पान:Yugant.pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

८ / युगान्त

 भीष्माने आंधळ्या धृतराष्ट्राला लांब देशीची राजकन्या बायको म्हणून आणली. आपला नवरा आंधळा आहे हे कळल्याबरोबर तिने आपले डोळे फडक्याने कायम बांधून टाकले. कुंती जाडजूड (पृथा) व निबरच होती. पण तिला व रूपवती माद्रीला ज्याच्या गळ्यात बांधले, त्याला स्त्री-संग शक्य नव्हता. बिचारी माद्री नवऱ्याच्या मृत्यूला कारण, म्हणून तरुणपणी सती गेली. ह्या पाच बायकांचा आत्मा किती तळमळला असेल ! भीष्मामुळेच त्यांची विटंबना झाली. भीष्म कुरुकुलातील कर्ता, अधिकारी पुरुष होता. त्यानेच आपल्या वंशाच्या वृद्धीपायी ह्या कुलस्त्रियांची मानहानी व विटंबना केला होती. गांधारी, कुंती, व माद्री ह्यांच्याबद्दल महाभारतात त्या वेळी लोक काय म्हणत होते, ते कळत नाही; पण काशिराजाच्या मुलींवर जे प्रसंग ओढवले, त्यांवरून भीष्माची भयंकर निर्भत्सना शिशुपालाच्या तोंडी आलेली आहे.
 प्रसंग होता धर्माच्या राजसूय यज्ञाच्या वेळी अग्रपूजा देण्याचा, सर्व थोर-थोर राजांना आमंत्रणे होती. पाहुण्यांना अर्घ्य देऊन त्यांचा सत्कार करायचा होता. पहिल्याने अर्घ्य कृष्णास द्यायचे, असे पांडवांनी भीष्माच्या सल्ल्याने ठरवले. त्याप्रमाणे तो अर्घ्य देणार, तो शिशुपालाने हरकत घेतली. "इतर कोणी नाही, तरी तुमच्या कुळातील सर्वांत वृद्ध जो भीष्म त्याला अर्घ्य देणे योग्य," असे शिशुपाल म्हणाला, कृष्णालासुद्धा बोलता येऊ नये, असा हा मुद्दा होता; व तो बोललाही नाही. भीष्माने स्वतःच उठून, कृष्णच सर्व दृष्टींनी कसा योग्य हे बोलून दाखविले, तेव्हा शिशुपालाने चिडून उत्तर दिले, “भीष्मा, तुझे सर्व चरित्रच क्षत्रियाला काळिमा लावणारे आहे. अंबेने शाल्वाला वरले आहे, ही गोष्ट जगजाहीर होती, तरी तू तिचे हरण केलेस. विचित्रवीर्य धार्मिक राजर्षी. त्याने तिच्याशी लग्न