पान:Yugant.pdf/54

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३४ / युगान्त

“मुलांच्या प्रेमामुळे... आंधळ्या प्रेमामुळे काय ते आपण जवळ आलेलो होतो. एरवी कुठल्याही क्षणी तुला माझ्याबद्दल आपलेपणा वाटला नव्हता. आम्ही कुरुकुलातील पुरुषांनी बायकांच्यावर फार अन्याय केले. त्यांचे प्रायश्चित्तही आम्हांला पुरेपूर मिळाले. अंबेच्या रागात भीष्म जळाला; तुझ्या रागात मी जळत आहे. माझी मुले पण जळून गेली. कुंतीचे लग्नसुद्धा अशाच एका व्यंग असलेल्या माणसाशी झाले. पण तिने मात्र पत्नीची फार आवडत्या नसलेल्या पत्नीची भूमिका तर पार पाडलीच; शिवाय पतीच्या मागे अविरत जागृत राहून मुलांचे हित पाहिले. प्रत्येक माणूस कोणत्या-ना-कोणत्या तरी अन्यायाच्या परंपरेत गुरफटलेला आहे. मी तुझ्यावर अन्याय केला; पांडूने कुंतीवर अन्याय केला. स्वतः मी आणि पांडू ह्यांना आयुष्यात जी विफलता भोगावी लागली, तो अन्याय कोणाचा? आमच्या आयांचा तळतळाट भोवला आम्हांला, असे म्हणायचे काय? बिचारा विदुर अंगाने आणि बुद्धीने धड होता. ज्या बापाची आम्ही मुले, त्या बापाचाच होता. पण केवळ दासीचा, म्हणून त्याला राज्यावर बसविले नाही. त्यानेही आपल्या आयुष्यातील निराशेचा सूड कोणावर उगवला नाही. आमच्या कुळात अहर्निश जागरूक राहिली, ती विदुर आणि कुंती. तू समजतेस, गांधारी, की तुझीच तेवढी वंचना झाली. पण विचार कर, आमच्या तीन पिढ्यांतली माणसे- प्रत्येकजण असा वंचित आहे. मी तुला सांगतो आहे, ते फक्त मला क्षमा हवी म्हणून नव्हे, तर आयुष्याशी तुझा झगडा चालला आहे तो मिटावा म्हणून. माझ्यावरचाच नव्हे, तर सर्व आयुष्यावरचाच राग सोड. मी तुझ्यावर अन्याय केला म्हणून आपल्या मुलांबाळांवर, आपल्या संसारावर, अन्याय करायचा तुला काही अधिकार प्राप्त होत नाही. एका अन्यायाची भरपाई दुसरा अन्याय करून कशी होणार गांधारी? डोळ्यांवरचे फडके अजून तरी सोड. भोवतालची सृष्टी माणसे आणि आयुष्यात आतापर्यंत घडलेल्या सर्व गोष्टी ह्यांच्याकडे