पान:Yugant.pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युगान्त / ११

असेही सत्यवतीला व भीष्माला वाटले असले पाहिजे. भीष्माच्या पत्रिकेत राजयोग नव्हता, पण अधिकारयोग मात्र भरपूर होता. ह्या अशा तऱ्हेच्या निवडीमुळे भीष्माच्या अधिकारालाही तडा गेला नाही व ब्रह्मचर्याची भूमिकाही शाबूत राहिली. हे झाले राजकारण. पण हे वर्तन मानवी मूल्यांच्या दृष्टीने गर्ह्य ठरते ते ठरतेच.

 शिशुपाल भीष्माला शिव्या घालताना ‘प्राज्ञमानिन्’- स्वतःला मोठा शहाणा समजणारा- असे विशेषण लावतो. सर्व स्वार्थ नष्ट झालेला. अत्यंत शहाणा, सत्यप्रतिज्ञ व दुसऱ्याची काळजी वाहणारा असा भीष्माचा लौकिक होता. स्वतः भीष्मही हीच भूमिका हिरीरीने पार पाडीत होता. मनुष्य स्वतःसाठी म्हणून जेव्हा काही करीत असतो, तेव्हा त्याच्या कृतीला मर्यादा असतात, त्याच्या कृतीचे मूल्यमापनही जोखून तोलून होत असते. पण एकदा का त्यागाची भूमिका घेतली, उपकाराची भूमिका घेतली, म्हणजे त्याच्या कृत्यांना सामान्य मर्यादा नाहीशी होते. एरवी चार लोकांचे दडपण असलेला माणूस बेफिकीर वागतो, जुलमी वर्तन करू शकतो. क्रांती करावी-पददलितांसाठी बंड म्हणून उभारावे व त्यात मानवांचा संहार व्हावा, असे कितीदा तरी घडले आहे. फ्रेंच किंवा रशियन राजांनी केला नसेल एवढा संहार फ्रेंच व रशियन राज्यक्रांतीत झाला. ही हत्या करणारे महात्मे होते, गरिबांसाठी लढत होते. मनुष्य स्वतःसाठी जे करीत नाही ते देशासाठी, समाजासाठी, इतरांसाठी करू शकतो. ध्येयवादी, स्वातंत्र्यवादी देशभक्त, देवभक्त लोक जेवढा अन्याय करू शकतात. तेवढा इतर करू शकत नाहीत. त्यातून तो ध्येयवादी ‘प्राज्ञमानिन्', केवळ कुळाच्या कल्याणाची चिंता वाहणारा असा असला, म्हणजे सदसद्विवेक राहत नाही. अशी तर अवस्था भीष्माची झाली नाही ना? आपल्या चांगुलपणाचा,