पान:Yugant.pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२८ / युगान्त

झाली होती. तरीही सखीच्या तोंडी 'राजकन्ये' हे तिचे माहेरचेच संबोधन येई. 'धीर धर.' हे शब्द उच्चारल्यावर तिचे तिलाच वाटले, 'काय वेड्यासारखी सांगते आहे मी. कशाच्या आधारावर तिने बिचारीने आता धीर धरायचा? बाकीची गेली, तरी एका दुर्योधनामुळे ती पुत्रवती होती, सनाथ होती. सर्व दु:खे गिळून तिला मान ताठ ठेवून चालता येत होते. आता ती काय करणार?' सखी म्हणाली, "शांत हो, गांधारी." एक सुस्कारा टाकून गांधारी म्हणाली, "सखे, हृदयाची कालवाकालव व्हायला आता काही कारणच उरले नाही. तुला वाटत होते की, मुले झाल्यापासून एवढ्या मुलांची आई म्हणून आता एकदाचे माझ्या गांधारीला सुख लाभेल. पण तसे नव्हते ग! मुलांना काही दुखले-खुपले की माझा ऊर धपापायला लागायचा. त्यांचे रडणे ऐकू आले की माझ्या जिवाची तारांबळ उडायची. रथांच्या रंगणात त्यांनी 'जिंकले नाही,' हे ऐकले की मी उदास व्हायची. ते घोषयात्रेत फजिती पावून आले, तेव्हा त्यांना झाले नसेल इतके दु:ख मला झाले. सीमेजवळील गावात दूरवर पांडवांना पाठवले, तेव्हा ती दीनवाणी पोरे मला नमस्कार करायला आली होती. मी वरवर त्यांना आशीर्वाद दिला, पण पोटातून वाटत होते, बरा निर्वेध झाला माझ्या मुलांचा मार्ग. "लढाई जुंपायच्या आधी सभेत जाऊन 'भांडू नका,' म्हणून उपदेश केला, तोसुद्धा तुझ्या प्रेरणेने. मला मनातून वाटत होते की, हस्तिनापूरचे राजपद माझ्या मुलांकडेच राहील म्हणून आणि नंतरचा एकेक दिवस उजाडे, तोच 'आज काय बरं वार्ता कानी पडेल?' अशा धास्तीने मन व्यापून राही. दिवस जाऊ लागले, तसे 'आज किती बरे उरली?' असा प्रश्न मी करी, प्रत्येक मूल हे एकेक दु:ख होते. माझा असा जन्मच राहिला नव्हता. त्यांचे सुखाचे क्षण, ते माझ्या सुखाचे क्षण; त्यांच्या दु:खाचे क्षण, ते माझ्या दु:खाचे क्षण; असे संबंध आयुष्य गेले." बोलता-बोलता गांधारी जोरजोराने बोलू लागली होती. सखीला भीती वाटून तिने परत कळवळून म्हटले,