पान:Yugant.pdf/98

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ७९

 तिच्या शहाणपणाने व व्यासांच्या मखलाशीने सर्व पेच सुटून द्रौपदी पाचांची बायको झाली. एकाची झाली असती, तर जी कलहाची बीजे पेरली गेली असती, त्या सर्वांचा मुळातच नायनाट झाला व पांडवांची एकी अभेद्य राहिली. अगदी हीच गोष्ट कर्णाने दुर्योधनाला सांगितली.
 लाक्षागृहातून वाचून परत येऊन प्रकट झालेल्या पांडवांचे आता काय करावे, ह्या ऊहापोहात दुर्योधन म्हणाला, “कुंतीच्या मुलांना माद्रीच्या पुलापासून फोडून वेगळे करावे, किंवा द्रुपदाला व त्याच्या मुलांना द्रव्याचा लोभ दाखवून पांडवांचा त्याग करायला लावावे किंवा त्यातल्या त्यात भीमाचा काटा काढावा." कर्णाने ह्या सर्व उपयांचा फोलपणा दाखवला; “इथे आपल्या राजधानीत पांडव अनाथ पोरे असताना जे साधले नाही, ते आता तर अशक्य आहे. आता त्यांना पक्षपाती मित्र आहेत, ते दुस-या देशांत आहेत. द्रुपद आर्यवृत्त राजा आहे. धनाचा लोभी नाही, द्रुपदाच्या मुलाच्या बाबतीत म्हणशील तर तो पांडवांचा भक्त आहे. द्रौपदी सर्वांची मिळून बायको झाली आहे आता त्यांच्यात फूट पाडणे कदापि शक्य नाही" आणि द्रौपदी जिवंत असेपर्यंत त्यांच्यात कधीही फूट पडलेली नाही. द्रौपदी मेल्यावर जी फूट पडली ती शरीराची.
 कुंतीने पांडवांचे जतन केले, ते त्यांच्या जिवाची काळजी घेऊन, द्रौपदीने त्यांना सर्वनाशापासून वाचवले. ह्या तिच्या कृत्याचा मोठेपणा महाभारतात परत कर्णाच्याच तोंडून वदवला आहे. धर्माने द्यूता सर्वस्व गमावले. एवढेच नव्हे, तर आपल्या बायकोला पणाला लावली. कौरवांच्या सभेत होऊ नये, तशी तिची विटंबना झाली. त्या वेळी झाला एवढा दुष्टावा पुरे, गोष्टी पुढे जाऊ दिल्या तर परिणाम बरा होणार नाही, या भीतीने धृतराष्ट्राने द्रौपदीला तीन वर मागायला सांगितले. एका वराने तिने धर्माला दास्यातून केले. दुसऱ्या वराने इतर चौघांना मुक्त केले. “नवरे शस्त्रास्त्रांसह मुक्त झाले, एवढे मला पुरेसे आहे." असे म्हणून तिने तिसरा वर मागितलाच नाही.