पान:Yugant.pdf/88

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



युगान्त / ६९

त्याच्या तोंडून वदवली गेली आहे. धर्म एवढा विवेकी, पण शेवटच्या क्षणी द्रौपदी खाली पडून मेली, तेव्हा तिचे प्रेम अर्जुनावर जास्त होते, ह्या दीनवाण्या शब्दांनी त्याने आपले मुख्य शल्य प्रकट केलेच. एकदा असे वाटते की, द्यूत खेळायला बोलावले असताना आपले राज्य, आपली भावंडे, आपली बायकोसुद्धा जणू उन्मादात पणाला लावण्यात धर्माने परत एकदा आपली मनोव्यथाच प्रकट केली. जे स्वत:च्या श्रमाने मिळाले नाही, ते असे उधळण्यात धर्माने मोठा पुरुषार्थ केला का? की ते मला तुच्छ आहे, हे दाखवून दिले? धर्म सगळ्या वडील माणसांचा मान ठेवीत असे, पण विदुराबद्दल त्याला एक आतला जिव्हाळा होता असे वाटते.
 हे सर्व लक्षात घेतले म्हणजे विदुराचे आणि धर्माचे पिता-पुत्रांचे तर नाते नव्हते ना, अशी शंका मनात डोकावते. ह्या शंकेला पोषक असे महाभारतात पुष्कळच आहे. महाभारतात कोणाचेही कसलेच गौप्य लपवलेले नाही. कुंतीला कुवारपणी झालेला मुलगासुद्धा त्यात आला आहे. मग कुंतीला विदुरापासून धर्म झाला, ही गोष्ट का लपवून ठेवली असावी? कदाचित ही गोष्ट झालीच नसावी. सर्व कुंतीपुत्र हे निरनिराळ्या देवतांपासून झालेले दाखवले आहेत. पांडू जिवंत असताना ही सर्व मुले झाली असल्यामुळे व पांडूने ती आपली स्वतःची असे मान्य केल्यामळे बीजक्षेत्रन्यायामुळे ती पांडूचीच होतात. त्यांत एखादे मूल विदुरापासून झाले असते, त्याला कुठलाही कमीपणा आला असता असे वाटत नाही. एक शंका मनात येते. धृतराष्ट्राचा मुलगा हा क्षत्रिय राजकन्येपासून झालेला होता व स्वतः धृतराष्ट्रही एका राजघराण्यातील सर्वांत वडील राजपुत्र होता. ह्याउलट कुंती जरी राजकन्या असली, तरी विदुर हा सूत होता. सूतापासून झालेला मुलगा म्हणून वडील असूनही धर्माचा हक्क दुर्योधनापुढे कमी ठरला असता का असा एक प्रश्न उरतो. त्याला काही महाभारतात उत्तर नाही. आदिपर्वात ज्या वेळेला, कोणातरी देवतेला बोलावून पुत्र उत्पन्न करायचा असा