पान:Yugant.pdf/99

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८० / युगान्त

राजा म्हणून धर्माला आधी मुक्त करण्याची तिची तत्परता, बाकीच्यांना शस्त्रांसह मुक्त करणे एवढेच मागून बाकी कशाचाही लोभ न धरणे, यांनी तिने आपल्यालाच नव्हे, तर पांडवांनाही अप्रतिष्ठेतून बाहेर काढले. या प्रसंगाला उद्देशून कर्ण जे म्हणाला, ते लक्षात घेण्यासारखे आहे. "जगात सुंदर बायकांच्या बाबतीत आत्तापर्यंत ऐकले होते, पण हिने जे केले त्याला तोड नाही. इथे पांडव आणि कौरव रागाने जळत होते. ह्या आगीच्या डोंबात काय झाले असते, कोण जाणे! पण ह्या कृष्णेने शांती प्रस्थापित केली. खोल समुद्रात गटांगळ्या खाणाऱ्या, अप्रतिष्ठेमध्ये बुडून गेलेल्या पांडवांना पांचालीने एखाद्या नावेप्रमाणे तीराला आणून पोहोचवले." स्त्रीमुळे आपली प्रतिष्ठा वाचली, हे शब्द भीमाला झोंबले, पण पांडवांना राग यावा, हा जरी त्याचा एक उद्देश असला, तरी कर्ण, म्हणाला ते काही खोटे नव्हते. पांडवांचे लहानपणचे आयुष्य कुंतीने रक्षिले होते, मोठेपणचे द्रौपदीने. द्रौपदी उभी होती, तोपर्यंत पांडव उभे होते... द्रौपदी खाली पडली, तेव्हा धर्माखेरीज इतरही पडले.
 द्रौपदीचा आणि सीतेचा वनवास ह्या दोहोंत नावाखेरीज काही साम्य नाही. द्रौपदीला वनवास घडला. नवऱ्याच्या द्यूतावरील प्रेमामुळे. शत्रूच्या मसलतींचा जय, नवऱ्याची व्यसनाधीनता, ह्या सगळ्यांचे ते प्रतीक होते. पंचनद्यांचा प्रदेश शक्य झाल्यास मिळावा, अशा तऱ्हेचा धर्माचा डाव होता, असे एकदाच वनपर्वात आले आहे. हे बोलणे म्हणजे स्वतःच्या वचनार्थ दिलेली एक सबब ह्यापलीकडे काही वाटत नाही. द्यूताने कुरु-पांचालांच्या ताब्यात नसलेला पंचनद्यांचा प्रदेश तो कसा मिळवणार होता हे कळतच नाही. सीतेचा वनवास हा रामाच्या ध्येयजीवनातील परमोच्च बिंदू होता. त्यात वनवासामुळे मुलाला राजपद देण्याचा कैकेयीचा डाव फसला. खुंटा हलवून घट्ट करावा, तशी रामाचा राज्याभिषेक ही गोष्ट अटळ झाली. भरताच्या राज्यत्यागामुळे रामाला वनवासात राहण्याचे व्यावहारिक कारण उरलेच नव्हते. केवळ बापाने दिलेले एक वचन