पान:Yugant.pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / ४

ठरल्यामुळे गाळलेले श्लोक खाली दिले आहेत. एकात आहे, ‘ती निषादी दुष्ट होती व पुरोचनाच्या विश्वासातली होती!' दुसऱ्या श्लोकात आहे, 'ती दुष्ट (पापा) होती व कुंतीला वरवर मैत्री दाखवीत होती (सखिमानिनी).
 हस्तलिखितांच्या तपासणीमुळे व तुलनेमुळे (अर्थामुळे नव्हे,) प्रक्षिप्त ठरलेले हे श्लोक, जुने महाभारत व त्यात मागून घुसडलेले श्लोक ह्यांच्यातील फरक उत्तम दाखवतात. जणू ती निषादी दुष्ट होती, व मारण्यास योग्य होती, असा आभास मागाहूनचे श्लोक निर्माण करतात. मूळ श्लोक परिस्थितीला धरून आहे. अचानक ती आली... मृत्यूने बोलावल्याप्रमाणे आली व पांडवांना दुर्योधनाचा डाव पुरेपूर उलटवता आला. ही हकीकत स्वाभाविक वाटते. कदाचित त्या निषादीमुळे त्याच दिवशी पळून जाण्याचा बेत नक्की झाला असेल. पाच मुले व एक बाई अशी सहा कोळसे झालेली, ओळखू न येणारी शरीरे दुसऱ्या दिवशी नागरिकांना सापडली. त्याचबरोबर आणखी एकाचे म्हणजे पुरोचनाचे, त्यांच्या मारेकऱ्याचे शरीर सापडले. म्हणजे पांडव मेले असे सिद्ध झाले व त्यांना कोणाचा ससेमिरा पाठीमागे न लागता वर्षभर लपत-छपत राहता आले. निषादी मरणे ही कथानकाच्या सूत्रातील एक अवश्य बाब होती.
 घर आगीत जळण्यासारखे आहे हे कळूनही तेथे रहाच कशाला, हा मुद्दा भीमाने काढला होता. धर्माच्या उत्तरावरून कळते की, पांडवांनी जे केले, त्यावाचून दुसरे काहीही करणे त्यांना त्या परिस्थितीत शक्यच नव्हते. तो म्हणे, “जणू काही समजलेच नाही, अशा तऱ्हेनेच आपल्याला राहिले पाहिजे. आपल्याला काही शंका आहे असे पुरोचनाला कळले, तर तो दांडगाईने आपल्याला जाळील. आगीच्या भीतीने आपण दूर गेलो, तर दुर्योधन आपल्याला शस्त्रांनी मारवील. त्याला एक विशिष्ट स्थान प्राप्त झालेले आहे. आपणाला स्थानच नाही. त्याच्या बाजूला त्याला