पान:Yugant.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४४ / युगान्त

मुलांना व अर्धवट जळलेल्या दोन प्रेतांना घेऊन ऋषींबरोबर हस्तिनापूरला गेली.
 कोणाची कीव करायची? कोणाचा तिरस्कार करायचा? सवती-सवती असणे हे त्या वेळच्या बहुसंख्य स्त्रियांचे नशीब. त्या सवतीपणातच वडीलपणा मिळवण्याची केविलवाणी धडपड! कौसल्या आणि कैकेयी, द्रौपदी व सुभद्रा, आणि नंतर एका सहस्त्रकामागून कालिदासाने रंगवलेली चित्रे... धारिणी, इरावती, मालविका. त्यामागून कित्येक शतकांनी शिवाजी महाराजांच्या राण्यांतील व त्यांच्या संततीमधील स्पर्धा! समाजातील स्थान नवरा व मुलगा ह्यांवर अवलंबून. म्हणून नवऱ्याची पहिली बायको व्हायचे, नाही तर आवडती बायको व्हायचे; मुलाला संपत्तीचा... राज्याचा... वाटा मिळवून द्यायचा, ही सारी धडपड. हे स्त्रियांचे नशीब. 'आपण एकमेकींना धीर देऊ या,' ही भावना कुठेच दिसत नाही.' ‘माझ्याकडे कशाला येतोस? ती सात्वतांची लेक आणली आहेस ना, तिच्याकडे जा,' असे रागाने अर्जुनाला बोलून सुभद्रा पाया पडायला आली, तेव्हा तिला उठवून "बाई, तुझा नवरा नेहमी विजयी होवो," असे म्हणून तिला भेटणारी द्रौपदी सवतीविषयी उदार नव्हती... नवऱ्याच्या मोठेपणाला जपणारी होती. हा नवा संबंध फार फलदायी आहे, हे तिला माहीत होते, म्हणून तिने हा उदारपणा स्वीकारला.
 कुंती फार कठीण होती. माद्रीविषयी तिला प्रेम वाटणे शक्यच नव्हते. पण तिने तिला संतान होण्यास मदत केली. ह्यावरून दिसते की, तिच्याजवळ न्यायबुद्धी होती. माद्रीला इतके कठीण बोलायला काही कारणही झाले होते. पांडू जिवंत राहता, तर आज-ना-उद्या हस्तिनापूरला जाऊन राज्य ताब्यात घेता आले असते, व मग तिचा थोरला मुलगा आपोआपच राज्याचा वारस झाला असता. कुंती राजाला सारा वेळ जपत होती, असे दिसते. ‘तुला सर्व माहीत असून एकांतात राजाला भेटलीसच का?' असा तिच्या ठपक्याचा