पान:Yugant.pdf/241

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२४ / युगान्त

 इंद्राने सहा वर्षे त्याला रानातच भटकत ठेवले. शेवटी वचनभंगाचा राग येऊन वरुणाने राजाला शिक्षा केली. ती शिक्षा म्हणजे जलोदराचा रोग. जलोदराचा रोग होणे म्हणजे वरुणाच्या अवकृपेचे लक्षण समजले जाई.
 रोहिताने रानात अजीगर्त नावाच्या गरीब ब्राह्मणाचा शुनःशेप नावाचा मुलगा शंभर गाई देऊन विकत घेतला. तो रानातून घरी आला व शुनःशेपाला राजाच्या स्वाधीन करून म्हणाला, “माझ्या ऐवजी ह्याला वरुणाला द्या” राजाने वरुणाला प्रार्थना केली की, "माझा मुलगा काही तुला देता येत नाही. त्याऐवजी दुसरा ब्राह्मण मुलगा बळी देईन. तो तू गोड करून घे. मला वचनातून आणि रोगातून मुक्त कर" वरुणाने म्हटले, “क्षत्रियापेक्षा ब्राह्मण बळी मला जास्त पसंत आहे .तुझे म्हणणे कबूल आहे.” शुनःशेपाला यज्ञस्तंभाला बांधले व वरुणाप्रीत्यर्थ यज्ञ सुरू झाला. शुनःशेपाला मारायला कोणी तयार होईना. तीनशे गाई घेऊन ठरल्या वेळी मुलावर प्राणघातक वार करायला अजीगर्त तयार झाला. यज्ञाला विश्वामित्र व इतर मोठे ऋषी आले होते. आपण आता बळी जाणार, हे पाहून शुनःशेपाने वरुणासुद्धा सर्व देवांची करुणा भाकली. वरुणाच्या स्तुतीचे काव्य तो म्हणू लागला. आणि एकेका कडव्याबरोबर त्याचे पाश गळून पडू लागले. उषेने प्रसन्न होऊन शुनःशेपाला मोकळे केले. वरुणाने राजालाही रोगमुक्त केले व मिळाला तो हविर्भाग घेऊन तो निघून गेला. यज्ञाच्या शेवटी शुनःशेपाने आई-वडिलांकडे जाण्याचे नाकारले. पोटाची खळगी भरण्यासाठी पोटच्या पोराला विकणारे व मारण्यास तयार होणारे हे लोक माझे आईबापच नव्हेत, असे तो म्हणू लागला व विश्वामित्राने त्याला दत्तक घेतले, अशी आहे जुनी कथा. पुराणांतरी हीच कथा अगदी निराळ्या स्वरूपात सांगितलेली दिसते. हरिश्चंद्र राजा स्वप्नात दिलेले वचन पुरे करण्यासाठी राज्य सोडतो.