पान:Yugant.pdf/58

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३८ / युगान्त

राज्यावर बसलेले पाहिले व संभाळले. कुंतीच्या बाबतीत मात्र सुख जवाएवढे तरी होते किंवा नाही, कोण जाणे ! दुःखाचे पर्वत मात्र ती जन्मभर उरावर बाळगून होती. जेवढ्या पुरुषांशी तिचा संबंध आला, त्या सर्वांनी आपापल्या परींनी तिला दु:ख दिलेच.
 एके ठिकाणी ती वासुदेवाला म्हणते, “मी तुला कडेवर घेऊन चेंडू खेळत होते, एवढ्या लहानपणी चोरा-पोरी द्रव्य देऊन टाकावे, तसे माझ्या बापाने मला कुंतिभोजाला देऊन टाकले' उद्योगपर्वातला हा उतारा मागून घुसडलेला असण्याचा संभव आहे, कारण ती कृष्णाला कडेवर घेतले असे म्हणते, ते इतर पुराव्यांशी जुळत नाही. ती एक दुःखी, विचारी बाई होती, असे वाचताना वाटते. ती रडली-कढली, पण ती आपल्याला हीन-दीन समजत नव्हती. तिच्या दृष्टीने क्षत्रिय स्त्रीने जे मिळवायचे, ते तिने मिळवले होते. सुखी आरामशीर आयुष्याची क्षत्रिय स्त्रियांची अपेक्षाच नव्हती. असे तिच्या उदगारांवरुन वाटते व मनात विचार येतो... तिची कीव करणारी मी कोण? तिने उघड्या डोळ्यांनी, ताठ मानेने व बऱ्याचशा कृतकृत्यतेने आयुष्य घालवले. माझ्या सुखाच्या कल्पनेने मी तिचे सुख-दु:ख का जोखावे?
 कुंतीचा बाप शूरसेन हा राजा होता. कुंतिभोज हा त्याच्याच कुळातला दुसरा राजा होता. कुंतीबद्दलची सुरवातच पुढील श्लोकांनी झाली आहे.

पैतृष्वसेयाय स तामनपत्याय वीर्यवान् ।
अग्न्यमग्ने प्रतिज्ञाय स्वस्यापत्यस्य वीर्यवान् ।।
अग्रजातेति तां कन्यामग्ग्रानुग्रहकाङ्क्षिणे ।
प्रददौ कुन्तिभोजाय सखा सख्ये महात्मने ।।
(१.१०४.२-३)


 (श्लोकाचा अन्वय : सः वीर्यवान् सखा स्वस्य अपत्यस्य अग्रे अग्यं प्रतिज्ञाय, अग्रजाता इति तां कन्याम् अग्यानुग्रहकाङ्क्षिणे पैतृष्वसेयाय अनपत्याय महात्मने सख्ये कुन्तिभोजाय प्रददौ।