पान:Yugant.pdf/51

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / ३१

निजली व दुसरे दिवशी जड मनाने परतली. अगदी एकही दासी किंवा दास धृतराष्ट्राने राहू दिला नाही. विदुराने धृतराष्ट्राचे सर्व करायची खात्री दिली. “मी थोरल्या जाऊबाईंचे अतिशय आनंदाने करीन. त्यांची संमती असावी." असे कुंती म्हणाली. काय होत होते, त्याला गांधारीने मनापासून संमती दिली. 'मला दासी नको,' असे तिने निक्षून सांगितले. शेवटी निरोप घेतला. जाता-जाता धर्माने विदुराला बोलावून सांगितले, “येथून खाली पाव योजन अंतरावर चार-पाच विश्वासू दासांना झोपडी बांधून रहावयास देत आहे. दोन-चार दिवसांनी ते येऊन काय हवे-नको त्याची विचारपूस करतील. त्यांना ‘नको,' म्हणू नका. त्यांना तुमच्याजवळ एरवी येऊ नका, म्हणून सांगत आहे." चार पावले मुलांबरोबर चालत जाऊन विदुरही परत आला. आता फक्त चौघेच त्या एकांत स्थळी राहिली.
 पर्णकुटीमध्ये सकाळची कृत्ये आटोपल्यावर विदुराने हाती धरून धृतराष्ट्राला व कुंतीने गांधारीला आणून फार ऊन लागणार नाही, अशा थंड ठिकाणी बसवले. स्वतः दोघेजण जरा मागच्या बाजूला टेकून बसली. गांधारी स्वस्थ बसली होती. एक खोल उसासा तिच्या तोंडून बाहेर पडला. तो ऐकून धृतराष्ट्र तिच्याकडे तोड वळवून किंचित उपहासाने म्हणाला, “आता सुस्कारून काय उपयोग? दोन आंधळ्यांचा व्हायचा, तसा आपला संसार झाला.” हे वाक्य आणि त्यामागील स्वर ऐकून गांधारी चमकली. एरवी तिने प्रत्युत्तर दिले नसते. पण राजाच्या शब्दांतला उपहास तिला बोचला. जरा रुक्षपणे ती उत्तरली. “मी स्वतःच्या दुःखांनी सुस्कारा नाही टाकला महाराज. इथे आल्यापासून अंगाला भासणारे गार डोंगरी वारे, पायांखाली देवदारांच्या काड्यांसारख्या लांब पानांचा दाट गालिचा, भोवती देवदारांचा मंद वास, प्रत्येक झुळुकीबरोबर सगळे रान जसे सुस्कारे टाकते आहे असा देवदारांच्या पानांचा आवाज, रात्रंदिवस चाललेला नदीचा खळखळाट ही सर्व अनुभवून मला