पान:Yugant.pdf/238

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
युगान्त / २२१
 

हा अंतर्गत विरोध अशा धर्मातून दिसून येतो. तिसरी भूमिका सर्वस्वी अगतिक आणि निराशावादी. दुसऱ्या व तिसऱ्या भूमिकेत असामान्य करुणा भरून राहिलेली आहे. पुष्कळदा existentialist लिखाण अती कठोर व विदारकही असते, पण त्याचा उगम ‘मानवी जीवन विफल आहे,' ह्या ठाम समजुतीत आहे.
 जे महाभारतकाली नव्हते, जे बुद्धकाली होते व हल्लीही आहे, ते म्हणजे विभूतिपूजन व संघपूजन. 'बुद्ध सरणं गच्छामि' 'संघ सरणं गच्छामि' हेच सूत्र हल्लीही फार प्रमाणात दिसून येते. 'विभूती' ह्या ऐतिहासिक वा धार्मिक विभूती असतात, व 'संघ' म्हणजे ह्या विभूतींनी स्थापलेले ख्रिस्ती, कम्युनिस्ट वगैरे संघ असतात. विभूतिपूजेपोटीच भक्तिमार्गाचा जन्म झाला. विभूती वा दैवत विफलतेपासून आपली सुटका करील, अशी एक आशा उत्पन्न झाली. तिच्या पोटी काही अतिएकतर्फी संहारास उद्युक्त करणारे, त्याचप्रमाणे अतिरम्य हृद्य लिखाणाबरोबरच स्वप्नाळू अवास्तव लिखाणही उत्पन्न झाले. दैवकल्पना, भक्तिभाव, एकेश्वरी पंथ, कठीण वास्तव विसरण्याचा प्रयत्न हे सर्व मागाहून आलेले- महाभारतात नाही असे. त्यादृष्टीने महाभारत युगान्तच. एकतर्फी संहारास उद्युक्त करणारे लिखाण भारतात झाले नाही. कारण भारत अनेक दैवतवादाला चिकटून राहिला, पण भारतातील लिखाण स्वप्नाळू झाले. महाभारतातील सर्वव्यापी निराशेची वा वैफल्याची भावना, कठोरपणा व वास्तवता पुन्हा भारतीय लिखाणात आलीच नाही. मनोभूमिकेतील व वाङ्मयातील फरक काही उदाहरणांवरून स्पष्ट होईल.
 भरताने आपल्या नाट्यशास्त्रात स्पष्टच सांगितले आहे की, नाटक शोकान्त होता कामा नये. हा नियम पुढील नाटककारांनी या इमानाने पाळला की, मूळ शोकात्म कथासुद्धा 'उत्तररामचरित'सारख्या नाटकात सुखान्त होऊ लागल्या. नायक, नायिका व त्यांची मुले ह्यांचे एका सुंदर कौटुंबिक मेळाव्यात शेवटी