पान:Yugant.pdf/71

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहेयुगान्त / ५१

मुलगा, राज्याचा वारस, पण तो युयुत्सूही नव्हता व विजिगीषूही नव्हता. “कृष्णा, राजा युधिष्ठिर धर्मात्मा आहे. त्याला म्हणावे, बाबा, तुझा धर्म नष्ट होतो आहे. नको ते करू नकोस. मंद, अविद्वान, शब्दजंजाळात गुंतून राहणा-या ब्राह्मणाप्रमाणे तुझ्या बुद्धीला एकच धर्म दिसतो आहे. अरे, ब्रह्मदेवाने क्षत्रियाला उरापासून निर्माण केले, ते बाहुबल दाखवण्यासाठी, प्रजापालन करण्यासाठी. राजा जर धर्म विसरला, तर तो नरकात जातोच; पण सर्व प्रजेलाही नरकात लोटतो. बापाकडून आलेला भाग बुडाला आहे. बाहेर ओढून काढ. आपलासा कर. अरे, शत्रूला आनंद होतो तुझ्या वागण्याने. तुला जन्माला घालून मी लोकांच्या अन्नावर जगावे, यापेक्षा मोठे दुःख नाही रे ! राजधर्माने वाग. स्वतःला व धाकट्या भावांना नरकात पाठवू नकोस." एवढ्यावर ती थांबली नाही. एक जुना इतिहास तिने मुलाला ऐकवला, ‘विदुरा' किंवा 'विदुलापुत्रसंवाद' म्हणून तो प्रसिद्ध आहे. विदुला वा विदुरा म्हणजे ‘ज्ञानी'. तिचे वर्णन म्हणजे कुंतीचे (व द्रौपदीचे) स्वतःचे म्हणायचे. ती कशी होती? ‘यशस्विनी', 'मन्यूमती' (राग येणारी, मानी), ‘कुले जाता' (उत्तम कुळात जन्मलेली), ‘क्षत्रधर्मरता' (क्षत्रधर्माचे पालन करणारी), ‘दीर्घदर्शिनी' (लांबपर्यंत पाहून विचार ठरवणारी), ‘विश्रुता राजसंसत्सु' (राजसभांमधून विख्यात असलेली), ‘श्रुतवाक्या, बहुश्रुता' (पुष्कळ ऐकलेली) अशी; मुलगा कसा होता- सिंधुराजाने जिंकलेला, निजून राहिलेला, दुबळ्या मनाचा, निरानंद, धर्म माहीत नसलेला, शत्रंना आनंद देणारा. अशा पुत्राची विदुलेने जी निर्भर्त्सना केली, ती कुंतीने धर्मराजाला समग्र ऐकवली. तीतला काही थोडाच भाग येथे देते. (उद्योगपर्व : अध्याय । १३१ ते १३५)
 "तू प्रेतासारखा निजला आहेस कसा? अरे क्षुद्रा, पराजित स्थितीत निजू नकोस. ऊठ, वीर्याचा प्रभाव दाखव, नाही तर सद्गतीला जा. अरे क्लीबा, ऐहिक कीर्ती व पारलौकिक पुण्य