पान:Yugant.pdf/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त/४१

कर्णजन्म व कवच-कुंडले ह्यांची काही नैसर्गिक उपपत्ती लागत नाही. दुर्वास-ऋषींचा सूर्याशी काही संबंध पोहोचता, तरी अशी उपपत्ती लागली असती. पण महाभारतात तसे कुठे दिसत नाही. कुवारपणात झालेला हा मुलगा म्हणजे कुंतीने जन्मभर पोटात बाळगलेले एक दुःखच होते. एकदा टाकून दिल्यावर तिला तो जवळ करता येईना. मोठेपणी सर्व जन्मरहस्य सांगूनही तो आईचे हे कृत्य विसरू शकला नाही. आईला क्षमाही करू शकला नाही. ह्या मुलांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कुंती त्याला जन्माला घालण्याच्या पापाची व त्याला टाकून देण्याच्या अन्यायाची भरपाई क्षणाक्षणाला करीत होती.
 एका बापाने दत्तक दिली, त्यातून हे दुःख निर्माण झाले. दुसऱ्या बापाने लग्न लावले ते एका व्यंग असलेल्याशी. त्यातून उत्पन्न झालेली दुःखे, पहिल्या दुःखाच्या जोडीला जन्मभर तिच्या सोबतीला राहिली.
 पांडूला राज्याभिषेक झाला. म्हणजे कुंती हस्तिनापूरची महाराणी झाली होती. पण सबंध महाभारतात ह्या राणीपणाचा उल्लेख फक्त तिच्याच तोंडून अगदी शेवटी आला आहे. पांडू राजा झाला, त्याने दिग्विजय केला, आणलेला करभार, रत्ने, नाणे, सर्व धृतराष्ट्राच्या स्वाधीन केले व तो हिमालयात गेला. त्याच्याबरोबर कुंती-माद्रीही गेल्या. हिमालयात त्या वैभवात राहिल्या असतीलही. पण हस्तिनापूरचे राणीपद कोठे व अरण्यवास कोठे? कुरूंना शिकारीचा षोक होता. ते रानात जात असत. बायका राजधानीतच राहात. त्यामुळेच तर शकुंतला-दुष्यंताला व सत्यवती-शंतनूला अडकवू शकल्या. पांडू तरुण वयात का गेला? आपण जिवंत असताना आपल्या राण्यांना दुसऱ्याकडून मुले उत्पादन करण्याचा प्रकार त्याला राजधानीत व्हावयास नको होता म्हणून? रानात सगळीच मुले ‘देवदत्त' झाली. कदाचित राजधानीत ते साधले नसते ते. पांडूला रानात गेल्यावर शाप मिळाला. असे महाभारत