पान:Yugant.pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४२ / युगान्त

म्हणते. क्षणभर ते खरे धरून चालले. तरी पांडू इतक्या तरुण वयात दोन्ही बायकांना घेऊन दिग्विजय झाल्याबरोबर रानात का गेला, हे कोडे राहतेच. पुत्रोत्पत्तीही ताबडतोब झाली असली पाहिजे. कारण आपल्यापासून संतती होणे शक्य नाही, हे माहीत झाल्यावर पांडूने कुंतीला नियोगाने पुत्र उत्पन्न करण्यास सांगितले. आपल्याला कुवारपणीच एक मुलगा झालेला आहे, ही गोष्ट या वेळी कुंतीला सांगता आली असती. त्या वेळच्या रूढीप्रमाणे (बीजक्षेत्र-न्यायाने) तो मुलगा आपलाच, असे पांडूला अगदी कायदेशीररीत्या म्हणता आले असते. पण आपल्याला कुवारपणी झालेल्या मुलाचे पुढे काय झाले, तो जिवंत तरी आहे की नाही, हेही कुंतीला माहीत नव्हते. अशा परिस्थितीत कुवारपणची कथा तिने पांडूला सांगितली नाही, यात काहीच नवल नाही.
 धृतराष्ट्राचे लग्न झालेले होते व त्याच्या आधी मुलगा होण्याची आवश्यकता पांडूला वाटली असली पाहिजे. सर्व हुकणारच होते; पण गांधारीला आधी गर्भ राहूनही तिचा मुलगा कुंतीच्या मुलामागून जन्मला, असे महाभारत सांगते.
 कुंतीला एकामागून एक तीन मुले झाली. माद्री राजाला म्हणाली, "लोक मला वांझ म्हणतील. माझ्यात काहीही दोष नाही. तुम्ही थोरलीला विचारून मलाही एक मंत्र देववता का?"
 राजाने कुंतीची याचना केली व कुंतीने एक मंत्र दिला. माद्रीने अश्विनांना पाचारण केले व तिला जुळी मुले झाली. मुले जरा मोठी झाल्यावर माद्रीने राजाला परत पुत्रप्राप्तीबद्दल विनंती केली. राजाने परत कुंतीजवळ याचना केली. कुंती रागाने जळत होती. "मी वेडी, मला कळले नाही की जुळे होईल म्हणून. आणखी एकदा तिला मंत्र दिला, तर ती काय करील कोण जाणे! तिचाच वरचष्मा व्हायचा सर्व प्रकारे. आता कुणालाच मुले नकोत. तिलाही नकोत व मलाही नकोत."
 माद्रीने पहिल्या झटक्यात दोन मिळवली नसती, तर कदाचित