पान:Yugant.pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



युगान्त / ५७

मिळवलेल्या राज्याच्या फलाची-वैभवाची-मला मुळीच इच्छा नाही. आता तप करून. सासू-सासऱ्यांची सेवा करून मला पुण्यप्रद अशा पतिलोकाला जाऊ द्या. तुम्ही परता."
 हे कुंतीचे शब्द ऐकून शरमलेले पांडव द्रौपदीला घेऊन परत फिरले. कुंतीने गांधारीचा हात आपल्या हातात घेतला होता. धृतराष्ट्राने गांधारीच्या खांद्यावर हात ठेवला होता व ती तिघे जण एका माळेत हस्तिनापूरच्या रस्त्यातून चालत होती.
 वनात गेल्यावरही कुंतीच त्यांची सेवा करीत होती व रोज ह्याचप्रमाणे ती त्यांना गंगेवर घेऊन जात होती. मुले एकदा येऊन भेटून गेली. परत सर्वजण रडली. वनात गेल्यापासून सर्वांआधी विदुर गेला. वनात एकंदर तीन वर्षे लोटल्यावर वणवा लागला असता आधीच होरपळलेल्या त्या तिघा जीवांची शरीरे आगीत होरपळून गेली. मरतानाही कुंती ताठ मानेने मेली. धृतराष्ट्राने संजयाला सुटून जायला सांगितले. वणवा पुढे येत असताना सर्वांनी जमिनीवर बसून श्वास रोधून प्राणायाम केला, व अशा अवस्थेत संजय पाहात असता ती अग्निसात झाली.

 सप्टेंबर, १९६६