पान:Yugant.pdf/97

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७८ / युगान्त

करण्यासारखा आहे. सासू म्हणाली, "काय आणलं आहे, ते पाचांनी वाटून घ्या." मग बघते, ती एक सुंदर मुलगी. ही कशी पाचांनी वाटून घ्यायची? धर्माने अर्जुनाला सांगितले, "बाबा, तू हिला जिंकलेस, तू हिच्याशी लग्न कर." अर्जुन म्हणाला, "तुम्ही व भीम वडील असता मी धाकट्या भावाने लग्न करण्याचे पाप कसे करू? तुम्हीच मोठेपणी हिच्याशी लग्न करा." कुंतीच्या मनात होते, ती सर्वांची व्हावी. ही गुंतागुंत सुटावी कशी?
 थोरल्या भावाआधी लहानाने लग्न करणे हे काही फक्त शिष्टाचाराविरुद्ध होते असे नव्हे, तर खरोखरी असे करणे पाप आहे, अशी फार जुनी समजूत होती. वेदांमध्ये व ब्राह्मण-ग्रंथांतही ह्याला स्पष्ट पुरावा सापडतो. थोरल्याच्या बायकोवर खालच्या भावांचा अधिकार असे; पण उलट मात्र होऊ शकत नसे. धाकटयाने लग्न आधी केले, तर तो धाकटा व थोरला भाऊ एवढेच नव्हे, तर अशा लग्नाला संमती देणारे आईबापही पापाचे धनी होत. पूर्वीच्या काळी थोरल्या मुलाला वंशपरंपरा अधिकाराचा व द्रव्यांचा वारसा मिळत असे. आई-वडिलांचे श्राद्ध व गृहस्थपणाची सर्व कर्तव्ये बजावण्यासाठी त्याला लग्न आवश्यक असे. खालच्या भावाने लग्न करणे म्हणजे थोरल्याचे सामाजिक, कौटुंबिक व धार्मिक अधिकार हिरावून घेण्यासारखे होते, म्हणून थोरल्याआधी लग्न करणे पाप होते. द्रौपदीच्या बाबतीत तर अर्जुनाने एकट्यानेच तिच्याशी लग्न केले असते, तर वरच्या भावांना इतक्या तोलाच्या राजघराण्यात मुलगी मिळणे जड झाले असते. अर्जुनाने जिंकलेल्या मुलीचे धर्माशी लग्न होणे शक्य होते. आजोबांच्या पिढीत भीष्माने आपल्या भावांकरिता मुली जिंकून आणल्या होत्या. द्रौपदीबद्दल बोलणी होत होती, तेव्हा सर्व भावांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या व सर्वांच्या मनात तिच्याबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली होती, असे महाभारतकारांनीच एका श्लोकात सांगून टाकले आहे. ही गोष्ट कुंतीच्या नजरेतून निसटलेली नसणार. तिच्या शहाणपणाने व