पान:Yugant.pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युगान्त/२१

 दहावा दिवस : शिखंडी भीष्मावर शरवर्षाव करतो. त्याच्या मागून अर्जुन बाण सोडून भीष्माचे कवच फोडतो. शेवटी डोक्याला बाण लागून भीष्म रथाखाली बाणांच्या खचावर पृथ्वीला अंग न लागता पडतो. भीष्माच्या रथात किंवा रथाजवळ दुःशासन असतो, व भीष्म शेवटपर्यंत त्याच्याशी बोलत असतो.

 लढाई तात्पुरती थांबते. भीष्म परत दुर्योधनाला सांगतो, 'माझ्या मरणाने तुमचे वैर मिटव. तह कर' शेवटी सर्व गेल्यावर कर्ण भीष्माकडे येतो. भीष्म कर्णाला पांडवांकडे जाण्यास सांगतो, पण कर्ण ते नाकारतो.

 एकंदर लढाई अठरा दिवसांची झाली. त्यांतील पहिले दहा दिवस लुटूपुटीची लढाई झाली. लढाईतील बहुतेक दिवशी भीष्म लढाई थांबवण्याची विनंती दुर्योधनाला करीत होता. शेवटी त्याने आपल्या प्राणांचे मोल देऊन युद्ध थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न केला. तोही व्यर्थ गेला.

 ह्या दहा दिवसांच्या वृत्तांतात काही ठळक विसंगती आहेत. शिखंडीची कथा धर्माला माहीत असली पाहिजे, कारण भीष्माशी शिखंडी दोनदा लढायला आला होता. भीष्म त्याच्याशी लढत नाही, हे सर्वांना माहीत झाले होते. आदल्याच दिवशी 'तू भीष्माला का मारीत नाहीस?' म्हणून धर्माने त्याला छेडले होते. अशा परिस्थितीत भीष्माकडे जाऊन 'तुझे मरण कशात?' हा पोरकट प्रश्न विचारण्याचे कारण नव्हते. भीष्म अजिंक्य आहे, हा समज शेवटपर्यंत टिकवण्यासाठी हा प्रयत्न होता. ह्या अतिवृद्धाला मारावयाचे सर्वांच्या जिवावर येत होते. मेलो, तर अर्जुनासारख्या पहिल्या प्रतीच्या योद्धयाच्या हातून मेलो, हा मोठेपणा भीष्माला हवा होता. कौरवांच्या बाजूने भीष्माला बाजूला टाकणे कठीण होते. पांडवांच्या बाजूने देखाव्यासाठी का होईना, अर्जुनाला भीष्माच्या विरुद्ध उभे करणे कठीण होते.