पान:Yugant.pdf/240

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / २३३
 

बसणारी आहे. ह्या साध्या व काहीशा व्यापारी गोष्टीचे रूपान्तर कालिदासाने एका रम्य स्वप्नसुष्टीत केले आहे. शाकुन्तलाचा चौथा अंक एकदा वाचला की, कधी त्याचा विसरच पडत नाही. पण मूळ कथेची धार मात्र अजिबात बोथटते. नुसती शकुन्तलाच निरागस दाखवून भागत नाही, तर अंगठीचे प्रकरण व दुर्वासऋषीचा शाप आणून राजालाही निरागस बनविण्याचा प्रयत्न तितकासा साधत नाही. शेवटचे कौटुंबिक मीलन तर इतके साचेबंद की, ते कालिदासाच्या काही सुंदर कविता किंवा उपमा नसत्या, तर वाचवलेच नसते. सगळेच पराकाष्ठेला नेऊन पोहोचवायचे. पराक्रम, निरागसता, विरह, श्रृंगार व शोक ही ठराविक साच्यात अत्युक्तीपूर्ण दाखवायची! द्रौपदी अर्जुनासाठी झुरत होती, तर महाभारतात चार-दोन श्लोक येतात. कुंतीच्या सवती-मत्सर व स्वतःबद्दलची कीव दाखवली आहे, ती आगीने धगधगणाऱ्या एका श्लोकात. कर्णाचे वैफल्य व निराशा एका वाक्यात. एक वाङ्मय रम्य, हृद्य व नादमधुर पण आभासमय तर दुसरे कठीण,खडबडीत, अत्यंत थोडक्यात व वर्षानुवर्षे विचार करावयास लावणारे !
 अशाच तऱ्हेचा अतिरेक पुराणकालीन कथांतूनही आढळतो. महाभारतात नाही पण ऐतरेय-ब्राह्मणात हरिश्चंद्राची कथा आली आहे, ती पुढील काळातील पौराणिक कथेशी ताडून पाहण्यासारखी आहे. हरिश्चंद्र राजाने मुलगा व्हावा म्हणून वरुणाची प्रार्थना केली आणि असे वचन दिले की, 'मुलगा झाला, तर तो वरुणाला अर्पण करीन.' वरुणाच्या कृपेने राजाला मुलगा झाला. त्याचे नाव रोहित. मुलगा जन्मल्यापासुन वरुण हा राजाकडे येऊन मुलाची मागणी करू लागला, आणि राजाने 'मुलगा अजून लहान आहे, अजून त्याला दात आले नाहीत,' अशा निरनिराळ्या सबबी सांगून वरुणाला परत घालवून दिले. मुलगा चांगला मोठा झाल्यावर 'आता तुला बळी द्यावयाचे,' असे त्याला सांगितले. त्याबरोबर 'छे' असे म्हणून