पान:Yugant.pdf/76

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५६ / युगान्त

जाण्यास निघाले. कुंतीनेही त्यांच्याबरोबर जाण्याचे ठरवले. "माझ्या हातून वडिलांची सेवा झाली नाही, आता होऊ दे. मी सासू (थोरली जाऊ गांधारी) व सासरा (थोरला दीर धृतराष्ट्र) ह्यांना संभाळीन,” म्हणून ती चालू लागली. पांडवांचा आक्रोश ऐकून धृतराष्ट्राने गांधारीला सांगितले की, “वधूला (कुंतीला-सुनेला) म्हणावे, फार कष्टात दिवस काढलेस; आता चार दिवस मुलांजवळ वैभवाने रहा." पण कुंतीने ऐकले नाही. शेवटी धर्म डोळ्यांत पाणी आणून म्हणाला, “पूर्वी विदुलेची गोष्ट वासुदेवाकरवी आम्हांला ऐकविलीस. तुझे म्हणणे मनावर घेऊन आम्ही राज्य जिंकले. आता तुझी क्षात्रवृत्ती कुठे गेली, की मिळवलेले राज्य, आम्ही मुले, सुना ह्या सर्वांना सोडून रानात चाललीस?” कुंती न ऐकता अश्रू ढाळीत चालतच राहिली आहे, हे पाहून भीम म्हणाला, “मुलांनी मिळवलेले राज्य भोगायचे सोडून कुठे चाललीस? असे जर होते, तर आमच्याकडून पृथ्वीचा क्षय होईल, असे युद्ध का खेळवलेस? माद्रीच्या ह्या दोन मुलांना आणि आम्हांला वनातून हस्तिनापुराला आणलेच कशाला?"
 मुले बडबडत होती. द्रौपदी अश्रू ढाळीत मागून येत होती, व ही काही न बोलता चालत होती. मुले काही केल्या पाठ सोडीत नाहीत, हे पाहून तिने अश्रू पुसले व ती म्हणाली, “पांडवा, तू म्हणालास ते सर्व खरे आहे. तुम्ही खचला होता, म्हणून मी तुम्हाला चाबूक मारून उठवले. द्यूतात राज्य गमावले होतेत. सुखाला पारखे झाला होता. ज्ञाती विचारीत नव्हत्या, तेव्हा मी तुम्हाला वरती काढले. पांडूची संतती नाहीशी होऊ नये, तुमचे यश नष्ट होऊ नये, म्हणून मी तुम्हांला फटकारले. ही माझी लाडकी सून परत अपमान न पावो, म्हणून मी तुम्हांला डिवचून जागे केले. बाबांनो, पांडूची बायको असताना मी राज्याचा उपभोग भरपूर घेतला आहे, बरे. दाने दिली, यज्ञ केले, सोमरस प्याले. माझ्यासाठी काही हवे होते, म्हणून नाही मी वासुदेवाबरोबर निरोप पाठविला. पुत्रांनी