पान:Yugant.pdf/249

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३२ / युगान्त

सांगता येत नाही. जागोजाग व्याधांचे उल्लेख आहेत. भीमाला मांस आवडे, ते ते मृगया करून आणीत, असाही उल्लेख आहे.पांडव मृगयेवर राहत. त्यांनी आणलेली मृगया त्यांचे ब्राह्मण आश्रितही खात असणार. मृगयेच्या व व्याधांच्या उल्लेखांवरून वाटते की, गोमांस खायचा प्रघात अजिबात नाहीसा तरी झाला होता, किंवा फारसा अस्तित्वात नव्हता. सर्व क्षत्रिय गाईंचे मोठाले कळप पाळीत. ते का?, क्षत्रिय दूध विकीतसे दिसत नाही. मग गुरे कुटुंबाला दूधदुभत्यासाठी व नित्य होणाऱ्या यागाला तुपासाठीच होती का? क्वचित खाण्यासाठीही, असा प्रश्न मनात येतो. कर्णपर्वातील उघडउघड प्रक्षिप्त भाग कर्णाचे मद्र-बाल्हीक व गांधार या देशांतील माणसांबद्दलचे निर्देश हा वाटतो. कुरु-पांचाल धार्मिक, इतर राष्ट्र अधार्मिक, असा समज झाल्यानंतरचा तो असावा. त्यात म्हटले आहे की, वरील तिन्ही राष्ट्रांचे लोक गोमांस खात व दारू पीत. (८.२७-७७) दारू पिणे महाभारतकाळी क्षत्रियांना संमत होते हे उघड आहे. तसेच गोमांस खाणेही संमत असेल. पुढे त्यावर धार्मिक बंधन पडल्यावर पश्चिमेकडील लोक जुने रीतिरिवाज पाळीत असल्यामुळे ते नव्या समजुतीप्रमाणे धर्मबाह्य ठरले असतील.
 दूध, सान्नाय व धृत ही हविर्द्रव्ये होती. 'सान्नाय’ म्हणजे दूध फाडून फडक्यात बांधून केलेला छाना. ही सर्व खाद्येही असणारच. मनुष्य स्वतःसाठी जे उत्पन्न करतो व खातो, तेच आपल्या देवांना वाहतो. 'घृत' म्हणजे काय ? 'तक्र' व 'नवनीत’ हे दोन्ही शब्द महाभारतात नाहीत. लोणी तापवून केलेले हे घृत, की गोचर्ममांस तापवून युरोपात काढतात तशी चरबी? तोच प्रश्न 'आज्य' ह्या शब्दाविषयी. 'आज्य’ म्हणजे 'अजापासून झालेले ते'. 'आज्य' हे बोकडाचे वा शेळीचे मांसही असू शकेल.'आज्य'शब्द 'अञ्ज्' (='माखणे') ह्या धातूपासूनही होतो. आज्य म्हणजे ह्या अर्थाने अंगाला जे माखायचे ते. तिबेटी लोक व मध्य आशियातील पशुपालक भटके लोक आजही सर्व तऱ्हेची चरबी व लोणी अंगाला