पान:Yugant.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



युगान्त / ७१

 मरणसमयीचे हे वर्तनही पिता-पुत्रांना योग्य असेच आहे. एका उपनिषदात मरायला टेकलेल्या पुरुषाने काय करावे, याचे वर्णन आहे. आपण जमिनीवर निजावे, पुत्राला आपल्या अंगावर घ्यावे; "मी माझी इंद्रिये तुला देतो," असे पित्याने म्हणावे. 'घेतो', असे पुत्राने म्हणावे. ह्याप्रमाणे शक्ती, ऐश्वर्य, बुद्धी सर्व काही पित्याने पुत्राला द्यावे व पुत्राने घ्यावे, असा एक विधी सांगितला आहे. महाभारतातील विदुर व धर्म यांच्या शेवटच्या भेटीत हीच क्रिया थोडक्यात वर्णिली आहे. पुढे दोन अध्यायांनंतर व्यास सगळ्यांना भेटायला आल्यावर तो विदुराबद्दल असे सांगतो, "पूर्वी विचित्रवीर्याच्या दासीच्या ठायी माझ्यामुळे साक्षात धर्म योगबलाने जन्माला आला आणि त्याने योगबलाने कुरुराज युधिष्ठिराला जन्म दिला. जो धर्म, तोच विदुर... जो विदुर, तोच पांडव! आणि हे धृतराष्ट्रा, ज्याप्रमाणे तुझा तो भाऊ तुझी चाकरी करीत होता, तसाच युधिष्ठिर धर्म तुझी करीत आहे." म्हणजे कुंतीने आपल्या धाकट्या दिरापासून धर्मराजाला उत्पन्न केले, ही गोष्ट सर्व युद्ध संपेपर्यंत गुप्त ठेवून त्याचा महाभारतात अशा ठिकाणी उच्चार केलेला आहे की, शेवटी विदुराचे व धर्माचे ऐक्य हे पिता-पुत्राचे ऐक्य होते, की दोघेही साक्षात यमधर्माचे मुलगे म्हणून होते, हा संदेह उरतोच. कुंतीला फक्त एकच मुलगा विदुरापासून झाला, इतर का नाही? असा विचार केला, तर नियोगाने एखाद्या पुरुषाशी संग केला तर तो फक्त एकदाच पुत्रप्राप्तीकरता करावा, अशी भावना असल्यामुळे विदुराचा व कुंतीचा संयोग परत झाला नाही व तिला दुसऱ्या पुरुषांना बोलवावे लागले असे वाटते. एवढे मात्र खरे की, ह्या शेवटच्या क्षणापर्यंत विदुराच्या आणि धर्माच्या नात्याचा व एकमेकांविषयी वाटणाऱ्या जिव्हाळ्याचा इतर बाबतीत अतिशय स्पष्टवक्ते असणाऱ्या महाभारतात कोठेही स्पष्ट उल्लेख नाही. विदुराचे व धर्माचे पिता-पुत्रांचे नाते असण्याची शक्यता आहे असे मानले, तर संबंध महाभारताच्या गोष्टीला एक निराळेच वळण