पान:Yugant.pdf/264

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडविलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तिलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते की, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वत:ची व्यथा होते. त्या व्यक्तीच्या द्वारे सबंध मानवतेचे दु:ख आपल्याला खुपत राहते.








 देशमुख आणि कंपनी
(पब्लिशर्स) प्रा. लि.