पान:Yugant.pdf/87

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

६८ / युगान्त

त्याच्या स्वतःच्या पिढीत विद्वान, विचारशील व धर्मज्ञ म्हणून प्रसिद्ध. त्याच्या शहाणपणाची परीक्षा अरण्यपर्वात यक्षप्रश्नाच्या वेळी झाली. परत महाप्रस्थानपर्वात झाली. पांडूचा, म्हणजे राज्याभिषेक झालेल्या राजाचा तो थोरला मुलगा. वंशपरंपरागत राज्य त्याला मिळावयाचे. पण त्यातही भानगडी व कटकटी निर्माण झाल्या, लहानपणीच शत्रूच्या घरी काही न बोलता दीनपणे त्याला रहावे लागले. आपण राज्याचे अधिकारी, ही गोष्ट क्षणमात्र विसरता येण्यासारखी नव्हती. किंबहुना, त्याच्या धाकट्या भावाने व आईने त्याला ही गोष्ट क्षणभरही विसरू दिली नसती, भीम, अर्जुन ह्यांच्यासारखा धर्म लढाऊ वृत्तीचा नव्हता. ब्राह्मण मंडळी जमवावी; त्यांच्याकडून यज्ञ करवावे, त्यांना दक्षिणा द्याव्या, लोकांचा दुवा घ्यावा, धार्मिक गोष्टींबद्दल ऊहापोह करावा, जुन्या राजांची चरित्रे ऐकावी, मजेत सोंगट्या खेळाव्या, हा त्याचा स्वभाव. वाट्याला आयुष्य आले, ते मात्र धकाधकीचे. जे काही मिळाले, तेही इतरांच्या पौरुषामुळे. अतिसुंदर बायको व द्रुपदासारखे बलाढ्य श्वशुर मिळाले, ते अर्जुनामुळे; दोन्ही वेळच्या वनवासामध्ये संरक्षण झाले, ते भीमाच्या बळाने; इंद्रप्रस्थाचे राज्य व मयसभेसारखी अप्रतिम सभा मिळाली, ती कृष्णार्जुनांच्यामुळे; शेवटचे युद्ध जिंकले, तेही भावांचा पराक्रम व कृष्णाची बुद्धी ह्यांच्या जोरावर! हे होत असतानाही, युद्धात एक-दोनदा भावांपुढे त्रागा करण्याचा प्रसंग उद्भवला. जे शेवटी हाती आले त्याची किंमतही इतकी जबर द्यावी लागली की, तोंड विजयाने उजळायच्याऐवजी विषादाच्या राखेने मात्र भरल्यासारखे वाटत होते. धर्माचे आयुष्यही पहिल्यापासून शेवटपर्यंत विषादाने भरलेले. ह्या बाबतीत तो विदुराच्या जवळचा वाटतो. मिळायची पात्रता असतानाही मिळाले नाही, म्हणून विदुराची विषण्णता; व अधिकारप्राप्य गोष्टी दुष्प्राप्य होऊन मिळाल्या, त्याही जबर किंमत देऊन, म्हणून धर्माची विफलता! विदुराच्या विफलतेला महाभारतात तोंड फोडलेले नाही. पण धर्माची विफलता वेळोवेळी