पान:Yugant.pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / अकरा

सर्वांत जुन्या आवृत्तीत आढळते ते ! ही आवृत्ती ख्रिस्ती शतकाच्या आठव्या-नवव्या शतकामागे जात नाही. ही आवृत्ती आता पुढील संशोधनास व अभ्यासास योग्य अशी झाली आहे. आतापर्यंतचे संशोधन बव्हंशी बाह्य रूपांवर आधारलेले होते. आता जी प्रत मिळाली आहे, तीमध्ये उघड-उघड मागाहून घुसडलेले, कथेशी काडीमात्र संबंध नसलेले असे कितीतरी भाग आहेत. अभ्यासाने ते काढण्याची आवश्यकता आहे. तसे झाल्यास आणखी काही वर्षांनी भांडारकर-प्रतीत जे आहे, त्यांतले निम्मेशिम्मे जाऊन कदाचित आणखी एक संशोधित आवृत्ती मिळण्याचा संभव आहे. एवढ्यावरच हे काम थांबत नाही. कदाचित त्याहीपुढे जाऊन महाभारताच्या मुळाशी असलेली ‘जय' नावाची गाथा प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. जसजसे संशोधन होत राहते, तसतसे संशोधनाचे नवेनवे मार्ग उपलब्ध होतात. जुन्या पिढीतील संशोधनाच्या चुकाही समजतात. म्हणून कुठचेही एक संशोधन म्हणजे कोणत्याही गोष्टींवर अगदी शेवटचे शिक्कामोर्तब झाले, असे समजू नये.

 संस्कृत हा माझा अभ्यासाचा विषय नव्हे. मी महाभारत वाचते, ते आवड म्हणून. मला जे भाग प्रक्षिप्त वाटले. किंवा मागाहून घुसडलेले वाटले, त्यांचा मी पदोपदी उल्लेख केलेला आहे. हे माझे मत वाचता वाचता झालेले आहे. त्याच्या पाठीमागे भक्कम संशोधन नाही. मला प्रक्षिप्त वाटलेला भाग संशोधनाने तसा नाही असे ठरले, तर तेवढ्यापुरते माझे विवेचन चुकले, असे म्हणावेच लागेल. पण एरवी ‘बाईचे विवेचन चुकले,' असे म्हणता येणार नाही. ‘पटत नाही,' असे जरूर म्हणता येईल. महाभारत ही एक मोठी खाण आहे. तीतून काही बाहेर काढायचे, तर निरनिराळ्या तऱ्हांनी काढता येईल. एकाने जे लिहिले, त्यात सर्व काही आले - यावे, असे म्हणताच येणे शक्य नाही. जो-तो आपल्या कुवतीप्रमाणे ह्या संस्कृति-भांडारातील द्रव्य वापरीत असतो. ज्योतिषशास्त्र,