पान:Yugant.pdf/254

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२३६ / युगान्त


आपला शापित भाऊ ओरेस्टेबरोबर वणवण हिंडणारी इलेक्ट्रा*, पापाचे प्रायश्चित्त म्हणून म्हातारपणी इडिपसने आपले डोळे फोडून घेतले तेव्हा ठरलेले लग्न मोडून ह्या निराधार अपंग बापाची काठी होणारी इफिजेनिया, अशी कितीतरी अविस्मरणीय विविध चरित्रे ग्रीक कथांतून आहेत. ग्रीकांचे देव व देवताही आपल्याकडील देवांच्या मानाने भारी रागीट,उतावळ्या व स्वभावाने दुष्ट वाटतात. ग्रीक कथेत बहीणभाऊ ह्यांचे नाते अतिशय प्रेमाचे व जवळिकीचे दाखवलेले आहे.लग्न झाले, म्हणून स्त्री आपल्या माहेरला विसरत नव्हती. मूळ एक पण मागाहून निरनिराळ्या प्रदेशांत गेलेल्या दोन पितृप्रधान संस्कृतीत हा फरक का असावा, असा प्रश्न साहजिकच उभा राहतो. ग्रीकांवर मिसरी संस्कृतीचा परिणाम झाला असला पाहिजे.मिसर देशात राजा जरी पुरुष असला, तरी संस्कृती मातृप्रधान होती व स्त्रियांचा दर्जा फार मोठा होता त्याचा हा परिणाम असला पाहिजे.
 ग्रीकांमध्येही राजकुले, पूजा-अर्चा करणारा वर्ग व इतर समाज होता. त्याशिवाय परिचर्या करणारा दासवर्गही होता. राजकुले जाऊन लोकसत्ताक प्रस्थापित झाले, तेव्हा मताधिकार फक्त वरच्या तीन लोकांना होता, दासांना नव्हता.


*महाभारतात बहीणभावांच्या प्रेमाबद्दल दाखले मिळत नाहीत.बहिणीच्या मोबदल्यात पराक्रमी वा श्रीमंत मेहुणा मिळवायचा, हाच भावाचा मुख्य उद्देश दिसतो. लग्न झाल्यावर बायकांचा माहेरी फ़ारसा संबंध राहत नसे, असे दिसते. वैदिक वाङ्मयात मात्र बहीण भावांचे संबंध जवळचे दाखविले आहेत. भावाशिवाय असलेल्या बहिणींची स्थिती शोचनीय होती, असेही उल्लेख आहेत.पण महाभारतात बहीणभावांच्या प्रेमाचे उल्लेख नसले, तरी गांधारीच्या व द्रौपदीच्या पाठीशी भाऊ होते व कुंतीच्या पाठीशी भाऊ नाही तरी भाचा होता, असे दिसते. तरी गांधारीचे व शकुनीचे बोलणे किंवा धृष्टद्युम्न-द्रौपदीचे जिवाभावावे संभाषण कुठे दिलेले नाही. पुढील काळात हीच परिस्थिती संस्कृत वाङ्मयात दिसते. पण मध्ययुगानंतर संस्कृत ग्रंथांतून यमद्वितीया व रक्षाबंधन ह्या सणांमध्ये भावा-बहिणींचे संबंध फार जिव्हाळ्याचे दाखवले आहेत, व भारतभर आजकालच्या सर्व भाषांमधून भाषाबहिणींच्या प्रेमाने थबथबलेले लोकवाङ्मय आहे.लोकांच्या तोंडी असलेल्या वाङ्मयातून सापडणारा हा भाव संस्कृतात नाही, पण आजकालच्या लिखित वाङ्मयात सर्वत्र आढळतो. जुन्या संस्कृताच्या परंपरेत अशा तऱ्हेचे संबंध नव्हते, पण बहुजनसमाजात होते व त्यांच्याकडून ते हळूहळू समाजातील सर्व थरांत पसरले, इतकेच नव्हे, तर वाङ्मयातही त्यांना स्थान मिळाले.