पान:Yugant.pdf/243

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२६ / युगान्त

 ही आयुष्याची गती भीष्माला चुकवता आली नाही. अंबेला चुकवता आली नाही. धर्माला चुकवता आली नाही, प्रत्यक्ष श्रीकृष्णालाही चुकवता आली नाही. भारत 'इतिहास' म्हणून गाईले गेले. 'हे असे झाले'. ते होत असताना व्यक्तीच्या आशा, आकांक्षा, तडफड, निराशा ह्या सर्वांचे चित्रण आले आहे; आणि सर्व मानवी पातळीवर. अतिमानुष चमत्कार जवळ-जवळ नाहीतच म्हटले तरी चालेल. देव किंवा इतर शक्ती आणून माणसांना संकटांतून, निराशेतून काढले असे आढळत नाही.
 ह्या सगळ्याच्या मागे आचाराची आणि विचाराची एक घट्ट चौकट होती. ज्या गोष्टी करायच्या त्या धर्म म्हणून, कर्तव्य म्हणून, पुष्कळदा पुढे वाढून ठेवलेल्या आहेत, म्हणून करावयाच्या.त्यांतून सर्व सुखे मिळतील, ही आशाच कधी नव्हती. काही थोडेसे मिळाले, तर त्याच्याबरोबर पुष्कळसे गेलेले असायचे. युद्धामध्ये एक जीव मरतो व जो जगाच्या दृष्टीने जिंकतो, तो सर्व सुखे गमावून. ह्या कथेतून मनुष्याच्या आकांक्षापूर्तीला वाव नाही. मनुष्याच्या आकांक्षा सर्व प्रकारे पुरवील असे दैवत नाही. खोट्या इच्छापूर्तीच्या कल्पनाही नाहीत. मनुष्य व त्याचे दैवत ही दोन्ही प्रचंड संसारचक्रात सापडलेली होती. ते चक्र परतवण्याचे सामर्थ्य कोणातच नव्हते.
 मानवी जीवनाच्या मर्यादा महाभारतात स्वच्छ, स्पष्ट सांगितल्या आहेत. ह्या मर्यादा ओलांडण्याची कुठच्याही तऱ्हेची स्वप्नसृष्टी महाभारतात दिसत नाही. काहीतरी अघटित घडावे, कोणाची तरी कृपा व्हावी व एकदम वाईटाचे चांगले व्हावे, असा प्रकार दिसत नाही. कर्तव्य करण्याचा उपदेश केला गेला, त्यावेळी सुखाचे किंवा वैभवाचे आमिष दाखवले गेले नाही. प्रश्न होता, तो मानाने जगण्याचा, आणि मानाने मरण्याचा आणि हा मान होता जन्मजात मूल्ये सांभाळण्याचा. 'जन्मजात' हा शब्द बुद्ध्या वापरला आहे.