पान:Yugant.pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युगान्त / १३

 लढाईच्या आधी सर्वनाश होणार, हे जाणून व्यासाने सत्यवतीला “सुनांबरोबर चतुर्थाश्रम घेऊन अरण्यात जा," असे सांगितले. त्या निघून गेल्या, भीष्म आपल्या सावत्र आईपेक्षाही वयाने मोठाच; त्यालाही हा मार्ग मोकळा होता. बलराम नाही का तीर्थयात्रेला गेला? मग भीष्मच मागे का राहिला?

 मोठा योद्धा म्हणून भीष्माचा लौकिक होता. महाभारतात भीष्मपर्वाच्या आधी भीष्माने कुठे लढाया मारल्याचे दिसत नाही. अंबेच्या बाबतीत परशुरामाशी झालेले युद्ध वास्तविक झालेलेच नसणार. रामाच्याही आधी होऊन गेलेला परशुराम दर युगात आणलेला आहे, इतकेच. महाभारतात परशुरामाचे कार्य दोन योद्धयांच्या पराभवाला कारण पुरवण्यापुरते ओढून-ताणून आणलेले, कथावस्तूला आवश्यक नसलेले असे आहे. हे कल्पित युद्ध सोडल्यास भीष्म लढल्याचा पुरावा नाही. पांडू वयात आल्यावर राजा झाला, व त्याने दिग्विजय केला. त्या वेळी भीष्म पांडूबरोबर गेला नाही. अशा ह्या भीष्माने म्हातारपणी सेनापतिपदाचा हव्यास का धरला? म्हातारपणी विराटाच्या गाई पळवण्याच्या कटात तो सामील होता, पण त्या वेळी एकट्या अर्जुनाने सर्वांनाच व त्याबरोबर भीष्मद्रोणांनाही- पळवून लावले होते.

 भीष्माचे वय भारतीय युद्धाच्या वेळी कमीत कमीत नव्वद ते एकशे-एक वर्षांचे होते. वयाचा हिशेब असा : भीष्माचा बाप शंतनू ह्याने मत्स्यगंधेशी लग्न लावले, तेव्हा भीष्म युवराज होता, धनुर्विद्या शिकलेला होता. तेव्हा तो सोळा वर्षांचा होता. त्याचा पहिला सावत्रभाऊ चित्रांगद काही वैयक्तिक भांडणात मारला गेला. त्याच्या खालचा भाऊ विचित्रवीर्य लग्नाच्या वेळेला निदान सोळा वर्षांचा होता असे धरले, आणि तो सत्यवतीला लग्नानंतर दोन वर्षांनी झाला असे धरले, तर विचित्रवीर्याच्या लग्नात