पान:Yugant.pdf/72

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२ / युगान्त

सगळेच तू घालवले आहेस. पुत्राच्या नावाने माझ्या पोटी कलीच आला आहे. कोणाही राजाच्या घरात गाढवाप्रमाणे मोठ्याने ओरडणारा [वाचिवीर] पण कृतीत निर्बल असा पुरुष जन्माला येऊ नये. तुझे ‘संजय' नाव ठेवले आहे, ते अन्वर्थ कर. तुझी बायको आणि मी ‘आश्रयणीय' (लोकांनी ज्यांच्या आश्रयार्थ यावे अशा) आहोत. तू आम्हांला आश्रित का बनवणार आहेस?"
 मुलगा म्हणाला, “सर्व लोखंड गोळा करून तुझे क्रोधाविष्ट, अकरुण, वैरमय हृदय केलेले आहे. हा काय क्षत्रियाचार, की तू आपल्या एकुलत्या-एक पुत्राला असे बोलावेस? मी मेलो, तुझ्या दृष्टीआड झालो, तर पृथ्वीचे राज्य वा अलंकार वा भोग वा जीव तरी तुला हवासा वाटेल का?"
 आई म्हणाली, “बाबा, हीच वेळ आहे तुला बोलायची व डिवचायची. ज्या वात्सल्यात सामर्थ्य नाही, व जे सहेतुक नाही, ते गाढवीच्या प्रेमासारखेच. तू क्षत्रिय आहेस. जिंक तरी, किंवा मर तरी"
मुलगा अगदी शेवटचा उपाय म्हणून म्हणाला, “अगं, मजजवळ काही द्रव्य नाही. मी लढू कशाच्या जोरावर? सैन्य कसे गोळा करू?"
 आई म्हणाली, “असे काही बोल. मजजवळ गुप्त धन आहे. तू लढायला तयार असलास, तर देते."
 मुलगा लढला, व त्याने गेलेले राज्य मिळवले.
 “...कृष्णा, हे आख्यान धर्माला सांग. अर्जुनाला सांग की, क्षत्रिय स्त्री ज्या आशेने मुलाला जन्म देते, ती फलप्रद करण्याचा काळ आला आहे. सर्वजण लढा व थोरल्या भावाला राजा करा. सुनेला सांग. ‘बाई, मोठ्या कुळातली आहेस."
 चाबकाने घोड्याला फटकारावे, तसे कुंतीने मुलाला लढायला उद्युक्त केले. भीमाला, अर्जुनाला, नकुल-सहदेवांना, सुनेला जे निरोप आहेत, ते म्हणजे ‘धर्मराजाला शरणागती पत्करू देऊ