पान:Yugant.pdf/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ९

केले नाही; ती तुझ्या आश्रयाला आली, तर तू तिला झिडकारलेस; तुझा भाऊ मेल्यावर त्याच्या राण्या तुझ्या होत्या. एका ब्राह्मणाने गुपचूप (मिषतः) त्यांच्या ठायी संतती निर्माण केली. तू ब्रह्मचारी नव्हेस, षंढ आहेस. आता अर्घ्य देऊन तुझा मान राखायची वेळ, तर तू कृष्णाचीच स्तोत्रे गात बसला आहेस.”
 धर्म-दुर्योधनांच्या पिढीत घरच्या पुरुषांसाठी बायका आणण्याचा भीष्माचा उद्योग थांबला, त्यामुळे कोणा बाईचा छळ झाला नाही. पण तो ज्या राजसभेत सर्वांत वडील म्हणून बसे, तेथे झालेली एका स्त्रीची विटंबना थांबवण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. द्रौपदीला सभेत ओढून आणली तेव्हा अति झाले, म्हणून विदुर मध्ये पडला. विदुर धृतराष्ट्राचा धाकटा भाऊ होता. शिवाय दासीपुत्र होता. त्याच्याऐवजी भीष्माला अधिकारवाणीने हा लाजिरवाणा प्रकार बंद करता आला असता. त्याऐवजी तो धर्म काय, अधर्म काय, ह्याचीच चर्चा करीत बसला.
 कुटुंबात म्हणा, राज्यात म्हणा, जे कोणी सर्वांत दुबळे असते, ज्याला अन्यायाविरुद्ध झगडता येत नाही, त्याला सौजन्याने वागवणे ह्यात खरा मोठेपणा असतो. देव अनाथांचा नाथ. म्हणून त्याचा मोठेपणा. अगदी हाच अभिप्राय तुकाराम महाराजांनी मराठीत सांगितला आहे. ‘दया करी जे । पुत्रांसी । तेचि दासां आणि दासी । तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।' स्वत:च्या मुलाला कोणीही नीट वागवील. घरच्या गडी-मोलकरणीचे जो हित बघेल, त्याच्याच मनात देवपणा असतो. अशा घरात देव राहतो. जवळजवळ हेच शब्द मनूने उपयोजले. मनुस्मृती महाभारतामागून लिहिलेली; पण आचाराचे नियम-सदाचाराचे नियम-दोन्ही काळी सारखेच होते.