पान:Yugant.pdf/70

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे५० / युगान्त

जवळ म्हणीवजा ह्या वाक्याचा वापर केलेला दिसतो. कुंती म्हणते, "लग्नामुळे मी एका डोहातून दुसऱ्या डोहात येऊन पडले.” (हृदात् हृदमिव) तिच्या मताने एका चांगल्या ठिकाणाहून दुसऱ्या चांगल्या ठिकाणी पोहोचले. राजाची मुलगी होते, ती राजाची राणी झाले. "दुसऱ्यांनी माझ्या आश्रयास यावे, ती मी आज दुसऱ्यांच्या आश्रयास आलेली आहे." पांडूसारख्या दुर्बलाच्या पदरी बांधली, म्हणून आजच्या दृष्टीने तिची कीव येते. पण तिला तसे वाटले नाही. काही झाले, तरी तो राजा होता. तिला दुसऱ्यांकडून मुले धारण करण्याची मुभा होती. पांडू जिवंत राहून हस्तिनापुरास येता, तर ती थोरली राणी राहिली असती व भानगडी कटकटी न होता राजमाता झाली असती. अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत ‘हृदात् हृदम्' अशी तिची परिस्थिती राहिली असती. पण तिच्या नवऱ्याने तिला पहिला दगा दिला व त्यातूनही धैर्याने बाहेर पडून राजमातेचे वैभव मिळते न मिळते, तो तिच्या मुलाने तिला दगा दिला. नवऱ्यापासून विषयसुख मिळाले नाही. एकदाच, शेवटचे का होईन माद्रीला ते मिळाले, म्हणून तिचा जळफळाट झाला. पण ती ते मिळायचे नाही, असे धरूनच चालली होती. ह्या भानगडीत नवरा मेल्यामुळे तिचे राणीपण व मुलाचे राजपद गेले, ही तिच्या दृष्टीन खरी वंचना होती. 'अग, मी त्याला किती जपत होते,' असे ती माद्रीला म्हणाली, त्याचाही अर्थ हाच होता.
 राज्य घालवून मुलांनी दगा दिला होताच. आता नवीन संकट उभे राहिले होते. ते हे की, हा थोरला मुलगा व त्याचे आज्ञाधार भाऊ म्हणून इतर भावंडे तह करू पाहत होती. तो तह क्षत्रियवृत्तीला न साजेसा व अपमानकारक होईल, ही तिला भीती; म्हणून तिने कृष्णाबरोबर पुढील निरोप पाठविला. कृष्णाजवळ तिने सांगितले, “भीमाला व अर्जुनाला सांग, अपमान विसरू नका."
 कृष्णाला तिने निरोप दिला. अर्जुनाला, भीमाला सांगितले, ‘अपमान विसरू नका,' पण मुख्य निरोप होता धर्माला. हा थोरला