पान:Yugant.pdf/63

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / ४३

आणखीही पांडव जन्माला आले असते !
 बिचारी माद्री ! सुरेख होती, तरुण होती. पण भीष्माने तिला पांडूची धाकटी पत्नी म्हणून विकत घेतली. राणीपद दूरच राहिले, पण थोरलीच्या मत्सराच्या ज्वाळेत ती जळत होती. एक दिवस न राहवून तिला एकांतात गाठून, ती ‘नको, नको,' म्हणत असता पांडूने तिच्याशी संग केला व तो ताबडतोब मेला ! माद्रीचे रडणे ऐकताच कुंती आली. 'एकटीच ये, मुलांना आणू नकोस', हे शब्द ऐकून मुलांना लांब राहण्यास सांगून, ‘माझा घात झाला!' असे ओरडतच कुंती धावत आली. राजा व त्याच्या शेजारी माद्री पाहून तिचा मत्सर उफाळला. “मी त्याला इतके दिवस संभाळले, पण तू कस ग जाणून-बुजून असे केलेस? त्याचे रक्षण करायचे सोडून तू एकांत साधून त्याला भुलवलेस. धन्य आहेस बाल्हीकी ! माझ्यापेक्षा कितीतरी पटीने धन्य आहेस ! संभोगाचा आनंद ज्या तोंडावर ओसंडून जात आहे. असे नवऱ्याचे तोंड तुला दिसले !” माद्री काय उत्तर देणार? “मी नको नको. म्हणत होते," हे ती कसेबसे बोलली. कुंतीने आणखी विष ओकले. “मी थोरली बायको आहे. मला जो मार्ग अनुसरायचा त्यापासून परावृत्त करू नकोस. ही चालले मी नवऱ्यामागून. ऊठ, त्याला सोड. ह्या मुलांचे रक्षण कर."
 ह्या एका क्षणात अल्लड माद्री मोठी झाली. एका क्षणात पुढले सबंध आयुष्य तिला दिसले का? आतापर्यंतचे विफल आयुष्य आणखीच हीनदीन होणार, याची तिला जाणीव झाली. सुटकेचा शेवटचा एकमेव मार्ग तिने पत्करला. माद्रीने उत्तर केले, “मीच नवऱ्यापाठीमागे जाते. माझ्यासाठीच त्याने जीव टाकला. माझेही मनोरथ पूर्ण झाले नाही. मोठी म्हणून अनुमती दे. तुझ्या मुलांशी समभाव ठेवता येणार नाही. तेही पाप माझ्या हातून व्हायला नको. कुंती, तूच माझ्या मुलांना पोटच्या पोरांप्रमाणे संभाळ. मी जाते.”
 माद्रीने राजाच्या चितेवर स्वतःला जाळून घेतले व कुंती