पान:Yugant.pdf/32

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२ / युगान्त

प्रतिज्ञापालनाचा त्याला कैफ तर चढला नव्हता ना? कैफ चढण्याइतके आत्मविस्मरण भीष्माला झाले नाही, पण चार लोकांच्या देखत जी कठीण भूमिका त्याने घेतली व जी जबाबदारी विशेष कारण नसता मागाहून त्याने स्वीकारली, तीत तो प्रवाहपतितासारखा वाहत गेला, असे म्हणावेच लागते.
 आपल्याकडे ह्या तऱ्हेचा विचार दुसऱ्या गोष्टीच्या अनुषंगाने झाला आहे. ती म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न. यमनियम, प्राणायाम, तप वगैरे साधनांनी मुमुक्षु पुढे जाता-जाता त्याला तपाचे फळ म्हणून ऋद्धि-सिद्धींची प्राप्ती होते. ही पायरी मोक्षमार्गावरच असते, पण ती मोक्षाला जायला एक मोठा अडसर ठरते. ऋद्धि-सिद्धी हे स्वतःच्या महातपाचे दृश्य फल असते व मनुष्य त्या चमत्कारात स्वतःला धन्य मानण्यात मोक्ष विसरून जातो. तशीच परिस्थिती ध्येयवादी माणसाची होते. एका विशिष्ट पायरीवर त्याला मानाचे स्थान व वाहवा मिळते व तो स्वतःला विसरतो. आपल्या हातून काही वाईट व्हायचे नाही, म्हणून तो जपत नाही. इतरांसाठी म्हणून तो धडाक्याने, अविचाराने कृत्ये करतो. तसेच भीष्माचे झाले.
 भीष्माने या सर्व प्रकारात सत्यवतीवर सूड उगवला, असे मात्र म्हणता येत नाही. एक तर महाभारतात ही कल्पना मुळीच आली नाही, व दुसरे म्हणजे ज्या गोष्टी घडल्या- विचित्रवीर्याचे मरण, एका राणीचा मुलगा आंधळा निपजणे, दुसरीचा रोगी निपजणे- त्यांचे काही भीष्माला अगोदर ज्ञान नव्हते. गोष्टी घडत गेल्या व भीष्म संसारात गुरफटत राहिला.
 धर्माच्या राजसूय यज्ञानंतर अग्रपूजेचा मान भीष्माचा, हा शिशुपालाचा दावा चुकीचा नव्हता. तेथेही भीष्म मागे सरला व त्याने मान कृष्णाला देववला. अशा भीष्माने सेनापतिपद स्वीकारलेच कसे ?