पान:Yugant.pdf/94

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेयुगान्त / ७५

जनकाच्या मोठेपणाचे वर्णन आहे, पण प्रत्यक्षात रामाला किंवा सीतेला त्याचा उपयोग झाला नाही. अगदी ह्याउलट द्रौपदीची कथा. द्रुपदाला शूर मुलगा हवा होता, म्हणून त्याने यज्ञ केला व त्या यज्ञातून त्याला एक मुलगा व मुलगी अशी जाणती मुले मिळाली. त्यांतील मुलगा धृष्टद्युम्न व मुलगी द्रौपदी. ती माहेरची किती लाडकी होती, ते नावावरूनही समजते. सीतेला स्वतःचे नाव ‘सीता', जनककुळाने स्वीकारली, म्हणून ‘जानकी', विदेहाची राजकन्या म्हणून ‘वैदेही', द्रौपदी वर्णाने सावळी, पण ज्या यज्ञकुंडातून निघाली, त्यातील ज्वालेसारखी तेजस्वी. तिचे स्वतःचे नाव ‘कृष्णा', द्रुपदकुळातली, म्हणून ‘द्रौपदी' पांचालांची राजकन्या, म्हणून ‘पांचाली'. यज्ञसेन द्रुपदाची मुलगी, म्हणून 'याज्ञसेनी.' सीतेच्या बापाचे तर नावच माहीत नाही. द्रौपदी आणि द्रौपदीचा भाऊ मोठेपणी यज्ञातून आली, त्यांना आपल्याबद्दल काहीच वाटावयाचे नाही, अशा भीतीने द्रुपदाची राणी पृषती* हिने अग्निदेवाची प्रार्थना केली की, 'देवा, ह्या मुलांना आपल्या खऱ्या जन्माचा विसर पडून मीच त्यांची आई आहे, असे वाटावे.' म्हणून द्रौपदीला ‘पार्षती' असेही आईवरून आणखी एक नाव आहे. द्रुपदाला शूर मुलगा हवा होता, त्याप्रमाणे मुलीच्या पणाच्या सौद्यात कुशल धनुर्धर जावई हवा होता. कृष्णेच्या माहेरामुळे पांडवांना प्रतिष्ठा मिळाली, दुर्योधनाशी लढावयाला सेना मिळाली व धृष्टद्युम्नासारखा सेनापतीही मिळाला.
 महाभारतकथेत एका मोठ्या थोरल्या कुटुंबाचे तीन-तीन पिढ्यांचे नातेवाईक आले आहेत. बळेच आंधळेपण स्वीकारलेल्या गांधारीचा भाऊ जे धृतराष्ट्राला मिळाले नाही, ते दुर्योधनासाठी मिळवायला पाहत होता. मुलांच्या लहानपणी त्यांच्यावर जागता पहारा ठेवाणारी कुंती, तिच्या माहेरची माणसे; अर्जुनाची सून उत्तरा


  • यज्ञसेन द्रुपदाच्या आजोबांचे (की पणजोबांचे?) नाव ‘पृषत' असे होते. म्हणून सर्व घराणे ‘पार्षत', म्हणजे द्रुपदाची बायको त्यांच्याच घराण्यातली होती. दशरथाची कौसल्याही अशीच त्याच्या घराण्यातील होती.