पान:Yugant.pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युगान्त / ५

देवव्रत भीष्माच्या स्वाधीन केले. “आई चल," ह्या शब्दांनी भीष्माने तिला रथात घेतले व सर्व परिवारासह राजधानीत येऊन तिचे शंतूनशी लग्न लावून दिले.

 ह्या असामान्य त्यागाने संतुष्ट होऊन बापाने भीष्माला इच्छामरणाचा वर दिला. म्हाताऱ्या बापासाठी पुरूने वार्धक्य पत्करले होते, पण तो त्याग कायमचा नव्हता व त्याचे फलही पुरूला उत्तम मिळाले. पुरू सर्वांत धाकटा मुलगा, पण वरच्या सर्व भावांचा (यदू, तुर्वसू, अनू ह्यांचा) हक्क हिरावून घेऊन ययातीने राज्य पुरूला दिले. भीष्माला त्यागाच्या मोबदल्यात काय मिळाले, तर इच्छामरण! भीष्माचा त्याग मोबदल्यासाठी नव्हताच. तो एक शापित जीव होता, हे त्याला स्वतःला माहीत नव्हते; पण गंगेने शंतनूला ते सांगितले होते. त्याला पूर्वायुष्याचे स्मरण नसूनही पूर्वायुष्यावर आधारलेल्या काही प्रवृत्ती असणार अशी कल्पना केली, तर ह्या प्रसंगाची एक निराळीच संगती लावता येईल. जन्मल्याबरोबर जगातून सुटणार, या आशेने आलेल्या पण अडकून पडलेल्या ह्या जिवाने जगाच्या पसाऱ्यात न अडकण्याची ही संधी साधली, असे तर नाही? राज्य नाही, लग्न नाही, आणि इच्छामरण. ह्या तिन्ही गोष्टींमुळे भीष्म जगातून निघून जाण्यास मोकळा झाला. पिंजऱ्यात अडकलेल्या पाखराला सुटकेचा मार्ग दिसला. पण भीष्माच्याबरोबर जन्माला आलेल्या त्याच्या नशिबाने त्याला परत खोड्यात टाकले.

 शंतनूला सत्यवतीपासून दोन मुले झाली, व ती मुले मोठी होण्याच्या आतच तो मेला. ह्या लहान मुलांना व त्यांच्या तरुण आईला टाकून जाणे भीष्माला अशक्य झाले, व तो परत जगाच्या कटकटीत गुंतला. राजा नसूनही त्याने अडीच पिढ्या विचित्रवीर्य, पांडू, ते दुर्योधन वयात येईपर्यंत, म्हणजे कमीत कमी चाळीस वर्षे राज्य संभाळले, अधिकार गाजवला. स्वतः