंदी महासागराचें व किनाऱ्याच्या लोकवस्तीचें पुनर्दर्शन घडलें म्हणून मोठ्या प्रमुदितमनानें मी परत टॉमस कुकचे कचेरींत येऊन रा. चोरगे यांना ती पेटी दिली. (कारण नापसंत म्हणून ती परतबोलीवर घेतलेली पेटी परत करावयाची होती). आगबोट दिवसा चार वाजतां येऊन मध्यरात्रीचे सुमारास पुढच्या जलप्रवासास निघेल; पण सायंकाळच्या साडेपांच सहाच्या सुमारास आगबोटीवर जाऊन बसण्यास हरकत नाहीं असें कळलें. तेव्हां जवळ जवळ सर्व दिवसभर आपल्याला हिंदी महासागराचें दर्शन आपल्या खोलीच्या खिडकींतून घडणार असें पाहून आगबोटीच्या उशीरा येण्याबद्दल मला वाईट न वाटतां उलट आनंदच वाटला. बिऱ्हाडीं परत आल्यावर मी गरम पाण्यानें स्नान केलें. नंतर नेहमींच्या वेळीं फराळ केला व चहाची चार वाजेपर्यंतची वेळ मी आपले सर्व सामान बांधण्यांत व लंकेचा नुकताच विकत घेतलेला इतिहास वाचण्यांत घालविली. चहा झाल्यावर मी हॉटेलांतील सर्व नोकरांस बक्षिसी दिली. इतक्यांत हॉटेलचे मालक माझ्या खोलींत आले. "आपल्या हॉटेलच्या उत्तम व्यवस्थेनें व विशेषतः आपल्या हॉटेलच्या सुंदर उपस्थितीमुळे माझा लंकानिवास मोठ्या सुखाचा झाला" असें त्यांना म्हणून व त्यांचा निरोप घेऊन मी पांच वाजतां सामान रिक्शामध्यें ठेवून चालत आगबोटीच्या धक्क्यावर आलो. तोंच रा. चोरगे मला पोहोचविण्याकरितां धक्क्यावर हजर! या माझ्या नव्या मित्राच्या आगमनानें मला प्रयाणसमयीं जास्तच आनंद वाटला. मी ज्या काँटे रासो आगबोटीनें लंकेस आलों त्याच आगबोटीनें परत जात होतों. रा. चोरगे यांना मी सर्व आगबोट व तेथल्या पहिल्या वर्गाचा राजवाड्यासारखा दिवाणखाना, ग्रीष्मबाग, पोहण्याची पुष्करणी इत्यादि सुखसोयीच्या गोष्टी दाखविल्या. नंतर आमच्या दुसऱ्या वर्गाच्या धूम्रपान दिवाणखान्यांत आम्ही थंडगार लेमन स्वॉशचें गवताच्या पोकळ काडींतून सहपान केलें. नंतर घरी जाण्यास उशीर होईल म्हणून माझा निरोप घेऊन रा. चोरगे परत गेले.
नंतर आमचा आगबोटीचा नित्यक्रम नियमितपणें सुरू झाला. आगबोटीमध्यें कोलंबो बंदरांतून कितीतरी माल बोटीवर चढविण्यांत येत होता. हे काम जवळ जवळ सर्व रात्रभर चाललें होतें हे मला दुसरे दिवशीं सकाळीं कळलें. यामुळे आमची आगबोट खरोखरी १९ फेब्रुवारीस कोलंबोहून न निघतां ता. २० फेब्रुवारीच्या पहांटे तीन वाजतां निघाली. माल भरण्यास इतका वेळ लागला.
ता. २० फेब्रुवारी सकाळीं पहातों तों जमीन कोठेही न दिसतां वर निळे आकाश व सभोवार दाट निळे पाणी हा जलप्रवासाचा नेहेमींचा नयनमनोहर देखावा दिसूं लागला. पण दिवसां दहा वाजण्याच्या सुमारास कन्या कुमारीचें टोंक दृष्टीस पडलें. लंकेस जातांना हे टोंक मला दिसलें नव्हतें. आतां मात्र तें टोक व त्याचे पलीकडील विलक्षण आकाराचे पश्चिमघाटाचे डोंगर स्पष्टपणे दिसले व पूर्वपरिचितपणाची ओळख पटून मला जास्तच आनंद झाला. येथपासून सारखा हिंदुस्थानचा किनारा दिसत राहतो. या खेपेला मला आगबोटीवर रा. गोझ नांवाचे वांद्र्याला राहणारे नाविक व्यापारी खात्यांतील एंजिनीयर भेटले. त्यांनीं सर्व जगाचा प्रवास केलेला असून हिंदुस्थानच्या या सर्व किनाऱ्याची त्यांना खडान् खडा माहिती होती. यामुळे दुरूनसुद्धां ते हिंदुस्थानांतील कोणत्या भागासमोरून आमची बोट चालली आहे हें सांगत असत. ता. २० रोजच्या दिवसां बारा वाजताच्या रिपोर्टावरून ९ तासांत आमच्या आगबोटीनें १७४ मैलांची मजल गाठली असें कळलें.
ता. २१ रोजी सर्व दिवसभर आम्हांला त्रावणकोर संस्थान व कोचीन संस्थान यांचा किनारा व त्यांचे तांबडे डोंगर व हिरव्यागार बागा केव्हां अस्पष्ट तर केव्हां स्पष्ट अशा दिसत होत्या. आमच्या सर्व जलप्रवासांत हिंदुस्थानच्या ज्या किनाऱ्याच्या अगदी नजीक आमची बोट साडेतीन वाजतां आली, तो गोवें प्रांत होता. गोझ हे गोवे प्रांतांतील गोवानीझ गृहस्थ असल्यामुळे त्यांना त्या प्रांताचा चिरपरिचय होता. मार्मगोव्या बंदराजवळच्या सेंट जार्ज बेटाचे अगदीं समोर व नजीक अशी आमची बोट आली. "कप्तानानें कोलंबोपासून मार्मगोवा या टोकांकडे सारखें सुकाण धरून सरळ तो मार्मगोव्यास आला असावा" असें गोझ म्हणाले. आम्हांला मार्मगोवाबंदर, तेथें नांगरलेल्या आगबोटी मार्मगोवा स्टेशनापासून निघणारी आगगाडी यासुद्धां स्पष्टपणे दिसल्या; तसेंच पणजीम बंदर व बिशपचा टेकडीवरील पांढरा शुभ्र वाडा व दीपगृह हीं सर्व उत्तम तऱ्हेनें दिसली. येथें मला विलायतेच्या जलप्रवासांतील इटालीच्या मेसिना सामुद्रधुनींतून जातांना दिसणाऱ्या देखाव्याची आठवण झाली. आतां मुंबई फक्त बारा तासांचे अंतरावर राहिली म्हणून मला आनंद वाटला. पुढे साडेपांच सहा वाजतां समुद्रवलयांकित वेंगुर्ल्याचे खडक नांवाचे खडक लागले. त्यांचे ते विचित्र आकार, त्यांचें तें जळकें उघडें बोडकें स्वरूप आश्चर्यकारक वाटलें. या खडकावर एक दीपगृह आहे. नंतर काळोख पडला व मी बोटीवरील शेवटचें भोजन केलें. पहांटेस पांच वाजतां उठलों तोंच मुंबईच्या विजेच्या दिव्यांचा लखलखाट दिसूं लागला. आगबोट मुंबई बंदरांत आली हे पाहून मला मातृभूमीला सुखरूप परत आल्यामुळे फार आनंद झाला. मी चहाब्रेड घेऊन डेकवर आलों व माझ्या बंधूची वाट पहात बसलों. पण ते दिसले नाहींत. आमच्यामागें पासपोर्टची पीडा नसल्यामुळे आमची ताबडतोब सुटका झाली व मी एका दादरावरून धक्यावर आलो व माझे बंधु व रा. धारप वकील हे दुसऱ्या दादरानें बोटीवर गेले. म्हणून आमची चुकामूक झाली. पण या चुकामुकीमुळे त्यांना काँटेरॉसो आगबोट सबंद पाहण्यास सांपडली. ती पाहून ते परत आले व मला भेटले. अर्थात् मला फार आनंद वाटला. बरोबर आणलेला चहा व थोडीं खेळणीं यांवरील जकात चुकती करून सर्व सामान घेऊन व्हिक्टोरिया करून आम्हीं मोठ्या आनंदानें रा. धारप वकील यांचे बिऱ्हाडीं आलों.
याप्रमाणें बरोबर तीन महिन्यांनीं म्हणजे ता. २२ फेब्रुवारी रोजीं मी आपला लंका बेटाचा व केरल प्रांताचा प्रवास संपवून परत देशीं आलों व मग सर्व आप्तेष्टमित्रांच्या भेटीस गांवोगांवीं गेलों.
हिंदुस्थानांत काय किंवा युरोपच्या पूर्वेकडील इतर देशांमध्यें काय, ऐतिहासिक कालगणना करतांना तीन युगें मानण्याचा प्रघात पडला आहे; कोणत्याही देशाच्या इतिहासाचे पुरातनयुग, मध्ययुग व अर्वाचीनयुग असे तीन भाग पाडतात. एखाद्या बहुपरिणामी प्रसंगापासून युगभेद पाडण्यांत येतो. पूर्वेकडील देशांत असा बहुपरिणामी प्रसंग म्हणजे युरोपच्या पश्चिम किनाऱ्यावरील युरोपियन लोकांचा पूर्व देशांत चंचूप्रवेश हा होय. कारण या चंचूप्रवेशापासून व युरोपीयन लोकांच्या वरचष्मी सहवासापासून पूर्वेकडील देशांत राजकीय धार्मिक आर्थिक व सामाजिक बाबतींत बहुविध बदल व फेरफार घडून आले. राजकीय दृष्ट्या तर जपानखेरीज बाकीच्या सर्व देशांत स्वकीय अंमल नष्ट होऊन कमी जास्त प्रमाणांत परकीय अंमल सुरू झाला. धार्मिक बाबतींत क्रिसचन धर्माचा खुषीनें किंवा नाखुषीनें स्वीकार व प्रसार झाला; आर्थिक बाबतींत तर क्रांतिकारक फेरफार झाले व सामाजिक बाबतींत पाश्चिमात्य संस्कृतीच्या व वाङ्मयाच्या परिचयानें समाजांत नव्या नव्या कल्पना व नवे नवे आचार प्रचलित झाले; सारांश, दोन स्वतंत्र संस्कृतींचा संगम व समागम झाला म्हणजे परस्परांवर कमी अधिक परिणाम घडतात या सर्वसामान्य नियमाप्रमाणें पूर्वेकडील देशांत सार्वत्रिक क्रांति घडून आली. तेव्हां युरोपीयन लोकांच्या पूर्वदेशांतील चंचुप्रवेशापासून तेथें अर्वाचीन युगा प्रारंभ झाला असें मानण्यांत येतें तें यथार्थ आहे.
या दृष्टीनें लंकेच्या अर्वाचीन युगास सन १५०५ पासून सुरवात झाली. तेव्हांपासून या युगाचीं आजतागाईत ४३० वर्षे झाली असें होतें. या अर्वाचीन युगाचे जवळ जवळ समान वर्षांचे असे तीन पोटविभाग पडतात. पहिला विभाग सन १५०५ ते सन १६५६ म्हणजे १५१ वर्षांचा पडतो. या पोटविभागांत लंकेमध्यें पोर्तुगीझ लोकांचा प्रथम चंचूप्रवेश होऊन त्यांचा लंकेकरांना वरचष्मी सहवास व प्रत्यक्ष अंमल सहन करावा लागला. या युगपर्वाला 'पोर्तुगीझ कारकीर्द' असें म्हणतात. दुसरा विभाग सन १६५६ ते सन १७९६ म्हणजे एकशेचाळीस वर्षांचा पडतो. या युगपर्वास 'डच कारकीर्द' म्हणतात; तिसरा विभाग सन १७९६ ते आजतागाईत म्हणजे सुमारें एकशेचाळीस वर्षांचा पडतो. या युगपर्वास 'ब्रिटिश कारकीर्द' म्हणतात. आतां या युगपर्वातील निरनिराळ्या कारकीर्दींची हकीकत तीन प्रकरणांत देणे सोयीचें होईल. पण या वर्णनास लागण्यापूर्वी पोर्तुगीझ लोकांच्या लंकाप्रवेशाच्या सुमारास तेथल्या स्थितीचें सिंहावलोकन करणें वावगे होणार नाहीं.
समाजशास्त्र असें सांगतें कीं एखाद्या लोकांची किंवा देशाची संस्कृति ही अचल नसून त्याला चक्रनेमिक्रमाप्रमाणें वरखालीं नेणारी गति असते व तदनुरूप संस्कृतीला केव्हां 'उपरिदशा' येते तर केव्हां 'नीचदशा' येते. या नियमान्वयें पहातां लंकेच्या व लंकेकरांच्या संस्कृतीची उपरिदशा किंवा वैभवरवीचा मध्यान्हकाळ म्हणजे पहिल्या पराक्रमबाहूची कारकीर्द हा होय. दुसऱ्या प्रकरणांत वर्णन केल्याप्रमाणें पराक्रमबाहूनें सर्व बेटांवर पूर्ववत् एकछत्री अंमल स्थापित करून आपल्या दीर्घकालीन कारकीर्दीमध्यें (सन ११५३ ते ११८६) लंकाबेटाची सर्वाङ्गीण सुधारणा घडवून आणली. यामुळे विद्याकला, उद्योगधंदे, उदीमव्यापार, शेतीबागायती इत्यादि संस्कृतीच्या सर्व अंगांची पराकाष्ठेची प्रगति झाली, व लोक संपन्न व सुखी झाले. पण त्याच्या पश्चात् संस्कृतिचक्राची अधोगति सुरू झाली व तें चक्र पंधराव्या शतकाच्या अखेर अगदीं रसातळाला येऊन पोहोंचलें. आधीं एकछत्री व एक तंत्री राज्याचे तुकडे तुकडे पडले; लंकेच्या उत्तरेकडील भाग तामील राजांनी काबीज करून जाफना येथें स्वतंत्र राज्य स्थापन केलें. त्यांच्या स्वाऱ्यांच्या माऱ्यामुळे पराक्रबाहूच्या वंशजास पोलनुरूवा राजधानी सोडून दक्षिणेत मोर्चा फिरवावा लागला व यापहू, दंवडानिया, गांपोला, कुरुनेगाला, रयीगामा, केलेनिया, कोटे, सितावाका व कँडी इत्यादि शहरांना तात्पुरतें व क्षणभंगुर राजधानीपद प्राप्त होत गेलें. शिवाय तुकडे तुकडे पडलेल्या राज्यांमध्यें व त्यांच्या राजांमध्यें आपआपसांतील भांडण-तंटे व लढाया सारख्या चालू असत. यामुळे देशाची संपत्ति सामर्थ्य व संस्कृति नामशेष होत चालली. कोलंबोमध्यें पोर्तुगीझांनीं प्रथम पाऊल टाकलें त्यावेळीं उत्तरेस जाफना व कँडी येथें परस्पराशीं भांडणारे असे दोन तामीलवंशीय राजे राज्य करीत होते; तर कोलंबोच्या नजीक कोटे येथें व कोलंबोच्या पूर्वेस सितावाका (अविसवेला) येथें मूळच्या सिंहली राजघराण्यांतील परस्परांचा नायनाट करूं पाहणारे दोन राजे राज्यांवर होते. सन १५०५ मध्ये १५ नवंबर रोजीं लोरेंझो दी आलमीडा नांवाचा पोर्तुगीझ व्यापारी आरमाराचा कप्तान कोलंबो बंदरास आला.
पोर्तुगीझ राष्ट्राला पोपनें दिलेल्या पूर्व देशावरील स्वामित्वाचें आज्ञापत्र राष्ट्रीय ढालीच्या चित्रासकट त्यानें बंदरावरील एका खडकावर खोदलें. तो खडक पूर्वी कस्टम कचेरीच्या जागेंत होता. पण खोदलेल्या लेखाचा तो मोठा खडक सध्यां गॉर्डन बागेंत ठेवण्यांत आला आहे. शिलालेख राष्ट्रीय ढालीचें चित्र चांगलें स्पष्टपणें दिसतें. कोलंबोकरांवर पोर्तुगीझ लोकांनीं आपल्याबद्दल अनुकूल ग्रह उत्पन्न केला असावा. कारण राजावली या ग्रंथावरून लोकांनीं राजाकडे खालील बातमी धाडली असें दिसतें. "आपल्या कोलंबो बंदरांत गोऱ्या कातडीच्या व देखण्या लोकांची जात आली आहे. ते लोक अंगांत लोखंडी चिलखत व डोक्यावर लोखंडी शिरस्त्राण घालतात. ते क्षणभरही एका जागेवर बसले रहात नाहींत; ते सारखे इकडे तिकडे फिरतात; ते गोट्याचे तुकडे (पावाचे तुकडे) खातात व रक्त (तांबडी दारू) पितात; एका माशाला किंवा लिंबाला ते दोनतीन सोन्याची किंवा रुप्याचीं नाणी देतात; त्यांच्या तोफांचा आवाज युगंधर खडकावर येऊन आपटतो तेव्हां तो मेघाच्या गडगडण्यापेक्षांही मोठा वाटतो. त्यांच्या तोफांचे गोळे पुष्कळ लांबपर्यंत जातात व जांब्या दगडाची तटबंदी हादरून टाकतात."
पोर्तुगीझ लोकांना कोलंबोपासून साहा मैल असलेल्या कोटे राजधानीस मुद्दाम फार लांबूनच्या वांकड्या तिकड्या वाटेनें नेण्यांत आलें; म्हणून त्यांना राजधानीस पोहचण्यास तीन दिवस लागले. अर्थात् या कुटील कारवाईनें पोर्तुगीझ वकील फसले नाहींत. या परकीयांच्या आगमनानें इसलामधर्मी मूर लोकांच्या व्यापाराचें नुकसान होणार होतें. म्हणून त्यांची या परकीयांविरुद्ध कारस्थानें सुरू झालीं. तरी डॉम लोरेंझो कप्तानाची व कोटेच्या राजाची भेट झाली. वाटाघाटीनंतर कोटेच्या राजानें पोर्तुगालच्या राजाची मदत व आश्रय घेण्याचें व दालचिनीच्या रूपानें खंडणी देण्याचें कबूल केलें. लवकरच पोर्तुगीझ लोकांनी कोलंबो येथे किल्ला बांधला व आपला व्यापार चालू केला.
लंकेतील पोर्तुगीझ लोकांच्या दीडशे वर्षांच्या कारकीर्दीचे स्वाभाविकपणें दोन विभाग पडतात. पहिला विभाग म्हणजे सन १५०५ मधील लंकाप्रवेशापासून तों सन १५९७ मधील कोटेच्या राज्याच्या व लंकेच्या अधिराज्याच्या हक्कसंपादणीपर्यंतचा काळ होय. दुसरा विभाग सन १५९७ पासून ते सन १६५६ पर्यंतचा लंकेच्या खऱ्याखुऱ्या स्वामित्वाच्या संपादन- विसर्जनाचा काळ होय.
पोर्तुगीझ लोकांनीं प्रथम लंकेंत प्रवेश केला तेव्हां आठवा पराक्रमबाहू कोटे येथें राज्य करीत होता. हा बराच वृद्ध झालेला होता. जरी पराक्रमबाहूला तामील लोकांच्या उत्तर लंकेच्या आक्रमणामुळे मूळची लंकेची राजधानी सोडून दक्षिण लंकेंत येऊन राहावें लागलें होतें तरी तो आपल्याला लंकेचा अधिराजा म्हणवीत असे. पण त्याची तीस पसतीस वर्षांची कारकीर्द आपल्या नातेवाईकांशीं भांडण्यांतच गेली. त्याच्या उतार वयांत तर त्याच्या दोन मुलांनीं वृद्धबापाकडून बळजबरीनें म्हणा किंवा खुशीनें म्हणा, राज्यकारभार आपल्या हातीं घेतला; एक मुलगा नववा पराक्रमबाहु म्हणून आपली कारकीर्द सन १५०९ पासून मोजूं लागला तर दुसरा मुलगा सातवा विजय म्हणून तेव्हांपासूनच आपली कारकीर्द मोजूं लागला.
यावरून दोघां भावांमध्यें गादीच्या वारसपणाबद्दल वाद चालू होता व दोघेही आपआपल्यापरी स्वतःला राजा म्हणवून घेत होते असें दिसतें. पण सन १५१८ मध्यें तो वृद्ध राजा एकदांचा मेला अगर मारला गेला. या राजाच्या वृद्धापकाळींच राजघराण्यांतील दूरच्या एका शूर पुरुषानें कँडीकडील मुलूख आपल्या हाताखालीं घातला व तो स्वतंत्रपणें तिकडील कारभार करूं लागला; तर पराक्रमबाहूच्या मायादुने नांवाच्या भावानें सितावाका (अविसवेला) येथेंच स्वतंत्र राज्य स्थापन केलें. अशा तऱ्हेने आठव्या पराक्रमबाहूच्या कारकीर्दीच्या अखेरीस दक्षिण लंकेंत सुद्धां तीन चार स्वतंत्र राजे झाले. पण आठव्या पराक्रमबाहूच्या सन १५१८ साली झालेल्या मृत्यूनंतर नववा पराक्रमबाहू म्हणविणाऱ्या आपल्या भावाचा पाडाव करून विजयबाहूनें कोटेची गादी बळकावली व तो आपल्याला सातवा विजयबाहू म्हणवूं लागला व आपली कारकीर्द सन १५०९ पासून मोजूं लागला. परक्या पोर्तुगीझ लोकांना आश्रय देण्याचें आपल्या बापाचें धोरण न आवडल्यामुळे कालिकतच्या झामोरिनपाशीं संगनमत करून त्यानें पोर्तुगीझ लोकांनीं नुकत्याच बांधलेल्या कोलंबोच्या किल्ल्यावर हल्ला केला. पण पोर्तुगीझ लोकांनीं विजयबाहूच्या सैन्याचा पराभव केला. पुढें विजयबाहूच्या मुलांचा व मायादुनेच्या मुलांचा पक्ष घेऊन विजयबाहूवर पोर्तुगीझांनीं सन १५२१ मध्यें स्वारी केली. या स्वारीमध्यें विजयबाहूचा पराभव झाला व तो धारातीर्थी पतन पावला. विजयवाहूचा थोरला मुलगा सातवा भुवनैकबाहु या नांवानें गादीवर आला. याची कारकीर्द सन १५२१ ते सन १५५१ म्हणजे तीस वर्षे चालली खरी. पण या सर्व काळांमध्ये कोटेचा राजा भुवनैकबाहु व सितावाकाचा राजा मायादुने व त्याचा मुलगा राजसिंह व कँडीचा राजा यांमध्यें तिरंगी सामना सारखा चालू होता. अशा या तिरंगी सामन्यामध्यें पोर्तुगीझ अंमलदार एकदां एकाचा पक्ष घे तर दुसऱ्यांदा दुसऱ्याचा पक्ष घे अशा धोरणानें वागत होते व आपला व्यापार व आपल्या अंमलाखालील मुलूख यांची वाढ करीत होते. आठव्या पराक्रमबाहूप्रमाणें मायादुने हा फार वर्षे जगला. त्यानें सितावाका येथें स्वतंत्र गादी सन १५२१ साली स्थापन केली. पण तेव्हांपासूनच त्याचा अल्पवयी पण पराक्रमी मुलगा राजसिंह लढाया व राजकारण यांत भाग घेऊं लागला. तो बापाच्या हयातीतच म्हणजे सन १५५४ पासून स्वतंत्रपणे राज्यकारभार करूं लागला व तेव्हांपासून त्याच्या कारकीर्दीस सुरवात झाली. मायादुने सन १५८१ पर्यंत नांवानें गादीवर होता. मायादुने व भुवनैकबाहू यांचेमध्यें लंकेच्या अधिराज्याबद्दल सारखी चुरस चालू होती. आपल्या राज्याला जास्त स्थैर्य यावें या उद्देशानें भुवनैकबाहूनें आपला धर्मपाल नांवाचा अर्भक नातू (मुलीचा मुलगा) याची सोन्याची मूर्ती सन १५४० मध्यें वकिलाबरोबर लिसबन येथें पोर्तुगालच्या राजाकडे पाठविली व त्या अर्भक मुलाला आपल्यामागें गादीवर बसवून त्याचें संरक्षण करावें अशी पोर्तुगालच्या राजाला विनंति केली. पोर्तुगीझ राजाला ही संधि सुवर्णसंधि वाटली व त्यानें धर्मपालाचे पालकत्व पतकरलें. इकडे कँडीच्या राजानें सन १५४७ मध्ये पोर्तुगीझ लोकांजवळ सितावाकाच्या राजावर हल्ला करण्याकरितां मदत मागितली. तीही गोष्ट पोर्तुगीझ लोकांनीं कबूल केली. याप्रमाणें दक्षिण लंकेत चौरंगी सामना सारखा चालू झाला. सन १५५१ मध्यें भुवनैकबाहु ठार मारला गेला. अर्थात् धर्मपाल राजाला पोर्तुगीझ सरकारच्या आश्रयाखालीं गादीवर बसविलें खरें. पण मायादुनेला ही उत्तम संधी मिळाली. त्यानें कोटेच्या मुलुखावर स्वारी केली व बहुतेक मुलूख काबीज केला. पोर्तुगीझ सरकारला धर्मपालाला कोलंबो येथें सुरक्षितपणाकरितां न्यावें लागलें.
सन १५५७ मध्यें धर्मपालानें क्रिस्ती धर्म स्वीकारला. यामुळे त्याची प्रजा बिथरली व मायादुनेचा मुलगा राजसिंह यानें या संधीचा फायदा घेऊन धर्मपालच्या राहिलेल्या राज्यावर स्वारी केली व सन १५६१ मध्ये पोर्तुगीझ सैन्याचा पराभव केला. सन १५६३-६४ मध्ये तर त्यानें कोटे राजधानी व कोलंबो बंदर या दोन्ही ठिकाणाला वेढा दिला. ही लढाई सन १५८० पर्यंत सारखी चालू होती. सन १५८० मध्ये राजसिंहानें कँडीच्या राज्यावर स्वारी करून राजाला पळवून लावलें व राज्य आपल्या राज्यांत सामील केलें. राजाला (त्यानेंही धर्मपालाप्रमाणेंच क्रिश्चनधर्म स्वीकारला होता) डोना कॅथरिना नांवाची मुलगी होती. तिच्या अज्ञान दशेमध्ये आपला पुतण्या डॉम फिलिप याला वारस नेमून पदच्युत राजानें प्राण सोडला. सन १५८१ मध्ये मायादुने वारला व राजसिंह खरोखरीचा राजा झाला. राज्यावर आल्याबरोबर त्यानें पोर्तुगीझ लोकांना लंकेतून घालवून लावण्याचा निश्चय केला व खुद्द कोलंबो बंदराला सन १५८७ मध्यें वेढा दिला. यावेळी पोर्तुगीझ लोकांनी लंकेच्या सर्व पश्चिम किनाऱ्यावर लुटालूट केली. दोंद्रा (लंकेचें कन्याकुमारी टोंक) येथील विष्णूचें देवालय पाडलें. पण कँडी राजघराण्यांतील डॉमजॉन नांवाचा वीर पुरुष राजसिंहाविरुद्ध उठला. त्यानें डॉम फिलिपला बरोबर घेऊन कँडीच्या मुलखावर स्वारी केली व प्रथम त्याला गादीवर बसविलें; पण त्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर त्यानें स्वतःच कँडीची गादी बळकावली व त्यानें सन १५९० मध्ये विमलधर्मसूर्य या नांवानें ग्वाही फिरविली. सन १५९२ मध्ये राजसिंहानें विमलधर्मसूर्य राजावर स्वारी केली. पण त्याचा पराभव झाला व लवकरच म्हणजे सन १५९३ मध्यें राजसिंह अपघातानें वारला. त्याच्या मृत्यूबरोबर त्याचें राज्यही लयास गेलें. कारण, राजसिंहाचा आवडता सेनापती धर्मपालाच्या पदरीं चाकरीस राहिला. मग धर्मपालानें त्याच्या व पोर्तुगीझ सैन्याच्या मदतीनें सितावाकाचा सर्व मुलूख काबीज करून आपल्या राज्यांत सामील केला. यावेळी पोर्तुगीझ लोकांचे ग्रह उच्चीचे होते. कारण यावेळीं जाफनाच्या राजानें मानार येथें असलेल्या पोर्तुगीझ पाद्र्यावर हल्ला केला. तेव्हां पोर्तुगीझ सरकारने जाफना प्रांतावर हल्ला केला व तो प्रांत सन १५९१।९२ मध्यें काबीज केला व तेथें आपला अंमल राजरोस सुरू केला.
याप्रमाणें सन १५९४ च्या सुमारास विमलधर्मसूर्य व पोर्तुगीझ लोकांच्या ताटाखालचे मांजर बनलेला धर्मपाल येवढे दोन राजे राहिले. विमलधर्मसूर्यानें आपला कँडीच्या गादीवरील हक्क द्विगुणित करण्याकरितां पूर्वीच्या पदच्युत राजाची मुलगी डॉन कॅथरिना हिच्याशी लग्न केलें व ख्रिश्चन धर्म टाकून बौद्धधर्म स्वीकारला. इकडे सन १५९७ मध्यें धर्मपाल विनवारशी वारला. त्यानें आपल्याला संतति नाहीं असें पाहून व आपले पालनपोषण पोर्तुगीझ लोकांनीं केलें हे स्मरून सन १५८० मध्यें बक्षीसपत्रानें पोर्तुगालच्या राजाला आपलें राज्य व लंकेचें अधिराज्य दिलें होतें. तेव्हां धर्मपालाच्या पश्चात् पोर्तुगालचा राजा लंकेचा राजा झाला व तशी ग्वाही फिरविण्यांत आली.
येथपासून पोर्तुगीझ कारकीर्दीच्या दुसऱ्या विभागास सुरवात झाली. त्यांनी सर्व लंकाबेट आपल्या ताब्यांत आणण्याचा घाट घातला. त्यांनी कँडीच्या राजाशी युद्ध सुरू केलें व सन १६०२ पर्यंत त्यांनीं समुद्रसपाटीचा तळमुलूख काबीज केला. जाफना व मानार हे उत्तरेकडील भाग आधींच त्यांच्या ताब्यांत आले होते. कँडीच्या राजानें पोर्तुगीझ सेनापतीला लांच देऊन आपल्या बाजूस आणण्याचा प्रयत्न केला. सिलोनच्या पोर्तुगीझ गव्हरनराच्या सांगण्यावरून वरकरणी तो राजाच्या म्हणण्याला कबूल झाला. पण असें करण्यांत कँडी राजधानीच्या मुख्य मार्गावरील बालाने शहर ताब्यांत घेण्याचा पोर्तुगीझांचा बेत आहे ही बातमी राजास कळली व त्यानें तयारी ठेवली. सन १६०३ मध्ये बालाने वर हल्ला केला गेला. तो यशस्वी झाला नाहीं; व गव्हरनरास मोठ्या प्रयासानें परत फिरावें लागलें. पण एव्हांपासून कँडीच्या राजानें पूर्वेकडे व्यापार करीत असलेल्या डच कंपनीशी संधान बांधण्याचा उद्योग चालविला. विमलधर्मसूर्य यानें बुद्ध धर्म स्वीकारून बुद्धदांताकरितां दोन मजली सुंदर इमारत बांधली व बुद्धधर्मी भिक्षूंची तुटलेली परंपरा सुरू केली. गटांबे येथें मोठा बौद्धधर्मी उत्सव केला. कँडी येथें सध्यां असलेल्या पुष्कळ इमारती त्याने बांधल्या. विमलधर्मसूर्य हा सन १६०४ मध्यें वारला. त्याचेमागून त्याचा चुलतभाऊ सेनारेट आपला भिक्षूचा पेशा टाकून राज्यावर आला व त्यानें डोना कॅथरिना या विधवा झालेल्या राणीशीं विवाह केला. सितावाका राजघराण्यांतील राजपुत्रानें राज्य मिळण्याकरितां खटपट केली खरी; पण ती यशस्वी झाली नाहीं. मात्र या संधीचा फायदा घेऊन पोर्तुगीझ गव्हर्नरानें आपल्या राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला. त्यानें कँडीच्या मुलखांतील लोकांना फार क्रूरतेनें वागविलें. सेनारेटची कारकीर्द सन १६३५ पर्यंत चालली. या सर्व कारकीर्दीभर त्याचें पोर्तुगीझ सरकारबरोबर युद्ध चालू होतें. याच्याच कारकीर्दीच्या काळांत प्रख्यात पोर्तुगीझ आलबुकर्क हा गव्हरनर होऊन आला. त्यानें पोर्तुगीझ अंमलातील व सैन्यांतील अव्यवस्था व लांचलुचपतीचा प्रकार काढून टाकला. त्यानें कालुतारा, त्रिंकोमाली, बाटिकोला येथें किल्ले बांधले व गॉल व कोलंबो येथील बंदराचा अधिक बंदोबस्त व बळकटी केली. याप्रमाणे कँडी राजाच्या मुलखाची पूर्णपणें नाकेबंदी झाली. पण सेनारेटचा मुलगा राजसिंह हा सन १६३० पासून कारभार पाहूं लागला. त्यानें पोर्तुगीझ लोकांच्या सिंहली सैन्याला वश करून घेऊन पोर्तुगीझ मुलखावर हल्ला केला. त्यांत पोर्तुगीझ सैन्याचा पराभव होऊन खुद्द पोर्तुगीझ सेनापती लढाईत मारला गेला. दुसऱ्या पोर्तुगीझ सेनापतीनें पुनः कँडीच्या मुलखावर हल्ला केला. सेनारेट राजानें सन १६३४ मध्ये पोर्तुगीझ लोकांशी तह केला. पण तो सन १६३५ मध्ये वारला व त्याचा मुलगा राजसिंह राज्यावर आला. त्यानें सन १६३६ मध्यें डच लोकांची मदत मागितली. डच लोकांचा लंकेवर डोळा होताच. त्यांना ही उत्तम संधी मिळाली. तेव्हांपासून लंकेमध्यें डच व पोर्तुगीझ या दोन युरोपीयन राष्ट्रांतील कंपन्यांमध्यें लंकेच्या व्यापाराकरितां व लंकेवरील वर्चस्वाकरितां युद्ध सुरू झालें. डच सेनापतीनें बाटिकोला सन १६३८ मध्यें काबीज केलें; सन १६३९ मध्यें त्रिंकोमाली हे प्रख्यात बंदर डच लोकांनीं घेतलें. सन १६४० मध्यें त्यांनीं निगंबो काबीज केलें. गॉल बंदराला डच लोकांनीं सन १६४२ मध्यें वेढा दिला व तें बंदर सन १६४३ मध्ये त्यांच्या ताब्यांत आलें. शेवटीं सन १६५६ मध्यें खुद्द कोलंबो किल्ल्याला त्यांनी वेढा दिला. पोर्तुगीझ सेनापतीला डच लोकांना शरण जाऊन किल्ला त्यांचे स्वाधीन करावा लागला. ज्या ठिकाणीं सन १५०५ सालांत लंकेमध्यें पोर्तुगीझाचा चंचूप्रवेश झालां त्याच ठिकाणी सन १६५६ मध्ये त्यांचा पराभव होऊन त्यांच्या सत्तेचा अंत झाला; व लंकेतील डच कारकीर्दीस सुरवात झाली. तेव्हां या प्रकरणाचे शेवटीं पोर्तुगीझ लोकांच्या दीडशे वर्षांच्या कारकीर्दीचें सिंहावलोकन करणें अयोग्य होणार नाहीं.
लंकेंतील पोर्तुगीझ सरकार हे हिंदुस्थानांतील गोव्याच्या व्हाईसरॉयाच्या ताबेदारीखाली असे. लंकेमधील मुख्य अधिकाऱ्यास कॅपटन जनरल म्हणत. लंकेतील पोर्तुगीझ मुलखाचे चार भाग केलेले होते व त्यावर चार मुख्य अंमलदार असत. त्यांना डिसावा म्हणत. त्यांना दिवाणी, फौजदारी व लष्करी असे सर्व तऱ्हेचे अधिकार असत. प्रत्येक भागाचे कोरले म्हणून जिल्हे असत. त्यावरील अधिकाऱ्यास आदिगार म्हणत. त्याच्या हाताखालीं खेडीं असत व त्यावरील अधिकाऱ्यांस विदाने म्हणत. बहुतेक खेड्यांचा वसूल पैशाऐवजीं जिनसामध्ये घेतला जात असे; ते जिन्नस म्हणजे दालचिनी, मिरी, सुपारी, रत्ने, मोतीं व हत्ती हे होत. धार्मिक बाबतींत सिलोनचा मुलूख कोचीनच्या धर्मोपदेशकाच्या ताब्यांत असे; पुष्कळ मिशनरी मंडळ्यांचे पाद्री लंकेंत येऊन राहिले होते. त्यांनी शाळा व कॉलेजें काढलीं होतीं. सर्व शिक्षण मोफत असे. धार्मिक बाबतींत लोकांवर पुष्कळ जबरदस्ती व सक्ती होत असे. पोर्तुगीझांच्या कारकीर्दीमध्यें पुष्कळ सिंहली लोक खुशीनें किंवा नाखुशीनें पण क्रिसचन झाले व लंकेंत किसचनधर्मी लोकांचा पुष्कळ भरणा तेव्हांपासून झालेला आहे.
पोर्तुगीझ लोकांच्या राज्यव्यवस्थेंत बरीच अंदाधुंदी व लांचलुचपत चाले; पोर्तुगीझ सैन्यामध्येंही म्हणण्यासारखी शिस्त नव्हती. यामुळे पोर्तुगीझ अंमलाला कायमपणा व मजबुती येऊ शकली नाहीं. लोकांमध्यें या अंमलाबद्दल अनुकूल ग्रह नव्हता. म्हणून दीडशे वर्षे चाललेला पोर्तुगीझ अंमल डच लोकांना अवघ्या वीस वर्षांच्या अवधीत नाहींसा करून लंकेवर आपले वर्चस्व स्थापन करतां आलें. लंकेच्या पोर्तुगीझ अंमलाच्या काळ्या बाजूचें वर्णन केलें खरें; पण त्या अंमलाला पांढरी बाजू मुळींच नव्हती असें मात्र नाहीं. जरी क्रिसचन मिशनरीनीं धार्मिक बाबतींत सक्ती केली तरी त्यानीं लोकांमध्यें ज्ञानाचा प्रसार केला यांत शंका नाहीं, तसेंच ते प्रजेचा पक्ष घेऊन जुलमी अधिकाऱ्याच्या जुलमापासून प्रजेचें संरक्षण करीत यांतही शंका नाहीं. त्याचप्रमाणें शेतकी व उद्योग या बाबतींत पोर्तुगीझ अमदानींत पुष्कळ वाढ व सुधारणा झाली. त्यांनीं पुष्कळ नवीं पिकें व नवे वृक्ष यांच्या लागवडीस सुरवात केली व उत्तेजन दिलें; तसेंच घरगुती उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिलें. पण सिलोनमध्ये सध्या पोर्तुगीझ अंमलाच्या खाणाखुणा व स्मारकें फारशीं राहिलीं नाहींत हें खरें आहे.
वास्को डि गामानें हिंदुस्थानचा, व त्याच्याही पूर्वेकडचा स्वतंत्र व सलग जलमार्ग शोधून काढून तिकडचा विलक्षण किफायतशीर व्यापार पोर्तुगीझ लोकांना मिळवून दिल्यापासून युरोपांतील पश्चिमेकडील सर्वच लहान मोठ्या राष्ट्रांच्या तोंडाला पाणी सुटलें व त्या राष्ट्रांचे व्यापारी टोळांच्या टोळधाडीप्रमाणें पूर्वेकडे आपल्या व्यापारी गलबतांसकट सफरी करूं लागले व पूर्वेकडील प्रांतांवर व बेटांवर धाड घालूं लागले. सर्वांची पद्धत एकच; एक व्यापारी कंपनी स्थापावयाची; आपल्या राजाकडून व्यापारी मक्त्याचा परवानगीपट पटकावयाचा; लहान मोठे व्यापारी आरमार व थोडेसे शिपाई जमवावयाचे; व गलबतांत थोडाफार माल व सोनें रूपें भरावयाचें व पूर्वेकडच्या एखाद्या देशांत किंवा बेटांत येऊन तेथील राजाजवळ पाऊलभर जागा व व्यापाराची सवलत मागून तेथें व्यापाराचें ठाणें स्थापावयाचें व मग तद्देशीय राजाच्या भांडणांत हात घालून हळूहळ 'भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी' या म्हणीप्रमाणे मुलख काबीज करून आपले राज्य करावयाचें व तेथे आपला धर्म पसरावयाचा व व्यापार वाढवावयाचा! याच पद्धतीनें नेदरलँडच्या डच लोकांनी सन १६०२ मध्यें डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली व लागलीच त्यानीं व्यापारी आरमार तयार करून पूर्वेकडे कुच केलें. पोर्तुगीझ लोकांनीं हिंदुस्थान व लंकाबेट येथें आपलें बस्तान बसविल्यामुळे डच व्यापारी आणखी पूर्वेकडे गेले व सुमात्रा जाव्हा बोर्निओ इत्यादि बेटांमध्ये त्यांनीं आपलें ठाणें दिलें. या भागाला ते डच ईस्ट इडाझ म्हणूं लागले. थोड्याच काळांत त्यानींहीं बेटे आपल्या ताब्यांत घेतलीं व बटेव्हिया बंदर आपल्या प्रांताची राजधानी केली. तरी त्यांचा हिंदुस्थानावर व लंकाबेटावर डोळा होता व संधी साधतांच त्यांनी या दोन्ही ठिकाणांवर झडप घातली.
डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली त्याच वर्षी म्हणजे सन १६०२ साली पहिला डच व्यापारी जोरीस स्पिलबर्जेन हा बटेव्हियाहून लंकेच्या पूर्वकिनाऱ्यावरील बाटिकोला या बंदरीं आला. त्यानें कँडीचा राजा विमलधर्मसूर्य याची भेट घेतली; ही पहिली परिचयभेट असल्यामुळे त्यापासून कांहीं एक निष्पन्न झालें नाहीं. त्याच सालीं डच आरमाराचा ॲडमिरल वीर्ट हा बाटिकोला बंदरास आला. तोही कँडीच्या राजाला भेटला. राजाला गलबतावर येण्याचा आग्रह करण्यांत आला. राजा मनांत साशंक होता; तरी पण तो गलबतावर गेला. पण दारूनें धुंद झालेल्या आडमिरलनें राजाचा उपमर्द केला. म्हणून राजानें आडमिरलला ठार मारलें व सांपडतील तितक्या डच खलाशांनाही ठार मारलें. याप्रमाणे कँडीचा राजा व डच लोक यांच्या सलोख्याच्या वाटाघाटींत 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' चा प्रकार घडला. यामुळें डच लोक कांहीं वर्षे लंकेत येण्याच्या फंदात पडले नाहींत. पण सेनारेट या कँडीच्या राजाच्या कारकीर्दीमध्यें सन १६१२ मध्यें मार्सेलस द बाशुवर हा खुद्द कँडीला आला. त्यानें डच ईस्ट इंडिया कंपनीकडून राजाला मदत देण्याचे कबूल केलें. पण तो कांहीं कारणानें लंकेंत दोन तीन वर्षे राहिला. यामुळे याही भेटीपासून कांहीं एक निष्पन्न झालें नाहीं. डच लोकांचें बस्तान बटेव्हिया येथें उत्तम बसल्यामुळे त्यांनीही कांहीं वर्षे लंकेच्या राजकारणांत लक्ष घातलें नाहीं. पण डच ईस्ट इंडियामध्ये त्यांचा अंमल कायमचा बसल्यानंतर व त्यांचें लष्करी व आरमारी सामर्थ्य वाढल्यावर त्यांनीं लंकेंतून पोर्तुगीझ लोकांना हाकलून देऊन सर्व लंकाबेट व तेथला मसाल्याचा विलक्षण किफायतशीर व्यापार हा आपल्या ताब्यांत घेण्याचा निश्चय केला. कँडीचा नव्या दमाचा राजा, दुसरा राजसिंह याच्याही मनांत पोर्तुगीझ लोकांचें लंकेतील प्रस्थ मोडून टाकावयाचें होतें. तेव्हां राजा व डच कंपनी यांचे संगनमत सहज होऊं शकलें. डच लोकांनीं सन १६३८ पासून सन १६५६ पर्यंतच्या अवघ्या अठरा वर्षांच्या काळांत पोर्तुगीझ लोकांचा पूर्ण पराजय करून त्यांच्या ताब्यांत असलेला सर्व मुलुख व त्यांच्या राजधानीचें बंदर कोलंबो हीं सन १६५६ मध्यें काबीज केली व लंकेमध्यें डच अंमल व राज्यव्यवस्था सुरू केली. त्यांनीं सर्व प्रांत किंवा राजधानीचें बंदर प्रत्यक्ष ताब्यांत घेण्याचे आधीपासून म्हणजे सन १६४० पासून लंकेचा गव्हर्नर नांवाचा अधिकारी यांची नेमणूक केली होती. डच लोकांचा पहिला गव्हर्नर वुल्यम कांस्टर हा होता. पण लंकेवरील डच लोकांची खरी कारकीर्द एडीअन व्हॉन मेडन या गव्हर्नराचेपासून सुरू झाली. डच लोकांच्या एकंदर एकशेंचाळीस वर्षांच्या कारकीर्दीमध्ये म्हणजे एड्रिअन व्हॉन मेडन या पहिल्या डच गव्हर्नरापासून तों व्हॉन एंजलबीक या शेवटच्या डच गव्हर्नरापर्यंत एकंदर सत्तावीस गव्हर्नर झाले. त्यामध्ये व्हॉन मेडन व रिकलॉफ व्हॉन गोन्स नांवाचे बापलेक अशा तिघां गव्हर्नरांनी सुमारें पंचवीस वर्षे लंकेतील राज्यकारभार केला. याच काळांत लंकेच्या किनाऱ्याच्या बाजूचा सर्व मुलख डच लोकांच्या ताब्यांत आला; व सिंहलद्वीपच्या कँडी येथील नामधारी राजांची पिंजऱ्यांत कोंडलेल्या सिंहाप्रमाणें अक्षरशः स्थिति झाली. या एकशेंचाळीस वर्षांच्या काळांत कँडीच्या राज्यावर दुसरा राजसिंह, दुसरा विमलधर्मसूर्य, नरेंद्रसिंह, विजय राजसिंह, कीर्तिश्री व राजाधिराज राजसिंह इतके राजे एकामागून एक राज्यावर आले. पुढे इंग्रजांच्या कारकीर्दीमध्यें एकच राजा श्रीविक्रमराजसिंह हा गादीवर आला व लवकरच त्याचें राज्य इंग्रजांनी घेतलें. या कोंडलेल्या स्थितीबद्दल त्या राजांची सारखी कुरबूर चालू असे. डच लोकांशीं वारंवार केलेल्या तहांना व करारमदारांना धाब्यावर बसवून हे राजे स्वतः डच मुलुखांवर हल्ले व स्वाऱ्या करीत किंवा डच मुलुखांतील लोकांना डच अंमलाविरुद्ध फिसारत देऊन त्यांचेकडून दंगेधोपे करवीत. यामुळे सर्व डच कारकीर्दीभर लंकेमध्यें सारखी धामधूम व लहान मोठ्या चकमकी व लढायां चालू असत. तरी पण डच लोकांच्या ताब्यांत सर्व बंदरें असल्यामुळे त्यांच्या व्यापारामध्ये फारसा व्यत्यय आला नाहीं. पोर्तुगीझ लोकांच्यापेक्षां डच लोकांची राज्यव्यवस्था पुष्कळच चांगली असल्यामुळें व त्यांच्या कडक शिस्तीमुळे मुलखाचा वसूल निर्वेध येई. म्हणूनच डच लोकांना लंकेमध्यें मोठमोठी सार्वजनिक कामें करतां आलीं; व त्यांच्या वेळचे किल्ले, प्रार्थनामंदिरें, खासगी व सार्वजनिक इमारती व दळणवळणाचे पाट व कालवे यांचे अवशेष अझून लंकेत शाबूत आहेत. तरी कँडीच्या राजाशीं सारखे युद्धप्रसंग येत असल्यामुळे डच कंपनीला सैन्याचा व आरमाराचा मोठा खर्च ठेवावा लागे. पुढें पुढे दुसऱ्या युरोपीयन कंपन्यांच्या चढाओढीमुळे डच लोकांच्या व्यापाराला बराच धक्का बसला. या सर्व कारणांमुळे लंकेतील डच अंमल त्यांच्या डच इंडीझच्या अंमलाप्रमाणें मजबूत पायावर उभारला गेला नाहीं. त्याचा पाया कच्चा व डळमळीत असाच राहिला. यामुळे युरोपांत इंग्लंड व हॉलंडमध्ये सन १७९४ मध्ये लढाई सुरू झाल्याबरोबर हिंदुस्थानांत बद्धमूल झालेल्या व सामर्थ्यवान् बनलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनें लंकेतील डच मुलुखावर मोठ्या आरमारानिशीं व सैन्यानिशीं स्वारी केली व डच लोकांच्या ताब्यांतील बंदरे व शहरें भराभर काबीज केली व शेवटीं कोलंबो किल्ल्याला सन १७९६ मध्ये वेढा दिला. डच लोकांच्या ताब्यांतील मुलख व बंदरें गेल्याची बातमी कोलंबोस कळल्यामुळें व कुमक येण्याची आशा नसल्यामुळें डच गव्हर्नर व्हॉन एंजलबीक यानें कोलंबो किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन केला. याप्रमाणें जो कोलंबो किल्ला पोर्तुगीझ लोकांवर निकाराचा हल्ला करून मोठ्या शौर्यानें डच लोकांनीं सन १६५६ मध्ये मिळविला तोच किल्ला एकशेंचाळीस वर्षांनी इंग्रज कंपनीला निकराचा हल्ला किंवा लढाई न करतां सहज ताब्यात घेतां आला. मग लंकेच्या किनाऱ्यानजीकचा सर्व मुलुख इंग्रजाच्या ताब्यांत येऊन इंग्रज कंपनीला सर्व लंकेचें अधिराज्य मिळालें. येथें लंकेतील डच अंमलाचें सिंहावलोकन करणें अयोग्य होणार नाहीं.
डच ईस्ट इंडिया कंपनी सन १६०२ मध्ये स्थापन झाली हें पूर्वी सांगितलेच आहे. या कंपनीची घटना प्रशंसनीय होती. ही घटना इतर युरोपीयन राष्ट्र आदर्शभूत मानीत. कंपनीचे भागीदार कंपनीच्या व्यवस्थेकरितां १७ डायरेक्टर नेमीत. हे निरनिराळ्या प्रांतांवरील गव्हर्नर व त्यांचे कौन्सिल यांची नेमणूक करीत. सिलोनचा राज्यकारभार गव्हर्नर नऊ सभासदांच्या कौन्सिलच्या मदतीनें पहात असे.
जुनी राज्यकारभाराची पद्धति डच लोकांनीं चालू ठेविली. न्यायदानाची पद्धति मात्र जास्त चांगली केली. कारण डच लोकांनीं डच रोमन कायदे व न्यायाचीं तत्त्वें लंकेतील आपल्या मुलखाला लागू केलीं व त्या तत्त्वानुरूप व कायद्यानुरूप तंट्याभांडणांचा निकाल केला जात असे. डच सरकारनें लोकांच्या प्राथमिक शिक्षणाची चांगली सोय केली होती.
शेतकीच्या धंद्याला ते नेहमीं उत्तेजन देत असत. सन १७२० पासून त्यांनी लंकेमध्यें कॉफीची लागवड सुरू केली. दालचिनीचीं झाडे लंकेमध्ये आपोआप रानांत होत असत. पण डच लोकांनीं दालचिनीचे मळे करून त्याची मोठ्या प्रमाणावर पैदास होईल अशी व्यवस्था केली. भाताचें पीक वाढविण्याचे व सुधारण्याचे प्रयत्न त्यांनी केले. सारांश, डच लोकांची लंकेंतील कारकीर्द व राज्यव्यवस्था पोर्तुगीझ लोकांच्यापेक्षां जास्त वाखाणण्यासारखी होती यांत शंका नाहीं; व म्हणूनच त्यांच्या कारकीर्दीच्या खाणाखुणा व अवशेष अजूनसुद्धां लंकेमध्यें जागोजाग दृष्टीस पडतात.
सर्व यूरोपीयन राष्ट्रांचें पूर्वेकडील धोरण कमी अधिक प्रमाणांत एक सारखेच होतें. प्रथम व्यापाराच्या दृष्टीनें देशांत चंचूप्रवेश करावयाचा व मग हळूहळू देशी राजांच्या भांडणांत पडून राजकीय वर्चस्व व सत्ता मिळवावयाची. इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीचा हाच कार्यक्रम होता. हिंदुस्थानासारख्या विस्तीर्ण देशांत त्यांना प्रथम ओसरी मिळाल्यामुळें त्यांना तेथेंच ऐसपैस हातपाय पसरण्यास वाव व संधी मिळाली. मग छोट्याशा लंकेकडे त्यांचें लक्ष कशाला जाईल? तरी पण सन १७६३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रास इलाख्याच्या सरकारनें कँडीच्या कीर्तिश्री राजाकडे आपला वकील पाठवून लंकेंत व्यापारी सवलती मिळविण्याची खटपट केली; पण ती गोष्ट त्यावेळीं साधली नाहीं. पण मागच्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें सन १७९४ मध्ये इंग्लंड व हॉलंडमध्यें लढाई सुरू होतांक्षणीं मद्रास सरकारनें ती संधी साधून लंकाबेटावर पूर्व किनाऱ्याच्या बाजूनें स्वारी केली व एका दोन वर्षांमध्यें लंकेंतील डच सत्ता नाहींशी होऊन त्या जागीं ब्रिटिश सत्ता आली.
लंकेतील ब्रिटिश कारकीर्द आजतागाईत बरोबर डच कारकीर्दीइतकी म्हणजे एकशेंचाळीस वर्षांची होते. त्या कारकीर्दीचे स्वाभाविकपणें तीन विभाग पडतात. पहिला सन १७९६ पासून सन १८१५ पर्यंतचा काळ, दुसरा सन १८१५ पासून सन १८३३ पर्यंतचा काळ व तिसरा काळ म्हणजे १८३४ पासून १९३४ पर्यंतचा एका शतकाचा काळ हा होय.
लंकेतील ब्रिटिश मुलुख ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रास सैन्यानें मिळविला असल्यामुळे हा मुलुख प्रथमतः मद्रास सरकारच्या ताब्यांत देण्यांत आला. मद्रासचा गव्हर्नर हाच लंकेचा पहिला गव्हर्नर बनला. मद्रास सरकारने मद्रासी अंमलदार पाठवून राज्यकारभार मद्रास इलाख्याच्या धर्तीवर चालविला. पण ही राज्यव्यवस्था यशस्वी झाली नाहीं; आधीं परकी मद्रासी अंमलदारांच्या सुळसुळाटानें सिंहली प्रजेंत असंतोष उत्पन्न झाला; तसेंच प्रत्येक नारळावर बसविलेला कर जबर असल्यामुळे त्याबद्दल फार गवगवा झाला; जमिनीचा सारा नोकरीच्या रूपानें घेण्याची जुनी पद्धति बंद करून त्याचे ऐवजी पिकाचा दहावा हिस्सा जमिनीचा सारा म्हणून घेण्याची नवी पद्धति लोकांना फार जाचक वाटली; शेवटी, सारावसुली व न्यायदान हीं दोन्हीं कामें एकाच अंमलदाराकडे देण्याची पद्धति ही प्रजेला पसंत नव्हती; सारांश, मद्रास सरकारने राज्यकारभारामध्ये एकदम घडवून आणलेल्या बदलामुळे सिंहली प्रजेचा असंतोष अनिवार होऊन तिनें जवळ जवळ बंडाचे निशाण उभारलें. तेव्हां विलायतेंतील इंग्रज सरकार जागें झालें व खुद्द राजानें फ्रेडरिक नार्थ याची लंकेचा पहिला स्वतंत्र गव्हर्नर म्हणून नेमणूक केली. त्यानें लोकांना जाचक वाटणारे नवे कर व नवी व्यवस्था काढून राज्यव्यवस्था सिंहली प्रजेला परिचित अशा पद्धतीनें व पूर्वीच्या अधिकाऱ्यामार्फत चालू केली. यामुळे प्रजेचा असंतोष कमी झाला. पुढें त्यानें राज्यकारभारांत सावकाश सुधारणा घडवून आणल्या व मग त्या सुधारणा लोकांचे आंगवळणी पडूं लागल्या.
फेडरिक नार्थ साहेब गव्हर्नर म्हणून आले त्याचे जरा आधीं कँडीचा राजा राजाधिराजसिंह वारला. त्याच्या दूरच्या एका तरुण नातेवाईकास पहिल्या आडिगारनें (मुख्य प्रधान) गादीवर बसविलें. या राजानें श्रीविक्रम राजसिंह हे नांव धारण केलें. त्यानें सन १७९८ पासून १८१५ पर्यंतच राज्य केलें. हाच कँडीचा व सिंहलद्वपिचा शेवटचा नामधारी राजा होय. हा राजा तरुण, अननुभवी व जात्या क्रूर होता.
गादीला प्रतिस्पर्धी राजकुमार होते. शिवाय राजाच्या मुख्य मंत्र्याचा बेत राजाला मारून आपणच गादी बळकाविण्याचा होता. त्या हेतूनें फ्रेडरिक नॉर्थ याजपाशीं त्याचें खलबत चालू होतें. कसें ही करून राजा व ब्रिटिश सरकार यांचेमध्यें वितुष्ट पाडून लढाई घडवून आणावी, मग राजाला पदच्युत करून ब्रिटिश सरकारच्या मदतीनें आपण राजपद मिळवावें असा तो बेत होता. पण या सर्व व्यूहाचा परिणाम 'तेल गेलें तूप गेलें धुपाटणें हातीं आलें' या म्हणीप्रमाणें झाला. ब्रिटिश सरकार व कँडीचा राजा यांचेमध्यें कटकटी सुरू झाल्या. एकमेकांच्या मुलखांवर स्वाऱ्या व हल्ले झाले; कँडीच्या राजानें कोलंबो राजधानीपर्यंत ब्रिटिशांच्या मुलखाची नासधूस केली. सिलोनच्या गव्हर्नरानें सिलोनमधील सरदारांना अनुकूल करून घेतलें. शिवाय मद्रासहून मोठें सैन्य आणविलें व कँडीच्या राजाच्या मुलखावर हल्ला केला. ब्रिटिश सैन्यापुढें कँडीच्या राजाच्या बाजारबुणग्या सैन्याचा निभाव कसा लागणार? शिवाय राजाच्या सरदारांना आधींच फितूर करून घेतलेलें होतें. अशा स्थितींत कँडीच्या सैन्याचा पूर्ण बीमोड होऊन इंग्रज सैन्यानें कँडी राजधानी सन १८१५ फेब्रुवारीमध्यें काबीज केली; व श्रीविक्रमराजसिंह राजाला कैद केलें. इंग्रजांनी कँडीच्या राजाचा सर्व मुलख ताब्यांत घेतला. श्रीविक्रमराजसिंह राजाला प्रथम कोलंबोस व मग हिंदुस्थानास धाडण्यांत आलें. तो तेथेंच सन १८३२ मध्यें वारला व त्याचा एकुलता एक मुलगा संततिहीन असा सन १८४३ मध्ये वारला. याप्रमाणें सिंहलद्वीपचें शेवटचें राजघराणें अस्तंगत झालें.
आतां सर्व लंका बेट इंग्रजांच्या ताब्यांत आलें. तरी पण १८१५ पासून सन १८३३ पर्यंत कँडीच्या राजाचा मुलुख निराळा ठेवला होता; व त्याचा कारभारही निराळा असे. याच काळांत कँडीच्या सरदारांनीं दोनचार वेळ बंडाळी केली; पण ती ताबडतोब मोडण्यांत आली. याच काळांत कोलंबो ते कँडी हा रस्ता बांधण्यांत आला व पुढें तो पूर्वेस त्रिंकोमाली बंदरापर्यंत नेण्यांत आला व उत्तरेस दांबुलपर्यंत नेण्यांत आला. याच काळांत लंकेंत काफीची मोठ्या प्रमाणावर लागवड सुरू करण्यांत आली. सर रॉबर्ट हार्टन या गव्हर्नरीचे कारकीर्दीमध्यें कँडी मुलुखाची निराळी व्यवस्था मोडून सर्व बेटांतील प्रांतांची व जिल्ह्यांची नवीन विभागणी व घटना करण्यांत आली; व सन १८३३ मध्यें सिलोन बेटाला नवी राज्यघटना देण्यांत आली. तदनुरूप स्वतंत्र न्यायकोर्ट बनविण्यांत आलें. चालू राज्यकारभार चालविण्याकरितां गव्हर्नर व त्याचें एक्झीक्युटिव्ह कौन्सिक अशी व्यवस्था करण्यांत आली. तसेंच कायदे करण्याकरितां कायदेमंडळ स्थापन करण्यांत आलें. सारांश, एकतंत्री राज्यव्यवस्था जाऊन कायद्यानें ठरविलेली व नियमबद्ध प्रतिनिधी स्वरूपाची राज्यघटना चालू झाली.
गेल्या शंभर वर्षांच्या कारकीर्दीमध्यें लंका बेटाची राजकीय, आर्थिक व सामाजिक बाबतींत कसकशी प्रगति होत गेली याचें सिंहावलोकन पुढील प्रकरणांत करणें चांगलें.
मागील प्रकरणांत सांगितलें आहे कीं, सन १८३४ च्या सुमारास लंका बेटाची राज्यव्यवस्था सर्वस्वीं एकतंत्री व एकसूत्री होती. सिलोनचा गव्हर्नर कार्यकारी कौन्सिलच्या मदतीनें वसाहतीच्या स्टेट सेक्रेटरीच्या सल्ल्यानें व संमतीनें लंका बेटाचा सर्व कारभार पाही. सिलोनला जवळ जवळ पहिल्यापासून 'राजाची वसाहत' समजत व म्हणूनच तेथल्या कारभाराचें धोरण वसाहतींच्या सेक्रेटरीच्या अखत्यारानें ठरे. तेव्हां गेल्या शंभर वर्षांमध्यें सिलोनच्या राज्यघटनेची कशी व कितपत प्रगति झाली याचें सिंहावलोकन करणें रास्त आहे.
सन १८३४ मध्यें नवी राज्यघटना ठरली ती फार साधी व सुटसुटीत होती. न्यायदानाकरितां स्वतंत्र वरिष्ठ कोर्ट स्थापन करण्यांत आलें. पूर्वीचें हिज मॅजेस्टीज् कौन्सिल नांवाचें गव्हर्नराला मदत करणारें कौन्सिल रद्द करून सिलोनमधले कायदे करण्याकरितां व सिलोनच्या सरकारी उत्पन्नाची विल्हेवाट लावण्याकरितां एक नवें सोळा सभासदांचे 'सिलोन कायदे कौन्सिल' बनविण्यांत आलें. यांपैकी दहा सभासद सरकारी अंमलदार असावयाचे, सहा कार्यकारी कौन्सिलर जागेच्या हक्कानें सभासद असावयाचे व चार दुसरे अंमलदार गव्हर्नरने नेमावयाचे; सहा बिनसरकारी सभासद गव्हर्नरनेंच नेमावयाचे; पण ते तामिळ, सिंहली, बर्जर, सर्वसाधारण युरोपियन, मळेवाले व व्यापारी अशा सहा वर्गांचे प्रतिनिधी म्हणून त्या त्या वर्गांतून एकएक असे निवडावयाचे. या नव्या कौन्सिलची पहिली बैठक सन १८३४ मे मध्यें भरली. पण गव्हर्नर हॉर्टन यानें बिन सरकारी सभासद वेळेवर न नेमल्याबद्दल प्रथमग्रासे मक्षिकापातः या न्यायानें गवगवा झाला. पुढे सन १८४७ मध्ये कोलंबो चेंबर ऑफ कामर्स या सभेला व्यापारी प्रतिनिधी व मळेवाल्यांच्या सभेला मळेवाला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क मिळाला. बाकीचे प्रतिनिधी अजून गव्हर्नरच नेमीत असे. सन १८६३ मध्यें सीलोनकडून लष्कराकरितां घ्यावयाच्या रकमेबाबत रण माजलें व सर्व बिन सरकारी सभासदांनी राजिनामा दिला. म्हणून सन १८६५ मध्ये कमिशन नेमण्यांत आलें. या कमिशनच्या शिफारशीप्रमाणें वसाहतीच्या सेक्रेटरीनें सिलोनच्या उत्पन्नांतून परभारें लष्करी खर्चाची रक्कम उचलण्याचा हक्क सोडला व सिलोन सरकारच्या शिल्लकेवर कौन्सिलला मर्यादित ताबा मिळाला. खेरीज, कोलंबो, कँडी व नंतर गॉल येथें स्थानिक म्युनिसिपालिट्या व गांवोगांव ग्रामसभा स्थापन करण्यांत आल्या. पण कायदे कौन्सिलची वाढ सन १८८९ पर्यंत कांहींच झाली नाहीं. त्या सालीं बिनसरकारी सभासदांची संख्या साहाचे ऐवजीं आठ करण्यांत आली व एक सरकारी सभासद कमी करण्यांत आला व एकंदर कौन्सिल सतरा सभासदांचें झालें. सन १९१० मध्यें कौन्सिलची आणखी थोडीशी वाढ झाली. आतां आकरा सरकारी सभासद व दहा बिनसरकारी सभासद मिळून एकवीस सभासदांचें कौन्सिल झालें. तरी अजून निवडणुकीचा हक्क किंवा बिनसरकारी सभासदांचे बहुमत देण्यांत आलें नव्हतें. पण महायुद्धाचे काळांत व युद्धाचे समाप्तीनंतर लोकांची चळवळ वाढली. म्हणून सन १९२४ मध्ये बऱ्याच सुधारणा करण्यांत आल्या. प्रथमतः लोकप्रतिनिधी लोकांनी निवडून देण्याचें तत्त्व स्वीकारण्यांत आलें. त्याप्रमाणें चवतीस लोकप्रतिनिधी लोकांनीं निवडून द्यावे व बारा सरकारी अंमलदार व तीन बिनसरकारी सभासद गव्हर्नरनें नेमावे असें ठरलें. म्हणजे बिनसरकारी सभासदांना बहुमत देण्यांत आलें. पण या राज्यघटनेनेंही लोकांचें समाधान झालें नाहीं. म्हणून सन १९२७ मध्यें लार्ड डनमार यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमण्यांत आलें. त्यांनीं केलेल्या शिफारशी ब्रिटिश सरकारनें स्वीकारल्या. तदनुरूप सिलोनच्या कौन्सिलची वाढ व सुधारणा करण्यांत आली. सध्यां सिलोनमध्यें चालू असलेल्या राज्यघटनेचें सामान्य स्वरूप अशा प्रकारचें आहे.
हल्लीच्या कौन्सिलला 'स्टेट कौन्सिल' असें नांव देण्यांत आले आहे. या कौन्सिलमध्यें सत्तावन सभासद आहेत. त्यांपैकीं पन्नास सभासद संयुक्त मतदारसंघांनी निवडलेले आहेत; व सात गव्हर्नरने नेमलेले आहेत. एकवीस वर्षांच्यावरील सिलोनमध्यें पांच वर्षे राहिलेल्या बायका- पुरुषांस मताचा अधिकार देण्यांत आलेला आहे. स्टेट कौन्सिलची आयुर्मर्यादा चार वर्षांची ठरविण्यांत आली आहे. सिलोन सरकारच्या सर्व, कारभाराचे दहा विभाग किंवा खातीं ठरविण्यांत आलीं आहेत. त्यांपैकीं तीन विभाग सरकारी वरिष्ट अंमलदारांकडे सोपविलेले आहेत. त्यांना चीफ सेक्रेटरी, कायदा सेक्रेटरी व जमाखर्ची सेक्रेटरी म्हणतात. हे तिघे कार्यकारी बोर्डाचे सभासद जागेच्या हक्कानें होतात. बाकी सात विभागांवर लोकनियुक्त सभासद मंत्री म्हणून गव्हर्नरानें निवडावयाचे असतात; या दहा सभासदांचें कार्यकारी बोर्ड बनतें. सिलोनच्या कारभाराची व जमाखर्चाची संयुक्त जबाबदारी या बोर्डावर आहे. या बोर्डाचा ठराव किंवा जमाखर्ची अंदाजपत्रक स्टेट कौन्सिलनें नापास केल्यास किंवा मंत्र्यावर अविश्वासाचा ठराव पास केल्यास मंत्र्यांना आपल्या जागेचा राजिनामा द्यावा लागतो. याप्रमाणें जबाबदारीचें तत्त्व सध्यांच्या घटनेंत अन्तर्भूत केलेलें आहे. तरी पण अझून गव्हर्नर व तिघे सरकारी सेक्रेटरी यांचे हातीं बरीच सत्ता राखून ठेविलेली आहे. लंकेमध्यें या बाबतींत लोकप्रतिनिधींमध्यें थोडा फार असंतोष आहे. पण कालेकरून खरी राजसत्ता लोकांनी निवडलेल्या मंत्र्यांच्या हातीं आल्याखेरीज राहणार नाहीं. तेव्हांच लंका बेटाला पूर्ण स्वराज्य मिळालें असें होईल. सध्यांची सिलोनची राज्यघटना हिंदुस्थानांतील प्रांतांना देऊ केलेल्या "प्रांतिक स्वायत्ततेच्या" स्वरूपाची आहे असें म्हणण्यास हरकत नाहीं.
मागें उल्लेख केल्याप्रमाणें मी सिलोनच्या स्टेट कौन्सिलच्या एका बैठकीस हजर राहिलों होतों. तेव्हां मला तें कौन्सिल मुंबई कौन्सिलची छोटेखानी आवृत्ति आहे असें वाटलें.
सिलोनमधील सिव्हिल सर्व्हिसचे पगार हिंदुस्थानांतल्या असल्या सर्व्हिसेसपेक्षां पुष्कळ कमी असल्यामुळे व मन्त्र्यांचा पगार तर दरमहा अवघा रुपये १००० असल्यामुळे सिलोनच्या कारभाराचा खर्च डोईजड नसावा असे मला वाटलें.
शिवाय सिलोनमध्यें हिंदुस्थानाप्रमाणें युरोपियन लष्कर मुळींच नाहीं. संरक्षणार्थ लागणारे सर्व लष्कर सिंहली शिपायांचें आहे. फक्त लष्करी अंमलदार अजून युरोपियन आहेत. पण कालेकरून ही संख्या कमी कमी होत जाईल असे मला सांगण्यांत आलें.
याप्रमाणे राज्यघटना व संरक्षक सैन्य यासंबंधीं सिलोनची बरीच प्रगति या गेल्या शतकांत घडून आली आहे यांत शंका नाहीं.
सुधारलेल्या राज्यव्यवस्थेच्या दुसऱ्या बाबीमध्यें प्रगति करण्यांत ब्रिटिश राजकर्त्यांचा हातखंडा आहे. ब्रिटिश लोकांच्या ताब्यांत सर्व बेट आल्यावर प्रथमतः त्यांनीं दळणवळणाची साधनें निर्माण केलीं.
दळणवळणाचें आद्य साधन म्हणजे सडका होत. अशा सडका सर्व बेटभर करण्यांत आल्या. लढाईनंतर व मोटारगाड्या सररहा सुरू झाल्यावर या सर्व सडका डामरी गुळगुळीत व निर्धूळ करण्यांत आल्या. लंकेंत पांच दहा घरांच्या लहान खेड्याला सुद्धां उत्तम सडक केलेली आहे. सर्व देशभर व खेडोखेडी सडका करण्याची योजना फार अनुकरणीय व सुसाध्य वाटली. प्रत्येक खेड्यांतील प्रौढ स्त्री-पुरुषांनीं आपले सहा दिवसांचे श्रम किंवा त्याचा मोबदला तितक्या दिवसांच्या मजूरीचे रोख पैसे दिले म्हणजे बाकी लागणारा सर्व खर्च सरकार करी व त्या गांवाला सडक करून देई. अशा लोकांच्या सहकार्यानें उत्तम सडका करण्यांत आल्या. तें ऐकून मला वाटलें हिंदुस्थानांत अझून सुद्धां या पद्धतीनें खेड्यापाड्यांना दळणवळणाचें आद्य साधन निर्माण करतां येईल.
दळणवळणाचें दुसरें साधन आगगाड्या व रेल्वे रस्ता. आगगाड्या व रेल्वे रस्ते प्रथमतः हिंदुस्थानाप्रमाणे खासगी कंपन्यांना व्याजाची हमी देऊन करण्याचा विचार कायम ठरला होता व तदनुरूप एका कंपनीला हमी देऊन कोलंबो ते कँडीपर्यंत रेल्वे रस्ता करण्याचें कंत्राट दिलें सुद्धां होतें. पण त्या कंपनीकडून वेळेवर काम न झाल्यामुळें तें कंत्राट रद्द करण्यांत आलें व सिलोन सरकारनें आगगाड्या व रेल्वे रस्ता सरकारी भांडवलानें व सरकारी देखरेखीखाली करविण्याचें ठरविलें. व म्हणूनच सध्यां लंकेंत असलेले सर्व रेल्वे रस्ते व आगगाड्या सरकारी मालकीच्या आहेत. असा रेल्वे रस्ता सुमारें ८५० मैल लांबीचा आहे. त्यापैकी सुमारें १२० मैलच फक्त नॅरोगेज आहे. बाकी सर्व ब्राडगेज आहे.
तिसरें दळणवळणाचें साधन जलमार्ग. सर्व देशच समुद्रवलयांकित असल्यामुळे लंका बेटांत किती तरी बंदरें आहेत व गलबतांची व आगबोटींची रहदारी चालू आहे. शिवाय सुमारें दीडशें मैलाचे जलयानक्षम असे कालवेही बेटांत पूर्व राजवटीपासून केलेले आहेत. याप्रमाणें दळणवळणाच्या साधनांत लंकेंत सध्यां पुष्कळ प्रगति झालेली आहे.
दळणवळणाच्या साधनाप्रमाणे शिक्षणाच्या बाबतींत लंकेचे पाऊल हिंदुस्थानच्या पुष्कळ पुढे आहे. बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे प्रथमपासूनच बहुजनसमाजाच्या शिक्षणाची साधारण सोय बौद्ध धर्मी मठाकडून होत असे. युरोपियन राष्ट्रांपैकीं डच लोकांच्या ताब्यांत लंका बेट असतांना त्यांनीं प्रत्येक खेड्यांत शाळा काढून तेथे प्राथमिक शिक्षण देण्याची चांगली व्यवस्था केली होती व शाळेत जाणें सक्तीचें केलें होतें. ब्रिटिश अंमल सुरू झाल्यावर कांहीं काळपर्यंत या प्राथमिक शिक्षणाची हेळसांड होऊन शिक्षणाची प्रगति न होतां उलट अधोगति झाली. पण १८३४ पासून एक शिक्षण कमिटी नेमण्यांत आली पुढे या कमिटीऐवजीं डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन नांवाचा एक वरिष्ठ अंमलदार नेमण्यांत आला. तेव्हांपासून प्राथमिक, दुय्यम व उच्च शिक्षण असे विभाग पाडण्यांत आले. सन १८३४ मध्ये निघालेल्या कोलंबो ॲकॅडमी नांवाच्या संस्थेची वाढ रॉयल कॉलेज या नांवानें करण्यांत आली. सन १९२१ युनिव्हर्सिटी कॉलेज स्थापन करण्यांत आलें. प्रथमतः लंकेंतील कॉलेज हिंदुस्थानांतील विश्वविद्यालयाला जोडण्यांत आलें; पण पुढें लंडनच्या विश्वविद्यालयाला लंकेंतील उच्च शिक्षणाच्या संस्था जोडण्यांत आल्या. तेव्हांपासून लंकेंत लंडन मॅट्रिक परीक्षा व केंब्रीज जुनीयर व सीनीयर परीक्षा होऊं लागल्या. युनिव्हर्सिटी कॉलेज निघाल्यापासून तर बी. ए. व बी. एससी. या परीक्षाहि लंडन विश्वविद्यालयातर्फे लंकेंत हाऊं लागल्या. लंकेसारख्या स्वायत्त होऊं पहाणाऱ्या देशाला स्वतःचं स्वतंत्र विश्वविद्यालय असावें अशी महत्त्वाकांक्षा उद्भूत व्हावी हें साहजिक आहे; व तदनुरूप विश्वविद्यालय स्थापण्याची योजना तयार करण्यांत आली. पण महायुद्धामुळे व पुढें व्यापारी मंदी आल्यामुळे ती योजना मूर्त स्वरूप धारण करूं शकली नाहीं.
पण प्राथमिक व दुय्यम शिक्षण व औद्योगिक व शेतकी शिक्षण यांची लंकेंत समाधानकारक प्रगति गेल्या शतकांत घडून आली. दुय्यम शिक्षण तामिल व सिंहली भाषेच्याद्वारा देण्याची व्यवस्था झाली. सन १९०७ सालापासून प्राथमिक व दुय्यम शिक्षण सक्तीचें करण्यांत आलें व वयाच्या साहा वर्षांपासून चवदा वर्षांपर्यंत प्रत्येक मुलामुलीला पालकाने शाळेत पाठविलें पाहिजे असा सक्त नियम करण्यांत आला. यामुळे हल्लीं लंकेंमध्यें बहुजनसमाजांत साक्षरता पुष्कळच वाढली आहे व आणखी एका पिढींत लंकेंतील लोकांची साक्षरता अत्यंत सुधारलेल्या देशाच्या तोडीची होईल यांत शंका नाहीं.
गेल्या शंभर वर्षांमध्यें लंकेमध्यें फळ-पिके व पेय-पिके यासंबंधी पुष्कळच प्रगति घडून आली आहे. धान्य-पिकाबद्दल फारसे प्रयत्न झाल नाहींत. परंतु राज्यघटनेत सुधारणा झाल्यापासून मंत्रिमंडळानें जुनीं पाट बंधाऱ्याचीं कामें यांची दुरुस्ती करून व नवीं पाटबंधाऱ्याचीं कामें करून भातादि धान्याच्या लागवडीस उत्तेजन देण्याचा क्रम सुरू केला आहे.
लंकेमध्ये जगभर मागणी असणाऱ्या फळ-पिकांची व पेय-पिकांची वाढ किती झपाट्याने झाली आहे हे खालील कोष्टकावरून दिसून येईल.
| पिकाचें नांव. | लागवडीचा विस्तार. | १९२२ सालचा निर्गत व्यापार. | १९३२ सालचा निर्गत व्यापार. |
|---|---|---|---|
| भात | ८ लाख एकर | निर्गत नाहीं, तांदुळाची आयात होते. | |
| नारळ | ११ " " | ||
| सुपारी | ७० हजार " | ||
| चहा | ४॥ लाख " | १७ कोटी पौंड | २५ कोटी पौंड |
| रबर | ५। " " | १० " " | ११ " " |
| कोको | ३४ हजार " | ९० लाख " | ९० लाख " |
| दालचिनी | २६ हजार " | ४६ लाख " | ५२ लाख " |
| खोबरेल तेल | ७० लाख गॅलन | १ कोटी गॅलन | |
| खोबरें | २० कोटी पौंड | २१ कोटी पौंड | |
| सिट्रोनेल तेल | ३३ हजार " | १२ लाख " | १२ लाख " |
| वेलदोडा | ७ हजार " |
लंका बेटामध्यें म्हणण्यासारखे उद्योगधंदे नाहींत; जे काय आहेत ते घरगुती व खेडेगांवी स्वरूपाचे आहेत. मोठमोठे कारखाने तर मुळींच नाहींत. लंकेची सर्व संपन्नता त्या बेटांतील सुपीक जमिनीवर अवलंबून आहे. अर्थात् ही संपन्नता एका दृष्टीनें परावलंबी आहे, म्हणूनच हल्लींच्या व्यापारमंदीचा परिणाम लंकेस जास्तच भोगावा लागत आहे. विशेषतः रबर व नारळ या दोन पिकांच्या किंमती कमी झाल्यामुळे व त्यांची मागणीही घटल्यामुळे लंकेंतील लोकांचें उत्पन्न फार कमी झालें आहे. पण ही व्यापारमंदी व मालाची स्वस्ताई सर्व देशांना भांवत आहे. तेव्हां ही सर्व जगाला सामान्य अशी बाब सोडली तर गेल्या शंभर वर्षात लंकेची सर्वाङ्गीण प्रगति झाली आहे असें वरील त्रोटक विवेचनावरून दिसून येईल.
विस्तीर्ण हिंदुस्थानच्या अगदी एका टोकाला असलेल्या रामेश्वरच्या यात्रेला हिंदू लोक फार दूर दूर ठिकाणांहून जातात. पण आश्चर्याची गोष्ट ही कीं, त्यांपैकी फारच थोडे लोक रामेश्वरापासून फक्त दीडदोन तासांच्या प्रवासाच्या टप्यांत असलेल्या लंका बेटाला जात नाहींत. याचे कारण लंकाबेट, तेथले लोक व तेथली संस्कृति अगदीं परकी आहे असें हिंदुस्थानवासीयांना वाटतें. परंतु लंकेंत प्रत्यक्ष गेलें व तेथें कांहीं दिवस राहिलें म्हणजे लंकेबद्दल व तेथल्या संस्कृतीबद्दल परकीपणाचा भाव अजिबात नाहींसा होतो; इतकेंच नव्हे तर हिंदुस्थानची संस्कृति व लंकेची संस्कृति यामध्यें विलक्षण साम्य नव्हें ऐक्य आहे असें आपल्याला कळून येतें. माझा अनुभव थेट असाच आहे. आधीं सिंहली लोक- बंगाल-बिहारकडच्या लोकांसारखे दिसतात; तामीळ लोक तर ऐतिहासिक काळांत लंकेत गेलेले आहेत. युरोपांत गेलें असतां ज्याप्रमाणें आपण परकी लोकांमध्यें आलों आहों असें पदोपदीं वाटतें त्याप्रमाणें लंकेंत मुळींच वाटत नाहीं. उलट आपण हिंदुस्थानवासीयांमध्येच वावरत आहों असें वाटतें. लंकेतील दोन मुख्य भाषा तामिळ व सिंहली. या भाषाही युरोपियन भाषांप्रमाणें परकी भाषा वाटत नाहींत. कारण तामिळ ही दक्षिण हिंदुस्थानांत प्रचलित असलेल्या द्रविड कुटुंबांपैकीच एक आहे; सिंहली भाषा पालीपासून निघालेली असल्यामुळे ती आर्य कुटुंबांपैकींच आहे. या भाषा साम्याप्रमाणे लोकांच्या राहणींत, खाण्यापिण्यांत व कपड्यालत्त्यांत परकीपणा वाटत नाहीं. कारण लंकेमध्यें लोकांचा सर्वसाधारण पोषाख दक्षिण हिंदुस्थानच्या लोकांसारखा आहे. तो धोतरी (छोटे धोतर), उपरणी (छोटें उपरणें) व सदरा इतकाच होय. त्यांना पादत्राण किंवा शिरस्त्राण लागत नाहीं. भातभाजी हेंच लंकेकरांचें नेहमींचें व सामान्य जेवण असतें. हें जेवणही हिंदुस्थानवासीयांना अत्यंत परिचित आहे. लंकेकरांमध्यें हिंदुस्थानवासीयांप्रमाणें यात्रा करण्याची भावना सार्वत्रिक आहे व त्यांचे आयुष्याचे ध्येय हिंदवासीयाप्रमाणें आध्यात्मिक आहे. सिंहली लोकांना पिंपळ पवित्र वाटतो; हिंदूवासीयांची तीच भावना आहे. हिंदू देवालय व बौद्ध देवालय यांमध्यें पुष्कळच साम्य भासतें. याप्रमाणें हिंदुस्थान व लंकाबेट यामध्यें संस्कृतिसाम्य पुष्कळ आहे. ही गोष्ट दुरून मनाला पटत नाहीं; पण लंकेचा प्रत्यक्ष प्रवास व निवास करून आलें म्हणजे तें साम्य समजून येते.
मलाही असाच अनुभव आला. लंकेमध्यें कांहीं दिवस राहिल्यावर मला वाटलें कीं, लंकाबेट ईस्ट इंडिया कंपनीच्या मद्रास प्रांतानें प्रथम काबीज केलें तें जर तसेंच त्या प्रांताशी निगडित राहिलें असतें तर किती नामी गोष्ट झाली असती. हिंदुस्थानच्या नजीक असलेल्या बेटाचा हिंदुस्थानशीं निकट व जिव्हाळ्याचा संबंध राहिला असता व भावी संयुक्त हिंदुस्थानचा लंकाबेट हा एक घटकावयव झाला असता. लंकाबेट व हिंदुस्थान हे जरी दोन्ही शेतकीप्रधान देश आहेत तरी दोन्ही देशांतील हवापाणी व जमीन यांमध्ये फरक असल्यामुळे या दोन देशामध्यें स्पर्धा किंवा चढाओढ न राहतां ते देश व तेथली शेती परस्परांना पूरक व पोषक अशीच झाली असती व अशा दोन देशांमध्यें खुला व अप्रतिबंधक व्यापार चालू राहिला असता व असा व्यापार दोन्ही देशाच्या हिताचा व फायद्याचा झाला असता. मला वाटलें अझून सुद्धां जर लंकाबेट व हिंदुस्थान यांमधील सुशिक्षित व लोकनायक गृहस्थ यांचे परस्परांकडे जाणेयेणे जास्त प्रमाणावर होईल तर दोन देशांतील संस्कृतिसाम्य सर्वांच्या डोळ्यांत भरेल व मग कालेकरून लंकाबेटांतील लोकांना संयुक्त हिंदुस्थानच्या राज्यघटनेत सामील होण्याची इच्छा होईल. असा दिवस कधीं उगवेल तो उगवो. पण हिंदुस्थानवासीयांनीं तरी आपल्या शेजारच्या सुंदर बेटाची भेट घेतल्यावाचून राहूं नये असे मला लंकाबेट पाहिल्यापासून सारखे वाटत आहे. 'लंकेचें वर्णन व वृत्तांत' हे पुस्तक वाचल्यानें लंकाबेटास जाऊन येण्याची वाचकांस इच्छा झाली तरी माझ्या श्रमाचें सार्थक झालें असें मला वाटेल.
| चित्राचें नांव | पान | चित्राचें नांव | पान | ||
|---|---|---|---|---|---|
| श्रीमंत नारायणराव बाबासाहेब | ९ | त्रिंकोमालीच्या किल्ल्याचा तट | ८९ | ||
| संस्थान इचलकरंजी | प्रारंभी | १० | त्रिंकोमालीचा स्वामीखडक | ९१ | |
| लंकेचा नकाशा | १ | ११ | थुपाराम विहार पोलनरुवा | ९७ | |
| १ | कोलंबोच्या लाटमोड्या भिंतीवर | १२ | वातदागे " | ९८ | |
| आपटणाऱ्या लाटा | ३४ | १३ | लोहप्रासाद अनुराद्धपुर | १०५ | |
| २ | पेट्टामधील हिंदु देवालय | ४१ | १४ | अंबस्थले दागबा मिहिंतले | १०५ |
| ३ | माँट लॅव्हिनिया, पोहणाऱ्या स्त्रिया | ४८ | १५ | श्रीपादशिखर, मस्केलिया | ११२ |
| ४ | पेरेडॅनिया बागेंतील तालीपॉट पाम | ५४ | १६ | नानुओया घाट व ब्लॅक पूल | १३५ |
| ५ | कँडींचें दंतंदेवालय व दागबा | ६० | १७ | न्युवारा एलिया | १४५ |
| ६ | कँडीचा तलाव | ६१ | १८ | हगाला बागेचें प्रवेशद्वार | १४८ |
| ७ | डांबूलच्या खडकदेवळांतील मूर्ति | ६८ | १९ | हगाला बागेंतील फर्न वृक्ष | १५० |
| ८ | खडक किल्ल्यावर जाण्याचा जिना | ७२ | २० | सिंहली गृहस्थ | १८७ |
| अगबोधी राजे २६ | आले-गेले राजे २२, २३, २६ |
| अगस्त्य ६ | आवीसवेला ४९, २०३ |
| अद्भुताची आवड (प्रक्षिप्ताचें कारण) | ऑर्चिड् ५७ |
| ३, १० | इलाला राजा २०, १०६ |
| अतिशयोक्ति ( " ) ३, १० | इंग्रज (ब्रिटिश) २८, २१३, २१५ ते २१८ |
| अनुराद्धपूर १७, १९-२१, २3-२७, | कारकीर्द २१५-२१८ |
| ७५, ७७, १५, १०४ - ११०, ११३- | उत्तरकांड ११ |
| १५, १२३ | उत्तीय २० |
| मार्ग १०४ वर्णन १०५ पोलनरुवाशीं | उपतिस्स २४-२५ |
| तुलना १०५ बेझन् पॅलेस १०५ | उन्हाळें ९३ |
| अभयगिरी व जेतवाराम दागबा १०८ | ऋवनवेली दागबा २२, १०७ |
| अनुला राणी २३ | एलिफंट पास ११६-१७, १२४ |
| अभयगिरी दागबा २३, १०८ | एंजलबीक २१२-१३, |
| अभयतिस्स २३ | कनकरत्न ९६ |
| अर्धचंद्राकृति पायऱ्या ९९, १०९ | कनिया ९३ |
| अवतार कल्पना ३, १० | कन्याकुमारी १६८, १९७ |
| अशोक राजा १९ | करेटिव्ह बेट १२४ |
| अशोकवन १४७ - फुलै १४७ वृक्ष १४७, | कर्णिक ४८-५० |
| १८० | कलानिलय ११७ |
| असेल राजा २१ | कलिंग १५ |
| ॲडॅम्स्पीक १२९, १३७, १४२ | कश्यप २५, ७५ |
| ॲनहिस्टानोबिलिस १८० | कंकेसंतुराई ११५, ११९-२०, १५७ |
| आठवडा - अखेर ४७, ८० | कंदिया ५३, ६५, ७८, १३०, १४३ |
| आदिगर २५ | कॅनरी लेणी ६९ |
| आरबी समुद्र ३१ | कॅलिमेर १२३ |
| कँडी १८, २८, ५१, ५३, ५९-६६, | कोटे २०१-५ |
| १०७, १३०, १४६, २०१, २०३ | कोलपिटिया १९५ |
| २०८, २१२ - २१६. | कोलंबो २९ - ४८, १५७, १८१, १८४- |
| मार्ग ५१ वर्णन ५१-५२, ५९, ६० | ८५, १९१-१९७, २०८, २१७. |
| दंत देवालय ६० सरोवर ६१-लेडी | माँट लॅव्हानिया ४७-४८, ग्रीनपाथ |
| ब्लेक-ड्राइव्ह ६२-६५ थंड हवा ६५ | ४६ व्हिक्टोरिया पार्क ४४-४५ |
| वेसपार्क ६२ राजे २०३-८, २१२-६ | सार्वजनिक संस्था ४५ सिनॅमन् |
| काईट्स ११८, १२४ - २५ | गार्डन् ४४ सहलवाट ४२-४३ |
| कालसेन १६ | गॉर्डन् बाग ४२ पिंपळ वृक्ष ४१ |
| कालिदास २६, १३९ | मलिकगुंडा ४१ किल्ला ३५-३६ |
| कालुगंगा ३५, १७५, १८० | तीन भाग ३८-३९ वाहने ३७-३९ |
| कालुतारा १७६, १८०-८१ | कालीनी देऊळ ३९-४० पेट्टा ३६ |
| कांतलाई तलाव ७८ | लाटमोड्या भिंती (Break |
| कॉफी झाडे ५७, ६६, १६७ | waters) 3४, बंदर ३४ प्रवास |
| कॉस्टर वुइल्यम् २१२ | ३०-३१ दोनमार्ग ३९ निवास १९१, |
| काँटे रॉसो २९-३१, १९६ | खर्च १९१-२ पदार्थसंग्रहालय |
| किरिमलाई पुष्करणी १२१ | १९२-९३ पशुसंग्रालय १९३. |
| किलिनाची ११६ | कोसलांडे १६१ - धबधबा १६२ |
| किष्किंधा १० | खडक किल्ला ७०-७४ |
| कीतसिरी निवाण २४ | खडक देऊळ ६७-८ |
| कीर्तिश्री २१५ | गजबाहु २७ |
| कुडतिस्स २३ | गणपति १०६ |
| कुमारदास २६ | गंडारा १६८ |
| कुवेणू १६ | गालबोडा १३३ |
| केलानी गंगा ३५, १७० | गालोया ८० |
| केस्तु १८३ | गॉल ४७, १७०-७३, १७५, १८४, |
| केळी नारळी ४९, ५१, ६६, ७४, ८५ | २०८, दीपगृह १७१, बंदर १७१, |
| १०९, १६२ | किल्ला १७२, |
| कोको ५७-५८, ६३, ६६, १५७ | गोझ १९७ |
| गोदावरी ६, १० | डॉमजॉन् २०५ |
| गोन्स २१२ | डॉम् लोरेंझो २०६ |
| गोलविहार १०१ | डिकवेला १६८ |
| ग्रेट वेस्टर्न १४३ | डोना कॅथरीना २०५, २०७ |
| चहा ५१, १३१-३२, १४२, १५७-८ | डोंगर पठार (Upcountry) १५६ |
| झाडे १३२.३, मळा १३४-५ गिरण्या | डोमिनियन हॉटेल ३६, ४९, १८२, १९०, |
| १३४-५ पर्वतपिकी High grown | १९६ |
| १५८डोंगरपिकी middle grown | तलाईमानार १२८, १८६ |
| १५९ टेकडी low grown | तलेवाकेले १४२ |
| १५९ | ताडपत्र २३, १८९ |
| चित्रकूट ६ | तामीळ |
| चिलाँ १८५ | राजे २०, २२, २६, २८, २०१ |
| चूलवंस २, १३ | भाषा २२७ जेवण ११९, १५३ |
| चोरगे १९४-९६ | पोषाख १८७ देवालय १८८ |
| जनस्थान ६ | तिसा महाराम १५०-१६५ |
| जाफना ११५-१२२ | मार्ग १५०-६० डागबा १६३ |
| मार्ग ११५ स्टेशन ११६ वर्णन ११८ | तिसावेवा सरोवर ११३ |
| बंदर १२२ | तिसावेसा " १६४ |
| जीनगंगा १७५, १८० | तुंगभद्रा १० |
| जेठतिस्स २४ | तोफगोळा झाडे ५६ |
| जेतवाराम बिहार १०० - १०१ | त्रिकंडिमाडु ८१ |
| दागबा १०८ -१०९ | त्रिकूट ८ |
| टांगाला १६८ | त्रिपिटक २३ |
| टेंपल ट्री १९५ | त्रिंकोमाली ५९, ७७, ८७-९४, २०८ |
| डच ईस्ट इं. कं. २१४ | मार्ग ७७-७८ बंदर ८७-८९, ९४ |
| डच कारकीर्द २१०-१x | बंदराचा इतिहास ८७ मुंबईशीं तुलना |
| डच् बे ८८ | ८८-८९ बालसिंघमचा बंगला ८९ |
| डलहौसी १३४-३५ | किल्ला ८९-९१ दीपगृह ९० स्वामी |
| डांबुला ६६-६७ | खडक ९१-२ दंतकथा ९२, ९४ |
| कनिया ९३ | पराक्रमबाहु २६ - २७, ७७, १८९ |
| थंबीपिल्ले १४२, १४५, १५३. | २००, २०३ |
| थुपारामविहार ९७-९८ | पंचवटी ६ |
| थ्वेट्स ५७ | पंडुकाभय १८ |
| दडब १३२, १६१ | पंडुवास १८ |
| दण्डकारण्य ६,१० | पंपा ८ |
| दत्तगामनी २१-२२ | पॅरन्थम ११६ |
| दलदमलिगवा २४ | पाऊस १३१, १५७ |
| दंत देवालय २४, ६०, | पाम ५३-५४, ८५, १७०, १७५ |
| दागबा २२, २३, ६०, १०८, १०९ | रॉयल ५४ पालमीरा ११६, १२० |
| धबधबा १६३ | पालमिनमाड ८१ |
| धर्मपाल २०४-७ | पालमीरा पॉईंट १२३ |
| धातुसेन २५ | पाली २, १२, २२७ |
| नटराजन् ८४-८७ | पालेगांव १२१ |
| नवलपिटिया १३१-३२ | पिंपळ वृक्ष ९४, १०५-६ |
| नागद्वीप ११५ | पुनरागमनाय १२८ |
| नागपुष्करणी १०१ | पुतालं १८५, १८९, |
| नागापट्टम् १२३ | पेरेडॅनिया बाग ५३-५६, १०३ प्रयोग- |
| नानुओवा १४३ | क्षेत्र ५७-५९, १४४ |
| नारळी पोफळी ४०, ४९, ५१, ६६, | पोर्तुगीश कारकीर्द १९८ २०९ अधि- |
| १०६, ११५, ११, १७०, १७५- | कारी २०८ अंदाधुंदी २०९ ज्ञान- |
| १७७, १८६-८७ | प्रसार २०९ शेतकी २०९ |
| नॉक १५२ | पोलगहवेला ५१, १८६ |
| नॉर्थ फ्रेडरिक् २१६ | पोलनरुवा १८, २६, २७, ७७८, ९५ |
| निगंबो, १८७-८९, २०८ | मार्ग ९५-६ टपालघर ९७ खंदक |
| निसंक लतामंडप ९८ | ९७ किल्ला ९० धू. विहार ९७ |
| नीलगंगा १६९ | निसंक९८ हेतदागे ९८ वातदागे ९८ |
| न्युवारा एलिया १४१ - १५४, १८५ | तोपावेवा १०२ दमालामहासेवा |
| मार्ग १४२-४३ वर्णन १५५ | जैतवारामविहार १०० |
| प्रमिला प्रेम १७९, १९५ | बेंटोरागंगा १७५ |
| प्रक्षिप्त २, ३, ११ | ब्रेझन् पॅलेस १०५ |
| फर्नरी १५० | ब्लॅकपूल १४४ |
| फाउल पाईंट ८८, ९० | भंडारवेला १४४, १५४, १५० |
| फे हायन २४ | भाकरीचें झाड १६८, १७८ |
| बटेव्हिया २११ | भाटघर ७८ |
| बर्जर ८७ | भातपीक ४९, १३६ |
| बल्ब बाग १५० | भातशेतें- ती ७०, ७४, १०९, ११५, |
| बहु मुखऱ्हो १० | ११९, १२५, १३१, १६२, १८७.८ |
| बंगाल उपसागर ८५, १०, १२३ | घाटाची ६४, १३१, १५४-५५ |
| बॅटिकोला ७७-८७, २०१, २०८ मार्ग | भिंतीवरील चित्रे ७१,१०२-३ |
| ७९, वर्णन ८१ शहर | भुवनैकबाहु २४ |
| ८२ पूल ८४ दीपगृह ८५ सरोवर | भेंडीची झाडे १९९ |
| ८१, ८६ गाणारे मासे ८६ | मकलंतिस्स २३ |
| बाजीराव ४९-५० | मगध १९ |
| बाडुला १५४-५७ | मडवाची ११४, १२७-८ |
| बालसिंघम् ७८, ७९, ८२, ८६, ८९ | मद्यपान (लंकेतील) ८४-८४ |
| बिभीषण ९, १३ | मद्रास सदर्न मराठा ८०, १४३ |
| बिल्हण १ | मनकूलम् १२६-२० |
| बुटी १३५-३६, १५१ | मरडाना ३६-३७ |
| बुद्धघोष २५ | मलिकगुंडा ४१ |
| बुद्ध-दांत २५, २५, २०७, | मस्केलिया १३४, १३९ |
| -दास २४ | महानाम १४, २५ ग्रंथ १४ राजा २० |
| -देवळें ६७, ६९, १०३, २२८, | महावेली गंगा २५, ८८ |
| -धर्म १९, ६१ २०६, २०७ | महावंस २, १३, १५, २३-२५ |
| -पाऊल १३८ | महासेन २४ |
| -भिक्षु २, ६१, ६९, १०५, १०६ | महिन्द १९, २०, ११२ |
| -मूर्ति ६८, ७८, १०७ | मातर १६६ रचना १६९-७०, १७३ |
| बुंडाला १६७ | मातले ६६-७, १५७ |
| मानभरण २६ | रावण १, २, ८, १०, १३, १४८, १८५ |
| मायादुन २०४ | राक्षसी बांबू ५५ |
| मारुतमुनाई ८१ | रिक्शा ३८ |
| मार्सेलस द बाशुवर २११ | रुद्राक्ष वृक्ष ५६ |
| माँट लेव्हिनिया ४७-८, १७९, १८१ | रुहुनुरुत २५ |
| मिनेरिया ९५ तलाव ९५ | रोझेला १३३ |
| मिहिंतले १९.२०, ७७, १०१, ११०- | लंका १, ७,८,११, १७, १८, २४ व इतर |
| ११ पायऱ्या १११, अंबस्थलेदागबा | सोन्याच्या विटा ५० प्रवासकाल |
| ११२ कुंडे ११३ तिसावेवा ११३ | १२९ - हवामान १४१ - इंग्लंड १४६, |
| मुकुटवृक्ष ५६ | १५४ - सामान्य स्वरूप १५७ पश्चिम- |
| मुदलियार ११६-१७ | किनारा १७५-८२ |
| मुनेसरम् १८८ | (इतर माहिती सीलोनखाली पाहणें) |
| मेडन व्हॉन २१२ | लंकातिलक १०० |
| मेणबत्ती झाड ५५ | पुराण १ |
| मोगलान २५, ७५ | लँडस् एण्ड १६७-७० |
| युकॅलिप्टस १४५ | लामिनी तिस्स २५ |
| रत्नपुर ४९.५०, १२९ | लिव्हिंगस्टन् ११ |
| रबर, ४९, ५१, ६४, ६६, १४२, | लेडन बेट ११७, १२५ |
| १५७, १७४ | लेडीलव्ह १७८-८० |
| रागमा १८४ | लेणीं ६९ |
| राजधान्या ९५, १५७ | वलंगबाहु २२ |
| राजसिंह २०७, २११ | वंग १५, १८ |
| राजाची वसाहत (Crown Colony) | वाटपाही १२७, १५३, १९० |
| २१९ | वाटेगोडा १४२ |
| राजाधिराजसिंह २१६ | वाटावाला स्टे. १३३ |
| राजावली ग्रंथ २०१. | वातदागे ९८ |
| राम ३–१०, १३, १८५ | विक्रमबाहु २६ |
| रामराज्य १० | विक्रमरत्न ११०-११४ |
| रामायण १, २, १०, ११ कथा ११- | विक्रमराजसिंह १८, २६, २८,२१६-१७ |
| त्रिदोष २ | |
| विक्रमांकदेव चरित १ | २२२-२३ शिक्षण २२३.४ शेतकी |
| विजय १५-१६-१८-१८५ | २२४-५ उद्योगधंदे २२६ भाषा २२७ |
| विजयबाहु २६, २०३ | सीलोन - संस्कृति २२७ पोषााख २२७ |
| विजितपुर २१ | खाणे २२८ ध्येय २२८ हिंदुस्थानशी |
| विन्ध्य ६, १० | जवळीक २२८ शक १७ |
| विरावेलावेवा १६२ १६६ | सुग्रीव ७-९ |
| विष्णुमूर्ति ६८ | सुप्पादेवी १५ |
| वीर्ट २११ | सुमिता २० |
| वेलवाया १६२ | मुरतिस्स २९ |
| वेलाचना ८१ | सेन २६ |
| वेलावाटा ३५, ४७, १९४-९६ | सेनारेट २०७.८, २११ |
| वेलीगाटा १६७ | स्नानगृहें १०१ |
| वोडावेवा १६४ | शिलालेख १८९, २०१ |
| समुद्रसपाटी १४२, १५७, १६०, १८६ | शिवालय ७८, ९७, १८८ |
| संगबोधी २३ | श्रीपाद शिखर १२९-१४१ मार्ग १२९- |
| सॅनिटोरियम १२१ | ३०, १३३-३५, तीन टप्पे १३५ |
| साद्धतिस्स ६९ | वाट १३६-३७ सूर्योदय १३९-४० |
| सिगिरिया २५, ६९, ७२, ७५, ७६, | हगाला बाग १४४, १४८-१५३ |
| १०२ | हनुमान् ८ |
| सिरिनाग २३ | हंबनटोटा १६६-६८ |
| सिल्व्हर ओक १३२, १६१ | हॅटन् १३०-३४, १४१-४२ |
| सिंहबाहु १५-१६ | हँडी ९६, १०२ |
| सिंहलद्वीप २, ११ | हापुतले १५७, १५९ घाट १६० |
| सिंहली २२७ लोक १६३ जेवण १६३ | हाबर्ने ७८ |
| सिंहशिवली १५ | हार्टन् २१८ |
| सिंहस्नानगृह १०१ | हॉपर्स १५१-५३, १६३ |
| सीता ४, ६-९ १३, १४८, १८५ | हिंदी महासागर १२, १६७-६८, १८५, |
| सीता (राजकन्या) १८ | १८९-९०, १९६ |
| सीलोन २ कायदेकौन्सिल २१९-२२० | हिंदु ऑर्गन १२६ |
| सर्व्हिसेस २२२ स्टेट्कौन्सिल २२१ | हेतदागे ९८ |
| लष्कर २२२ दळणवळणाची साधनें |