पान:Yugant.pdf/34

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

१४ / युगान्त

भीष्माचे वय चौतीस वर्षांचे होते. लग्नानंतर लगेच विचित्रवीर्य मेला. कुरुवंशाचा उच्छेद होऊ नये म्हणून भीष्माने लग्न करावे, अशी इच्छा सत्यवतीने दाखवली. पण भीष्माने ते न जुमानल्यामुळे व्यासाचा विचित्रवीर्याच्या राण्यांशी व दासीशी संग होऊन धृतराष्ट्र वगैरे तीन मुले झाली. भीष्माचे वय धृतराष्ट्राच्या जन्माच्या वेळी पस्तीस, व पांडूच्या जन्माच्या वेळी छत्तीस तरी होते. पांडूचा राज्यभिषेक व लग्न ही दोन्ही सोळाव्या वर्षी झाली असे गृहीत धरले, तर भीष्माचे वय त्या वेळी बावन्न वर्षांचे होते. पांडू हिमालयात गेल्यावर त्याला धर्म झाला, तो लगेच एक वर्षाने असे धरून चालले, आणि त्यामागून एक वर्षाने भीम व त्यानंतर एक वर्षाने अर्जुन असे मानले, तर अर्जुनाच्या जन्माच्या वेळी भीष्माचे वय पंचावन्न असले पाहिजे.

 अर्जुनाचे वय लग्नाच्या वेळी बाप किंवा आजा यांच्याप्रमाणे सोळा वर्षांचेच नसावे, असे त्याने केलेल्या द्रुपदपराभव वगैरे गोष्टींवरून वाटते. पण तरीही ते सोळा वर्षांचे होते असे समजले, तर त्या वेळी भीष्माचे वय एकाहत्तर येते. द्रौपदी-स्वयंवरानंतर पांडव इंद्रप्रस्थाला गेले. तेथून अर्जुन पहिल्या वनवासाला गेला. वनवास सरता-सरता त्याने द्वारकेला जाऊन सुभद्रेशी लग्न केले आणि तो इंद्रप्रस्थाला आला. नंतर त्याचा मुलगा अभिमन्यू ह्याचा जन्म झाला. अर्जुनाचा हा पहिला वनवास बारा वर्षांचा होता, असे महाभारतात म्हटले आहे. त्याऐवजी तो बारा महिन्यांचाच होता असे धरून चालले, तर अर्जुनाला अभिमन्यू अठराव्या वर्षी झाला, असे समजावे लागेल. इंद्रप्रस्थात राजसूय यज्ञ झाला, त्या वेळी जे वैभवाचे प्रदर्शन झाले, त्यामुळे चिडून दुर्योधनानेही एक यज्ञ केला. तेवढ्याने समाधान न होऊन दुर्योधनाने पांडवांना द्यूतास बोलाविले व सर्वस्व गमावून वनवासाला गेले. त्या वेळी अभिमन्यू तीन-एक