पान:Yugant.pdf/257

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / २३९
 


परिशिष्ट

महाभारतात उल्लेखिलेले काही समाज


१ वैदिक समाज : मानववंशाबद्दल काही विशिष्ट कल्पना मनात बाळगल्या नाहीत, तर ह्या समाजाला 'आर्य' म्हणावयास हरकत नाही. ह्यात मुख्यत्वे तीन प्रकार : ब्राह्मण, क्षत्रिय व विश्. ब्राह्मण, क्षत्रिय व विश् ह्या तिघांचे चाकर, दास, दासी वगैरे, ते शूद्र. फक्त ब्राह्मण व क्षत्रिय यांचे परिचारक, पुष्कळदा क्षत्रियांना अति जवळचे असे, ते सूत (उदा. विदुर, संजय, सुदेष्णा वगैरे).
२. वरील गटाशी मित्रत्वाचे वा शत्रुत्वाचे नाते असलेला गट नाग. त्याची मुख्य घराणी...
तक्षक :- खांडववनाचा राजा : पांडवांशी तीन पिढ्यांचे वैर.
ऐरावत कौरव्य :- ह्याचेच प्राकृत स्वरूप एलापत्त. अर्जुनाची एक बायको उलुपी ह्याच्याच कुळातली.
वासुकी :- भोगावतीचा राजा. मुलगी जरत्कारू त्याच नावाच्या ब्राह्मणाला दिली. तिचा मुलगा आस्तिक ह्याने मातृकुलाला जनमेजयाच्या सर्पसत्रापासून वाचवले.
३. दासराज :- गंगेवर नौका चालवणाऱ्या, मासे धरणाऱ्या लोकांचा राजा. ह्याची मुलगी काली-सत्यवती-मत्स्यगंधा हिचे लग्न शंतनूशी झाले. ही धृतराष्ट्र-पांडूची आजी.
४. पक्षिकुलाची नावे असलेले नागेतर अरण्यवासी लोक. शारङ्गी नावाच्या बाईला ब्राह्मणापासून झालेल्या संततीला अर्जुनाने खांडवदाहाच्या वेळी जीवदान दिले.
५. अरण्यवासी राक्षस (?)- हिडिंब, बक वगैरे.
ह्यातील एका बाईशी- हिडिंबेशी भीमाचे लग्न झाले. त्यांचा मुलगा घटोत्कच लढाईत मारला गेला.
६. मणिपुरचा राजा व प्रजा. मुलगी चित्रांगदा हिचे अर्जुनाशी लग्न झाले. ती व तिचा मुलगा तिच्या माहेरीच राहत होती. मातृप्रधान घराणे होते काय ते कळत नाही.