पान:Yugant.pdf/89

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

७० / युगान्त

बेत ठरतो, त्या वेळेला नेमकी यमधर्माचीच आठवण व्हावी, हे मोठे चमत्कारिक वाटते.
 ह्या पहिल्या मुलाचे नाव 'युधिष्ठिर'. त्याचे 'धर्म' नाव पडले त्याला कारणे पुष्कळ आहेत. यमधर्माचा मुलगा म्हणून त्याचे नाव 'धर्मज', अतिशय धार्मिक वृत्तीचा, म्हणूनही त्याचे नाव 'धर्म', ह्याखेरीज विदुराचा असल्यामुळेही त्याला 'धर्म' नाव पडण्याचा चांगला संभव होता. विदुर म्हणजे शापित यमधर्मच होता. (अणिमांडव्य ऋषीची गोष्ट पहा.) विदुर हा कुंतीचा धाकटा दीर, या नात्याने नियोगाला सर्वस्वी योग्य असा होता. धर्माच्या आज्ञेप्रमाणे झालेले मूल म्हणूनही युधिष्ठिराला 'धर्म' नाव पडण्याचा संभव होता. ह्यावरून धर्म विदुराचा मुलगा असावा, असे वाटते.
 दुसऱ्याही ठिकाणी दोन प्रसंग असे आहेत की, त्याने या तर्काला पुष्टी येते. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती आणि विदुर ह्यांनी अरण्यवास स्वीकारला. धर्म व इतर पांडव त्यांना भेटायला वनामध्ये जात असत. अशा एका वेळी विदुर दिसला नाही, म्हणून धर्माने त्याची चौकशी केली. धृतराष्ट्राने सांगितले, "विदुर घोर तप करतो आहे. तो काही खात-पित नाही. कधीकधी अरण्यात इकडे-तिकडे भटकताना तो लोकांना दिसतो." धृतराष्ट्र हे सांगत असतानाच अस्थिपंजर मात्र उरलेला, सर्व अंग धुळीने माखलेला उघडा-नागडा असा विदुर लांबून जातो आहे, असे लोक म्हणाले. हे ऐकून धर्म "विदुरा, थांब. अरे मी तुझा आवडता युधिष्ठिर." असे ओरडत-ओरडत त्याच्यामागून धावला. असे एका-पाठोपाठ धावत असताना एके ठिकाणी अगदी दाट अरण्यात एकांत स्थळी विदुर एका झाडाला टेकून उभा राहिला. "मी युधिष्ठिर," असे म्हणून परत एकदा धर्माने आपली ओळख दिली. तेव्हा विदुर पापणी न हलविता, आपली दृष्टी राजाच्या दृष्टीत मिसळून त्याच्या गात्रागात्रात योगबलाने शिरला. आपले प्राण, इंद्रिये, तेज सर्व काही विदुराने राजाला दिले.