पान:Yugant.pdf/47

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / २७

तिच्या माहेरच्या राजवाड्याच्या मानाने इथला राजवाडाही खूपच विस्तीर्ण होता. माहेरची आठवण कमी होऊन सासरच्या राणीपदाच्या वैभवात तिचे मन गुंतले होते. इतक्यात तिची सखी आली. 'वैभवाच्या कोणत्या नव्या गोष्टी ही आज ऐकवणार आहे बरे?' म्हणून गांधारी अपेक्षेने तिच्याकडे पाहू लागली. पण आजचा नूर काही वेगळाच होता. आज दासी नेहमीप्रमाणे हसतहसत, चंचल गतीने येत नव्हती. तिचा चेहरा फिक्कट पडला होता. पावले अडखळत होती. सखी आजारी आहे, असे वाटून राजकन्या दोन पावले पुढे सरकली. तोच तिची सखी धडपडत पुढे सरकली. तिने राजकन्येचे हात घट्ट धरले आणि तिच्या तोंडून कसेबसे शब्द निघाले, "घात झाला! बिचाऱ्या पोरी, घात झाला! तुझे ज्यांच्याशी लग्न व्हावयाचे, ते राजकुमार जन्मांध आहेत." एक क्षणभर दासीच्या शब्दांचा अर्थच राजकन्येला कळला नाही. दुसऱ्याच क्षणी ती धाडकन जमिनीवर बेशुद्ध पडली.


२ -

 डोळस बायको आंधळ्याची काठी होईल, अशी काही धृतराष्ट्राची आशा असली, तर ती पार नष्ट झाली. नवरा आंधळा, हे कळल्यावर गांधारीने आपले डोळे फडक्याने गच्च बांधून घेतले. डोळे बांधले, तरी संसार व्हायचा राहिला नाही. गांधारीला खूप मुले झाली. कौरव-पांडवांच्या युद्धात ती सगळी मेली. सगळ्यांत मोठा शेवटपर्यंत राहिलेला दुर्योधन, तोही मेल्याची बातमी दूताने आणली.


३ -

 गांधारी आपल्या मंदिरात बसली होती. तिची सखी मागे उभी राहून तिच्या केसांवरून हळूहळू हात फिरवीत होती. स्वतःचे अश्रू पुसता-पुसता गांधारीचे सांत्वन करावयाचा प्रयत्न करीत होती. "धीर धर, राजकन्ये." गांधारी नुसती आईच नव्हे, तर आजीसुद्धा