पान:Yugant.pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

२० / युगान्त

दिवस पांडवांना बरा जातो. रात्री दुर्योधन भीष्माला दोष देतो. पांडवांचे- विशेषतः कृष्णार्जुनांचे- दैवी अजिंक्यत्व भीष्म वर्णन करून युद्ध पुरे कर, असे दुर्योधनाला सांगतो.

 पाचवा दिवस : नेहमीप्रमाणे युद्धे होतात, कोणाचाच मोठा विजय होत नाही.

 सहावा दिवस : पाचव्याप्रमाणेच जातो.

 सातवा दिवस : सुरुवातीसच दुर्योधन भीष्माला खूप बोलतो. 'पांडव अजिंक्य आहेत, पण मी शिकस्त करीन,' हे ठरलेले उत्तर भीष्म देतो. निकराची लढाई होते. धर्म 'अजून भीष्माला का मारले नाहीस?' म्हणून शिखंडीला बोल लावतो. हाही दिवस सहाव्या दिवसाप्रमाणेच जातो.

 आठवा दिवस : निकराचे युद्ध होते. कौरवांकडचे शकुनीचे मुलगे व पांडवांकडचा इरावत मारले जातात. भीम धृतराष्ट्राचे पंधरा-सोळा मुलगे मारतो. निकराचे युद्ध चालले असताच संध्याकाळ होते. रात्री दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण ह्यांची मसलत होते. भीष्माला युद्धातून काढून लावण्यास कर्ण सांगतो. दुर्योधन भावांबरोबर भीष्माकडे जातो व निर्वाणीची भाषा बोलतो. भीष्म परत एकदा पांडवांच्या अजिंक्यत्वाचा पाढा वाचतो, पण निकराने लढण्याचे वचन देतो.

 नववा दिवस : भीष्म पराक्रमाने लढतो. अर्जुनाचे चालत नाही, असे पाहून कृष्ण रागारागाने चाबूक घेऊन भीष्मावर चालून जातो. अर्जुन त्याला परतवतो. युद्ध संपते. एकंदर दिवस कौरवांना बरा जातो. रात्री पांडव मसलत करून भीष्मालाच 'तुझे मरण कसे होईल?' असे विचारतात व ‘शिखंडीला पुढे करा' हा उपदेश ऐकतात. कृष्ण अर्जुनाचे मन वळवतो. भीष्माला मारू नकोस, नुसते रथातून पाड, असे तो सांगतो. अर्जुन लाजेने व प्रयासाने कबूल होतो.