पान:Yugant.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत



युगान्त / ६१


युगान्त / ६१ बोलू लागला. कारण उघड होते. विदुराची परिस्थिती कौरवांच्या घरी होती, तशीच होती. तो कोणासाठी काहीच करू शकत नव्हता. पण पांडव आता स्वतंत्र झाले होते. त्यांच्या पाठीमागे पांचालांचे सामर्थ्य होते. आता गुपचप राहून कौरवांचे बेत मुकाट्याने हाणून पाडायचा प्रश्न नव्हता. आदिपर्वात परिस्थितीतला हा फरक फारच मार्मिकपणे दाखवला आहे. द्रौपदीला पांडवांनी मिळवली. दुर्योधन आणि त्याचे मित्र हात चोळीत पराभव खाऊन परत आले. हे कळल्याबरोबर विदुर धृतराष्ट्राकडे गेला, आणि त्याला म्हणाला, "कौरवांचे अभिनंदन असो!" पांडव काय किंवा दुर्योधनादी भाऊ काय, सगळे कुरूंचे वंशज, म्हणजे कौरव! पांडव लाक्षागृहात जळालेले, त्यामुळे धृतराष्ट्राला वाटले, द्रौपदीला मिळवून आपलाच मुलगा परत आला. आणि तोही मोठ्या आनंदाने "छान,छान" म्हणून "द्रौपदीला आणा", "अरे दुर्योधना, तिला भूषणे आणा," असे म्हणाला. मागाहून विदुराने त्याला खरी हकीकत सांगितली. लहानपणापासून धृतराष्ट्राने पांडवांना छळून शेवटी त्यांना जाळायची मसलत केली होती, त्या सर्वांचे ह्यावेळी विदुराने उट्टे काढले. धृतराष्ट्राने "तेही माझे मुलगेच आहेत; विदुरा, तेही माझे आवडतेच आहेत." असे म्हटल्यावर “बाबा, तुझ्या तोंडात साखर पडो. त्यांच्याविषयी तुझी बुद्धी अशीच कायमची राहो," असे विदुर म्हणाला. विदुर गेल्यावर दुर्योधन वगैरे परत येऊन पांडवांचा नाश कसा करावा, ह्याबद्दल धृतराष्ट्राकडे येऊन मसलत करू लागले. तेव्हा काळ-वेळ जाणून आता गुप्त खलबत करण्यात अर्थ नाही, हे ओळखून धृतराष्ट्राने भीष्म, द्रोण, विदुर यांना बोलावले.सर्वांनी त्याला पांडवांशी सख्य करण्याची विनंती केली. ह्याही वेळी विदुराचे भाषण अगदी तळमळीचे आहे. नंतर विदुराने स्वत: जाऊन पांडव, द्रौपदी व कुंती ह्यांना आणले आणि त्यांना राज्यार्ध म्हणून खांडवप्रस्थ दिले. ह्यानंतर मात्र विदुराने दरवेळी उघडपणे पांडवांची बाजू घेतली.