पान:Yugant.pdf/247

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२३० / युगान्त

कालातल्या गाढ़ मैत्रीचे ते प्रतीक होते. महाभारत मैत्री, गाढ मैत्री बरोबरीच्यांशीच होई, असे दिसते.
 ह्यानंतरच्या काळात श्रीकृष्ण देवत्वाला पोहोचल्यावर त्याच्या व सुदाम्याच्या मैत्रीचे जे वर्णन आहे, ते महाभारतातील चित्रणाशी सर्वथैव विसंगत आहे.सुदामा हा एक गरीब ब्राह्मणाचा मुलगा कृष्णाबरोबरच गुरुगृही विद्या शिकत असे. शिकून झाल्यावर दोघेही आपापल्या घरी गेले. सुदामा कशातच- विद्येच्याही बाबतीत पारंगत झाला होता असे दिसत नाही. तो केवळ एक दरिद्री ब्राह्मणच राहिला. एवढेच नव्हे, तर तोंडाळ बायकोमुळेही गांजून गेला होता. ती त्याला म्हणे, 'अहो, तुमचा तो मित्र कृष्ण द्वारकेचा राजा झाला आहे, त्याच्याकडे जाऊन द्रव्य मागा,' ह्या गोष्टीत कृष्ण द्वारकेचा राजा दाखवला आहे. शेवटी कंटाळून सुदामा द्वारकेला जाऊन भीतभीत राजद्वारी उभा राहिला. कोण आले आहे, हे कळल्याबरोबर कृष्ण सिंहासनावरून उठून दाराशी गेला. त्याने मित्राला मिठी मारली; आपल्या शेजारी आणून बसवले. आपल्या राण्यांकडून त्याला स्नान घातले; त्याने आणलेले मूठभर पोहे मोठ्या आवडीने खाल्ले; पाहुणचार केला; व शेवटी त्याच्या गावात त्याला अपार धन दिले. ही कथा भारतभर सर्वांना माहीत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक कीर्तनकार ती सांगत आला आहे. ह्या गोष्टीतली प्रत्येक घटना द्रुपद-द्रोणांच्या कथेकडे पाहून मुद्दाम तीविरुद्ध रचलेली दिसते. श्रीमंतांनी चढेलपणे वागू नये म्हणून लिहिलेली ही नीतिकथा आहे, की देव (श्रीकृष्ण) श्रीमंत-गरिबांत भेद करीत नाही, हे पटवण्यासाठी ही कथा लिहिली आहे हे कळत नाही. ज्याला 'मित्र' म्हटले आहे, तो एकदाच कृष्णाच्या मोठेपणाच्या आयुष्यात येतो व स्वतःची गरज भागवून जातो. आपल्या राज्यातल्या ब्राह्मण वगैरेंना तृप्त ठेवणे हे राजाचे कामच आहे. तेव्हा कृष्णाने केले ते योग्यच. पण हा संबंध मित्रत्वाचा नव्हे, असेच महाभारताच्या आचारविचारांच्या चौकटीचा विचार