पान:Yugant.pdf/50

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३० / युगान्त

आणि गांधारी, विदुर आणि कुंती ह्या चौघांचे दिवसांमागून दिवस चालले होते. विदुर, धृतराष्ट्र आणि इतर तापसी ह्यांचे काही-ना-काही विषयांवर संभाषण चाले. गांधारी व कुंती ऐकत असत. ह्या वरवर शांत जीवनात हस्तिनापूरचे पाहुणे आले, की लाटा उसळत असत. राजपुत्रांच्या नव्हे, राजांच्या परिवाराने सारा आसमंत भरून जाई. मुलांनी पायांवर डोके टेकले म्हणजे प्रत्येकाच्या मनात भिन्नभिन्न भावनांचा पूर लोटे. मुले निरोप घेऊन गेली, की बाहेरचे वातावरण शांत होई; पण आतली खळबळ निवायला वेळ लागायचा. आजही हस्तिनापुराहून मुले, सुना आल्या होत्या. धृतराष्ट्राने काही निश्चय करून धर्माला सांगितले, “युधिष्ठिरा हा काही खरा शेवटचा आश्रम नाही. आता आम्हांला चौघांनाच झोपडी बाधून एकांत जागी राहू दे. राजवाड्यातून बाहेर निघाल्यावर सवय व्हावी, म्हणून येथे रहायला लागल्याला पुष्कळ महिने लोटले. आता वर जाऊन अरण्यात राहिलेले बरे." युद्धिष्ठिराने व इतरांनी चुलत्याचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण धृतराष्ट्र काही ऐकेना. धर्माने विदुराकडे पाहिले. पण आज विदुरसुद्धा धृतराष्ट्राचे म्हणणे उचलून धरीत होता. “धर्मा, धृतराष्ट्र म्हणतो आहे, ते योग्यच आहे. तू आता आम्हांला निरोप दिला पाहिजेस. तुला धर्म माहीत असता आम्हांला मोहात का पाडतोस? तु मोहात का पडतोस? कुंतीचे डोळे भरून आले होते; पण तिनेही सध्याची पर्णकुटी सोडण्याचा आपला निश्चय सांगितला. गांधारीला कुणी निराळे असे विचारलेच नाही. धृतराष्ट्राची इच्छा तीच तिची. असे सर्वच धरून चालली होती.
 सर्वजण दिवसभर चालत होती. सुना-मुलेच नव्हे, तर तापसीदेखील पोहोचवायला आले होते. नदीचे खोरे अरुंद झाले होते. विदुराने एक प्रशस्त, शांत सावलीची जागा पसंत केली. बरोबर आलेल्या दासदासींनी झोपडी उभी केली; आठ-पंधरा दिवस तरी पुरेल. एवढी सामग्री भरून ठेवली. एक दिवस सर्व तिथेच