पान:Yugant.pdf/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेयुगान्त /६७

आहे, “आपणच आमचे आई-वडील सर्व काही आहात; जे रुचेल ते करावे. “ह्यापुढे गांधारी, कुंती व माद्री ह्यांबद्दलची हकीकत निरनिराळी आली आहे. म्हणजे हे पहिले आठ श्लोक सर्वस्वी निरर्थक आहेत. ह्या वेळी विदुराच्या दोघा थोरल्या भावांच्या लग्नाचा विचार चालला होता. विदुराचे लग्न व्हावयाचे होते. सर्वजण वीस वर्षांच्या आतलेच असणार. विदुर सगळ्यांत धाकटा. अशावेळी भीष्म विदुराचा सल्ला विचारणे शक्यच नाही. भीष्माने आपल्या थोरल्या दोघा पुतण्यांचे लग्न झाल्यावर देवक नावाच्या राजाची दासीपुत्री आणून तिचे विदुराशी लग्न लावले व त्याला चांगली मुले झाली, असे दोन-तीन श्र्लोक आहेत. त्यांनतर परत विदुराच्या बायका-मुलांचा महाभारतात कुठे उल्लेख नाही. 'महाभारतात घडलेल्या मानसिक व शारीरिक तुंबळ स्पर्धेपासून विदुराने स्वतःला अलिप्त ठेवले, एवढेच नव्हे, तर आपल्या कुटुंबालाही अलिप्त ठेवले असे दिसते. तरीही विदुर खोलपणे कुठे गोवला गेला होता की काय, अशी मनाला शंका येतेच.
 विदुर पांडवांचा कैवारी असे म्हटले, पण सर्व पांडवांशी त्याचे संबंध सारखे नव्हते, त्याचा आणि धर्माचा अगदी निकटचा संबंध होता. वारणावताला जाताना त्याने पुढील संकटाची सूचना धर्माला दिली होती. कुंतीने धर्माला विचारले, “विदुर तुजजवळ काय बोलला, ते आम्हांला सांगतोस का?" तेव्हा विदुराने काय सूचना दिल्या, ते धर्माने सर्वांना सांगितले. कौरवांच्या राजसभेतून तो आला, म्हणजे दरवेळी त्याचे बोलणे धर्माशी होई. कृष्ण आणि अर्जुन, कर्ण आणि दुर्योधन ह्यांच्या मैत्रीप्रमाणे उघडउघड जगाला दिसेल अशी मैत्री, असा हा संबंध नव्हता. बरोबरीच्या मैत्रीचे ते नाते नव्हते. धर्मराज म्हणतो त्याप्रमाणे विदुराने बापाच्या नात्याने पांडवांचे रक्षण केले, पण इतर पांडवांपेक्षा धर्मच त्याला जास्त जवळचा होता. धर्मात आणि विदुरात काही विलक्षण साम्य आहे. विदुर नीतिज्ञ, धर्मज्ञ म्हणून ‘विदुर' ह्या नावाने प्रसिद्ध, तर धर्म हा