पान:Yugant.pdf/242

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
युगान्त / २२५
 


आपल्या स्वतःला व बायको-मुलाला विकतो. शेवटी आपल्या बायकोला मारायला तो तयार होतो आणि मग त्याच्या एकवचनीपणामुळे प्रसन्न झालेला विश्वामित्र ऋषी त्याच्या मेलेल्या मुलाला जिवंत करून सर्व राज्य परत देतो - अशी कथा आहे.
 ऐतरेयातला राजा मनुष्य होता. देवालासुद्धा तो आपला मुलगा द्यायला तयार नव्हता. वचनभंगाच्या पातकामुळे जलोदर झाल्यामुळे त्याने दुसराच एक विकत घेतलेला मुलगा देऊ केला, पण आपला, मुलगा दिला नाही. नवस करणे म्हणजे देवाला प्रत्यक्ष वचन देण्यासारखेच आहे.पण राजाला मुलापुढे वचनाची किंमत नव्हती. ह्याउलट पुराणकालीन राजा स्वप्नात दिलेले वचन पुरे करण्यासाठी नाना तऱ्हेचे छळ पत्करतो; मनुष्यस्वभावाला विसंगत अशा गोष्टी करीत राहतो; आणि शेवटी सर्व काही परत मिळून वचनपूर्ती (म्हणजे राज्यदान) होतच नाही. सत्यवचनीपणा हे एक मायाजाळच ठरते.
 हरिश्चंद्र कथाच नव्हे, तर मागाहून येणाऱ्या इतरही कथा ह्याच धर्तीच्या आहेत. कुठल्यातरी एका गुणाची परिसीमा दाखवायची, आणेि शेवटी होणारा सत्यानाश न दाखवता सर्वतोपरी चांगलेच झाले, असे दाखवायचे, अशा धर्तीच्या ह्या नव्या युगातील कथा आहेत. महाभारताच्या काळापर्यंतचे वाङ्मय अगदी ह्याच्या उलट आहे.
 महाभारताची कथा पहा. त्यामधली माणसे ही हाड़ामासाची, एका विशिष्ट समाजात राहणारी आहेत. ती काही कृत्ये करीत असतात व त्याची निमूटपणे फळे भोगीत असतात. आयुष्याच्या चाकाला एक दिशा व गती मिळालेली असते. ती दिशा बदलत नाही, ती गती थोपवली जात नाही. तो मनुष्य बाई असो, पुरुष असो, राजा असो, श्रीमंत असो, कंगाल असो, मनुष्य असो, देव असो, आयुष्याच्या ठरलेल्या फेऱ्यातून त्याला सुटका नाही. काही दिवस सुखाचे, ऐश्वर्याचे, भरभराटीचे काही दिवस दुःखाचे,कष्टाचे, किंवा सर्वनाशाचेसुद्धा!