पान:Yugant.pdf/239

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२२२ / युगान्त

मीलन होऊ लागले. 'विक्रमोर्वशीय', 'अभिज्ञान शाकुन्तल' ह्यांचाही शेवट तोच.अशाच तऱ्हेचे चित्र पाश्चात्त देशांत आज एक प्रकारच्या लिखाणात दिसते. कौटुंबिक जीवनाची नित्य क्रूर मोडतोड होत असते. रकानेच्या रकाने भरून सर्व वर्तमानपत्रांतून तिची वर्णने येत असतात; पण राजकारणी पुरुषांची चित्रे येतात, ती मात्र बायकांमुलांबरोबर काढलेल्या कुटुंब-मेळाव्याची, असा आजच्या पाश्चात्त्य देशांत दिसणारा विरोध ह्या नाटकात दिसतो. पुष्कळ बायका असलेला वयस्कर राजा राणीच्या परिवारातील वा इतर कुठे दिसतील त्या सुंदर पोरींच्या मागे लागलेला असतो, त्यांच्याशी त्याचा विरह होतो व शेवटी पुनर्मीलन होते ते प्रौढ बनलेल्या प्रियेचे व तिच्यापासून झालेल्या, चांगल्या वाढलेल्या मुलाचे! सर्वच खोटे. प्रेम खोटे, विरह खोटा, कौटुंबिक जिव्हाळाही खोटा आणि वाईट वाटते ते ह्यासाठी की, ह्या देखाव्याचे वर्णन करणारे खरोखरीचे कवी होते. त्यांचे काव्य हृदयाला भिडते; मात्र कोणाबद्दल व कशाच्या अनुषंगाने ते लिहिले आहे, ते विसरले पाहिजे.
 महाभारतातील 'शकुन्तलोपाख्यान' व कालिदासाचे 'अभिज्ञान शाकुन्तल' ह्यांचा अभ्यास करावा, म्हणजे वरील वचनाची प्रचीती येते. महाभारतातील राजा व शकुन्तला दोघेही स्वार्थी व धूर्त होते. दोघे परस्परांची पारध करीत होते. शकुन्तलेला आश्रमात मुलगा झाला. तो द्वाडपणा करून सर्वांना त्रास देऊ लागला, तेव्हा कण्वाने तिची पाठवणी केली व राजाने तिला ओळखूनही कानांवर हात ठेवले. मग आकाशवाणी होऊन शकुन्तलेचा व मुलाचा स्वीकार झाला. मुलगा होता, तो राजाला हवा होता, म्हणून शकुन्तलेच्या आयुष्याची विटंबना झाली नाही. ह्या गोष्टीत स्वभावदर्शन आहे. राजाची व विशेषतः शकुन्तलेची राजदरबारातील भाषणे फारच छान वठलेली आहेत. त्यांत राग आहे, उपरोध आहे, अगतिकता आहे. गोष्ट साधी आहे. त्या वेळच्या मूल्यांत व चालीरीतींत